माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

३ फेब्रुवारी, २००७

मुक्काम पोस्ट मद्रास! भाग ८

संध्याकाळी आम्ही बाजारात गेलो. साथीला रामालिंगम आणि परसराम होते. जेवण बनवण्यासाठी लागणारी सगळी सामग्री घेऊन आलो. त्यात डाळ-तांदूळ पासून ते पोळपाट लाटणे,स्टोव्ह, भांडीकुंडी वगैरे सर्व आलं. रॉकेलची व्यवस्था रामालिंगम करणार होता. अशी सर्व खरेदी करून आम्ही खोलीवर आलो. आमच्या पाठोपाठ दहा मिनिटांनी रामालिंगम एक ५लीटर चा कॅन भरून रॉकेल घेऊन आला.

घरी आईने आम्हा सर्व भावंडांना वरण-भात,खिचडी(मुगाच्या डाळीची) वगैरे गोष्टी करायला शिकवल्या होत्या. अधनं-मधनं ते सर्व केलेले देखिल होते. त्यामुळे एकप्रकारचा आत्मविश्वास होता. म्हणून मग मी चिंटूला म्हणालो की मी खिचडी करतो, तर त्याला खिचडी हा काय प्रकार आहे हे सगळे समजावून सांगायला लागले. त्या बिचार्‍या मांसाहारी प्राण्यावर काय हा प्रसंग गुदरला होता! पण कोणतीही खळखळ न करता त्याने संमती दिली आणि ह्यात मी काय करू म्हणून विचारले. मग मी अंदाजाने डाळ-तांदूळ मापून त्याला निवडायला दिले. मग टोमॅटो,कांदा,बटाटा चिरून घेतला. निवडलेले डाळ-तांदूळ धुऊन घेतले‌. तुपाच्या(त्यावेळी डालडा होता)फोडणीत टोमॅटो-कांदा-बटाटा टाकून चांगला परतला आणि मग धुतलेले डाळतांदूळ त्यात घालून सारखे केले. त्यात चवीपुरते तिखट-मीठ आणि थोडा गरम मसाला टाकून वर झाकण ठेवले. मध्ये एकवेळा अजून पाणी घातले आणि मग वीस मिनिटात खिचडी तयार झाली . काय घमघमाट सुटला होता म्हणून सांगू! ह्या खिचडीला मी नाव ठेवले 'शाही खिचडी.'

मग आम्ही दोघांनी खिचडी वाढून घेतली आणि त्यावर पुन्हा डालडा(पर्यायच नव्हता) घालून चिंटूला म्हटले, कर सुरुवात!
चिंटूने पहिलाच घास घेतला आणि म्हणाला, देवा,लेका काय टेस्टी आहे रे! आपण रोज रात्री आता खिचडीच खाणार. सकाळी चपाती-भाजी आणि रात्री तुझ्या हातची शाही खिचडी!
मी म्हणालो, अरे, रोज रोज खिचडी खाऊन कंटाळशील. कधी कधी आमटी-भात बनवूया, तेव्हढाच बदल!
ठीक आहे, तू म्हणशील तसे करू. पण सांगून ठेवतो उद्या सकाळपासून चपात्या बनवायचे काम माझे आणि तू भाजी बनवायची. कबूल? चिंटू उवाच!
मी म्हटले, कबूल!
आमचे हे प्रितीभोजन चालू असताना परसराम डोकावला. मग नको-नको म्हणत असताना त्यालाही थोडी खिचडी खायला लावली. तो तर पागलच झाला. त्याने लगेच माझ्याकडून रीत समजावून घेतली. मी त्याला म्हणालो, तुमको जब खिचडी खानेका मन होता है, हमारे पास आओ और जब हमको पराठा खानेका मन होगा तो हम तुम्हारे पास आयेंगे!(परसराम पराठे काय मस्त बनवायचा! परसरामदा जवाब नही!)
तो लगेच म्हणाला, अबे क्या मस्त आयडिया है! ऐसा करते है, मै इतवार को परांठे बनाउंगा और तुम ये तुम्हारी शाही खिचडी बनाओ. मिलकर खायेंगे‌. साथमे दही और पापड होगा और सलाद भी बनायेंगे!

आम्ही त्याची योजना मान्य केली आणि शाही खिचडीचा चट्टामट्टा केला. जेवण तर झाले. आता भांडी कुणी घासायची(मनातल्या मनात)हा प्रश्न निर्माण झाला. पण काही कळायच्या आत चिंटूने भांडी गोळा केली आणि गेलासुध्दा भांडी घासायला. जन्माचा आळशी म्हणून प्रसिध्द असलेल्या ह्या प्राण्याचे हे वेगळेच रूप मी पाहत होतो. तसे मुंबई सोडल्यापासूनच त्याच्यातला आमूलाग्र बदल मी पाहत आलो होतो. म्हणजे आपल्यात म्हण आहे ना की, 'संगतीला आणि पंगतीला एकत्र राहिल्याशिवाय खरा स्वभाव कळत नाही' अगदी तसेच ह्याच्या बाबतीत झाले होते. पूर्वीचे बरेच गैरसमज आता दूर होत होते आणि त्याचे खरे स्वरूप जे मी आता पाहत होतो ते माझ्यासमोर हळूहळू प्रकट होत होते.

दुसर्‍या दिवसापासून आमचा कार्यक्रम अगदी ठरल्याप्रमाणे सुरू झाला ‌सकाळी ५वाजता उठणे. प्रातर्विधी आटोपून योगासनं करणे,त्यानंतर चहापान, मग दोघांनी मिळून जेवण बनवणे(ह्यातच नास्ता पण होऊन जायचा आणि डबा पण तयार व्हायचा),मग अंघोळी करून,कपडे करून होइस्तोवर पावणे आठ वाजलेले असत. मग जाता जाता मध्येच उपाहारगृहात पुन्हा कॉफी पिऊन प्रकें कडे मार्गस्थ होणे. संध्याकाळी आल्यावर पुन्हा स्नान,कपडे धुणे(माझे बाहेरचे कपडे पण मीच धूत असे;चिंटू लाँड्रीत देत असे) मग जेवण बनवणे,जेवणे आणि गप्पा टप्पा करून झोपणे. अश्या तर्‍हेने दिवस हा हा म्हणता जात होते. प्रशिक्षण पण ऐन भरात आले होते आणि मुख्य म्हणजे आम्हालापण त्याची गोडी लागली होती. रविवारी आम्ही दोघे मद्रासभर भटकत दिवस सत्कारणी लावत असू. त्यादिवशी सर्व खाणे-पिणे बाहेरच असायचे.

अशाच एका रविवारचा प्रसंग आहे हा. आम्ही दोघे एका ठिकाणी रस्ता ओलांडण्यासाठी पदपथावरून खाली उतरलो आणि चार पावलं चाललो नाही तर आमच्या जवळ एक ऑटोरिक्षा, ब्रेकचा कर्कश्श आवाज करत येऊन थांबली. मला धक्का लागता लागता थोडक्यात वाचलो पण त्या अनपेक्षित आवाजाने भांबावून गेलो होतो. त्या रिक्षा चालकाला चिंटूने दोनतीन अर्वाच्य शिव्या दिल्या त्याबरोबर तो रिक्षाच्या बाहेर आला. त्याला बघितल्यावर माझी खात्रीच पटली की आज काय आपली धडगत नाही. अहो साक्षात घटोत्कच आमच्या समोर उभा होता. काळा रप्प, सहा फूट उंच आणि अंगाने चांगलाच आडवा,झुपकेदार मिशा,अशा त्याने चटकन माझा हात धरला आणि तमिळमध्ये काही तरी गुरगुरला. त्याच्या त्या मुसळासारख्या हातात माझा हात म्हणजे एखाद्या भल्या मोठ्या अजगराच्या तोंडात ससा असावा तसे काहीसे दिसत होते. पण त्याक्षणी मी असेल नसेल तेव्हढा जोर काढून त्याच्या हाताला हिसडा दिला आणि माझा हात सोडवून घेऊन तिथून जरा दूर पळालो. तो मोका साधून चिंटूने मुष्टीचे दोनतीन तडाखे त्याला दिले. पण त्या घटोत्कचावर त्याचा विशेष असा परिणाम जाणवला नाही. मात्र मनात कुठे तरी त्याला आश्चर्य वाटले असावे की हे मच्छर माझ्याशी दोन हात करण्याची हिंमत कसे काय करताहेत. दोन पावले पुढे होऊन त्याने चिंटूला पकडण्यासाठी हात पुढे केला.ती संधी साधून चिंटूने त्याच्या नाकावर एक जबरदस्त ठोसा लगावला. ह्यावेळी मात्र घटोत्कच गडबडला, जरा तोल जाऊन पडता पडता बचावला आणि त्वेषाने चिंटूवर त्याने हल्ला केला आणि त्याला आपल्या जबरदस्त मिठीत पकडून दाबू लागला. चिंटू सुटायची धडपड करत होता पण ते त्याच्या शक्तीबाहेरचे काम होते. मी तर केवळ बघ्या होतो. काय करावं,कुणाला मदतीला बोलवावं हा विचार करता करता मला एक युक्ती सुचली. मी त्या घटोत्कचाच्या मागे गेलो आणि त्याच्या कुशीत बोट खुपसले तेंव्हा तो एकदम उसळला. माझा प्रयत्न फळास येतो आहे हे माझ्या लक्षात आले. म्हणून मी एकदम दोन्ही हातांनी त्याच्या कुशीत जोरदारपणे बोटे खुपसली त्यामुळे तो पुन्हा जोरात उसळला आणि त्याची चिंटूवरची पकड ढिली पडली. त्याचा फायदा घेत चिंटू त्याच्या मगरमिठीतून बाहेर पडला आणि त्याने एकामागून एक जबरदस्त ठोसे लगावायला सुरुवात केली. त्याच्या ह्या मार्‍याने नाही म्हटले तरी घटोत्कच थोडा ढिला पडला. त्या दोघांचे ते युध्द बघण्यासाठी बाजूला बरीच गर्दी जमली आणि साहजिकच वाहतूक खोळंबली.

हा काय प्रकार आहे म्हणून बघायला एक वाहतूक पोलीस शिट्टी वाजवत तिथे आला आणि त्या दोघांना दरडावून त्याने बाजूला केले आणि समोरच असलेल्या पोलीस स्टेशनकडे घेऊन निघाला. आमची वरात पोलिस स्टेशनमध्ये पोहोचल्यावर तिथल्या ड्यूटी ऑफिसरच्या हातात आम्हाला सोपवून तो आपले कर्तव्य बजावण्यासाठी निघून गेला. ड्युटी ऑफिसरने प्रथम त्या रिक्षावाल्याचा जबाब घेतला. ते दोघे तमिळ मध्ये बोलत होते म्हणून आम्हाला काहीच कळले नाही. मग त्याने मोर्चा आमच्याकडे वळवला आणि तमिळमध्येच काही तरी बोलला. आम्हाला काहीच अर्थबोध न झाल्यामुळे आमचे चेहरे कोरेच होते. ते बघून जणू त्याचा अपमान झाला असे वाटून त्याने चिंटूची कॉलर पकडली. चिंटूने त्याचा हात झटकला आणि जोरात ओरडला, ऑफिसऽ! बिहेव युवऽसेल्फ! अदऽवाइज यू विल रिग्रेट!
ह्या अनपेक्षित घटनेने ऑफिसर एक पाऊल मागे हटला आणि तो पुढे काही बोलणार तोच चिंटूने आपले ओळखपत्र त्याच्या टेबलावर जोरात आपटले आणि म्हणाला, आय ऍम फ्रॉम ......... डिपाऽट्मेंट! वगैरे वगैरे वगैरे.

तो पोलिस अधिकारी हादरलाच. त्याने आयकार्ड नीट पाहिले आणि लगेच एका हवालदाराला बोलवून त्या घटोत्कचाला त्याच्या हवाली करत काही तरी तावातावाने सूचना केल्या आणि त्यांना तिथून घालवून दिले. मग अतिशय नम्र आवाजात 'सार, सार' करत त्याने आम्हाला झालेल्या त्रासाबद्दल क्षमा मागितली आणि कॉफी मागवली. आयकार्डावर ज्या साहेबांची सही होती ते साहेब किती पोचलेले आहेत (म्हणजे हे साहेब किती प्रसिध्द आहेत आणि त्यांचा कसा दरारा आहे)आणि त्यांनी तुमच्या(म्हणजे आमच्या सारखे- दिसायला सामान्य,अव्यवस्थित राहणी असणारे वगैरे )सारखे तरुण कसे भरती केलेत हे ऐकून होतो पण आज प्रत्यक्ष पाहिले तेंव्हा खात्री पटली असे सांगत पुन्हा:पुन्हा आमची माफी मागितली.

बाजूच्या खोलीतून आरडा-ओरड ऐकू येऊ लागली तशी त्याने सांगितले की घटोत्कच शिक्षा भोगतोय आपल्या पापांची. वरती हे पण सांगितलं की चांगली चामडी लोळव असं सांगितलंय त्या हवालदाराला. काही जरूर लागली तर मला फोन करा असे सांगून स्वत:चे नाव,हुद्दा आणि फोन नंबर त्याने दिला आणि जाता एक विनंती केली की हा झालेला प्रसंग कृपा करून साहेबांना सांगू नका म्हणून.
त्या नंतर आम्हाला मोठ्या सन्मानाने त्याने निरोप दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: