माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

१७ ऑक्टोबर, २००९

पुनर्जन्म!

मित्रहो इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलेकम्युनिकेशन क्षेत्रात माझी पुरी हयात गेली तरीही आज मी पूर्णपणे एक सामान्य व्यक्ती म्हणून जगतोय. म्हणजे असं की जेव्हा जे करायचं ते हिरीरिने केलं,त्यात बर्‍याच अंशी प्राविण्यही मिळवलं; मात्र आता ते सगळं सगळं जाणीवपूर्वक विसरलोय. राहिलेत फक्त काही कडू-गोड आठवणी. त्यातलीच एक इथे सांगतोय. पाहा तुम्हाला आवडते का?

आयटीआय(आय.आय.टी. नव्हे) मधून मी रेडिओ आणि टेलिव्हिजन मेकॅनिकचा दोन वर्षांचा(१९६९-१९७१)कोर्स केला तेव्हा खरे तर मुंबईत दूरदर्शनचा जन्म व्हायचा होता; त्यामुळे टीव्हीबद्दलचे फक्त पुस्तकी ज्ञान घेऊनच बाहेर पडलो होतो. पुढे २ऑक्टोबर१९७२ ला गांधी जयंतीचा मुहूर्त साधून मुंबई दूरदर्शन सुरु झाले.सुरुवातीला दूरदर्शनसंचांची(दूदसं)म्हणजेच टीव्ही सेट्सची संख्या मर्यादित होती आणि असे संच निर्माण करणार्‍या कंपन्याही अगदी मोजक्याच होत्या. हे सगळे दूदसं श्वेत-श्याम(ब्लॅक ऍंड व्हाईट)प्रकारातले होते.फारच थोड्या लोकांकडे असे संच त्यावेळी होते आणि त्यामुळे त्यावरचे कार्यक्रम पाहण्यासाठी अशा लोकांकडे खूप गर्दी जमत असे.

मी देखिल असे बरेच कार्यक्रम दुसर्‍यांच्या संचावर पाहत असे कारण आमच्या घरात त्यावेळेपर्यंत वीजच नव्हती. ती आली साधारण १९७५च्या आसपास.त्यामुळे जरी मी कोर्स १९७१ साली पूर्ण केलेला होता तरी घरी वीजेशी संबंधी कोणतेही काम करू शकत नव्हतो. १९७२ साली मला नोकरी लागली आणि मी माझे कौशल्य तिथे पारखून घ्यायला लागलो. पण इथे मुख्य काम टेलेकम्युनिकेशन संबंधीचे होते. इथे असणार्‍या काही कर्मचार्‍यांचे रेडिओ,ट्रान्झिस्टर आणि टेप रेकॉर्डर्स मी फुकटात दुरुस्त करून दिले आणि हळूहळू माझ्या कार्यालयीन कामाव्यतिरिक्त ह्या असल्या कामातही मी चांगलाच सराईत झालो. तरीही अजूनपर्यंत टीव्हीला मी हात लावलेला नव्हता,कारण त्यासंबंधीचे प्रात्यक्षिक मी अजूनपर्यंत केलेले नव्हते. एक-दोघांनी त्यांचा टीव्ही दुरुस्त करायला मला बोलावणेही धाडले होते पण माझ्यातच तसा आत्मविश्वास नसल्यामुळे मी त्यांना विनम्रपणे नकार दिला होता. पुढे लोकांची आमंत्रणे वाढायला लागली आणि मला त्याबाबत गंभीरपणाने विचार करावा लागला. त्याचा परिणाम म्हणून मग मी टीव्ही दुरुस्तीचा एका छोटासा खाजगी कोर्स केला आणि हळूहळू टीव्ही दुरुस्तीच्या क्षेत्रात प्रवेश केला.

सुरुवातीला मला बर्‍याच ठिकाणी हमखास अपयश येत गेले. लोकांच्या अपेक्षा मी पूर्ण करू शकलो नाही. त्यावर मनातल्या मनात विचारमंथन सुरु असायचे की टीव्हीबाबत मला पूर्ण ज्ञान असूनही असे का होत असावे? विचार करता करता मला एक गोष्ट लक्षात आली आणि त्यावर नीट लक्ष केंद्रित केल्यावर मग मी देखिल सहजपणाने टीव्ही सेट्स दुरूस्त करायला लागलो. काय बरे हो्ती ती गोष्ट? सांगतो....
जेव्हा केव्हा मी कुणाच्याही घरी दुरुस्तीसाठी जात असे तेव्हा त्या टीव्हीचे मागचे कव्हर उघडल्यावर सर्वप्रथम काय दिसायचे तर..खंडीभर धूळ साचलेली असायची. मग मी सर्वात आधी ती धूळ साफ करायचो. टीव्ही आतून एकदम चकाचक करून टाकत असे आणि हीच गोष्ट नेमकी माझ्या अपयशाला कारणीभूत असायची. साफसफाई करताना टीव्हीतल्या मूळ दोषाबरोबर अजूनही काही ’मानवनिर्मित’ दोष निर्माण व्हायचे...जे शोधणे महाकर्म कठीण काम होऊन बसायचे. त्यामुळे टीव्हीतला मूळ दोष काढला तरी हे नवनिर्मित दोष काही केल्या डोक्यातच घुसायचे नाहीत...मग त्यावर उपाय काय योजणार?
असो. तर अशा तर्‍हेने ठकत ठकत मी शहाणा झालो आणि टीव्ही दुरुस्तीतही चांगलाच सरावलो.

असाच एकदा एका ठिकाणी टीव्ही दुरुस्ती आटोपून मी माझ्या सामानाची आवराआवर करत होतो. इतक्यात तिथे एक शेजारचे वृद्ध गृहस्थ आले आणि त्यांनी यजमानांकरवी(ज्यांच्या घरी टीव्ही दुरुस्त केला होता)माझ्याकडे विचारणा केली...
आमचा टीव्ही दुरुस्त करणार काय?
मी ’हो’ म्हटले आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या घरात गेलो.
त्यावेळचा अतिशय मानाचा समजला जाणारा असा २४इंची स्टॅंडर्ड कंपनीचा त्यांचा टीव्ही पाहून मला खूप आनंद झाला. आता हा टीव्ही मला हाताळायला मिळणार म्हणून मी अधीर झालो होतो. तेव्हढ्यात ते गृहस्थ म्हणाले....
बरं का! हा आमचा टीव्ही गेले सहा महिने बंद आहे. आमचा पूर्वीचा मेकॅनिक म्हणाला होता की ह्याची पिक्चर ट्युब गेलेय आणि ती बदलायला खूप खर्च होईल...म्हणून आम्ही हा दुरुस्त न करता असाच ठेवलाय. माझा मुलगा म्हणतोय की इतका खर्च ह्याच्यात करण्याऐवजी आपण नवा टीव्ही घेऊ या. पण मला हा टीव्ही खूप आवडतो,तेव्हा काहीही झाले तरी मी त्याला टाकू शकत नाही. आता तुम्ही त्याची ट्युब बदलायची असली तरी बदला पण त्याला दुरुस्त करा हो. घरातलं एक माणूस आजारी असल्यावर कसं घर सुनं सुनं होतं,तसं झालंय अगदी.
मी म्हटलं... काका! आधी मला त्याला तपासू द्या मग काय करायचे ते पाहू.
अहो,नाही हो! त्याची ट्युब गेलेय,तेव्हढी बदला म्हणजे सुरु होईल. आवाज मात्र अजूनही चांगला येतोय...काका वदले.
ठीक आहे, मी पाहतो काय करायचे ते असे म्हणून मी टीव्ही सुरु केला . टीव्हीचा आवाज अतिशय मस्त आणि खणखणीत होता;पडद्यावर मात्र मध्यभागी एक रेखीव अशी आडवी रेघ येत होती. मी काय समजायचे ते समजलो. लगेच टीव्हीचे सर्किट तपासले आणि पाचच मिनिटात दोषावर शिक्कामोर्तब केले.
नंतर मी त्या काकांना म्हणालो....काका,पिक्चर ट्युब बदलायची जरूर नाहीये. एक छोटा भाग बिघडलाय तो मी उद्या घेऊन येतो. उद्या तुमचा टीव्ही सुरु होईल.
काका म्हणाले...अहो,पण पिक्चर ट्युब गेलेय ना? ती बदला की. आमचा मेकॅनिक सारखे तेच म्हणत होता.
मी काकांना मध्येच थांबवत म्हणालो....उद्यापर्यंत धीर धरा. सगळं आपोआप कळेल.
बरं! मग तुम्हाला आत्ता किती रुपये देऊ? तो पार्ट आणायला लागतील ना?..काका
नाही हो. आत्ता काही नको. उद्याच द्या टीव्ही दुरुस्त झाल्यावर.... मी


दुसर्‍या दिवशी मी पार्ट बाजारातून विकत घेतला आणि त्यांच्या घरी गेलो. ते काका माझी अतिशय उत्सुकतेने वाट पाहत होते. मी पटापट कामाला सुरुवात केली. जुना पार्ट काढून नवा बसवेपर्यंत ते काका मला काही ना काही विचारत होते आणि मी फक्त ’हो,नाही’अशा स्वरुपात त्यांना उत्तरं देत होतो.सगळी जोडणी पूर्ण झाल्यावर मी त्यांना टीव्हीच्या समोर बसायला सांगितले आणि हळूच टीव्ही सुरु केला. व्हॉल्वचा टीव्ही असल्यामुळे काही क्षण फक्त आवाज येत होता आणि मग हळूहळू चित्र दिसायला लागले. मी टीव्हीच्या मागून त्या काकांची प्रतिक्रिया न्याहाळत होतो. चेहर्‍यावरचे शंकाकुशंकांचे भाव हळूहळू दूर होत होते आणि चित्र दिसता क्षणी ते एखाद्या लहान मुलासारखे आनंदाने किंचाळले. चटकन कोचावरून ते ऊठले आणि येऊन त्यांनी माझे हात हातात घेतले.त्यांना बरंच काही बोलायचं होतं पण तोंडातून शब्द फुटत नव्हता. मात्र त्यांचा स्पर्श बरंच काही सांगून गेला. त्याचवेळी त्यांच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहात होते.

मला हाताला धरूनच त्यांनी कोचाजवळ नेलं आणि स्वत:जवळ बसवून बोलायला लागले....
आज तुम्ही माझ्या टीव्हीला जीवंत केलंत. त्याचा जणू ’पुनर्जन्म’च झालाय. काय हवे ते मागा. मी देईन. कित्ती कित्ती महिन्यांनी ह्या घरात असा जीवंतपणा आलाय.
मी म्हटलं....काका,अहो मी फारसं काही नाही केलं. जे केलं ते नेहमीच्या सवयीप्रमाणे केलंय. मला हे काम करताना काहीच श्रम पडले नाहीत किंवा फारसे डोकंही लढवायला लागलं नाही. तरीही तुम्हाला त्याचं अप्रूप वाटावं..हे मी समजू शकतो. पण माझ्यासाठी हे विशेष असे काही नाही. तेव्हा फक्त पार्टचे ४० रुपये आणि माझ्या मेहनतीचे ५०रुपये असे मिळून ९०रुपये द्या. जास्त काही नको.
अहो,ते तर मी देईनच,पण मी आज खूप खुश आहे तेव्हा तुम्हाला बक्षीसही देणार...असे म्हणून काकांनी माझ्या हातात ३००रुपये ठेवले.
नाही-हो करता करता मला ते सगळे पैसे घ्यावे लागले. कारण काका मानायलाच तयार नव्हते. इतकं करून ते थांबले नाहीत. त्यांनी लगेच त्यांच्या सुनेला गोडाचा शिरा बनवायला सांगितले आणि मुलाला त्याच्या कार्यालयात दूरध्वनी करून टीव्ही सुरु झाल्याची बातमी कळवली. येताना पेढे आण..वर असेही फर्मान सोडले.

टीव्हीत काही छोट्या-मोठ्या गोष्टी तपासून त्याचे मागचे कव्हर लावेपर्यंत काकांनी त्या शेजार्‍यांनाही सहकुटुंब बोलावून आणले आणि त्या घरात गप्पा-गोष्टींना नुसता ऊत आला. सगळ्यांच्या कौतुक मिश्रित नजरांचे आकर्षण होतो...मी. मला अगदी अवघडल्यासारखे झाले होते.

आम्हा सगळ्यांचे खान-पान सुरू असतानाच काकांचा मुलगा त्याच्या पाच-सहा वर्षांच्या छोट्या मुलीसहीत आला....आणि मग पुन्हा जल्लोष झाला. ती छोटी तर आनंदाने घरभर बागडायलाच लागली. काकांच्या मुलानेही माझे हात हातात घेऊन कृतज्ञता व्यक्त केली.

त्यानंतर बोलण्याच्या ओघात समजले ते असे....काका हे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती म्हणून दोनतीन वर्षांपूर्वीच सेवानिवृत्त झाले होते आणि त्यानंतर वर्षभरात त्यांची सौभाग्यवती आकस्मिकरित्या हे जग सोडून गेली होती. मुलगा आणि सून दोघेही नोकरी करणारे आणि छोटी दिवसभर शाळा आणि पाळणाघरात. वेळ घालवण्यासाठी आणि मनोरंजनासाठी ते पूर्णपणे टीव्हीच्या आहारी गेलेले आणि अशात जवळपास सहा महिन्यांहून जास्त टीव्ही बंद ...मग त्यांनी वेळ कसा घालवायचा? काकांना दिवसभर एकाकीपणामुळे घर अगदी खायला उठायचे....आणि आज त्यांचा सखा,त्यांचा सोबती पुन्हा त्यांच्याशी गप्पा मारायला लागला होता....त्यामुळे झालेला हा आनंद...आनंद कसला ...परमानंदच म्हणा.

टीव्ही दुरुस्तीमुळे टीव्हीचा पुनर्जन्म झाला असं जरी काका म्हणाले असले तरी मला मात्र तो काकांचाच पुनर्जन्म वाटतो.

२ टिप्पण्या:

sunil म्हणाले...

Realy touching story and perfect truth by auther

मी अत्त्यानंद म्हणाले...

धन्यवाद सुनील.