माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

१० एप्रिल, २०१०

पुन्हा एकदा..मुक्काम पोस्ट नवी दिल्ली! भाग ३

सकाळी जाग आली तेव्हा एकदम प्रसन्न वातावरण होतं. बाहेर बर्‍यापैकी गारवा होता. पक्ष्यांची किलबिल जाणवत होती. मुखमार्जनादि आन्हिकं उरकली. रामदासने चहा केला होता. माझ्या समोर गरमागरम चहा आणि बिस्किटे ठेवून तोही गप्पा मारायला बसला. खरंतर त्या काळात मी फक्त कॉफीच पीत असे...पण रामदासने इतक्या प्रेमाने दिलेला चहा मला नाकारता आला नाही आणि मी तो कसाबसा पिऊन टाकला.

गप्पांच्या ओघात कळले की चारपाच दिवसातच रामदास ही जागा सोडून नवी दिल्लीतच....कार्यालयाच्या जवळपास जागा घेण्याच्या विचारात आहे. ह्याचा अर्थ सरळ होता की मलाही तेवढाच अवधी होता...माझ्यासाठी जागा शोधण्याचा...अर्थात आमच्यात एका बाबतीत एकमत होते की शक्य तो आपणे दोघे मिळून राहू शकू अशीच जागा शोधूया.

त्यानंतर स्नानादि इतर आन्हिके उरकून आम्ही दोघे कार्यालयाकड कूच केले. दिल्लीत आमची बरीच कार्यालये आहेत...रामदासला मुख्यालयात जायचे होते तर मला संसद भवनाजवळील कार्यालयात जायचे होते...त्यामुळे आम्ही वेगवेगळ्या बस धरून आपापल्या कार्यालयात पोचलो.

कार्यालयात पोहोचताच मला शिपायाने सांगितले की मला साहेबाने बोलावलंय...मी तसाच साहेबांसमोर हजर झालो. हे साहेब...नायर साहेब मुंबईपासूनचे माझ्या ओळखीचे होते...निव्वळ ओळखीचेच नाही तर माझ्याबद्दल त्यांना आत्मीयताही होती. मी येईपर्यंत ते कॉफी घ्यायचे थांबले होते. त्यानंतर त्यांनी आम्हा दोघांसाठी कॉफी मागवली. दरम्यान त्यांनी माझ्या सोयी-गैरसोयीबद्दल विचारून घेतले. मी माझे आणि रामदासचे जागेबद्दलचे बोलणे त्यांना सांगितले...त्यावर त्यांनी मला...घाबरू नको...आजच तुला जागा मिळवून देतो...म्हणून आश्वस्त केले.

त्यानंतर तासाभरानेच मला पुन्हा नायरसाहेबांनी बोलावून घेतलं... नायर साहेबांच्या बरोबरचाच एक दुसरा साहेब...सिन्हा-बर्मन नावाचा...जो दिल्लीतल्या रामकृष्णपुरम(आरके पुरम) नावाच्या सरकारी वसाहतीत राहात होता...तो आम्हा दोघांना त्याच्या घरात एक खोली द्यायला तयार झालाय...असं सांगितलं. त्यानंतर काही वेळाने चश्मा लावलेला, सडसडीत बांध्याचा,साधारण पावणेसहा फूट उंचीचा एक सदगृहस्थ नायरसाहेबांच्या खोलीत प्रवेशकर्ता झाला...हाच तो सिन्हा-बर्मन. मग माझी आणि त्याची रीतसर ओळख करून देण्यात आली. भाडे ठरले आणि दोनतीन दिवसांनी राहायला येतो असे सांगून त्याचा निरोप घेतला.
लगेच रामदासला दूरध्वनीवरून कळवले...तोही खुश झाला.

इथे दिल्लीत मी जास्त दिवस राहणार नाहीये...असे मनात धरूनच माझे सगळे पुढचे बेत सुरु होते...त्यामुळे ह्या सिन्हा-बर्मनकडे मी काही जास्त दिवस राहणार नव्हतोच...
मी नायर साहेबांना भेटून त्यांच्याशी सल्ला-मसलत केली. मला परत मुंबईला लवकरात लवकर परत जाता यावे म्हणून लागेल ती मदत त्यांनी द्यायचे मान्य केले.बदलीच्या सर्वसाधारण नियमाप्रमाणे खरे तर मला निदान तीन वर्ष इथून हलता येणार नव्हते...पण काहीही करून मला इथून बाहेर पडायचे होते...तेव्हा नायर साहेबांची मदत निश्चितच उपयुक्त ठरणार होती. मग त्यांचीच परवानगी घेऊन मी आमच्या सर्वोच्च साहेबांना भेटण्याचा दिवस ठरवला.

ठरल्याप्रमाणे मी मुख्यालयात गेलो. तिथे साहेबांच्या शिपायामार्फत... मी आलोय...हे साहेबांना कळवायला सांगितलं... तो निरोप देऊन आला आणि मला निदान अर्धा तास तरी वाट पाहावी लागेल असे सांगून बाजूच्याच प्रतिक्षागृहात बसायची विनंती केली. मी आत खोलीत जाऊन बसलो...मनात विचारचक्र सुरु झाले...साहेब कसे वागतील आपल्याशी...रागावतील की सहानुभूती दाखवतील...मदत करतील की फटकारतील?
अशा विचारात गढलो असतानाच....साहेबांनी बोलावलंय...असा निरोप घेऊन शिपाई आला.

सर, मी आत  येऊ का... ह्या माझ्या प्रश्नाला...त्यांनी हसत हसत...या...म्हटलं आणि जीव भांड्यात पडला.चला,म्हणजे साहेब चांगल्या मूडमध्ये आहेत तर.
सर मी....मला पुढे बोलू न देताच सरांनी मला हातानेच खुर्चीकडे बोट दाखवून म्हटले...बसा. मी तुम्हाला पूर्णपणे ओळखतो. ही पाहा तुमची वैयक्तिक माहिती माझ्या पुढ्यातच आहे...आणि का आलात तेही माहीत आहे....साहेब अस्खलीत मराठीत बोलत होते....अहो पुण्याचेच होते फडकेसाहेब...त्यामुळे त्यांच्या मराठीचं आश्चर्य नाही वाटलं....आश्चर्य ह्याचं वाटलं की दिल्लीत राहूनही त्यांची मराठीशी नाळ तुटलेली नव्हती आणि माझ्यासारख्या त्यांच्या भाषाबंधूशी ते आवर्जून मराठीतच बोलत होते.
दिल्लीत मी आलो तेव्हा मला भेटलेल्या मराठी माणसांतील काही मोजकी माणसे सोडली तर बहुतेकजण हिंदी/इंग्रजीतच संवाद साधायचा प्रयत्न करायची...मी मराठी आहे,तुम्हीही मराठी आहात...तेव्हा मराठीतच बोला...असे सांगूनही त्यांच्यात बदल होत नसे....त्या पार्श्वभूमीवर पाहता...फडकेसाहेबांसारखा , आमच्या आस्थापनेतला देशातला सर्वोच्च साहेब सहजपणे माझ्याशी मराठीतून संवाद साधतोय हे ऐकून मला ...ते...गहिवरल्यासारखे की काय ते झाले.

हं.बोला देव,काय अडचण आहे?

सर,मला पुन्हा मुंबईला जायचंय....

एक क्षण फडकेसाहेब शांत होते.
अहो,पण आत्ताच तर तुम्ही आला आहात,लगेच कसं परत पाठवणार तुम्हाला? जरा काही दिवस कळ काढा...मग पाहू काय करता येते ते.

सर, पण मी आधीच लिहून दिले होते ना...मला बढती नको...आणि म्हणून त्यासाठी माझी बदलीही होणार नाही असे आस्थापनाने लिहून दिलेय...मग असे असतांना माझी बदली झालीच कशी? म्हणून सर,कृपा करा,मला लगेच मुंबईला परत पाठवा.

अहो,असं नाही करता येणार...त्या धारवाडकरांनी...तुमच्या मुंबईच्या प्रमुखाने...तुमच्या विरुद्ध शिस्तभंगाची तक्रार केलेय ना..

अहो सर,पण त्याबद्दलची चौकशी होऊन चौकशी समितीने माझ्या बाजूने निर्णय दिलाय...हे देखिल तुम्हाला माहित आहे ना...अशा परिस्थितीत केवळ अट्टाहासाने माझी बदली का केली?

देव,सगळ्याच गोष्टी शब्दात नाही सांगता येत. काही निर्णय हे धोरणात्मक असतात...एक धोरण म्हणून तुमची बदली करावी लागली...तुमची बदली व्हावी म्हणून तुमच्या त्या साहेबांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली...आता मला सांगा, एकाच वेळी दोघांना कसे खुश करणार? आज काही झाले तरी मुंबई कार्यालयाचा भार ते समर्थपणे सांभाळताहेत...तेव्हा तुमची बदली केली नसती तर साहजिकच त्यांचा मानभंग झाला असता.

सर,म्हणजे आम्हा लहान कर्मचार्‍यांना काहीच किंमत नाही...आमचा मानभंग होत नाही? बदली होऊ नये म्हणून मी, बढती नको...असे स्पष्टपणे लिहून दिले आणि तेही, तुम्ही लेखी मान्य केलेले आहे...मग आता बदली करून तुम्ही माझ्यावर अन्याय करता आहात असे नाही वाटत?.....माझा आवाज नकळत वाढत गेला.

मला शांत करत साहेब म्हणाले...हे पाहा,तुमची बदली झाली...किंबहूना एका विशिष्ट परिस्थितीत ती करावी लागली...आता घटना घडून गेलेय...ती दुरुस्त करता येणार नाही...पण मी त्याची भरपाई करू शकतो...तुमची योग्यता लक्षात घेता ...आजवर तुम्ही नाकारलेल्या दोन बढत्या मी तुम्हाला माझ्या अधिकारात त्वरित देऊ शकतो...त्यानंतर मुंबई सोडून तुम्हाला हवे तिथे...मुंबईच्या आसपास बदलीही देऊ शकतो...पण पुन्हा मुंबईला जाण्याचे नाव इतक्यात काढू नका आणि तसा हट्टही करू नका.

सर,अहो,बढतीबद्दल मला कधीच आकर्षण नव्हतं... कौटुंबिक स्थैर्यासाठी मी त्याकडे  जाणीवपूर्वक पाठ फिरवलेय...तेव्हा मला बढती नकोच...तुम्ही मला लगेच मुंबईला परत पाठवा.

देव,अहो असं काय करताय,मी म्हटलं ना....आता ते शक्य होणार नाहीये...तुमचं झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी...

सर,मला आर्थिक नुकसानी परवडेल...पण माझी चुकी नसताना.... मी माझे पालूपद सुरुच ठेवले.

फडके साहेबही मला समजावून थकले. एकीकडे त्यांना माझे म्हणणे पटत होते...दुसरीकडे ते धोरणात्मक निर्णयामुळे अडकलेले होते. शेवटी ते म्हणाले....देव,जरा शांतपणे विचार करा...मी तुम्हाला जे देऊ शकतोय ते द्यायला तयार आहे...पण उगाच नको तो हट्ट करू नका...तुमच्या मागचे कैक लोक पुढे गेले...तुम्ही अजून तिथेच राहिलात...काय मिळवलंत ह्यातून...आता बदली झालेलीच आहे तर...ही बढतीची संधी सोडू नका...मी तुमच्यावर मेहेरबानी म्हणून हे करत नाहीये...तुमची योग्यता आहेच...म्हणून सांगतो...हो म्हणा...दिल्ली काही इतकी वाईट नाही हो...मी गेली पंचवीस वर्षे इथे राहतोय...

सर,दिल्ली कितीही चांगली असो...मला माझी गल्ली...आपली, मुंबईच प्यारी आहे. तुम्ही मला पुन्हा परत पाठवा...बस अजून काही नको मला....आणि मला बढतीलायक समजून बढतीचा प्रस्ताव दिल्याबद्दल मी आपला मन:पूर्वक आभारी आहे...तुम्हाला जर मी खरोखरच तसा वाटत असेन तर मला मुंबईला परत पाठवा...बस्स,तीच माझी बढती असेल.

काही क्षण शांतता पसरली. मग शांततेचा भंग करत,घड्याळाकडे पाहात, साहेब म्हणाले...हे पाहा देव, मला आता एका महत्वाच्या कामासाठी बाहेर जावे लागतेय...मी तुम्हाला दिलेल्या प्रस्तावाबद्दल नीट विचार करा...आपण पाहू काय करता येईल ते...या आता...आणि हो एक सांगायचंच राहिलं...नायरना हे सांगा...त्यांचाही सल्ला घ्या हवे तर...दिल्लीत ते तुमचे पालक आहेत...नव्हे,तुमचे पालकत्व त्यांनी स्वत:हून स्वीकारलंय...तुम्हाला हव्या त्या सवलती इथे मिळतील...तेवढं एक सोडून....
साहेबांनी वाक्य अर्धवट सोडलं आणि त्यांनी बाहेर जाण्यासाठी आपली ब्रीफकेस उचलली...

४ टिप्पण्या:

nikhil म्हणाले...

mag kai zale ? badlee zale ka ?

मी अत्त्यानंद म्हणाले...

धीर धरा...कळेलच पुढे. :)

अनामित म्हणाले...

पुढल्या भागाची वाट पहात आहे. :-)

सहज

मी अत्त्यानंद म्हणाले...

लवकरच येत आहे...सहजराव, वाट पाहा! ;)
जास्त वेळ वाट पाहायला लागणार नाही. :)