हिंदी-मराठी चित्रपट आणि मराठी नाटकात गाजलेल्या जुन्या पिढीतील एक स्त्री कलाकार म्हणजे श्रीमती दुर्गा खोटे. हे नाव उच्चारताच दुर्गाबाईंचे ते खानदानी रुप डोळ्यासमोर दिसू लागते.
अतिशय लाडाकोडात आणि ऐश्वर्यात वाढलेली लाडांच्या घरातली ही माहेरवाशीण लग्नानंतर खोट्यांच्या घरात गेली. खोट्यांचे घराणेही तितक्याच तोलामोलाचे होते. पण व्यापारात खोट बसून असलेले सगळे वैभव पार धुळीला मिळाले आणि खोटे कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आले. माहेरच्या मदतीमुळे राहाण्याची सोय झाली तरी मानी बानूला(बानू हे दुर्गाबाईंचे माहेरचे घरगुती नाव) बापाच्या जीवावर जगणे अमान्य होते. ऐष आरामात लोळणार्या नवर्याला कमावण्याची अक्कल नव्हती त्यामुळे मग दुर्गाबाईंनाच हातपाय हलवावे लागले. त्यातून पदरात दोन मुलेही होती. ह्या अशा परिस्थितीमुळे आणि निव्वळ योगायोगामुळे दुर्गाबाईंनी तोंडाला रंग फासला आणि एका सुमार चित्रपटात भूमिका केली. पहिलाच अनुभव इतका भयाण होता की घरच्यांनी त्यांना ह्यापुढे चित्रपटात काम करायची बंदी केली. पण पुन्हा एक संधी प्रभातच्या व्ही. शांताराम ह्यांच्याकडून मिळाली आणि मग दुर्गाबाईंच्या वडिलांच्या सर्व वकिली अटी मान्य करून प्रभातने त्यांच्याशी करार केला. इथून मग दुर्गाबाईंनी पुन्हा मागे वळून पाहिले नाही.हा सर्व इतिहास खुद्द दुर्गाबाईंच्या तोंडून ऐकण्यात गंमत आहे.
बालगंधर्व हे नाट्य सृष्टीचे चालते बोलते दैवत होते. त्यांच्याबद्दल दुर्गाबाई भरभरून बोलतात. तसेच समकालीन नट,नट्या ह्यांच्याबद्दलच्या आठवणींही त्यांनी शब्दबद्द केलेत.दुर्गाबाईंची दोन लग्ने झाली. त्यासंबंधीही त्यांनी सविस्तर लिहिले आहे. त्यांची दोन मुले बकुल आणि हरीन ह्यांच्याबद्दलही भरभरून लिहिलेय. त्यांची एक सून विजया हरीन खोटे(पुर्वाश्रमीच्या विजया जयवंत आणि सद्याच्या नामवंत दिग्दर्शिका आणि अभिनेत्री श्रीमती विजया मेहता)ह्यांच्या अनुषंगानेही काही गोष्टी सांगितलेल्या आहेत.दुर्गाबाईंचे दुसरे पती श्री.रशीद ह्यांच्याबद्दलची सविस्तर माहिती देखिल ह्यात आहे.
दुर्गाबाईंनी कधी एकटीने तर कधी सिनेसृष्टीतील शिष्ठमंडळाबरोबर केलेल्या प्रवासाचे साद्यंत वर्णन वाचताना आपण त्यात रंगून जातो.आपली संपूर्ण चित्रपट आणि नाट्य कारकीर्द दुर्गाबाईंनी अतिशय समर्थ शब्दात उभी केलेय. ती त्यांच्याच शब्दात वाचण्यातली मजा काही औरच आहे. एकदा हातात घेतलेले हे पुस्तक पूर्ण वाचून होईस्तो खाली ठेववत नाही ह्यातच त्याचे यश सामावलेले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा