माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२ फेब्रुवारी, २००७

माझ्या लग्नाची चित्तरकथा!अंतिम भाग

सगळी हिंमत गोळा करून मी त्यांच्या घरी गेलो. दरवाज्यावरची घंटी वाजवायच्या अगोदर पुन्हा एकदा मनातल्या मनात सर्व पराक्रमी पुरुषांचे स्मरण केले आणि घंटी वाजवली. दार उघडायला स्वतः 'ती' च आली आणि मला बघून लाजून पळून गेली. मनातल्या मनात अंदाज केला "पांडोबा, पोरगी फसली रे फसली."

आगत स्वागताला बरेच महिला मंडळ जमले होते (३ बहिणी, आई, तिच्या मैत्रिणी). माझा आत्मविश्वास पुन्हा डळमळायला लागला. पण आल्या प्रसंगाला तोंड देणे क्रमप्राप्त होते. त्या सर्व महिला मंडळाने माझा मोरू करायचा असा जणू विडाच उचलला असावा. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देता देता माझी दमछाक होत होती. मी मनातल्या मनात निर्णय घेतला आणि एकदम आक्रमक पवित्रा घेतला (जेव्हा जेव्हा मी दडपणाखाली येतो तेव्हा तेव्हा मी आक्रमक होतो असा माझा स्वतःबद्दलचा आजपर्यंतचा अनुभव आहे).
मी मुलीच्या आईला रोखठोक (मनातल्या मनात घाबरलो होतो, तोंडाला कोरड पडली होती) सुनावले.
"मी तुमच्या मुलीचा निर्णय विचारायला आलो आहे तेव्हा प्रथम तिला काय ते बोलू दे मग बाकीच्या चांभारचौकशा नंतर करा." (मी हेरले होते की मुख्य व्यक्तीवरच हल्लाबोल केले की बाकी चिल्लरपिल्लर चुपचाप बसतात)
माझ्या चढ्या सुरातील बोलण्याने अपेक्षित परिणाम साधला आणि एकदम सगळे चिडीचूप झाले. मुलीला पुढ्यात घालून मला म्हणाले, "बोला. काय बोलायचे ते बोला."
मी तिला विचारले,"तुझा निर्णय काय?" (एकदम मुद्यालाच हात)
तिने आईकडे बघितले आणि आई काहीतरी बोलणार तेव्हढ्यात मी त्यांना अडवत म्हणालो, "मला तिच्याच तोंडून ऐकायचे आहे, तुम्ही मध्ये बोलू नका."
तरी मुलगी काहीच बोलेना. मी उठलो आणि म्हटलं, "मी निघतो, मला निर्णय समजला."
त्यांनी मला थांबवलं आणि मुलीला एकटीला त्या ठिकाणी सोडून त्या सर्वजणी आतल्या खोलीत गेल्या. मुलीने हळूच मान वर करून इशार्‍यानेच मला तिचा निर्णय सांगितला. निर्णय तोंडीच हवा असा आग्रह मी धरला आणि तिने हळू आवाजात होकार भरला.

मंडळी अशा तर्‍हेने पहिली लढाई मी जिंकली आणि पुढे माझ्या सर्व अटी मान्य करूनच (नोंदणी विवाह, मानापानाला-वरदक्षिणेला फाटा (फक्त मुलगी आणि नारळ), अत्यंत साधा घरगुती समारंभ वगैरे वगैरे ) माझे दोनाचे चार हात झाले.

जाता जाता..... मला एक कुतूहल होते त्याचे शमन पत्नीकडून (आता 'ती' नव्हे, पत्नी बरंका! ) नंतर झाले. माझा प्रश्न...... "तू माझ्यात काय पाहिलेस?"
तिचे उत्तर..... " तुम्ही माझ्या आईचा आवाज बंद केलात जे माझ्या वडिलांना देखिल जमले नव्हते!!"
तिचा प्रश्न.... "तुम्ही माझ्यात काय पाहिलंत?"
माझं उत्तर.... "बर्‍याच वर्षापूर्वी मी तुला दूध-केंद्रावर पाहिले होते तेव्हाचे तुझे रूप पाहून." ( आता तू कशीही असलीस तरी मला त्याची पर्वा नाही)

आता बोला मंडळी माझ्या आणि तुमच्या लग्नात फरक आहे की नाही?

समाप्त!!!!

६ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

नक्कीच. . .मानलं पाहिजे तुम्हाला. . सध्या आमच्यासाठी वधु संशोधन सुरू आहे. . .इतके वर्ष आम्हीही काऽऽऽऽही न केल्याने अर्थातच नोंदणी पद्धतीने विवाह करण्यावाचून गत्यंतर नाही. . .बघूया आम्हाला काय अनुभव येतोय ते

अमित

दीपिका जोशी 'संध्या' म्हणाले...

अतिशय सुंदर...नक्कीच फरक तुमच्या आणि आमच्या विवाहात. सध्या आम्ही आमच्या जुळ्या मुलांसाठी वधुसंशोधन करत आहोत. मुलाच्या होकारापेक्षा हल्लीची लग्ने सर्वस्वी मुलीच्या होकारावर अवलंबून आहेत. [जसे तुम्ही होकार ऐकायला उत्सुक होतात.. :)] असे अनुभव मला मुलांच्या बाबतीतले रेखाटायला नक्कीच आवडेल. [पण त्यांचे लग्न ठरल्यावर.. ] आणि हो...आमचे पण विचार अगदी असेच...नोंदणी पद्धतिने विवाह, मुलगी आणि नारळ..बस..बघु या..

अनामित म्हणाले...

very very well written. Mala far far avadal... mi mi.pa. varati suddha tumache lekhan vachat asato.. farach chhan lihita tumhi.. thanks.

Raviraj.

jivanika म्हणाले...

काका सहीच!!! काकू नशीबवान होत्या म्हणायच्या. आणि तुमच्या हिमतीची दाद द्यावीशी वाटते.
शिवाय काकूंच उत्तर पण भारीच!!

प्रमोद देव म्हणाले...

रविराज आणि जीवनिका धन्यवाद.

mukteshwar kulkarni म्हणाले...

maja aali kaka vachatana !