माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२४ एप्रिल, २००८

भगीरथाचे वारस!

पाणी म्हणजेच जीवन असे आपण म्हणतो. पण आपल्याला मिळणारे पाणी कुठून येते? कसे येते? वगैरे प्रश्न आपल्याला कधी पडलेत काय? पडले असल्यास त्याची माहिती आपण कधी मिळवण्याचा प्रयत्न केलाय काय? काही अपवाद सोडल्यास आपण एकूण सगळेच जण त्याबद्दल फारसा विचार कधी करत नाही हेच खरे; मग पाण्याचा अभाव, म्हणून पडणारा दुष्काळ, दुष्काळपीडित लोक, त्यांच्यासाठी रोजगार हमी योजना वगैरे सारखी चालणारी सरकारी कामे वगैरेबाबत आपण कधी विचार करत असू असेही वाटत नाही. ह्याला कारण म्हणजे शहरी भागात न जाणवणारी पाण्याची टंचाई. त्याच्या उलट परिस्थिती खेड्यापाड्यात असते. विशेषतः उन्हाळ्यात, नदी, नाले, ओढे आटलेले असतात आणि मग तिथल्या आया-बायांना मैलोन-मैल पाण्यासाठी भटकावं लागतं; हे सगळे आपण वृत्तपत्रात वाचत असतो पण तरी त्याची म्हणावी तशी धग आपल्याला जाणवत नाही हेच खरे. अधेमधे कधी जलवाहिनी दुरुस्तीसाठी अथवा तलावात पाण्याचा साठा कमी आहे म्हणून काही टक्के पाणी कपात वगैरेची घोषणा महानगरपालिकेकडून झाली की आपल्याला त्याची तीव्रता कळते पण ती तेव्हढ्यापुरतीच असते.

पण ह्या जगात सगळेच काही आपल्यासारखे आत्मकेंद्रित आयुष्य जगणारे नसतात. पाणी सद्या जितक्या प्रमाणात आपल्याला उपलब्ध आहे त्याचा जर योग्य पद्धतीने आपण वापर आणि वाटप नाही केले तर भविष्यात पाण्यावरून युद्धे होतील असा गर्भित इशारा काही तज्ञांनी दिलेला आहे हे आपण वाचलेही असेल. काही लोक नुसतेच इशारे देतात, पण काही लोक केवळ इशारे देऊन स्वस्थ बसत नाहीत तर त्यावर तोडगा शोधण्यासाठी अविरत धडपडतात. त्यासाठी आपले आयुष्यही पणाला लावतात. अशाच पैकी एक आहेत 'पाणी पंचायत' चे विलासराव साळुंखे.

मुळातच पाणी पंचायत हा काय प्रकार आहे हे जाणून घ्यायचे असेल तर मग आपल्याला विलासरावांचा सगळा जीवनप्रवास माहिती करून घ्यायला हवा. पाणी अडवा,पाणी जिरवा, पाणी साठवा आणि त्याचे समान वाटप करा... थोडक्यात..पाण्याचे सुयोग्य नियोजन करणे असा जणू मंत्रच आहे विलासरावांच्या कार्याचा. वर म्हटल्याप्रमाणे खेड्यापाड्यात उन्हाळ्यात पाण्यासाठी होणारी परवड पाहिली आणि मग विलासरावांचे विचारचक्र सुरू झाले. त्यातून मग ह्या समस्येचा त्यांनी कसून अभ्यास केला तेव्हा लक्षात आले की सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडूनही महाराष्ट्रातला कैक भाग हा दुष्काळग्रस्त आहे. पावसाचे पाणी नदी,नाले -ओढ्यांतून वाहत जाऊन समुद्राला मिळते हे त्याचे एक कारण. दुसरीकडे जिथे हे पाणी मोठमोठ्या धरणात साठवले जाते त्याचे काय होते? ह्या प्रश्नाचा पाठपुरावा केल्यावर लक्षात आले की सरकारी योजनेमुळे ही जी मोठमोठी धरणे बांधली गेली त्याचा जास्तीत जास्त फायदा हा त्या त्या ठिकाणच्या सधन शेतकर्‍यांनाच झालाय. त्यातूनच भरपूर पाणी लागणारे ऊसासारखे पीक घेतल्यामुळे इतर लोकांपर्यंत पाणी पोचतच नाही. धरणाच्या आसपास असणारे शेतकरीच त्या पाण्याचे लाभार्थी ठरतात आणि इतरजण पाण्याअभावी शेतीच करू शकत नाहीत. म्हणजे एका मर्यादित भागाचा विकास तर बाकी सर्व भकास!

