बापूशेठ आणि गोविंदराव ह्या दोघांना आमच्या कार्यालयात चहा बनवायला ठेवल्यामुळे साहजिकच चंदूशेठकडचा आमचा चहा पिणे बंद झाले. त्यामुळे शंकररावाचे आमच्या इथे येणे कमी झाले. पण अचानक एक संधी अशी आली की शंकरराव आमच्या कार्यालयात कायमचा चिकटला.
त्याचे असे झाले. आमच्याकडच्या झाडूवाल्याने कायमची नोकरी सोडून गाव गाठला. मग आयत्या वेळी त्याची जागा कोण घेणार? बापूशेठने शंकरमामाचे नाव सुचवले. आम्ही त्याला विचारले तर म्हणाला.... झव,मी कुनबी हाय! मी नाय झाडू मारन्यासारखी हलकी कामं करनार!(कोणत्याही वाक्याची सुरुवात...झव...ह्या शब्दाने होत असे. त्या शब्दाला काही अर्थ मात्र नव्हता.)
मग बापूशेठ म्हणाला.... मामा,उगाच नाटक करू नुको. ही नोकरी पर्मनंट हाय. चंदूशेठकडं मिलतो त्येच्यापेक्षा रगड पगार मिलेल,सुट्टीबी मिलेल. तवा आता नाय म्हनू नुको. आपन आपल्या घरात झाडू मारतो का नाय? तसा हिथं मारायचा. हाय काय आनि नाय काय?
तरी शंकरराव तयार होईना. पण आम्ही ह्यावेळी त्याला सोडायचेच नाही असे ठरवले होते. त्याची मुख्य हरकत होती ती संडास साफ करण्यासाठी. त्याबद्दल त्याची खात्री करून दिली की त्याच्या कामात संडास सफाई येत नाही. त्यासाठी एक वेगळा माणूस नेमलाय वगैरे. तेव्हा कुठे शंकरराव एकदाचा तयार झाला.
शंकरराव अशिक्षित होता पण त्याने काढलेला मुद्दा बिनतोड होता. कारण खरे तर झाडूवाला(स्वीपर) च्या कामात संडास सफाई देखिल येत असे. पण ह्यातली गोम अशी होती की झाडूवाला(स्वीपर) आणि फरशी साफ करणारा(फराश) अशी दोन पदं आमच्या कार्यालयात होती तरी सर्वप्रथम ती जेव्हा भरली गेली होती तेव्हा तत्कालीन कारकुनाने त्याच्या भाषिक अज्ञानामुळे पार उलटापालट केलेली होती. दोन्ही पदांसाठी पगार जरी तेवढाच होता तरी कामाचे स्वरूप मात्र वेगवेगळे होते. पण झाले काय की आता फराशला संडास सफाई करावी लागत होती आणि झाडूवाल्याला फक्त कार्यालयीन साफसफाई करावी लागत होती. पूर्वापार चालत आलेली ही चुकीची प्रथा कुणीही मोडायची तोशीस घेतली नाही आणि ती आजही तशीच सुरु आहे.
शंकररावाची खात्री झाली आणि त्याने पदभार स्वीकारला. शंकरराव कामाला एकदम वाघ निघाला. एका आठवड्यातच त्याने कार्यालयाचे स्वरूपच पालटून टाकले. साफसफाई इतकी की आमचे साहेबही त्याच्या कामावर खूश झाले. जेवणाची सुट्टी सोडली तर शंकरराव सदोदित कामात असायचा. आमचा आधीचा झाडूवाला सकाळी आल्या आल्या एकदा कार्यालय झाडून घ्यायचा,मग लादी पुसायचा आणि मग दिवसभर गप्पा ठोकत बसायचा. पण शंकरराव मात्र सतत कार्यमग्न असायचा. तासातासाने कचर्यासाठी ठेवलेल्या बादल्या साफ करत बसायचा (त्यात कचरा असो नसो). कुठे टेबल साफ कर,कुठे पंखा साफ कर तर कुणाला पाणी आणून दे, बाहेरून कुणासाठी विडी-काडी,पोस्टाची कार्ड-पाकिटे आण,हॉटेलातून जेवण आणुन दे असली सगळी कामं हसतमुखाने करायचा. त्याची विश्रांती म्हणजे जेवल्यावर जेमतेम दहा मिनिटाची बसल्या बसल्या काढलेली डुलकी. त्या दहा मिनिटात तो गाढ झोपायचा आणि चक्क घोरायचाही. पण त्यानंतर पुन्हा नव्या जोमाने कामाला तयार असायचा.
साधारण सव्वा पाच फूट उंची,काटक बांधा,गालफडं बसलेली आणि खपाटीला गेलेले पोट अशा शंकररावाच्या पोटाची भूक मात्र जबरी होती. कोंकणी असल्यामुळे बसल्या बैठकीला ढीगभर भात सहज हादडत असे. वर चपात्या-भाजी, दोनचार केळी असली तर मग तो अजून खूश असायचा. घरून चपाती-भाजीचा डबा बरोबर आणायचा. कुणाच्यातले काही खाणे नाही आणि कुणाला काही देणे नाही. शंकरराव जात-पात मानणारा असल्यामुळे एखाद्याने कितीही आग्रह केला तरी सुरुवातीला त्याच्याकडचे खाणे अजिबात घेत नसे. पण पुढे पुढे जसजशी ओळख वाढत गेली आणि अमूक एक आपल्या किंवा आपल्यापेक्षा उच्च जातीचा आहे हे कळल्यावर मग त्याच्याकडचे खाणे खाऊ लागला होता. शंकररावाच्या भूकेची आणि जबरदस्त पचनशक्तीची एकदा आम्हाला योगायोगाने प्रचिती आली त्याचा एक किस्सा आहे.
