माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

३ नोव्हेंबर, २००९

कांद्याची पीठ पेरून भाजी!

मंडळी मी माझी एक आवडती पाककृती इथे चढवतोय.
बरेचजण विविध भाज्या बनवताना त्यात कांदा घालतात. पण मी आज फक्त कांद्याची भाजी कशी करतात हे सांगणार आहे.अर्थात हा पदार्थ तसा काही नवीन नाहीये. ही भाजी मी माझ्या लहानपणापासून खात आलेलो आहे....म्हणजे ही केवळ ही एकच भाजी नाही बरं का. :D
माझी आई ही भाजी अतिशय चविष्ट आणि खमंग अशी बनवायची. तुमच्यापैकी कैक जणांकडेही कदाचित ही भाजी केली जात असेल. असो. आता नमनाला वाटीभर तेल वापरल्यावर मूळ कहाणीकडे आपण आता वळू या....अहो तो ’वळू’ नाही हो. ;)
ह्या भाजीला लागणारे साहित्यः
४ कांदे,२चमचे चण्याचे पीठ(बेसन),तिखट,मीठ,साखर,तेल,मोहोरी,हिंग इत्यादि.
कृती:प्रथम कांदे सोलून,चिरून घ्यावेत. चिरताना कांदे उभे(खाली दाखवल्याप्रमाणे) चिरावेत.



त्यानंतर कढईत दोनतीन चमचे तेल घालून हिंग-मोहोरीची फोडणी करावी. त्या फोडणीत चिरलेला कांदा घालून तो चांगला परतून घ्यावा. त्यानंतर त्यात चवीपुरते लाल तिखट,मीठ आणि चिमूटभर साखर(साखरेमुळे खमंगपणा येतो.) घालून कालथ्याने सगळं एकजीव करावं.
त्यानंतर भाजीत बेसन घालावे... बेसन घालताना ते चमच्याने आधी हातावर घ्यावे आणि नीट पसरून भाजीवर पेरावे म्हणजे त्याच्या गुठळ्या होणार नाहीत. पुन्हा कालथ्याने भाजी सारखी करून मग त्यावर झाकण ठेवून एक हलकीशी वाफ द्यावी जेणेकरून बेसन कच्चं राहणार नाही.



अशा तर्‍हेने आपली भाजी तयार झाली.
करून पाहा आणि खाऊन सांगा कशी वाटली.
तळटीप: कांदे चिरल्यावर जरी जास्त दिसले तरी त्याची भाजी चोरटी होत असते. तेव्हा केवळ हे एकच तोंडीलावणे असल्यास अशी भाजी करताना आपण किती लोकांसाठी ही भाजी करणार आहोत हे लक्षात घेऊन त्याप्रमाणात कांदे आणि इतर साहित्य वापरावे.

४ टिप्पण्या:

mugdha म्हणाले...

Chhan aahe pakakruti..yala vidarbhat "jhunka" mhantaat!!

प्रमोद देव म्हणाले...

धन्यवाद मुग्धा.
झुणका आणि ही भाजी ह्यातला महत्वाचा फरक म्हणजे...झुणक्यात कांद्याचे प्रमाण बेसनाच्या तुलनेत बरंच कमी असतं आणि कांद्याच्या भाजीत बेसनाचं प्रमाण खूपच कमी असतं. बाकी एक आहे की ह्या दोघांची जोडी अभेद्य आहे. :)

kavita म्हणाले...

ek navin recipe sangitalyabaddal thank you.

mi nakki karun pahin.

प्रमोद देव म्हणाले...

धन्यवाद कविता!
आणि हो, केल्यानंतर कशी झाली तेही सांग! :)