माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२१ डिसेंबर, २००७

आठवणी!शालेय जीवनातल्या!१४

माझी शाळा अगदी घराजवळच होती. त्यामुळे शाळा भरल्याची,सुटल्याची, इतकेच काय प्रत्येक तास संपल्याची घंटा देखिल घरात ऐकू येत असे. शाळा भरल्याची घंटा वाजली की मी घरातून निघत असे आणि प्रार्थनेची सुरुवात होण्याच्या आधीच आपल्या जागेवर स्थानापन्न झालेला असे. मात्र ६वी पासून माझी वर्णी प्रार्थना म्हणणार्‍यांत लागल्यामुळे मला १० मिनिटे आधीच शाळेत पोचावे लागे.
प्रार्थनेला आमचे गाडगीळ सर पेटीवर साथ करत. शाळा तिमजली होती आणि आम्ही पहिल्या मजल्यावरच्या मार्गिकेमध्ये उभे राहून प्रार्थना म्हणायचो. सुरुवातीला शाळेत ध्वनिक्षेपकाची सोय नव्हती त्यामुळे प्रार्थना सगळ्या वर्गात ऐकू जायची नाही. म्हणून प्रार्थना सुरु होण्या आधी आणि नंतर, घंटेचा एक टोल वाजत असे. माझ्या समावेशामुळे प्रार्थना बर्‍याच वर्गात ऐकू जाऊ लागली असे बर्‍याच शिक्षकांकडून कळले. त्याबद्दल माझे आणि माझ्या आवाजाचे कौतुकही झाले. माझ्या पहाडी आवाजाचा हा असाही एक फायदा झाला.

आम्हाला दोन मधल्या सुट्ट्या असत. एक १५ मिनिटांची आणि दुसरी ३० मिनिटांची.
पहिल्या सुट्टीत पाणी पिण्यासाठी ही झुंबड उडायची म्हणून मी घरी येऊनच पाणी पीत असे. हळूहळू माझ्याबरोबर माझे वर्गमित्रही यायला लागले. मग हे प्रकरण इतके वाढले की आईने ओट्यावर एक नळ असलेला माठ आणि दोनचार भांडी ठेऊन सगळ्यांची सोय केली.

दुसर्‍या सुट्टीत मी जेवायला घरीच येत असे. जेमतेम दहा मिनिटांत जेवून उरलेला वेळ पुन्हा शाळेत जावून खेळण्यात घालवत असे. एकदिवस ह्या सुट्टीत मी घरी जाताना एक वर्गबंधू माझ्या बरोबर घरी आला. माझ्याबरोबर आईने त्यालाही जेवायला वाढले. त्यानंतर मग तो येतच राहिला . इतका की एखादे वेळेस मी घरी उशीरा पोचत असे पण हा माझ्या आधीच जावून पाटावर बसलेला असे. मला अस्सा राग यायचा त्याचा की काही विचारू नका. "रोज रोज कशाला रे येतोस माझ्या बरोबर जेवायला?" असे मी त्याला विचारले तरी तो काहीच उत्तर देत नसे. निमूटपणे जेवायचा आणि शांतपणे निघून जायचा. जेवण आटोपल्यावर तो माझ्या, बरोबर येण्याची देखिल वाट पाहात नसे.

मी आईला कितीतरी वेळा सांगितले की "तू त्याला जेवायला देत जावू नकोस. तो हावरट आहे. त्याचा डबा आधीच्या सुट्टीत खातो तेव्हा मलाही काही देत नाही आणि दुसर्‍या कुणालाही काही देत नाही. पक्का आप्पलपोटा आहे. रोज त्याच्या डब्यात छान छान पदार्थ असतात. शीरा,उपमा,थालीपीठ,घावनं,तुपसाखर पोळी,गुळसाखरपोळी तर कधी कधी पुरणपोळी देखिल असते; पण हा कुणाला त्याचा वासही देत नाही. ह्या अशा मुलाला तू कशाला लाडावून ठेवतेस? मला तो अजिबात आवडत नाही."

आई आपली नेहेमी एकच सांगायची, " अरे कसा ही असला तरी तुझा मित्रच आहे ना?"
मी, "नाही"! म्हणायचो. पण एक नाही आणि दोन नाही.
"अरे, दिल्याने आपले काऽऽही कमी होत नाही. भुकेलेल्याला अन्न आणि तहानेलेल्याला पाणी दिले की पुण्य लागते."
"तो काही भुकेलेला बिकेलेला नाही. चांगला चापून येतो स्वत:चा डबा आणि इथे येवून फुकट मध्ये खात असतो. त्याच्यापेक्षा एखाद्या भिकार्‍याला जेवायला घाल तू रोज. मी काही म्हणणार नाही."

पण माझ्या बोलण्याचा,त्रागा करण्याचा ना आईवर परिणाम व्हायचा ना त्या वर्गबंधूवर. माझ्या पुढे गहन प्रश्न पडला. आता ह्याला ह्या पासून परावृत्त कसे करायचे? काहीतरी युक्ती केली पाहिजे. पण काय करणार? शारिरीक दृष्ट्या मी दुबळा होतो त्यामुळे त्याला माराची भिती दाखवणे शक्य नव्हते आणि असे काही मी केले असे आईला कळले असते तर माझीच पाठ शेकली गेली असती. मग करावे तरी काय? बराच विचार केला पण काही सुचेना. मग मी हे माझ्या दुसर्‍या एका वर्गबंधुला विश्वासात घेऊन सांगितले आणि त्यावर त्याचे मत मागितले. तो चटकन म्हणाला, "आयला,त्यात काय आहे? तू त्याचा डबा खा मग बघ कशी खोड मोडेल ती."
"अरे पण त्याच्या डब्याला तो हात तरी लावू देईल काय? मग खाणे तर दूरच राहिले."
"तू पण ना चम्याच आहेस(खरे तर पम्याच). इतके कसे कळत नाही तुला की तो डबा खाण्याआधी हात धुवायला जातो, तेव्हाच त्याचा डबा लांबवायचा आणि शाळेच्या मागे जाऊन गुपचुप खायचा."
"अरे पण हे कसे शक्य आहे? तो शिक्षकांकडे तक्रार करेल ना माझी आणि मग इथे शिक्षक आणि घरी गेल्यावर आई माझी पाद्यपुजा करेल त्याचे काय? नाय बाबा. आपल्याला हे जमणार नाही."
"मग रडत बस." असे म्हणून त्या मित्राने माझा नाद सोडला. मी देखिल काय करावे आणि कसे करावे ह्या विवंचनेत गढून गेलो.

1 टिप्पणी:

अनामित म्हणाले...

मस्त. मला तुमच्या लिखाणातील सर्वात आवडलेली ही मालीका आहे. सानेगुरूजी -शाम तश्या संस्काराची ही मालीका वाटते. पुढच्या भागाला इतका वेळ लावू नका.