माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

३ फेब्रुवारी, २००७

मुक्काम पोस्ट मद्रास! भाग ५

त्या दिवशी आम्ही जवळपासचा भाग पाहिला. रखरखीत ऊन आणि रस्त्यावर शुकशुकाट(रविवार होता) ह्यामुळे कुठे फिरावेसे वाटेना. भूक भागवण्यासाठी थोडेफार खाऊन घेतले आणि आम्ही पुन्हा वसतिगृहात परतलो. खाली हिरवळीवर ते चार लुंगीधारी बसले होतेच. त्यांच्या गप्पा घोड्यांच्या शर्यतीबद्दलच्या असाव्यात असा तर्क केला. कारण त्यांच्या हातात काल रात्री बघितलेल्या पुस्तिका आजही त्यांच्याजवळ होत्या आणि त्यावरील घोड्यांची चित्रे आता मी स्पष्टपणे बघू शकत होतो. आम्हाला बघून रामालिंगम पटकन उठला आणि समोर आला. म्हणाला, बॉस,विल यू सीट विथ अस टुडे?

आम्ही त्याला कपडे बदलून येतो असे सांगून वर आलो. दिवसभर उन्हात फिरल्यामुळे डोळे लाल झाले होते. मी हल्लीच, म्हणजे इथे मद्रासला येण्याच्या एक महिना अगोदरच चष्म्याच्या जागी नेत्रस्पर्शी भिंगे(कॉन्टॅक्ट लेन्सेस)बसवली होती. त्यामुळे माझी अवस्था आगीतून फुफाट्यात अशी झाली होती. अजून डोळे सरावले नव्हते. त्यात रखरखीत ऊन आणि खंडीभर धूळ ह्यामुळे माझ्या डोळ्यातून सारखे पाणी येते होते. मी 'नेभिं' काढून ठेवली आणि गार पाण्याने डोळे धुतले तेंव्हा कुठे बरे वाटले. नंतर कपडे बदलले आणि लुंगी बनियनवर खाली यायला निघालो. पण आता माझ्या डोळ्यांना त्रास होत होता म्हणून माझा नेहमीचा जाड भिंगांचा चष्मा चढवला. ह्या अवतारात चिंटूबरोबर खाली आलो. त्यांनी चिंटूला या,बसा केले आणि विचारले, व्हेअर इज दॅट अदर बॉस?
माझ्या उपस्थितीत त्यांनी केलेला हा प्रश्न ऐकून चिंटूने माझ्याकडे बोट दाखवले. त्या सगळ्यांनी माझ्याकडे एक क्षण न्याहाळून बघितले आणि रामालिंगम लगेच म्हणाला, अय्यो रामा, सो बीग स्पेक्टा? वुइ कुड नाट रेकग्नाइस हिम बॉस!
मग मी थोडक्यात त्यांना माझ्या डोळ्यांबद्दल सांगितले आणि मग त्यांच्या शंकेचे निरसन झाले. परत माझ्या लुंगीकडे बघून (ही लुंगी रंगीबेरंगी होती आणि त्यांच्या पांढर्‍या शुभ्र होत्या) ’वेरी नाईस,वेरी नाईस!’ म्हणत त्याच्याबद्दल थोडे जुजबी बोलणे झाले.

आता ह्या लोकांशी नेमके काय आणि कुठल्या विषयावर बोलायचे हे माझ्या डोक्यात शिरेना. त्यामुळे काही क्षण आम्ही सगळेच शांत बसलो. ह्या शांतीचा भंग करत रामालिंगमने पहिला चेंडू टाकला(काल पासून बहुधा तो ह्याच क्षणाची वाट पाहत असावा).
बॉस,यू मस्ट बी मीटिंग डेइली बीग-बीग फ्लीमस्टार लाइक दर्मेंद्रा,येमामालिनी,सर्मिला टॅगोर ना?
मुंबई म्हणजे बहुतेक एखादी लहानशी गल्ली आहे आणि हे सर्व सिनेमातील नटनट्या आमच्या सहित कुठल्याश्या चाळीत राहतात. त्यामुळे रोज सकाळी सकाळी संडासच्या लाईनीत आणि नळावर पाणी भरताना आमची भेट होते असे काहीसे चित्र त्यांच्या मनात असावे असे मला वाटले. म्हणून त्यांचा गैरसमज दूर करण्यासाठी मी काही बोलणार होतो पण चिंटूने मला डोळ्यांनी गप्प बसण्याची खूण केली आणि त्याने त्या पहिल्याच चेंडूवर सणसणीत षट्कार ठोकला. धर्मेंद्र कसा आपला दोस्त आहे,त्याचे आणि हेमामालिनीचे लफडे आपण कसे जुळवून दिले वगैरे वगैरे खर्‍याखोट्या गोष्टी स्वतःच्या नावावर खपवायला सुरुवात केली.

चिंटू एक नंबरचा थापाड्या माणूस होता हे मला पूर्ण माहीत होते पण त्याचा तो आत्मविश्वास आणि बोलण्यातला ठामपणा बघून मी देखील चकित झालो. त्याच्यासारख्या कसलेल्या फलंदाजाला(थापंदाजाला) अशी अनुकूल खेळपट्टी मिळाली की समोरच्या गोलंदाजांची(इथे रामालिंगम आणि मंडळी)काही खैर नसते. आणि इथे तर त्याच्या त्या चौफेर टोलेबाजीचे साक्षात प्रतिस्पर्धी संघच वारेमाप कौतुक करत होता. मग त्याला आवर तरी कोण घालणार? त्यांच्या डोळ्यातून कौतुक नुसते ओसंडून वाहत होते आणि अतिशय तल्लीन होऊन ती मंडळी त्या सर्व गोष्टींचा आस्वाद घेत होती. मी बाजूला बसलो होतो ह्याचे देखिल त्यांना भान नव्हते. चिंटूच्या वाक्या-वाक्यावर त्यांच्या डोळ्यातले भाव बदलत होते. चेहर्‍यावर कृतकृत्यतेचे भाव दिसत होते. चिंटू च्या त्या अफाट आणि अचाट प्रतिभेने मी सुद्धा अचंबित झालो.
थापा सुद्धा किती रसाळपणे मारता येऊ शकतात ह्याचे जिते-जागते उदाहरण त्याच्या रूपाने माझ्या समोर प्रकट झाले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: