माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२४ जून, २०११

चंशिकुम! ९

पहाटे चार वाजता जायचं म्हणून तीन वाजताच उठून मुखमार्जनादि आन्हिकं आटोपून आम्ही सगळे तयार होतो पण गाडी चालकाचा पत्ताच नव्हता. त्याच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न फोल ठरत होता...चार ते पाच असा एकतास गेला आणि शेवटी एकदाचा संपर्क झाला बुवा...महाराजांनी फोन उचलून आम्हाला कृतार्थ केले...आणि मग गाडीत बसून रोहतांगच्या दिशेने निघायला सकाळचे पावणे सहा वाजले.
आमच्या आधीच्या चालकाने आम्हाला प्रवासाच्या सुरुवातीलाच सांगितले होते की इथे तुम्ही चालकाच्या सांगण्यानुसार आपला कार्यक्रम ठरवलात तरच तो उत्तमरित्या पार पडेल...कारण कोणत्या वेळी आणि कुठे रहदारी जास्त असते,ज्यामुळे उगाच प्रवासातला वेळ वाढत असतो...हे, चालक इथला स्थानिक असल्यामुळे त्यालाच बरोबर माहीत असतं. त्यामुळे तो सांगेल तसं वागा,तुम्हाला प्रवासात कोणतीच अडचण येणार नाही. आम्ही अगदी शहाण्या मुलासारखे त्याचे ऐकूनच ह्या आमच्या चालकाला आदल्या रात्री विचारून,त्याची संमती घेऊन पहाटे चारची वेळ ठरवली होती...पण त्याने तर मनालीतच आमचे दोन तास फुकट घालवले होते. असो,जे झालं ते झालं. आम्ही दोन-चार शब्द त्याला ऐकवले आणि त्यानेही प्रत्त्युत्तर न देता मुकाटपणे ऐकून घेऊन चक्राचा ताबा घेतला.

सकाळचं प्रसन्न वातावरण,थंडगार हवा,वळणावळणाचा रस्ता, रस्त्याच्या एका बाजूने वाहणारी नदी,तर दुसर्‍या बाजूला असणारा हिरवागार पर्वत...झोपेचे फुकट गेलेले दोन तास वसूल करायला मंडळींनी सुरुवात केली. मी मात्र चालकाजवळच्या आसनावर प्रग्रा सावरून बसून होतो...डोळ्यात काय आणि किती साठवू? प्रग्रात नेमकं काय कैद करू अशा द्विधा मन:स्थितीत सगळा आसमंत न्याहाळत होतो...अशा परिस्थितीत मला तरी झोप येत नाही बुवा...आपण अशी दृश्य रोज कुठे पाहात असतो?मग ही संधी सोडली तर आपणच आपल्यासारखे...कपाळकरंटे...

रस्ता अगदी साफ होता,वाटेत कुठेही विरुद्ध दिशेने येणारं वाहन दिसत नव्हतं. आमचा गाडीचालक अतिशय कुशलतेने गाडी चालवत होता...अधूनमधून भेटणार्‍या,आमच्याच सारखे रोहतांगच्या दिशेने जाणार्‍या बर्‍याच वाहनांच्या पुढे तो गाडी काढत होता.रस्ता असा नागमोडी होता की कधी नदी डाव्या हाताला तर कधी ती उजव्या हाताला...असे सारखे चित्र बदलत होते...मध्येच कधी छोटेखानी धबधबे दिसत होते आणि....आणि...अचानक समोरच्या बाजूला काहीतरी चमकायला लागलं...काय बरं होतं ते...अरेच्चा,ही तर हिमशिखरं दिसायला लागली होती...सूर्याची कोवळी किरणं त्यावर पडून ती हिमशिखरं जणू सुवर्णशिखरं भासत होती....मी लगेच प्रग्रा सावरला...काही छायाचित्रं घेतलीही...पण गाडी इतक्या वेगात पळत होती आणि रस्ता इतक्यावेळा वळत होता की ती हिमशिखरंही मध्येच गायब व्हायची....तशी ती अजून खूप दूर होती...आम्हाला तिथेच जायचं होतं...आणि त्यांनी आपली झलक दाखवून आमची उत्सुकता अजून वाढवून ठेवली होती.

चालकाने गाडी मध्येच एका गावात एका दुकानाजवळ थांबवली. इथून आम्हाला बर्फात खेळण्यासाठीचा सगळा जामानिमा घ्यायचा होता असं कळलं. पटापट सगळे खाली उतरून दुकानात गेलो. तिथे एक प्रसन्नवदना तरूण स्त्री उभी होती. तिच्याशी आमच्यातल्या महिलामंडळाने बातचीत करून आम्हा सहाजणांसाठी जामानिम्याची व्यवस्था केली..प्रत्येकी २०० रूपये असे त्याचे भाडेही ठरले. मग त्या स्त्रीने प्रत्येकाच्या उंचीचा,देहयष्टीचा अंदाज घेत एकेक पोशाख निवडून काढला,त्या त्या व्यक्तीला चढवला...अगदी आई लहान मुलाला आंगडं,टोपरं घालते त्याच मायेने ती माऊली आम्हाला सजवत होती. अंगात घालायच्या पोशाखात सगळ्यात आधी खुर्चीवर बसून पाय घालायचे, मग उभं राहून दोन्ही बाजूला हात पसरून लांब बाह्यात हात घालायचे आणि मग कमरेपासून वर गळ्यापर्यंत चेन खेचून अगदी गळाबंद व्हायचे. त्याच पोशाखाला जोडलेली टोपी असते...ती डोक्यावरून घ्यायची,तिचे बंद आवळून गळ्याशी बांधायचे....मग हातात घालायला हातमोजे आणि पायात घालायला गमबूट मिळाले....आयुष्यात पहिल्यांदाच हे सगळं आम्ही करत होतो...त्यामुळे एकमेकांच्या दिसणार्‍या ध्यानाकडे,अवताराकडे पाहून मस्तपैकी हसत होतो..एकमेकांची खेचत होतो...त्या माऊलीलाही आमची ही खेळीमेळी पाहून हसू फुटत होते. :)

चला,एकदाचे तयार तर झालो,म्हटलं आता सगळ्यांचं छायाचित्र काढूया.
नको,आत्ता नको,बर्फात गेल्यावर काढणारच आहोत ना,मग आता इथे वेळ नको घालवूया....असा एकूण विचार प्रकट झाल्यामुळे तसेच गाडीत बसलो आणि पुन्हा सुरु झाला प्रवास...रोहतांगच्या दिशेने.

मनाली ते रोहतांग पास हे अंतर तसं पाहायला गेलं तर फक्त ५१ किलोमीटरचं आहे असं नकाशा सांगतो....त्यामुळे ६०-७०च्या वेगाने गाडी हाणली तर ती तासाभरात पोहोचायला हवी असा सरळ साधा हिशोब आहे...पण तसं अजिबात झालं नाही...एक तर वळणावळणांचा आणि चढा रस्ता,त्यातच आता रहदारी कमालीची वाढलेली...सगळी रोहतांगच्या दिशेने जाणारी वाहनं एकामागोमाग एक अशी अक्षरश: रांगेत[रांगत म्हणलंत तरी चालेल.;)] चाललेली होती. अशी झुम्मड उडाल्यामुळे चांगले अडीच-तीन तास तरी लागले असावेत.(इथे घड्याळाकडे कुणाचं लक्ष होतं म्हणा?) तसेही शेवटचे काही किलोमीटर रस्ता बर्फाच्छादित असल्यामुळे प्रवाशांसाठी बंदच ठेवलेला होता...त्यामुळे आम्हाला जिथपर्यंत जायला परवानगी मिळाली तिथपर्यंत आम्ही पोचलो.वातावरणातला गारठा चांगलाच जाणवत होता...बर्फात खेळण्य़ासाठीचा सगळा जामानिमा घालून तयार होतो...तरीसुद्धा!
पांढर्‍या शुभ्र बर्फाच्या पार्श्वभुमीवर जिथे पाहावे तिथे पांढर्‍या गाड्याच गाड्या आणि प्रवाशांची वर्दळ दिसत होती. काही क्षुधाशांति गृह देखील तिथे असल्याचं लक्षात आलं....मग काय आम्ही सगळ्यात पहिल्यांदा तिथे मोर्चा वळवला. सकाळपासून पोटात चहा-कॉफीसुद्धा गेलेली नव्हती...मग गरमागरम पराठे आणि चहा-कॉफी अशी न्याहरी केली. न्याहरी करतांनाही मी अक्षरश: थरथरत होतो...आयुष्यात इतका गारठा पहिल्यांदाच अनुभवत होतो...तेही अंगावर इतके सगळे कपडे असतांना...

पोट भरलं तसा जीवात जीव आला.तिथून बाहेर पडलो...आजूबाजूला हिंडत-फिरत निघालो.बर्फाळ शिखरांची छायाचित्र घेण्याचा सपाटा लावला.सकाळचे साडेनऊ वाजले असावेत.आता सूर्य बराच प्रखर भासू लागला होता...बर्फाच्छादित शिखरांवरून येणारे त्याचे प्रकाशकिरण डोळ्यांना जाचक वाटू लागले आणि त्याच वेळी जाणवलं की अंगातली थंडी आता कुठल्या कुठे दूर पळालेय...मग काय मी तो खास अंगावर चढवलेला जामानिमा काढून टाकला...त्याच्याबरोबरच अंगातला स्वेटरही काढून टाकला...आता अंगावर एक पॅंट आणि टी-शर्ट..नाही म्हणायला पायतले गमबूट फक्त ठेवले होते. बाकी अगदी मुंबईत राहतो तशा पोशाखात मी तयार झालो होतो...हुश्श! आता कसं अगदी मोकळं मोकळं वाटायला लागलं....इतका वेळ माझ्यातला गुदमरलेला मी, पुन्हा एकदा अंगात संचारलो.

आजूबाजूला आमच्यासारख्याच उत्साही प्रवाशांनी आणि त्यांच्या गाड्यांनी रस्ते फुलले होते. खरं सांगायचं तर बर्फ फारसा नव्हता पण जो काही आजूबाजूला पसरला होता त्यात लोकांचे खेळणे-घसरणे सुरुच होते. आम्हीही मग त्यांच्यात सामील व्हायचं ठरवलं आणि म्हणून, चालकाला गाडी एका बाजूला घ्यायला सांगितली जिथे लांबवर बर्‍यापैकी बर्फ दिसत होता. त्याने गाडी पुन्हा उतारावर घेतली आणि पार्किंग शोधत शोधत हळूहळू आम्ही पुढे निघालो....पण मुद्दाम पार्किंगला अशी जागा कुठेच सापडेना...असली नसलेली जागा आधीच आलेल्या गाड्यांनी काबीज केली होती...मग आम्ही मध्येच उतरलो आणि चालकाला पुढे जिथे जागा मिळेल तिथे गाडी लावण्यास सांगून लांबवर दिसणार्‍या बर्फात खेळायला निघालो.
इतक्या लांब, चढ-उतार करून जाण्याची तयारी नसल्यामुळे आमच्यापैकी एक बाईमाणूस गाडीतच बसून राहिली...गाडी जिथे पार्क होईल तिथेच थोडे-फार बर्फात खेळून घेण्याच्या इच्छेने...आम्ही सगळे त्या बर्फमय वातावरणामुळे भारलेलो होतो...त्यामुळे पुढचा-मागचा विचार न करताच निघालो...बर्फाळ प्रदेशाकडे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: