माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२ फेब्रुवारी, २००७

माझ्या लग्नाची चित्तरकथा!भाग ३

मुलगी बघायचा कार्यक्रम ठरला. मधल्या दोन-तीन दिवसांत योगायोगाने जागेसंबंधी बोलणी झाली आणि अगदी हाकेच्या अंतरावर तीन खोल्यांचा (भाडे तत्त्वावर) ब्लॉक (ठोकळा नव्हे) मिळाला. काय गंमत आहे बघा इतके दिवस, नव्हे वर्ष, जागा काय, मुलगी काय(वधू) कशाचाच पत्ता नव्हता आणि गेल्या दोन-तीन दिवसात एकदम जादूची कांडी फिरावी तसे सगळे घडत होते. अर्थात अजून मुख्य गोष्ट म्हणजे मुलीची पसंती कळायची होती. मनातल्या मनात मी तिला पसंत केलेले असले तरी हे सगळे एकतर्फीच होते. त्यामुळे अजून निश्चित असे काही सांगणे कठीण होते.

ठरलेल्या दिवशी मी माझ्या आई-वडिलांबरोबर तिच्या घरी गेलो. रितीप्रमाणे नमस्कार चमत्कार झाल्यावर मुलीला चहा-पोहे(हे सगळीकडे सारखेच) घेऊन बाहेर बोलावले गेले. मी चोरट्या नजरेने पाहून घेतले की 'ही' 'ती'च आहे ना? की बघण्यात काही घोळ होता?
'ही' ती'च होती. पण? आता,पण काय? पण ती खूपच जाडजूड होती. आणि मी बघितली होती (भूतकाळात) तेव्हा गुटगुटीत(अंगासरशी)होती. एकूण प्रकरण बरेच "वजनदार' होते. माझ्या बायकोबद्दलच्या(शारीरिक ठेवण)अपेक्षांमध्ये आता ही कशी बसणार? मनात तरंग उठायला लागले. चहा-खाणे सवयीप्रमाणे चालू होते. प्रश्नोत्तरांचा तास संपल्यावर(मी कोणताही प्रश्न विचारला नाही(हिंमतच झाली नाही) आणि तिने देखिल नाही) वडिलांनी उठण्याचा इशारा केला. माझं सारखं लक्ष आतल्या दाराकडे होतं. सारखं वाटत होते की तिथे कोणीतरी उभे आहे आणि माझ्याकडे बघतंय. मला राहून राहून वाटत होते की मला दाखवत असलेली, कदाचित मोठी मुलगी असावी आणि धाकटी तिच्याचसारखी दिसणारी(मी पाहिलेली) असावी. माझी चलबिचल पाहून तिच्या वडिलांनी ती जी कोणी होती तिला बाहेर बोलावले. पण ती खूपच वेगळी होती. म्हणजे मला दाखवत असलेली मुलगीच माझी ती "ही" च होती ह्याबद्दल शंका राहिली नाही. दोन दिवसात निर्णय कळवण्याच्या बोलीवर आम्ही त्यांचा निरोप घेतला.

घरी आल्या आल्या आईने तिचा निर्णय देऊन टाकला. म्हणाली,"नाकापेक्षा मोती जड! दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचे साम्य नाही, जोडा विजोड दिसेल. नकार कळवून टाका."
माझ्या मनातली "ती 'मला हवी होती आणि आता 'ही' जी मी बघितली ती देखिल 'ती'च होती पण तिच्यात आणि अगोदरच्या 'ती'च्यात खूपच 'वजनदार'बदल झाला होता. आता हिला मी होकार कसा देऊ आणि नकार तरी कसा देऊ? काहीच कळेना. हो,अजून एक गोष्ट होतीच,मी तिला होकार दिला तरी ती मला होकार देईल काय? सगळाच घोळ होऊन बसला.

विचारांती मी होकार देण्याचा निर्णय ठरवला आणि आईच्या कानावर घातला. आई चकित झाली. म्हणाली, "अरे तुम्ही दोघे एकमेकांना अनुरूप नाही हे दिसतंय ना मग कशाला उगीच घोरपड गळ्यात बांधून घेतोस?"
मी आईला म्हणालो, "आई ती मुलगी मी खूप अगोदरच पाहिलेली होती आणि त्यावेळी ती मला आवडली होती. आणि योगायोगाने तीच जर माझ्या आयुष्यात येणार असेल तर मला वाटते ती आहे तशीच मला चालेल."
आई म्हणाली, "काय करायचे ते कर, माझे सांगण्याचे काम मी केले, ह्याउप्पर तू आणि तुझे नशीब."

अशा तर्‍हेने आईची परवानगी मिळाली (वडिलांनी सगळे माझ्यावर सोपवले होते) त्यामुळे आमच्या बाजूने होकार निश्चित झाला. आता त्यांचा निर्णय काय असेल ह्याची चिंता करत मी येणार्‍या त्या दिवसाची प्रतीक्षा करू लागलो.