दुष्काळ निवारणार्थ सरकारने हाती घेतलेली पाझर तलाव निर्माण वगैरेसारखी कामे कशी चालतात. त्यात काय फायदे/त्रुटी आहेत वगैरे गोष्टींचा साधकबाधक अभ्यास त्यांनी केला. ह्यातूनच काही धडा घेऊन विलासरावांनी आपली योजना तयार केली. त्यात जमेल तिथे पाणी अडवण्यासाठी छोटे छोटे बांध बांधणे,पाणी साठवण्यासाठी तलाव सदृश खड्डे खणणे,जेणेकरून पावसाचे जास्तीत जास्त पाणी अडवता येईल असे धोरण आखले. अडवलेले,साठवलेले पाणी मग सर्वांना समान वाटून देणे. कमी पाण्यात होणारी पिके घेणे ... हे सगळे कसे करायचे त्याबद्दल योजना आखल्या. हे सगळे एकट्याच्या बळावर करणे वाटते तितके सोपे नाही म्हणून स्थानिक लोकांशी बोलून,त्यांना ह्या गोष्टीचे महत्त्व पटवून त्यात सहभागी करून घेतले. अर्थात हे काम इतक्या सहजतेने झाले नाही. कारण जे आजवर शक्य झाले नाही असले स्वप्न दाखवणारा हा माणूस खरंच काही करून दाखवू शकेल काय? आणि त्यात त्याचा काय स्वार्थ दडलाय? असे काही प्राथमिक प्रश्न तिथल्या स्थानिकांना पडणे स्वाभाविकच होते. पण अडून राहण्याचा विलासरावांचा स्वभाव नसल्यामुळे जे आले त्यांना बरोबर घेऊन त्यांनी काम सुरू केले. ह्या संबंधीचा पहिला प्रयोग त्यांनी पुरंदर तालुक्यातील नायगाव ह्या दुष्काळी गावामध्ये केला. तो कमालीचा यशस्वी झाला.तिथे निर्माण झालेली हिरवीगार शेती, वनसंपदा पाहून जो तो त्या प्रकल्पाला भेट द्यायला येऊ लागला आणि मग ह्यातून पुढे सुरू झाली पुढची वाटचाल,पुढली चळवळ!

मंडळी हे जितक्या सहजतेने लिहिले तितके सहज झालेले नाही. ही चळवळ पुढे कशी गेली, त्याला किती यश आले,सरकारने ह्या असल्या प्रयोगांना किती आणि कसे साहाय्य केले अथवा नाही. त्या त्या वेळच्या सत्ताधार्‍यांनी, विशेषतः लोकनेते म्हणून गाजलेल्यांनी कसा/किती प्रतिसाद दिला, लोकांनी ह्या चळवळीला किती उचलून धरले,विरोध केला हे सर्व जाणून घ्यायचे असेल तर मुळातूनच "भगीरथाचे वारस" हे वीणा गवाणकर लिखित पाणी पंचायतच्या विलासराव साळुख्यांच्या कार्यासंबंधीचे सचित्र कथन वाचायला हवेय.

पेश्याने विद्युत अभियंता असणारे विलासराव एक यशस्वी उद्योजक म्हणून प्रसिद्ध होते. परंतु आधी काही दिवस आपला व्यवसाय सांभाळून आणि नंतर आपली पत्नी आणि विश्वासू सहकारी यांच्यावर उद्योगाची जबाबदारी सोपवून पूर्णपणे त्यांनी ह्या कार्याला वाहून घेतले आणि हे करतानाच देह ठेवला.त्यांची ही कहाणी मुळातूनच वाचण्यासारखी आहे.

भगीरथाचे वारस
लेखिका: वीणा गवाणकर
राजहंस प्रकाशन,पुणे.
किंमत १६०रू.

३ टिप्पण्या:

HAREKRISHNAJI म्हणाले...

very informative. must read the book. thanx for sharing

Unknown म्हणाले...

छानचं लिहिलं आहे, पाणी टंचाई सारख्या गहन विषयावरचा हा लेख विचार करायला नक्की लावेल.खरोखरंच जेंव्हा पाणी कमी असेल त्याच दिवशी फक्त आपण चिंता करतो आणि इतर दिवशी सगळं विसरुन पाण्याचा भरपूर वापर करतो.

SUDHIR KANDALKAR सुधीर कांदळकर म्हणाले...

असे वैचारिक लेखन विरळाच वाचले जाते. याबद्दल वाचकांत उत्सुकता निर्माण होऊन वाचक ते वाचायला उद्युक्त होतात. हा याचा फार मोठा फायदा आहे.प्रसिद्ध पुस्तके सगळेच वाचतात. पण अशा लेखनाबद्दल लिहिलेत तर फारच बरे होईल. अनेक अशी मौल्यवान पुस्तके प्रसिद्धीअभावी कमी वाचली जातात. अजून अशाच पुस्तकांवर लिहा.

शुभेच्छा.