आमच्या कॅंटीनमध्ये हल्ली चहा-कॉफी बरोबरच मधल्या वेळचे जेवणही बनवायला सुरुवात झालेली होती.असाच एके दिवशी शंकररावाने घरून डबा आणलेला नव्हता. त्या दिवशी कॅंटीनमध्ये डाळ-भाताचा बेत होता. शंकररावाची भूक जबरदस्त असल्यामुळे त्याने चांगला चार मुदी भात खाल्ला(थाळीत फक्त दोन मोठ्या मुदी आणि वाडगाभर डाळ मिळत असे).हात धूवून शंकरराव विश्रांतीसाठी खुर्चीवर टेकला नाही तोच तिथे आमचे सुरक्षारक्षक साबळे हवालदार त्यांचा भला मोठा डबा घेऊन जेवायला आले. हा गडी अंगा-पिंडाने मजबूत होता. सहा फूट उंची आणि भरदार देहयष्टीच्या त्या माणसाने आपला डबा उघडला आणि त्याने आणलेल्या कालवणाने शंकररावाच्या तोंडाला पाणी सुटले; पण तो नुसते डोळे मिटून बसला. साबळे हवालदारांनी औपचारिकपणे शंकररावाला..या जेवायला.. असे म्हटले. त्यावरचे शंकररावाचे उत्तर ऐकून साबळे हवालदार पार उडालेच.
शंकरराव म्हणाला.. झव,मी खाल्लं तर तुम्हाला काय उरणार नाय.
अरे शंकर्या, चांगल्या बारा चपात्या आहेत. तू खा. मला काय कमी नाय पडणार. तू खाणार आहेस काय ह्या सगळ्या चपात्या?
खाईन की! पर,तुमी उपाशी र्हाल त्याचं काय?
एक य:कश्चित कोंकण्या एका घाट्याला, तेही साबळ्यांसारख्या बलदंडाला आव्हान देतोय? साबळेंना हे सहन होणारे नव्हते.
ते म्हणाले...तू माझी काळजी करू नकोस. पण एक अट आहे, ह्या सगळ्या चपात्या खायच्या. काहीही उरवायचे नाय. कबूल असेल तर बोल.
अवो पण तुमी उपाशी र्हाल ना...
तुला एकदा सांगितले ना की माझी काळजी करू नकोस म्हणून. हिंमत असेल तर बोल.
ह्या गोष्टीची कुणकुण मला लागली. मी तिथे गेलो. माझ्या समोर आताच शंकरराव जेवलेले होते. मी शंकररावांना म्हटलं..
आत्ता तर तुम्ही पोटभर जेवलात आणि पुन्हा ह्या १२ चपात्या खाणार?(खरे तर त्यांना रोट म्हटले पाहिजे इतक्या त्या जाड होत्या. मी तर रिकाम्या पोटी फारतर दोन खाऊ शकलो असतो.)काय वेड-बिड लागलंय काय?
झव,त्यात काय हाय? मी पंधरा मिनिटात खाईन ह्ये सगलं!
बघ हं शंकर्या, पंधरा मिनिटात कशाला? हवे तर २५ मिनिटे घे.पण सगळे खायला हवे....आता साबळेही इरेला पेटले होते.
शंकररावही इरेला पेटला होता. मग काय मी शिरलो पंचाच्या भूमिकेत आणि सुरु झाली खाद्य-स्पर्धा.
इथे घड्याळाचा काटा सरकत होता आणि शंकररावाचे रवंथही सुरु होते. साबळे सारखे शंकररावाला वेळेची जाणीव देत होते पण तो अतिशय चवीचवीने खात होता. सुरुवातीला त्याचा वेग जास्त होता तरी हळूहळू तो कमी होत गेला. तरीही मोजून साडे चवदाव्या मिनिटाला त्याने शेवटचा घास घेतला आणि मग वर पाण्याचा घोट घेऊनच तो थांबला.
साबळे आश्चर्याने पाहातच राहिले. शंकररावाला आता काही त्रास तर नाही ना होणार ही मला काळजी.पण शंकरराव शांतपणे उठला, हात-तोंड धूवून आला आणि साबळेंना म्हणाला...झव,कालवन मस्त होतं तुमचं. पुना कवा आनाल तेव्हा मला सांगा.
साबळेंचा ’आ’ अजून वासलेलाच होता. त्यांनी शंकररावापुढे केळी ठेवली. अर्धा डझनातली तीन केळी शंकररावाने मुखशुद्धी म्हणून खाल्ली आणि मग एक मोठी ढेकर दिली. बाकीची तीन साबळेंना देऊन म्हणाला...आता तुमीच खावा.तुम्हाला बी भूका लागल्या असतील.
आणि शांतपणाने तो आपल्या कामाला निघून गेला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा