माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

१६ फेब्रुवारी, २००७

ते रम्य दिवस!भाग १२

दादाच्या 'दादागिरीचा' हा दुसरा किस्सा ऐका.

आमच्या कार्यालयाचे काम जसजसे वाढू लागले तसतसे नवीन कर्मचारी भरती होऊ लागले. त्या काळात बरेच अभियांत्रिकी पदवीधर(बीई-इलेक्ट्रॉनिक्स) भरती झाले. आम्ही जे आधी भरती झालो होतो ते सगळे आता सेवाकालामुळे ज्येष्ठ झालो होतो;पण हे येणारे नवे अभिभावक मात्र पदाने आमच्या वरचे होते. ह्या येणार्‍या लोकांची आम्ही जरा मजा करावी म्हणून एक खेळ खेळत असू. हा खेळ, जो उमेदवार पहिल्या दिवशी कार्यालयात रुजू होण्यास येत असे त्यावेळीच होत असे. एका खोलीत दादा,चिंटू आणि गजा हे तिघे बसत. कार्यालयाच्या दरवाजातून एखादा उमेदवार आत आला की मी त्याची कागदपत्रे पाहून त्याला हे तिघे बसलेल्या खोलीत घेऊन जात असे.

दादाचे आणि चिंटूचे वजनदार व्यक्तिमत्व, गजाचे त्याच्या बोकडदाढीमुळे (फ्रेंच कट) एखाद्या साहेबासारखे दिसणे ह्यामुळे आलेल्या त्या उमेदवारावर विलक्षण छाप पडत असे. मग चिंटू त्याच्या फर्ड्या इंग्लिशमधे त्यांची माहिती विचारून घेत असे. तो उमेदवार 'सर‌,येस सर' करत करत अतिशय अदबीने त्याची उत्तरे देई. मग गजा काही तरी जुजबी प्रश्न विचारत असे. त्याची उत्तरे देऊन झाली की मग दादाकडे सगळ्या नजरा लागत. दादाचा आणि इंग्लिशचा खास दोस्ताना असल्यामुळे तो काहीच बोलत नसे. फक्त त्या व्यक्तिची सगळी कागदपत्रे अतिशय बारकाईने बघत असल्याचे नाटक करत असे आणि मग त्याला रुजू करून घ्या असे खूणेनेच सांगत असे. तो उमेदवार माझ्याबरोबर त्या खोलीच्या बाहेर पडला की मागे हास्याचा मोठा स्फोट झाल्याचे ऐकून उमेदवार गोंधळला की मग आम्ही त्याला पुन्हा खोलीत बोलावून वस्तुस्थिती समजावून देत असू. मग नाईलाजाने त्यालाही ह्या हास्यकल्लोळात सामील व्हावे लागे.

अशाच एका प्रसंगी जगदीश नावाचा गुजराथी उमेदवार आला. त्याच्याबरोबर हे सगळे नाटक चालू असेपर्यंत तो अतिशय दडपणाखाली होता;पण हे सगळे नाटक होते असे त्याला आम्ही नंतर सांगितल्यावर त्याने तिथेच आई-माई वरून शिव्या द्यायला सुरुवात केली. दादाने उठून खिशातून रामपुरी काढून त्याच्यासमोर उघडल्यावर तो थरथर कापायला लागला आणि 'मारा बाप! मरी गयो'! म्हणत पळत सुटला.

हा जगदीश दिसायला एखाद्या 'सडक-सख्याहरी' सारखा होता. तोंडात अखंड शिव्या असायच्या. एकदा शिव्या देणे सुरु झाले की त्याच्या शिव्या संपतच नसत. 'लाखोली' म्हणतात तसला प्रकार होता. मात्र तो दादा आणि चिंटूला टरकून होता आणि त्यांच्याशी अतिशय नरमाईने वागत असे. हा जगदीश वेळेच्या बाबतीत एकदम पक्का होता. आमच्या कार्यालयात चार पाळ्यात काम चालायचे. ह्यातील ज्या पाळीचा हा प्रमुख असायचा त्यातील सगळ्यांना तो अखंड शिव्या देत असे‌. समजा बारा वाजताची त्याची पाळी असली की कार्यालयाच्या मुख्य दरवाजापाशी ११-४५ वाजता येऊन उभा राहायचा. ११-५५ झाले की तो आत येत असे. तोपर्यंत बाहेर सीगारेट फूंकत उभा राही. येण्याजाण्याच्या बाबतीतच नव्हे तर जेवायला जाताना आणि न्याहरीच्या वेळाही अगदी काटेकोरपणाने पाळत असे. काम मात्र यथातथा असे. तो अभियांत्रिकी पदवीधर कसा झाला हे मात्र एक कोडे होते. त्याच्यापेक्षा आम्हालाही त्या विषयातले जास्त ज्ञान होते हे वेळोवेळी सिद्ध झालेले होते;पण पदवी असल्यामुळे तो आमच्यापेक्षा वरच्या पदावर काम करत असे आणि जमेल तशी मग्रुरीही करत असे.

असेच एकदा एकाला त्याने धमकावले आणि जीवे मारण्याची धमकी दिली. ज्याला धमकी दिली तो एक सदगृहस्थ होता. मारामारी,भांडणं अशा क्षुद्र गोष्टींपासून नेहमीच चार हात दूर असे. अतिशय सौम्य स्वभावाच्या त्या माणसाला अशी धमकी मिळाल्याने साहजिकच तो अतिशय चिंताक्रांत झाला. माझ्याशी बोलताना त्याने मला सहजच ही गोष्ट सांगितली आणि मी ती दादाच्या कानावर घातली. दादाने पुढचा मागचा विचार न करता भर कार्यालयात जगदीशला झोडपले.

जगदीश ही तक्रार घेऊन वरीष्ठांकडे गेला;पण त्याच्या बाजूने एकही व्यक्ति साक्षीदार म्हणून उभी राहिली नाही. मग जगदीशच्या बरोबरचा एक वर्मा नावाचा अधिकारी तिथे होता. त्याची साक्ष काढावी असे जगदीशने साहेबांना सांगितले. साहेबाने वर्माला बोलावले आणि आम्ही चिंतेत पडलो. कारण वर्मा हा एकदम स्वच्छ चारित्र्याचा आणि खरे ते बोलणारा माणूस होता. आता त्याच्या साक्षीवर सगळे अवलंबून होते. वर्माने दादावर जगदीशद्वारे केलेल्या आरोपावर अतिशय मुत्सद्दीपणे आपली साक्ष दिली.
तो म्हणाला, सर, मी त्यावेळी कामात होतो आणि काय नेमके झाले हे मला खरेच माहित नाही!

वर्मा धडधडीतपणे खोटे बोलला होता(धर्मराजानंतर खोटे बोलणारा हा 'आधुनिक धर्मराज' आहे-इति. दादा) त्यामुळे तक्रार निकालात निघाली आणि दादावर कोणतीच कारवाई झाली नाही. उलट जगदीशलाच एक प्रेमपत्र(मेमो) मिळाले. वर्माचा दादावर एका अनामिक कारणाने जीव होता. त्यांचे नातेच सख्ख्या भावासारखे असावे इतका वर्मा त्याची काळजी घेत असे आणि म्हणूनच त्याच्या खोटे बोलण्याचे कारण आम्हाला पटले नव्हते तरी पचले होते. असो.
ह्यानंतर दादाने जगदीशला धमकी दिली, तू बाहेर पड,मग बघतो.

संध्याकाळी कार्यालय सुटल्यावर धमकी दिल्याप्रमाणे दादाने जगदीशला चर्चगेटपासून ते शिवाजी टर्मिनसपर्यंत पाठलाग करत करत आणि कार्यालयाच्या हद्दीपासून १००मीटरच्या पुढे गेल्यावरच चोप दिला आणि तोही मुका मार बरंका! कुठेही रक्त येणार नाही ह्याची काळजी घेत(आहे की नाही ! दादा कायदे जाणून होता ह्याचा हा पुरावा). दुसर्‍या दिवशी कार्यालयात आल्यावर जगदीशने एक भले मोठे पत्र साहेबांना लिहून पाठवले आणि त्यात आदल्या दिवशी दादाने त्याची जी धुलाई केली होती त्याचं साद्यंत वर्णन करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली. साहेबांनी जेव्हा दादाला ह्या बाबतीत विचारले तेव्हा दादाने आपण त्याला मारल्याचे कबूल केले आणि कार्यालयाच्या बाहेर १००मीटर अंतरापुढे केलेल्या कुठल्याही कृत्याचा जबाब द्यायला आपण बांधील नसल्याचेही ठासून सांगितले. साहजिकच साहेबांचा नाईलाज झाला आणि त्यांनी जगदीशला हवी असल्यास पोलीसात तक्रार कर असे सांगितले. हा गुन्हा कार्यालयात घडलेला नसल्यामुळे आपण ह्याबाबतीत काहीही कारवाई करू शकत नाही असेही वर सांगितले.

त्यानंतर दादाने जगदीशला जाऊन दम दिला, तू जर पोलीसात गेलास तरी माझे काहीही वाकडे होणार नाहीच पण मग मी तूझी फुल्टूच करेन हे लक्षात ठेव. शाना असशील आता शिस्तीत राहा आणि कुणाला पीडू नको! जगदीशने दादाचे पाय धरले आणि प्रकरण तिथेच समाप्त झाले.त्यानंतर पुन्हा कधी जगदीशने कुणाला त्रास दिला नाही.



क्रमश:

1 टिप्पणी:

जयश्री म्हणाले...

मान गये तुम्हारे दादाको :)