माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२ फेब्रुवारी, २००७

माझे सांगीतिक आयुष्य!भाग ३

१९७२ साली मला नोकरी लागली तरी देखिल आमच्याकडे वीज नव्हती. त्यामुळे रेडिओ घेणे शक्य नव्हते म्हणून वडिलांच्या परवानगीने सॅन्यो कंपनीचा एक बँडचा ट्रांझिस्टर विकत आणला आणि माझा श्रवणाभ्यास सुरू झाला. आता मी निरनिराळ्या प्रकारच्या संगीताचा आस्वाद घेऊ लागलो. जुन्या नामांकित गवयांच्या पावलावर पाऊल टाकून काही ताज्या दमाचे गायक-गायिका त्यावेळी आपले नाव प्रस्थापित करण्यात आघाडीवर होते. त्यापैकी पं. भीमसेन जोशी,पं.कुमार गंधर्व,पं.मल्लिकार्जुन मन्सूर,पं.जसराज,गंगुबाई हंगल,केसरबाई केरकर,मोगुबाई कुर्डीकर,हिराबाई बडोदेकर अशा अनेक नामांकित कलाकारांचे गाणे मला आकाशवाणीच्या राष्ट्रीय कार्यक्रमात ऐकायला मिळाले. गायकांपैकी माझ्यावर सर्वात जास्त प्रभाव टाकला तो पं. भीमसेन जोशी आणि पं. कुमार गंधर्व ह्यांनी. भीमसेनांच्या धीरगंभीर आवाजाने मी भारला गेलो तर कुमारांच्या वैचित्र्यपूर्ण आणि आक्रमक गाण्याने नादावलो. भीमसेन तर माझे मानसगुरुच झाले. त्यांचे गाणे आपल्या गळ्यात उतरावे म्हणून मी त्यांच्या गायनाची नक्कल करू लागलो. माझा आवाज निसर्गत:च पहाडी होता त्याचा मला इथे उपयोग होत होता. पण नक्कल करूनही समाधान होईना. आपल्याला असेच,अगदी असेच गाणे गाता आले पाहिजे असे प्रकर्षाने वाटायला लागले. त्यावर एकच उपाय होता की गाणे शिकणे आणि ते देखिल भीमसेनांकडेच! पण! हा पणच नेहमी घात करतो. माझ्या सारख्या घोडवयातल्या आणि शास्त्रीय संगीताचा पाया नसलेल्याला भीमसेन गाणं शिकवतील? शक्यच नाही. तेव्हा प्रथम आपण दुसरीकडे प्राथमिक ज्ञान घेऊ आणि मगच भविष्यात त्याबद्दल प्रयत्न करू अशी मनाची समजूत करून मी ठरवले की लवकरात लवकर गाणे शिकायला सुरुवात करायची.
मग शोध सुरू झाला गुरुचा. पण मनासारखा गुरू भेटेना. कारण माझ्या अपेक्षाच फार होत्या. मला शिकवणारा गुरू हा भीमसेनांच्या पठडीतलाच हवा होता. कारण? मी असे ऐकले होते की हे गुरूलोक दुसर्‍या घराण्याची तालीम मिळालेल्या व्यक्तीला शिष्य म्हणून सहजासहजी स्वीकारत नाहीत आणि तुम्ही जर हट्टालाच पेटला तर जुन्या घराण्याचे गाणे विसरून पुन्हा नव्याने सुरुवात करण्याच्या अटीवरच शिष्यत्व पत्करावे लागते. म्हणून मी ठरवले की अशी व्यक्ती मिळेपर्यंत आपण गाणं बाजूला ठेवू आणि गेला बाजार हार्मोनियम(पेटी अथवा संवादिनी)शिकून घेऊ या.

त्यावेळी प्रसिद्ध अशा पेटीवादकांमध्ये पं.मनोहर चिमोटे,गोविंदराव पटवर्धन,पुरुषोत्तम वालावलकर अशी खाशी मंडळी होती; पण त्यांच्यापर्यंत पोचणे सहजसाध्य नव्हते. दुसर्‍या फळीतील राजाभाऊ कोसके,तुळशीदास बोरकर वगैरे मंडळींची नावे देखिल ऐकून होतो. तेव्हा चौकशीअंती कळले की राजाभाऊ हे गोवा हिंदू असोसिएशनच्या संगीत क्लासमध्ये पेटी शिकवतात. मी तिथेच धडक मारली. राजाभाऊना भेटलो. त्यांना माझी इच्छा सांगितली आणि लगेच त्यांनी मला दाखल करून घेतले.
माझे पेटीवादनाचे शिक्षण सुरू झाले. आठवडाभरात बोटे नीट काम करायला लागली. गुरुजींच्या सल्ल्याप्रमाणे दादरच्या हरीभाऊ विश्वनाथांकडून एक पेटी विकत घेतली आणि घरी सराव करू लागलो. सुरुवातीचे काही अलंकार वाजवता वाजवताच माझी तारांबळ उडू लागली; पण निश्चयाने त्यावर मात करता येते असे सुवचन पाठ असल्यामुळे मी रेटतच राहिलो. आणि एक दिवस गुरुजी क्लासला आलेच नाहीत. वाट पाहून पाहून कंटाळलो आणि घरी परतलो. पुन्हा पुढच्या वेळी गेलो तेव्हा देखिल गुरुजी नव्हते. गुरुजी का येत नाही असे विचारल्यावर कळले की ते घरातल्या मोरीत घसरून पडले आणि त्यांचा पाय मोडला; त्यामुळे आता निदान दोनतीन महिने तरी येणार नाहीत,तेव्हा पेटीचा क्लास ते येईपर्यंत बंद. झाले! बोंबलले शिक्षण! काय म्हणावे ह्या कर्माला? ह्याला म्हणतात 'प्रथम ग्रासे मक्षिकापात:!’

ह्या क्लासमध्ये घडलेली एक गंमत! मला दाखल होऊन तीनचारच दिवस झाले होते आणि विद्यार्थ्यांना अनुभव मिळावा म्हणून सुवर्णा बँकर ह्यांचे गाणे ठेवले होते. कार्यक्रम सुरू होण्याअगोदरची साफसफाई सुरू होती. ज्या खोलीत पेटीचा क्लास चालत असे तिथे मी माझी बोटे साफ करून घेत होतो. अजून गुरुजी आले नव्हते. बाजूलाच ती गायिका आणि तिची आई आणि बुजुर्ग तबलजी नेरूरकर बसले होते. ते तबला लावत होते. मला म्हणाले,"जरा काळी चार दे बघू!"
मी आजूबाजूला बघायला लागलो. मुळात काळी चार हा काय प्रकार असतो हेच माहीत नव्हते. तर मी ते देणार कुठून. मी आपला मख्ख चेहरा करून बसलो.
त्यांनी पुन्हा तेच सांगितले आणि मग मी धीर करून विचारले, "कुठे आहे काळी चार? कोणाकडे मिळेल?"
ते तिघेजण जोरात हसायलाच लागले. मी पुन्हा मख्खच! मला काय माहीत की ते मला हसताहेत म्हणून? नेरूरकरांनी माझे एक बोट धरले आणि ते पेटीवर एका ठिकाणी ठेवून म्हटले, "ही काळी चार. समजलं?"
मला काहीच समजले नव्हते पण मी आपला हो ला हो केले आणि मग ते बोट तसेच ठेवून भाता हालवत बसलो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: