माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

३ फेब्रुवारी, २००७

मुक्काम पोस्ट मद्रास! भाग १

१९७७ सालच्या मे महिन्यात (मेलो!)मद्रासला जावे लागले. बरोबर एक लुडविग नावाचा रोमन कॅथलिक सहकारी होता आणि त्याच्या बरोबर पुरे तीन महिने काढायचे होते. अंगापिंडाने मजबूत(माजलेला म्हटलं तरी चालेल),साडेपाच-पावणे सहा फुटांच्या आंत-बाहेरची उंची,तोंडात अखंड शिव्या(इंग्लिश)आणि येताजाता सारखे हात चालवणारा(मुष्टीयोध्दा होता) असा हा माझा सहकारी आणि त्याचे घरगुती नाव काय तर म्हणे 'चिंटू' (काय लोकं एकेक नावं ठेवतात). आणि त्याच्या उलट मी‌. सव्वा पाच फूट उंची,वीतभर छाती,मारामारी वगैरे अशा 'क्षुद्र' गोष्टींपासून नेहमीच चार हात लांब दूर राहणे पसंत करणारा. तो मांसाहारी,नियमित पेय घेणारा,सिगरेट,तंबाखू झालंच तर मधनं मधनं स्त्री-संग करणारा आणि मी, मी ह्या सर्व गोष्टींच्या उच्चाराने देखिल घामाघूम होणारा. काय बघून ही जोडी आमच्या साहेब लोकांनी बनवली होती ते त्यांनाच माहीत. तसा हा चिंटू मला नवीन नव्हता. गेले वर्ष-दोन वर्ष आम्ही एकमेकांना ओळखत होतो. पण एक सुरक्षित अंतर ठेवूनच आम्ही एकमेकांशी बोलत असू(म्हणजे मीच जरा लांब राहत असे. हो त्याचा काय नेम. एक ठोसा जरी त्याने मला मारला असता तर भर दिवसा तारे दिसले असते. पण का कुणास ठाऊक तो माझ्याशी बोलताना शब्द जपून वापरत असे त्यामुळे असेल कदाचित, पण म्हणून मला असे वाटत असे की तो मला मानत असावा(हेच मला पदूने देखील सांगितले होते).

तर अशी ही जाड्या-रड्याची जोडी मद्रासला जायला निघाली तेंव्हा समस्त मित्रमंडळी आम्हाला गाडीवर सोडायला आली होती‌.
सांभाळून राहा रे,उगीच काही वाद घालू नका! असे दोघांना सांगत होती(जास्त करून मलाच,कारण अरेला कारे करणे ही माझी जित्याची खोड होती. पण ह्याच्याबरोबर तरी असे काही करू नको,नाहीतर खैर नाही तुझी ... हा त्यातला गर्भितार्थ!). ह्या सर्वांबरोबर त्याची बायको सुद्धा आली होती(ही म्हातारी... आम्ही तिला म्हातारीच म्हणत होतो कारण चांगली ८ वर्षांनी ती त्याच्यापेक्षा मोठी होती )आणि मला सांगत होती..... ब्रदर ते माज्या बाबाला (हा हिचा बाबा? मग ही कोण त्याची?)जरा सांबालुन घे. तेच्या खान्या-पिन्यावर जरा लक्स ठेव.
मी काय कप्पाळ लक्ष ठेवणार ह्याच्या खाण्यावर आणि पिण्यावर? पण आपलं हो ला हो केलं. ह्या चिंटुचे सामान तरी किती होते? अहो दोन मोठ्या बॅगा,एक वळकटी आणि गळ्यात एक मोठी एयर-बॅग; आणि माझ्याकडे एक मध्यम आकाराची बॅग आणि गळ्यात शबनम पिशवी.
माझे सामान बघून ती म्हातारी बरळली... पुअर फ़ेलो!एव्हढ्या छोट्याश्या बॅगेत काय रानार?
मी तिच्याकडे दुर्लक्ष केले आणि गाडीत शिरलो. माझ्या मागोमाग चिंटू आपल्या सामानासकट होताच. गाडीने शिट्टी दिली आणि चिंटू टुणकन उडी मारून फलाटावर उतरला आणि म्हातारीला मिठीत घेऊन तिची चुंबनं घेत सुटला. मी आपली नजर वळवली. गाडी सुरू झाली आणि चिंटू धावत-पळत गाडीत चढला आणि दारातूनच हात हालवत उभा राहिला.

तासा-दोन तासांनी आम्ही आपापले डबे काढले. मला आईने पुरी-भाजी दिली होती . त्याने काय आणले होते? त्याने सँडविचेस आणली होती.
मला म्हणाला, खानार?
मी विचारले, काय आहे त्याच्यात?
पोक्!(पोर्क)
म्हणजे काय?
डुकराचे मांस!(तरीच डुकरासारखा माजलेला होता).
मी ब्राह्मण आहे,मी मांस-मच्छी खात नाही!
पदू पण ब्राम्हिन हाय,पन तो खातो.तुला काय प्रॉब्लेम?
मी पूर्ण शाकाहारी माणूस आहे आणि पुन्हा तू मला असले काही विचारू नकोस.मला आवडणार नाही!
त्याने शांतपणे ती सँडविचेस गुंडाळून ठेवली आणि म्हणाला, मी तुझ्यातलं खाल्लं तर चालंल?
मी हो म्हणालो,पण त्याला स्वच्छ साबणाने हात धुवायला लावले आणि मग आम्ही दोघांनी माझा डबा फस्त केला. पुरी-भाजी त्याला खूप आवडली.
मग तो मला म्हणाला, मुंबैला परत येईपर्यंत मी बी व्हेजिटेरियन र्‍हानार. आपन दोघे दोस्त आहोत. तू खानार तेच मी बी खानार. प्रॉमिस!
गाडी मध्येच एका स्टेशनावर थांबली तसे त्याने ते सँडविचेस भिकार्‍याला देऊन टाकले आणि इथेच ख्र्‍या अर्थाने आमची गट्टी जमली.

२ टिप्पण्या:

प्रमोद देव म्हणाले...

vj धन्यवाद! आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद!
आपल्या सुचनेप्रमाणे फॊंटचा आकार मोठा केला आहे.

http://naadiastrologystudycircle.blogspot.in/ म्हणाले...

आपला मद्रासचा अनुभव वाचला. मजा वाटली.
माझ्या व आपल्या अनुभवात १८-२० वर्षांचा फरक असूनही काही फारसा फरक नव्हता.घामाची चिकचिक तमिळ हेल. झुपकेदार मिशावाले पोलिसशिपाई. गिंडीचा औद्योगिकिचा परिसर. थोडेपुढे गेलेल की तांबरम. हवाईदलाचा मोठा बेस. असो.