एक दादा सोडला तर आम्ही सगळे अविवाहित होतो. नोकरीत येण्याच्या अगोदरच दादाचे लग्न झालेले होते आणि वर तो एका मुलीचा बापही झालेला होता. त्याचे वडील एका मोठ्या खाजगी कंपनीत फोरमन पदावर काम करत त्यामुळे पैशाची आवक चांगलीच होती. त्यातून ते कामगार संघटनेचे पदाधिकारी होते. ह्या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणजे हा मुलगा जरा जास्तच तोर्यात असायचा. अतिशय उग्र स्वभाव आणि ग्राम्य भाषा,त्यामुळे त्याच्या वाटेला सहसा कोणी जात नसे.
पण एक गोष्ट जाणवली की आमच्यामध्ये राहून हळूहळू त्याची भाषा आणि वागणे सुधारत असल्याचे दिसून येत होते. माझ्याशी वागताना का कुणास ठाऊक तो खूप जपून बोलत असे(अर्थात, मी देखिल . तरी देखिल माझ्याशी त्याची मैत्री होत नव्हती.
दादाचे वडील चिक्कार दारू प्यायचे. बायको मुलांना मारझोड करायचे. अती मद्यपानामुळे कितीतरी वेळा त्यांना इस्पितळात भरती करावे लागत असे. बरे झाले की पुन्हा ये रे माझ्या मागल्या असे होत असे. नकळत ह्याचा चांगला परिणाम झाला तो म्हणजे दादाला दारूची भयंकर चीड निर्माण झाली. तो दारूच्या थेंबाला देखिल शिवत नसे. हां,आता नाईलाजाने बापाच्या आज्ञेवरून त्याच्यासाठी गुत्त्यावर जाऊन बाटल्या आणत असे; पण एकूणच त्याच्या मनात ह्या सर्व गोष्टींबद्दल एक प्रकारची घृणा निर्माण झाली.
दादा घरात सर्व भावंडात मोठा होता. त्याच्या पाठीवर सहा बहिणी झाल्या. त्यामुळे घरीदारी त्याला दादाच म्हणत. ह्या कौटुंबिक दादाचा सार्वजनिक दादा व्हायला कारण त्याची गुंडगिरी. आजूबाजूच्या भागात त्याचा दरारा निर्माण झाला. असा हा दादा आमच्या ऑफिसात कसा भरती झाला हे एक कोडेच होते. असो.
दिवसामागून दिवस जात होते आणि नकळत माझ्यात आणि दादाच्यात हळूहळू मैत्रिपूर्ण संबंध निर्माण होत होते.
एक दिवस दादा ऑफिसला आलाच नाही; पण त्याने दूरध्वनीने साहेबांना कळवले की वडिलांना पुन्हा इस्पितळात दाखल केले आहे आणि त्यांचे पोटाचे ऑपरेशन आहे. त्यामुळे तो काही दिवस येऊ शकणार नाही. आम्हा मित्रांना ही बातमी जशी कळली तसे काही जण इस्पितळात जाऊन त्याची विचारपूस करून आले. मी मात्र गेलो नाही. कारण मला इस्पितळाच्या त्या तसल्या वातावरणाची एक जबरदस्त भिती वाटत असे. त्या औषधांच्या विशिष्ट वासामुळे गुदमरून जायला होत असे. पण तरी मला मनापासून तिथे जावे असे वाटत होते. मग मी धीर करून गजाला म्हणालो की त्याने माझ्याबरोबर यावे म्हणजे मला दादाला भेटता येईल म्हणून तो माझ्याबरोबर यायला तयार झाला.
गजाच्या आधाराने मी केईएम इस्पितळात प्रवेश केला. ते इस्पितळाचे भव्य आवार,त्यातली डॉ.,परिचारिका,सेवकवर्ग ह्यांची लगबग आणि असंख्य रुग्णांची ताटकळत बसलेली रांग वगैरे सगळे बघूनच भांबावून गेलो. मी गजाला म्हटले की चल आपण परत जाऊ. त्यावर त्याने मला धीर देत बळजबरीनेच आत नेले. जिथेतिथे रूग्णच रुग्ण! निरनिराळ्या अवस्थेतले ते एव्हढे सगळे रुग्ण मी माझ्या आयुष्यात प्रथमच पाहत होतो. गजाचा हात गच्च पकडून डोळे बंद करून मी पुढे पुढे जात होतो; पण कानांवर कण्हण्या-विव्हळण्याचे आवाज आणि तो औषधांचा विचित्र दर्प माझे पाय मागे खेचत होते. शेवटी एका ठिकाणी गजा थांबला आणि दादाचा आवाज आला तेव्हाच मी डोळे उघडले.
दादा विमनस्क दिसत होता. रोजची चेहर्यावरची गुर्मी कुठेच दिसत नव्हती. खूप खचलेला दिसला. त्याचे बाबा झोपले होते म्हणून हळू आवाजात हालहवाल विचारली,त्याला धीर(खोटा खोटा... इथे मीच घाबरलेलो होतो) दिला आणि निरोप घेतला.
दादाच्या बाबांच्या बाजूच्याच पलंगावर एक रुग्ण पडला होता. त्याचा एक पाय कापला होता आणि एक पाय प्लॅस्टरमध्ये गुंडाळून वर टांगला होता. त्याच्या सर्वांगाला पट्ट्या बांधल्या होत्या आणि फक्त डोळे दिसत होते. ते भयानक दृश्य बघितल्यावर मला गरगरायला लागले. मी दादाचा आधार घेतला. मग एका बाजूला दादा आणि दुसर्या बाजूला गजा अशा दोघांच्या आधाराने मी त्या कक्षाच्या बाहेर येतच होतो तेव्हढ्यात समोरून एक अशी व्यक्ती आली की त्याला बघून माझी राहिलेली शुद्ध देखिल हरपली आणि काय होते आहे हे कळण्याअगोदर मी धाडकन जमिनीवर कोसळलो
मी शुद्धीवर आलो तेव्हा अक्षरश:'मैं कहां हूं?' असा प्रश्न मला पडला. वर लख्ख प्रकाशणारे दिवे,गरगरणारे पंखे आणि मी एका पलंगावर झोपलेलो,आजूबाजूला डॉक्टर,परिचारिका आणि दादा-गजा ह्यांचा घोळका माझ्याकडे सचिंत मुद्रेने पाहताना दिसला. काही क्षणातच मला मी इस्पितळात असल्याची जाणीव झाली आणि मी उठून बसलो. डॉक्टरांनी मला तपासले आणि सगळे ठीक असल्याचे सांगितले. परिचारिकेने तेव्हढ्यात ग्लूकोज -डी प्यायला दिले. त्यामुळे जरा हुशारी वाटली. मग मला तिथून जायची परवानगी मिळाली. मी दोघांच्या आधाराने जेव्हा इस्पितळाच्या बाहेर आलो, प्रथम दीर्घ मोकळा श्वास घेतला आणि मग त्या दोघांच्या डोळ्यातला चिंतातुर भाव बघून त्यांना मी आता पूर्ण ठीक आहे ह्याची खात्री दिली तेव्हाच ते मोकळेपणाने हसले. दादाने मला लगेच प्रेमाने मिठीच मारली. इथेच मला खर्या अर्थाने त्याच्या आतला माणूस भेटला.
मग मला त्याने विचारले की असे काय घडले की ज्यामुळे माझी शुद्ध हरपली होती?
मी त्याला म्हटले, "अरे तो तुझ्या बाबांच्या बाजूच्या पलंगावरचा रुग्ण(दादाने त्याचे 'जूगनू' असे नामकरण केले होते. धावत्या रेल्वेगाडीच्या टपावरून प्रवास करताना लोअर परेलच्या पुलाला आपटून तो खाली पडला होता असे कळले. त्याच काळात धर्मेंद्रची भूमिका असलेला 'जूगनू' नामक चित्रपट आलेला होता आणि त्यातील साहसी दृश्ये बघून काही असे युवक, असे स्वत:च्या जीवावर उदार झाले होते. त्यातलाच हा एक) होता ना त्याचा अवतार बघितला तेव्हाच मी अर्धमेला झालो होतो आणि तुमच्या दोघांच्या आधाराने जेमतेम बाहेर येत असताना तो दुसरा एक रुग्ण समोरून चालत आला त्याला तू बघितलेस काय? त्याचा चेहरा इतका सुजला होता की फक्त त्याचा एकच डोळा दिसत होता. एकाक्ष राक्षस जणू काही. आणि ते अनपेक्षितपणे पुढे आलेले ध्यान पाहून माझी उरली-सुरली शुद्धही हरपली."
दादाचा निरोप घेऊन मी आणि गजा निघालो. दादाने गजाला निक्षून सांगितले की त्याने मला रस्त्यात एकटे न सोडता ऑफिसमध्ये सुरक्षितपणे पोचवावे.
निघताना दादाने माझा हात हातात घेतला आणि त्यावेळी त्याच्या त्या स्पर्शाने जे सांगितले ते शब्दात मांडणे अशक्य आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा