माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

१ मे, २००७

माझ्या 'बुध्दीचे बळ'! ४

प्रतिस्पर्ध्यावर हल्ला करण्याच्या आधी आपल्या राजाला कडेकोट बंदोबस्तात ठेवणे(कॅसलिंग करणे) ही फार महत्त्वाची बाब असल्याचे श्री.बाबूर ह्यांच्या वक्तव्यावरून मनावर ठसले. मात्र हा बंदोबस्त राजाच्या बाजूला करावा की वजीराच्या बाजूला करावा हे मात्र खेळाचा आणि प्रतिस्पर्ध्याच्या आक्रमणाचा कल लक्षात घेऊनच केला पाहिजे हे त्याहूनही अधिक महत्त्वाचे तत्त्व लक्षात ठेवणे भाग होते. चुकीच्या वेळी चुकीच्या बाजूला राजाला किल्ल्यात बंद करणे म्हणजे प्रतिस्पर्ध्याला आपणहून त्याठिकाणी हल्ला करायला मदत करण्यासारखे असते आणि संरक्षण होण्याऐवजी नाहकपणे राजा संकटात सापडतो. आपले सगळे सैन्य त्याच्या रक्षणासाठी तिथेच अडकून पडते आणि आपल्याला प्रतिहल्ला करता येत नाही. तात्पर्य काय की १)आपला राजा तर सुरक्षित राहायला हवा आणि २)प्रतिस्पर्ध्याला त्याच्या आक्रमणाची दिशा पक्की करू द्यायची नाही आणि ३) आपण आक्रमण जारी ठेवून त्याच्या राजाला खिंडीत गाठायचा प्रयत्न करायचा जेणेकरून त्याचे सैन्य त्याच्या बचावात अडकून राहील. अशा तर्‍हेने योजना करायची म्हणजे सखोल विचार करणे ओघाने आलेच. हा विचार करताना शक्याशक्यतांचा विचार करणे क्रमप्राप्तच असते. तेव्हा घिसाडघाई अजिबात कामाची नाही आणि त्याच वेळी वेळकाढूपणाही कामाचा नाही. म्हणजे समतोल वृत्तीने विचार करायचा. हे सगळे त्यांनी आम्हाला व्यवस्थित उकल करून सांगितले आणि त्यामुळे आमचा आत्मविश्वास दुणावला.

दुसर्‍या दिवशी अतिशय आत्मविश्वासाने आम्ही दोघे खेळायला उतरलो आणि अगदी चुटकीसरशी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. आमचाच आमच्यावर विश्वास बसला नाही कारण प्रतिस्पर्धी बरेच अनुभवी होते असे(नंतर) कळले;पण कालचा उपदेशाचा डोसच इतका ताजा होता की आम्ही दोघे जोश्यातच होतो आणि त्यामुळे प्रतिस्पर्ध्यांचे आमच्यापुढे काहीच चालले नाही. अशा तर्‍हेने सहा डावात ४-४ गुणांची कमाई करून आम्ही तिथल्या त्या लोकांच्या चर्चेचा विषय झालो होतो;पण खरी लढाई तर पुढेच होती. कारण जसजसे गुण वाढत जातात तसतसे येणारे प्रतिस्पर्धी हे सराईत खेळाडू असतात आणि त्यांच्याबरोबर खेळून त्यांना हरवणे हे इतके सोपे नसते.

आतापर्यंत झालेल्या सहा फेर्‍यांतून सहाच्या सहा गुण मिळवलेलेही काही खेळाडू होते. तसेच साडे पाच,पाच,साडेचार असे गुण मिळवणारेही खेळाडू होते. अशांपैकीच कुणीतरी आम्हाला प्रतिस्पर्धी म्हणून भेटणार होते. त्यामुळे नाही म्हटले तरी एक प्रकारचे दडपण जाणवत होतेच. ह्या अवस्थेतच मी ७वा डाव बरोबरीतच सोडवला आणि भाऊ त्याचा डाव जिंकता जिंकता हरला. आता माझे ४.५ आणि भावाचे ४ गुण झाले होते.पुढचाच डाव मी सडकून हरलो आणि भाऊ मात्र आरामात जिंकला. आता आठ डावात माझे ४.५ तर भावाचे ५ गुण झाले.शेवटच्या आणि निर्णायक डावात आमच्या दोघांच्याही काळ्या सोंगट्या होत्या;पण मी मोठ्या शर्थीने लढत देऊन हरता हरता अचानक बाजी पालटवत जिंकलो(प्रतिस्पर्ध्याने मोठ्या मनाने माझे अभिनंदन केले) आणि तिथे भावाने त्याचा डाव बरोबरीत सोडवला. आमचे दोघांचे नऊ डावात प्रत्येकी ५.५ गुण झाले. एव्हढ्या मोठ्या खुल्या स्पर्धेत पहिल्यांदाच भाग घेऊन आम्ही मिळवलेले गुण केवळ आमच्याच नव्हे तर काही जाणकारांच्या मतेही अतिशय मोलाचे होते. ह्या गुणांच्या कमाईमुळे आमची निवड पुढच्या वर्षी होणार्‍या वरिष्ठ गटासाठी झाली.

ह्या स्पर्धेत खेळणारा एक अतिशय नाजूक प्रकृतीचा,कुरळे केस असणारा आणि काहीसा बायकी दिसणारा,गोरापान तरुण ९ च्या ९ डाव जिंकून पहिला आला. कोण होता तो? माहिताय? अहो तो तरुण म्हणजे आजचा भारताचा आघाडीचा 'ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे' होय(बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणतात!). सुदैवाने म्हणा की दुर्दैवाने म्हणा आम्हा दोघांपैकी कोणाशीही त्याची गाठ पडली नाही. सुदैवाने एव्हढ्यासाठी की त्याच्याबरोबरचा सामना आम्ही हरलोच असतो.तेव्हा न खेळल्यामुळे इज्जत वाचली आणि दुर्दैवाने अशासाठी की खेळून हरलो जरी असतो तरी आज सांगता आले असते की मी त्याच्याशी खेळलो होतो(चुकून जिंकलोही असतो! असेही म्हणायला काय हरकत आहे?).त्याच्या बरोबरीने त्याचा मोठा भाऊ 'अभय ठिपसे' हाही त्या स्पर्धेत खेळला होता आणि माझ्या आठवणीप्रमाणे त्याने आठ गुण कमावले होते. आज तो मुंबईत 'मॅजिस्ट्रेट' म्हणून कार्यरत आहे.ह्या दोन बंधूंसारखेच अजून काही राष्ट्रीय पातळीवर भविष्यात गाजलेले खेळाडू ह्या स्पर्धेतून पुढे आले ते म्हणजे 'अविनाश आवटे,रवी हेग्गडे,घाटे,डोंगरे आणि अजून काही.

त्यानंतरच्या पुढील दोन्ही वर्षी आम्ही दोघे वरिष्ठ गटात खेळलो आणि मी व माझ्या भावाने अनुक्रमे पहिल्या वर्षी ४.५ व ५ आणि दुसर्‍या वर्षी ४.५;४.५ गुण मिळवले. लागोपाठ दोन वर्षे वरिष्ठ गटात खेळूनही आम्ही पुढच्या गटात(राज्य स्तरीय) खेळण्यास पात्र ठरविणारे कमीत कमी ५.५ गुण मिळवू शकलो नाही. म्हणून पुन्हा एकदा आम्हाला कनिष्ठ गटात खेळून आपली पात्रता सिद्ध करावी लागणार होती(पुन्हा बिगरीत बसणे आले कपाळी!).

मग आम्ही दोघांनी ठरवले की आता तिथे(झंडू कॅंटीन) खेळायचे नाही.झाला तेव्हढा तिथला खेळ पुरे झाला. आता खेळलोच तर बाहेर कुठेही होणार्‍या खुल्या स्पर्धेतच खेळायचे. तिथे खेळूनच आपला अनुभव वाढवायचा.

क्रमश:

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: