माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!
१० मार्च, २००९
होळी!
होळी रे होळी पुरणाची पोळी
सायबाच्या *** बंदुकीची गोळी
होळी म्हटलं की माझ्या बालपणातली ही आरोळी मला सर्वप्रथम आठवते. ह्याचे जनकत्व कुणाकडे होते कुणास ठाऊक. माझा जन्म स्वातंत्र्योत्तर काळातला. त्यामुळे साहेब म्हणजे इंग्लीश माणूस असे जे एक समीकरण त्याकाळी होते त्यातला साहेब मी कधीच पाहीलेला नाही. कदाचित स्वातंत्र्यपूर्व कालात ह्या आरोळीचा जन्म झाला असावा आणि परंपरेने ती आमच्यापर्यंत पोचलेली असावी. असो.
होळीचा सण हा आम्हा लहान मुलांसाठी खूप आनंदाचा सण होता. होळीच्या आधी चांगले आठवडाभर जळाऊ लाकडांची जमवाजमव करण्यात आम्हा मुलांचा सगळा वेळ जात असे. लाकडे,बांबू पळवणे,छोटी-मोठी झाडं तोडणे,सुकलेला पालापाचोळा एकत्र साठवणे इत्यादि कामं करण्यात सगळ्यांची अहम-अहमिका लागत असे. त्यानंतर प्रत्येक घरी जाऊन वर्गणी गोळा करायची अशीही एक कामगिरी असायची. आमच्या वाडीत जवळजवळ तीस-चाळीस बिर्हाडं होती. साहजिकच होळी अगदी दणक्यात साजरी व्हायची.
होळीचा खड्डा खणण्यासाठी घराघरातून पहारी,कुदळी,फावडी वगैरे माळ्यावरून काढण्यापासून तयारी चालायची. खड्डा खणण्याचे काम मोठ्या मुलांकडे असायचे. खड्डा खणताना निघणारी माती उचलून बाहेर टाकण्याचे काम मात्र लहान मुलांवर सोपवले जायचे. ती बाहेर काढलेली माती मग त्या खड्ड्याच्या बाहेरून गोलाकार रिंगणबांध बनवण्यासाठी वापरली जायची. खड्ड्याच्या मधोमध एक छोटासा खड्डा खणला जायचा. त्यामध्ये एक मोठा थोरला बुंधा रोवला जायचा. मग ह्या बुंध्याच्या आधाराने इतर लाकडे रचली जायची. ही लाकडे रचण्याची पण एक खास पद्धत होती ज्यामुळे त्यात हवा खेळती राहात असे आणि होळीही सदैव पेटती राहात असे. होळीची लाकडे रचून झाली की मग एका मोठ्या दोरीने त्यांच्याभोवती वेढा घातला जायचा.मग होळीला हार घातला जायचा.
अशा तर्हेने जय्यत तयारी झाली की रात्री आठच्या सुमारास वाडीतील सर्व आबालवृद्ध एकत्र जमत. वाडीतल्या सुवासिनी होळीची पुजा करत. मग कुणी तरी वडिलधारं व्यक्तिमत्व होळी पेटवत असे. उघड्या तोंडावर पालथी मूठ धरून 'बो बो बो' असे मनसोक्त ओरडायला अशा वेळी खूप मजा यायची. एरवी असे ओरडले तर मार मिळत असे पण त्याच्याउलट ह्या दिवशी जो जास्त जोरात ओरडू शकायचा त्याचे जाहीर कौतुक व्हायचे. त्यानंतर होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जायचा. होळीत नारळ,लाह्या पैसे वगैरे अर्पण केले जायचे. होळीत खरपूस भाजले गेलेले नारळ बाहेर काढण्याचे काम मोठी मुले करत. त्यासाठी त्यांच्याकडे मोठ्या काठ्या असत. असे भाजलेले नारळ बाहेर काढले की त्याचे खोबरे बाहेर काढून त्याचे छोटे छोटे तुकडे करून साखरेबरोबर प्रसाद म्हणून ते वाटण्यात यायचे. त्या खोबर्याची चव काही न्यारीच असते. आजही त्या आठवणीने तोंडाला पाणी सुटलंय.
आमच्या वाडीतली होळी इतकी प्रचंड असे की आजूबाजूच्या वाडीतली समस्त मंडळी तिच्या दर्शनाला येत असत. दर्शन घ्यायला येणारी मंडळी आधी होळीची पूजा करत. मग नैवेद्य म्हणून होळीला पुरळपोळी,लाह्या,नारळ,पैसे वगैरे अर्पण करत. त्यामुळे नारळांनाही तोटा नसायचा. त्यानंतर हातातल्या लोट्यातले पाणी सांडत सांडत होळीला प्रदक्षिणा घालत.
रात्री शेव कुरमुर्यांची भेळ बनवली जायची. ही भेळ इतकी चविष्ट आणि भरपूर बनवत की आम्ही मुले ती मनसोक्त खात असू तरीही ती संपत नसे. त्याच बरोबरीने खोबर्याचा तोबराही सतत चालूच असायचा. होळीसाठी भांगही वाटली जायची पण आमच्या घरात भांग,दारू वगैरेसारख्या गोष्टी निषिद्ध मानल्या जातात, त्यामुळे मी आणि माझी भावंडं त्या भानगडीत कधीच पडलो नाही. रात्री बारा वाजेपर्यंत आम्हाला होळीचा आनंद उपभोगायची मोकळीक असायची. त्या वेळेत इतर मुलांच्या संगतीने आम्हीही इकडून तिकडून लाकडं,बांबू वगैरे पळवून आणण्यात आमचा हातभार लावत असू. आईची हाक आली की मग नाईलाजाने झोपायला जावे लागे. खरे तर अशा वेळी झोप कसली येतेय म्हणा. बाहेरून, होळीच्या पेटण्याचा, त्यातल्या लाकडांच्या फुटण्याचा तो विशिष्ट आवाज, वातावरणात भरलेला धूर आणि उकाडा आणि त्याचसोबत जागरण करणार्या होळकरांचे बोंबलणे,ह्या सर्व गोष्टींमुळे अंथरुणावर नुसते कुशी बदलत पडून राहाणे इतकेच आमच्या हातात असे.
दुसर्या दिवशी सकाळी सकाळी उठून मग त्या धुगधुगी असलेल्या होळीवर आंघोळीसाठी पाणी तापवण्यासाठी वाडीतल्या वाडकरांची रांग लागलेली असायची. मोठी माणसे आपापल्या आंघोळी उरकून घेत. आम्हा मुलांना मात्र धुळवड साजरी करायची असल्यामुळे आम्ही त्या आंघोळीच्या कचाट्यातून सुटायचो. माझ्यासारखी काही उपद्व्यापी मुले होळीच्या बाजुलाच बसून त्यात आदल्या दिवशी लोकांनी टाकलेले पैसे शोधण्यासाठी एखाद्या काठीच्या सहाय्याने उसका-उसकी करायचो. त्यात बर्याच जणांना पैसे मिळायचे देखिल. त्या काळी एक नया पैशाचे तांब्याचे नाणे होते. ते राखेने घासले की इतके चकचकीत दिसायचे की ते आम्ही एकमेकांना दाखवत असू. असे नाणे ज्याला मिळायचे त्याच्या भाग्याचा इतरजण हेवा करत.
त्यानंतर दुपारी बारा वाजेपर्यंत यथेच्छ धुळवड साजरी करायचो. आधी आमच्या वेळी कृत्रिम रंग नसायचे.(पुढे पुढे तैलरंग(ऑईलपेंट)वापरायला सुरुवात झाली. तो घालवायचा म्हणजे अक्षरश: खरवडून काढावा लागायचा.अंगाला रॉकेल फासावे लागायचे तरीही रंग सहजासहजी निघत नसे. त्यामुळे कातडी सोलवटायची,डोक्याचे केस तडतडायचे. हे सगळे अनुभवल्यानंतर मी त्यातून अंग काढून घेतले.) एकमेकांना रंगवण्यासाठी आम्ही गुलाल,होळीतली राख आणि माती ह्यांचा यथेच्छ वापर करायचो. अंगावर बादल्याच्या बादल्या पाणी ओतायचो आणि मग एकमेकांना मातीत लोळवायचो. अगदी कंटाळा येईपर्यंत हे सगळं चालत असे. मग विहीरीवर जाऊन त्याच कपड्यात गार पाण्याने मनसोक्त स्नान करून ओल्या अंगानेच घरी परतायचो. घरी आल्यावर ऊन ऊन पाण्याने आणि साबण लावून पुन्हा आंघोळ व्हायची; आणि मग पुरणपोळी,कटाची आमटी वगैरे पक्वान्ने आमची भूक भागवत. अशी सगळी मज्जा मज्जा होती.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा