माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

१ जून, २०११

चंशिकुम! २

बाबा,चला.
कन्येच्या हाकेने मी जागा झालो. म्हणजे,ते विमानचालकाशी बोलणे वगैरे सगळं मनातल्या मनातच होतं तर! :)
मी स्वत:शीच हसलो आणि उठून प्रवेशद्वाराकडे चालायला लागलो. प्रवेश परवाना दाखवला आणि प्रत्यक्ष विमानतळावर प्रवेश केला. बरीच विमानं तिथे उभी होती. आम्हाला न्यायला एक बस आली होती...जेमतेम ५०-१०० मीटर अंतरावर उभ्या असलेल्या विमानाकडे जाण्यासाठी बस...वा ! वा! काय ही सरबराई! बसमध्ये चढलो आणि दोन मिनिटात उतरलो...विमानाजवळ. तिथे एक शिडी लावलेली होती...पुन्हा प्रवेशपरवाना दाखवून मग त्या शिडीवरून एकेक पायरी चढत मी प्रत्यक्ष विमानात प्रवेश कर्ता झालो.

सगळे प्रवासी चढल्यावर विमानाचा दरवाजा बंद झाला. मग काही प्रात्यक्षिकं दाखवली गेली...सीटबेल्ट कसा लावायचा/सोडायचा. आपत्कालीन परिस्थितीत विमानाच्या बाहेर कसे आणि कूठून जायचे....नाही,नाही. ह्याचे प्रात्यक्षिक नाही दाखवले...फक्त सांगितलं...की तुमच्या सीटच्या समोरच्या खणात एक पत्रक आहे ते वाचा म्हणून. ;)
विमान पाण्यात पडलं तर...अंगात घालायचं जीवरक्षक जाकिट कसं घालायचं/फुगवायचं वगैरे दाखवून झालं.
मग पट्टा आवळायची सुचना झाली...विमान जागेवरून हललेलं होतंच आणि ते आता धावपटीकडे निघालं होतं. सगळ्यांनी आपापले पट्टे आवळले आणि विमान धावपट्टीवर पोचलं....काही क्षण तिथे थांबलं आणि मग सुसाट धावत सुटलं....दोनतीन मिनिटं धावलं आणि अचानक....अलगद हवेत उडालं...पोटात छोटासा खड्डा पडला..पण तेवढ्यापुरतेच.

विमान हवेत उंच उंच जात राहिलं...मध्येच थरथरत होतं..मधेच स्थिर होत होतं...हळूहळू उंची वाढत गेली...आता आजूबाजूला फक्त ढगच ढग दिसत होते...पाहता पाहता ते ढगांच्याही वर गेलं....आणि आता मात्र विमान पूर्णपणे स्थिर झाल्याचं जाणवलं..जणू काही ते एका जागीच थांबलंय...बाहेरचं दृश्य म्हणजे फक्त अथांग पसरलेलं आकाश...बाकी दुसरं काही नाही.

खिडकीबाहेर पाहतांना जाणवलं की विमानाचा एक पंख आणि पंखा दिसतोय....मी लगेच माझा प्रग्रा बाहेर काढला आणि एखाद्या कसलेल्या छायाचित्रकाराच्या आवेशात दोन छायाचित्र घेऊन मोकळा झालो.  ;)


दोन तास कसे गेले ते कळलंच नाही(खरं तर ते दोन तास कंटाळवाणे गेले...पण तसं बोलायचं नसतं ना!  ;)  )  आणि आता उद्घोषणा होत होती की विमान चंडीगढला पोचलंय आणि उतरण्याच्या तयारीत आहे...पुन्हा एकदा पट्टे आवळले गेले....विमान आता खूपच खाली आलं होतं...आजूबाजूचा परिसर दिसायला लागला होता....पुन्हा एकदा प्रग्रा सावरला आणि काही छाचि टिपली. <

पाहता पाहता विमान खाली उतरलं आणि एक बर्‍यापैकी धक्का देत जमिनीला टेकलं आणि तसंच धावत राहिलं...हळूहळू त्याचा वेग कमी झाला आणि मग ते हळूहळू चालत  धावपट्टीच्या बाहेर जाऊन त्याला नेमून दिलेल्या जागी थांबलं..शिडी लागली आणि एकेक करून आम्ही विमानाच्या बाहेर पडलो.

विमानतळाच्या बाहेरच्या इमारतीत आल्यावर मग आपापलं सामान  घेण्यासाठी सरकत्या पट्ट्याकडे मोर्चा वळवला...पाच-दहा मिनिटात तेही आलं...मग आमची वरात इमारतीच्या बाहेर निघाली. आम्हाला घ्यायला कुणी तरी येणार होतं....कोण ते आम्हालाही माहीत नव्हतं...त्यामुळे आमच्या नावाचा फलक घेऊन तिथे कुणी उभं आहे का हे आम्ही उत्सुकतेने आणि अधीरतेने पाहात होतो...पण त्या गर्दीत तसं कुणीच दिसत नव्हतं...पाच मिनिटं गेली...दहा मिनिटं गेली...अर्धा तास गेला तरी कुणीही दिसेना...विमानात,विमानतळाच्या इमारतीत एक बरं होतं...तिथे वातानुकुलित वातावरणात वावरतांना कोणताच त्रास जाणवला नव्हता पण आता ह्या बाहेरच्या रखरखाटात उभं राहणं फारच त्रासदायक होत होतं. मुंबईतल्या आमच्या सहल आयोजकाशी फोनवरून बोलणं झालं...त्याने अमूक अमूक माणूस गाडी घेऊन येईल म्हणून सांगितले आणि त्याचा भ्रमणध्वनी क्रमांकही दिला....त्या क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण बराच वेळ तिकडून उत्तरंच येत नव्हतं...शेवटी एकदाचं उत्तर आलं...तो जो कुणी होता त्याने आपण गाडी घेऊन आलोय आणि पार्किंगमध्ये गाडी लावलेय  असं सांगितलं....पाचदहा मिनिटाने तो देखिल आला...पण हाय रे दैवा...ना आम्ही त्याला ओळखू शकत होतो ना तो आम्हाला. मग पुन्हा भटक्यावर संपर्क साधला आणि तो आमच्या समोरच  आमच्याशी बोलतोय हे त्याला आणि आम्हाला एकाच वेळी कळलं आणि एकदाची ओळख पटली....हुश्श!
जवळजवळ पाऊण तास वाट पाहिल्यावर आम्ही एकमेकांसामोर आलो होतो...मग सामान घेऊन गाडीकडे निघालो...सामान गाडीत टाकलं आणि आधी कुठे जेवण मिळेल तिथे गाडी घ्यायला सांगितली.....

तुमच्या मनात शंका आहेत..मला माहीत आहे...आमच्याही मनात होत्या की हे असं कसं झालं....त्याबद्दल सांगतो....पण आता जरा पोटभर जेवू द्या...आणि हो तुम्हीही घ्या जेवून.... ताट पाठवतो...तुमच्यासाठी.

६ टिप्पण्या:

अपर्णा म्हणाले...

काका एक नम्र सूचना आहे....तुमच्या पोस्टवर हा print this port पर्याय आहे त्याची खरच गरज आहे का एकदा तपासून घ्या...जितका कागदाचा वापर कमी करू तितक पर्यावरणासाठी बर आणि त्यातून पोस्ट प्रिंट करून कायमसाठी कुणी जतन करून ठेवेल अस वाटत नाही तेव्हा मला वाटतं की त्याची तशी जरुरी नाही..

बाकी मुंबईची गरमी टाळून ही थंड हवेच्या ठिकाणी भटकंती करायची आयडिया मस्त आहे...

मी अत्त्यानंद म्हणाले...

अपर्णा,तुझी सुचना अंमलात आणली आहे.
सुचना आणि प्रतिक्रियेबद्दल मन:पूर्वक धन्यवाद.

दिलीप बिरुटे म्हणाले...

वर्णन झकास सुरु आहे. लगे रहो........!!!

Yogesh म्हणाले...

मस्त प्रवास वर्णन सुरु आहे...पुढील भाग लवकर येउ द्या.

SUDHIR KANDALKAR सुधीर कांदळकर म्हणाले...

वाचतांना गंमत तर येतेच आहे. पण त्या चालकाकडे तुमच्या नावाचा फलक कां नव्हता? जरा सहल आयोजकाला फटके द्या.

मी अत्त्यानंद म्हणाले...

योगेश्वरा,दिलीपराव आणि कांदळकरसाहेब...प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
कांदळकरसाहेब,अहो त्याच वेळी फटके द्यावेसे वाटले तर!पण आता तो राग निवलाय, त्यामुळे सौम्यपणे निषेध नोंदवला जाईल. :)