लग्न थाटामाटात पार पडले. पण मित्रांच्या अनुपस्थितीमुळे माझा जीव तिथे रमला नाही. त्या सर्व राजस्थानी वातावरणात मी मला उपराच वाटत होतो. नेमीचंद मात्र मधून-मधून माझ्या आसपास राहून माझा एकटेपणा कमी करायचा प्रयत्न करत होता. रात्री खूप उशीराने वधूसहित वरात परतली. नेमीचंदने माझी झोपण्याची व्यवस्था त्याच्या बरोबरच केली. सकाळपासूनच्या धावपळीने अंथरुणावर पडल्या पडल्या झोप लागली. सकाळी खूप लवकर जाग आली. प्रातर्विधी उरकून चहा-पान झाल्यावर मी माडीवर परतलो. अजूनही सगळेजण शांतपणे झोपले होते. लग्न होऊन गेले असल्यामुळे आता इथे राहण्यात विशेष स्वारस्य नव्हते. इथून पुढच्या प्रवासाची तयारी करणे क्रमप्राप्त होते. पण हे कुंभकर्ण उठतील तेंव्हाच पुढच्या हालचालींना वेग येणार होता. हळूहळू एकेक जण उठू लागला. गप्पा-टप्पा सुरू झाल्या. ह्या वेळी मात्र सर्वजण शुद्धीवर असल्याचे जाणवले. मी सगळ्यांना लवकर तयारी करायला सांगितले. त्यांना उद्देशून म्हणालो, आपल्याला आता पुढे दिल्लीला जायचे आहे तेंव्हा चला पटापट उठा आणि तयारी करा!
माझे बोलणे ऐकून सगळे चक्रावले. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आज लग्न झाले की मगच निघायचे असे होते(त्यांच्या साठी कालचा दिवस उजाडलाच नव्हता). मला त्यांना सगळी कालची रामकहाणी सांगावी लागली;पण कुणाचाच विश्वास बसेना. एव्हढ्यात नेमीचंद आला. त्याचेही तसेच उत्तर ऐकून मग मात्र त्यांना आपली चूक उमगली. आपण कशासाठी आलो आणि केले काय? हे समजल्यावर त्यांना स्वत:ची लाज वाटायला लागली. ते नेमीचंदची क्षमा मागायला लागले. नेमीचंदने त्यांना त्याच्या वडिलांची क्षमा मागा असे सांगितले;पण कोणाचीही त्यांच्यासमोर उभे राहण्याची हिंमत होईना. मग मी पुढाकार घेतला. सगळ्यांना कसेबसे तयार करून नेमीचंदच्या वडिलांना भेटवले;त्यांची क्षमा मागायला लावले. त्यांनीही मोठ्या उदारपणे त्या सगळ्यांना क्षमा केली आणि दुपारचे जेवण जेवूनच पुढच्या प्रवासाला जाण्याची परवानगी दिली.
ह्या सर्वांची तयारी होईपर्यंत मी जरा इकडे तिकडे भटकून गाव बघून घेतले. परत आलो तो रात्रीची वरातीची घोडी तिथेच बांधलेली आढळली. मोतद्दाराला मस्का लावून तिच्यावर स्वार झालो आणि फोटो काढून घेतला(मुंबईहून खास आणलेल्या फॊटॊग्राफरने तिथे काढलेला हा पहिला फोटो).
दुपारची जेवणे आटोपल्यावर आम्ही चौघे जण (मी,दिन्या,पद्या आणि सुध्या)नेमीचंद आणि त्याच्या घरातील सर्वांचा निरोप घेऊन दिल्लीकडे प्रस्थान ठेवले. आम्ही ज्या मार्गाने जाणार होतो त्या मार्गावर अजमेर आणि जयपूर अशी काही प्रेक्षणीय स्थळे होती. ती बघूनच दिल्ली गाठायची असे ठरवूनच आम्ही आमचा पुढील प्रवास सुरू केला. अजमेरला उतरल्यावर तिथे नेमके काय पाहायचे हे माहीत नव्हते. विचारल्यावर कळले की 'ख्वाजा मोईनुद्दिन चिश्तीचा दर्गा' ही एकच पाहण्यासारखी जागा आहे. आम्ही एक उपचार म्हणून तो पाहून घेतला. बाकी थोडा वेळ इकडे तिकडे भटकण्यात आणि खरेदी करण्यात घालवला. मी इथूनच खास माझ्यासाठी राजस्थानी 'मोजडी' आणि आई व मोठ्या बहिणीसाठी खास 'बांधणी' पद्धतीच्या दोन साड्या घेतल्या.(बहिणीला साडी अजिबात आवडली नाही. पण योगायोग असा की ह्या साडीमुळेच तिचे लग्न जमले)इथून आम्ही जयपुरला गेलो. संपूर्ण शहर बघितले. जगप्रसिद्ध 'हवामहल' बघितला. हे शहर आम्हा सगळ्यांना खूप आवडले. त्यानंतर आम्ही दिल्लीच्या वाटेला लागलो.
गाडीत आमच्या समोर एक प्रौढ जोडपे बसले होते. त्यांच्यातील पुरुषाचे आमच्या बोलण्याकडे बारीक लक्ष होते. बराच वेळ आमचे बोलणे ऐकल्यावर त्यांनी आमच्याशी बोलायला सुरुवात केली. आम्ही कुठून आलो आणि कुठे जाणार आहोत ह्याची चौकशी केली. आम्ही दिल्लीला जात आहोत हे ऐकून त्यांनी दिल्लीला जाण्याचे कारण विचारले. आमचा दिल्लीदर्शन करण्याचा विचार त्यांना सांगितला तेव्हा ते म्हणाले की ते(दिल्लीदर्शन) आम्हाला पुढच्या दोन दिवसात घडणार नाही. कारण विचारले तेव्हा कळले की दुसर्या दिवसापासूनच दिल्लीत जयप्रकाश नारायणांच्या नेतृत्वाखाली संसद भवनाला घेराओ घालण्याचा राष्ट्रव्यापी कार्यक्रम आहे आणि देशाच्या काना-कोपर्यातून त्यासाठी तरुण-तरुणींचे जथ्थे दिल्लीच्या दिशेने येत आहेत. आमच्या समोर बसलेली व्यक्ती कोण होती ह्याचे मला कुतूहल होते म्हणून मी धीर करून त्यांना त्यांचे नाव विचारले. ते होते थोर सर्वोदयी नेते आचार्य विनोबा भाव्यांचे पट्टशिष्य 'श्री.वसंतराव नारगोळकर' आणि त्यांच्या पत्नी 'सौ.कुसुमताई नारगोळकर'. वर्तमानपत्रात त्यांचे सर्वोदय चळवळी संबंधीचे लेख मी वाचले होते;त्यामुळे मला त्यांना प्रत्यक्ष भेटून खूप आनंद झाला.
त्यानंतर मग बोलणे साहजिकच सध्यस्थितीवर म्हणजेच राजकारणावर सुरू झाले. बोलण्याच्या ओघात त्यांनी सांगितले की सध्या त्यांनी विनोबांची साथ सोडून ते जयप्रकाश नारायणांबरोबर काम करत आहेत. विनोबांच्या पट्टशिष्या कडून हे ऐकले आणि मी पटकन बोलून गेलो, विनोबा मूर्ख आहेत!
नारगोळकराना ते आवडले नाही .ते म्हणाले, अरे अजून तुला खूप दुनिया बघायची आहे. असे एकदम एव्हढ्या मोठ्या माणसाला तू मूर्ख कसे ठरवतोस? असे बोलू नये!
त्या वेळी मी ऐन तारुण्याच्या जोषात होतो(मगरुर होतो म्हणा ना), समोरचा कोण आहे,त्याची थोरवी,योग्यता काय आहे आणि आपली लायकी काय आहे असले 'क्षुद्र' विचार मनाला शिवत नसत. 'उचलली जीभ लावली टाळ्याला' असला प्रकार होता. शाळेत असताना विनोबांविषयी त्यांच्या लहानपणातील चुकीच्या वागण्याविषयीचा एक धडा होता आणि त्यात त्यांच्या आईने त्याना उद्देशून म्हटलेले 'विन्या,तू मूर्ख आहेस' हे वाक्य कुठे तरी स्मरणात होते. तेव्हढ्या भांडवलावर मी देखिल त्याना मूर्ख ठरवून मोकळा झालो होतो. त्यातून माझा कल हा जास्त करुन 'सावरकरवादी' विचारांकडे असल्यामुळे हे सगळे अहिंसावादी,सर्वोदयवादी किंवा तत्सम सगळे मवाळ लोक मला मूर्खच वाटत. त्यामुळे मी त्याच आगाऊपणाने त्यांच्याशी वितंडवाद घालू लागलो.
नारगोळकर हे हाडाचे कार्यकर्ते होते. कोसबाड सारख्या मागासलेल्या भागात राहून आदिवासींची उन्नती करण्याचे कार्य ते करत असत. त्यामुळे त्यांच्या बोलण्याला अनुभवाची जोड होती आणि मी मात्र फक्त आजपर्यंत वर्तमानपत्रातील लेख,अग्रलेख इत्यादि वाचून आपण सर्वज्ञ आहोत असा आव आणत होतो. माझे मतपरिवर्तन करण्याचा आटोकाट प्रयत्न त्यानी दिल्ली येईपर्यंत केला;पण माझ्या अडेलतट्टु स्वभावापुढे त्यांचे काहीच चालले नाही. तरी देखिल दिल्ली आल्यावर मोठ्या मनाने त्यानी मला, ’अनुभवातून शिकशील’ असा आशीर्वाद दिला आणि आम्ही आमच्या वेगवेगळ्या वाटा धरल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा