माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२६ सप्टेंबर, २००९

जीकेके !

जी.के.के.नायर! असे लांबलचक नाव धारण करणारी एक व्यक्ती आमच्या कार्यालयात दिल्लीहून मुंबईला बदलीवर आली.साधारण पन्नाशी गाठलेल्या ह्या व्यक्तीचे प्रथम दर्शनी रूप निश्चितच कुणावरही छाप टाकण्याइतके प्रभावी होतं. मध्यम उंची,तसाच मध्यम बांधा,नाकी-डोळी नीटस, भरपूर तेल लावून आणि मधल्या भांगाचे अगदी चापून चोपून बसवलेले काळे कुळकुळीत केस, डोळ्यांवर सोनेरी फ्रेमचा चश्मा, अंगावर आकाशी रंगाचा सफारी पोशाख आणि हातात ऍरिस्टोक्रॅटची ब्रीफकेस अशा रुपातल्या जीकेकेला पाहिले आणि पहिल्या भेटीतच आमची मैत्री जमली.

ह्या जी.के.के आद्याक्षरांचे कोडे काय होते हे त्याने एकदा उलगडून दाखवले पण अगदी खरं सांगायचं तर तेवढ्यापुरतेच काय ते मला कळले. त्यानंतर मात्र मी ते पार विसरूनही गेलो. ह्या जीकेकेची एक खास अशी लकब होती. तो जेव्हा कामात मग्न असायचा तेव्हा त्याची मान एका विशिष्ट लयीत हलायची...कशी? जरा डोळ्यासमोर श्रीराम लागूंना आणा. संवाद म्हणतांना त्यांची मान कशी हलायची....आपलं कंप पावायची....अगदी तसेच. जीकेकेच्या ह्या लकबीमुळेच दादा पाटीलने...आमच्या कार्यालयातील ’दादा कोंडक्यानी’ जीकेके नायरचे नामकरण केले होते.....जी.कथकली नायर!
कथकली नाच करताना मानेच्या ज्या काही खास हालचाली असतात...तसे काहीसे नायरचे व्हायचे. त्या कथकलीचे नंतर एका बंगाल्याने ’कोथोकोली’ केले. :) तेव्हापासून जीकेके नायर म्हणजे जी.कोथोकोली नायर असे सुधारित नामकरण झाले आणि ते सर्वानुमते मान्य झाले. :)

जीकेके हा सैन्यदलातून आलेला म्हणजे शुद्ध मराठीत सांगायचं तर एक्स-सर्विसमन होता. कोणत्याही सैनिकाप्रमाणे तो त्याच्या कामात तरबेज होताच पण सैन्यात तो एक उकृष्ट कराटेपटू(खेळाडू) म्हणून गणला जायचा. अर्थात ही माहिती माझ्यासारख्या त्याच्याशी मैत्री असणार्‍या लोकांव्यतिरिक्त कुणालाही नव्हती. जीकेके वागायला इतका साधा होता की त्याने आपल्याकडे अशी काही विद्या आहे म्हणून मुद्दाम कधी कुणाची कळ काढलेय किंवा उगाचच कुणाला दम दिलाय असं माझ्या पाहण्यात आलं नाही. आपण आणि आपलं काम....बाकी काही नाही. कुणाच्या अध्यात ना मध्यात.

जीकेकेसारखीच सैन्यदलातून आमच्या कार्यालयात आलेली आणि आपल्या नोकरीतील दुसरी कारकीर्द चालवणारी ही बहुतेक माणसं ’ऑपरेटर’ सदरातील असायची. त्यामुळे जिथे कुठे मशीनमध्ये काही तांत्रिक दोष आला तर त्यांना माझ्यासारख्याची म्हणजे ’मेंटेनन्स’ वाल्याची जरूर लागायची. कदाचित ह्यामुळेच माझी आणि ह्या समस्त फौजी लोकांची वेव्ह-लेंग्थ जुळली असावी. ह्या सर्व माजी सैनिकांना सवलतीच्या दरात वस्तुखरेदीची जी सवलत असायची त्याचा फायदा एखादा अपवाद वगळता बहुतेक सर्वजण आमच्या सारख्या सिव्हिलियन्सना देत असत. जीकेकेही तशातलाच. त्याच्याकडे केव्हाही आपण काही मागणी नोंदवावी की पुढच्या वेळी जेव्हा तो कॅंटीन डिपार्टमेंट स्टोअरला जाईल तेव्हा आठवणीने तो ती गोष्ट घेऊन यायचा.

जीकेके अधनं मधनं आमच्यामध्ये हास्य-विनोद करायलाही सामील होत असे. त्याच्या कथकली ते कोथोकली ह्या नामकरणावरही त्याने हसून दाद दिलेली होती. त्यामुळे संपूर्ण कार्यालयात तो तसा लोकप्रिय होता. कधीही कुणावर रागावलेला,रुसलेला असे मी त्याला पाहिलेले नव्हते....एक वेळचा अपवाद सोडला तर....

त्याचे काय झाले...आमच्याच कार्यालयात एक लेस्ली नावाचा गोव्याचा रोमन कॅथलिक तरूण होता. तरूणाईचा जोश म्हणा किंवा स्वभाव जात्याच खोडकर म्हणा...तो ज्याला त्याला उगाचंच छेडत असायचा. आमच्या कार्यालयात भर्ती झाला तेव्हा अगदी शेलाट्या बांध्याचा असणारा लेस्ली बघता बघता वर्ष-दोन वर्षात एकदम धष्टपुष्ट झाला. बहुदा मुंबईची हवा आणि खाणं-पिणं त्याला मानवलं असावं. ह्यामुळे की काय त्याचा व्रात्यपणा अजूनच वाढला...म्हणजे आधी तो लोकांशी फक्त शाब्दिक छेडाछेडी करायचा..पण आता वेळप्रसंगी शारिरीक मारहाण करण्या इतपतही त्याची मजल जायला लागली. आमच्या कार्यालयात तो फक्त दोघांना घाबरून असायचा.. त्यात एक म्हणजे दादा पाटील आणि दुसरा चिंटू उर्फ लुडविग...असाच दुसरा रोमन कॅथलीक..जो सराईत मुष्टीयोद्धा होता...तर ह्या दोघांपासून तो चार हात दूर असायचा.



लेस्लीला एकदा कधी नव्हे ती जीकेकेची कळ काढण्याची हुक्की आली. जीकेके ह्या आद्याक्षरांवरून,त्याच्या नायर ह्या जातीवरून आणि एकूणच त्याच्या मल्याळी भाषेबद्दल चेष्टा करायला सुरुवात केली. आधी जीकेकेने त्याच्याकडे साफ दूर्लक्ष केलं. तरीही लेस्ली गप्प बसेना...म्हणून मग जीकेकेने त्याला सडेतोड शाब्दिक उत्तर दिले. जीकेकेचे उत्तर ऐकल्यावर लेस्ली जाम भडकला आणि जीकेकेच्या अंगावर धावून गेला. मी लेस्लीला अडवण्याचा निष्फळ प्रयत्न केला पण लेस्लीने मला झटकून टाकले आणि जीकेकेच्या सफारीची कॉलर धरली. तरीही जीकेके शांत होता. तो लेस्लीला समजावण्याचा प्रयत्न करत होता,शांत करण्याचा प्रयत्न करत होता पण त्यामुळे लेस्ली अजूनच पेटत होता. जीकेके समजावणीच्या भाषेत बोलतोय म्हणजे आपल्याला तो घाबरलाय असे लेस्लीला वाटत होते त्यामुळे लेस्लीने इंग्लीशमधल्या त्याला येत असतील-नसतील त्या शिव्या द्यायला सुरुवात केली. तरीही जीकेके शांत होता. जीकेकेचा शांतपणा असह्य होऊन शेवटी लेस्लीने त्याला मारण्यासाठी आपला उजवा हात उगारला...तरीही जीकेके शांत होता.

इतक्यात तिथे साहेब येताहेत अशी कुणकुण लागली आणि लेस्ली तिथून पळाला. लेस्लीने शारिरीक पातळीवर हल्ला करूनही जीकेकेसारखा कराटेपटू गप्प का बसला...असा प्रश्न मला सतावत होता. इथे मी जीकेकेच्या जागी असतो तर... असो.
ह्या प्रसंगानंतरही जीकेकेच्या मनात लेस्लीबद्दल कोणतीही अढी निर्माण झाली नाही...उलट,बच्चा आहे अजून,डोकं गरम आहे..वय वाढेल तसा होईल शांत...असं जीकेके म्हणायचा. मात्र लेस्लीने जीकेकेच्या शांतपणाचा चुकीचा अर्थ लावला. जीकेके मला घाबरतो...असे तो सर्वांना सांगत सुटला.

ह्या प्रसंगानंतर पुन्हा एकदा लेस्लीने संधी साधून जीकेकेची छेड काढली पण जीकेकेच्या थंड प्रतिसादामुळे तो शांत होण्याऐवजी अजूनच पेटत गेला आणि शेवटी त्याने पुन्हा जीकेकेची कॉलर पकडली. कॉलर सोड...असे वारंवार सांगूनही लेस्ली ऐकेना. उलट त्याने जीकेकेला एकदोन फटकेही लगावले. आपल्या बापाच्या वयाच्या व्यक्तीवर विनाकारण हात उचलताना लेस्लीला जरासुद्धा लाज वाटत नव्हती आणि जीकेकेच्या शांतपणाचा तो गैर अर्थ काढून त्याच्यावर शारिरीक हल्ला करण्यात धन्यता मानत होता.

लेस्लीला समजावण्याचा प्रयत्न असफल होतोय आणि आता तो हाताबाहेर जातोय हे लक्षात आल्यावर जीकेकेने त्याला दरडावणीच्या स्वरात इशारा दिला आणि झटक्यात दूर ढकलून दिले. ह्यावरून खरं तर लेस्लीला काय ते समजायला हवे होते पण उलट तो मोठ्या त्वेषाने जीकेकेवर धावून गेला. आता पुढे काय होतंय...ह्याची मी उत्कंठेने वाट पाहत होतो...आणि..

मी पाहिले की लेस्ली एकाच जागी ठाणबद्ध झालेला होता. जीकेकेने त्याच्या गळ्यात दोन बोटं खुपसली होती आणि लेस्ली त्याच्यापासून एका हाताच्या अंतरावर अक्षरश: सुटकेसाठी तडफडत होता. काही क्षण तशाच अवस्थेत लेस्लीला लटकत ठेवून मग शांतपणे जीकेकेने आपली बोटं तिथून काढून घेतली आणि लेस्ली धाडकन्‌ जमिनीवर कोसळला. काही क्षण तो निपचित पडलेला पाहून मला खूप भिती वाटली ...वाटलं की लेस्ली बहुदा मेला की काय?
हुश्शऽऽ! पण थोड्याच वेळात तो शुद्धीवर आला आणि त्याला वास्तवाचे भान आले. आता मात्र त्याच्या डोळ्यात भिती दिसत होती. त्या तशाच पडलेल्या अवस्थेत त्याने हात जोडून जीकेकेकडे अभय मागितले. जीकेकेने खाली वाकून त्याला दोन्ही हाताने आधार देत उठवले,खुर्चीवर बसवले आणि पाणी प्यायला दिले.

त्या दिवसापासून लेस्लीची मस्ती अर्ध्याने कमी झाली. त्यानंतर त्याने कुणावरही शारिरीक हल्ला करायचा प्रयत्न केला नाही. म्हणतात ना ’समझनेवालोंको इशारा काफी होता है.’

लेस्लीसारख्यांकडे पाहून त्या म्हणीची आठवण येते...उथळ पाण्याला खळखळाट फार.
आणि जीकेकेसारख्यांकडे पाहून म्हणावेसे वाटते...फलभाराने वृक्षही नम्र होतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: