१९७३ साली मी माझ्या दोन सहकार्यांबरोबर बंगलोरला गेलो होतो. आमचा मुक्काम महिनाभर होता. त्या काळात घडलेल्या गमतीदार घटनांची आज आठवण आली आणि आपल्याला देखिल त्या आवडतील असे वाटले म्हणून हा एक प्रयत्न आहे.
प्रतोद,हरिश आणि मी (एकाच ऑफिसात काम करत होतो) ऑफिस कामानिमित्त बंगलोरला पोहोचलो. नवीन प्रदेश,वेगळे हवामान आणि भाषा ह्या सर्वस्वी निराळ्या वातावरणात जाण्याचा हा आमचा तिघांचा बहुदा पहिलाच प्रसंग होता. त्यामुळे आम्ही थोडेसे बावरलेले होतो. बंगलोर मध्ये आम्हाला आयटीआय(इंडियन टेलेफोन इंडस्ट्रीज) मध्ये जायचे होते आणि रेल्वे स्थानकाबाहेर पडल्याबरोबर पहिला प्रश्न पडला की नेमके कुठे आणि कसे जायचे.
आमची ती अवस्था हेरून एकजण पुढे आला आणि आम्हाला त्याने अगम्य भाषेत प्रश्न केला .........? आम्ही आळीपाळीने एकमेकांकडे पाहत राहिलो आणि नकारार्थी मान हालवली. त्या व्यक्तीला समजले हे तिन्ही 'भाऊ' इकडचे नाहीत आणि पहिल्यांदाच घराबाहेर पडलेले दिसतायत! त्याने लगेच इंग्लिशमध्ये विचारले,"सार!येनी प्राब्लेम?"
आम्ही जरा हुश्श केले. चला एकतरी माणूस आपली दखल घेतोय. आम्ही आमची अडचण त्याला सांगितली आणि त्याने मग त्याच्या खास इंग्लिशमध्ये काही सूचना केल्या..... "सार! यू गो स्ट्रेइट्ट! यू विल सी बासस्टँडा! टेल्ल कंडक्टरा,आयटीआय!"
आम्ही त्याचे आभार मानून चार पावले चाललो नाही तर अजून एक व्यक्ती सामोरी आली. तिने फर्मानच काढले. "ओपन युर बॅग्ज!"
हरिशने पटकन बॅग उघडली आणि त्या माणसाने जरा इकडे तिकडे विस्कटून बघितले आणि म्हणाला,"वोके."
नंतर तो माझ्याकडे वळला आणि म्हणाला,"सार!युर बॅग प्लीज."
मी त्याला विचारले(मराठीतूनच),"तू कोण आहेस? तुला काय अधिकार आमच्या बॅगा तपासायचा?"
तो जरा भिरकटला...म्हणाला,"सारी! नाट फालोड!"
मी (मनातल्या मनात........नाट फालोड तर नाट फालोड) आपल्या खास मराठी ढंगातील इंग्लिश मध्ये,"हू आर यू? व्हॉट राइट यू हॅव टू चेक माय बॅग?"
परत तो भिरकटला पण मग सावरून म्हणाला,"आय यम एक्साईज इन्सपेक्टर."
दिसायला यमासारखाच होता(यमाला कोणी बघितलंय म्हणा )..काळा रप्प, बर्यापैकी जाडजूड आणि मध्यम उंचीचा.
"व्हेयर इज युवर आयडी?"..... माझा प्रतिप्रश्न.
त्याने खिशातून एक मोठे पाकीट काढले आणि त्यांतून एक चुरगळलेला,पिवळा पडलेला (सरकारी वाटेल असा) कागद काढला आणि माझ्यासमोर धरला. मी तो वाचायचा प्रयत्न केला पण मला तो काही वाचता आला नाही. त्या कागदावर सगळ्या जिलब्या जिलब्या(बहुतेक कानडी असावे) काढल्या होत्या. मी तो कागद प्रतोदकडे दिला,त्यालाही काही कळेना. मग तो पुढे झाला आणि म्हणाला, "व्हाट इज धिस? हां,आय से,व्हाट इज धिस? व्हाट इज धिस जिलबी? आय लाइक जिलबी यु नो ? बट नॉट धिस! द्याट गोल गोल(हाताने प्रात्यक्षिक दाखवत) अँड यलो यलो. यू लाइक जिलबी ? देन गो अँड हाण!"
माझी आणि हरिशची हसता हसता पुरेवाट झाली. प्रतोदच्या त्या अनपेक्षित सरबत्तीने (त्या माणसाला त्यातले काय कळले असेल हा एक प्रश्नच होता) तो माणूस एव्हढा बावचळला की तो सरळ पळतच सुटला आणि त्याच्या मागे प्रतोद .."युवर जिलबी,युवर जिलबी" करत !
मी तर तिथेच जमीनीवर बसकण मारली आणि पोट धरधरून हसून घेतले. प्रतोद परत आला तो हातात 'जिलबी' घेऊनच !
मला म्हणाला, "आता ह्याचे काय करायचे?"
"ठेवून दे आठवण म्हणून!"..मी.
नंतर आम्ही स्थानकाच्या बाहेर पडलो. त्या पहिल्या सदगृहस्थाने सांगितल्याप्रमाणे बस स्थानकावर जाऊन चौकशी केली. आम्हाला आयटीआय ला म्हणजेच कृष्णराजपुरमला(जागेचे नाव) नेणारी बस मिळाली. आम्ही आयटीआय मध्ये पोहोचून तिकडच्या संबंधित अधिकार्याला भेटलो आणि आमचे येण्याचे कारण सांगितले. त्याने लगेच त्यांच्या वसतिगृहात आमची राहण्याची व्यवस्था केली. शिष्टाचार म्हणून प्रवास कसा झाला वगैरे चौकशी केली तेंव्हा न राहवून प्रतोदने तो किस्सा सांगितला . ऐकून तो अधिकारी फक्त गडबडा लोळायचाच बाकी राहिला.(प्रतोदचे खास इंग्लिश आणि हिंदि हा आमचा देखील नेहमीचा विरंगुळा होता). हसण्याचा भर ओसरल्यावर त्या अधिकार्याने आम्हाला शाबासकी दिली आणि म्हणाला,"ते सगळे
'फ्रॉड' आहेत. वाचलात त्यांच्या तावडीतून! नशीबवान आहात! यू आर वेरी वेरी लकी गाइज!"
प्रतोद मला हळूच म्हणतो कसा,"अरे तो आपल्याला 'गाइज' म्हणतोय! निदान बैल तरी म्हणायला पाहिजे ना?"
"नंतर सांगेन" असे म्हणून त्याला गप्प केले.
1 टिप्पणी:
हा हा हा!!
खरंच का प्रतोद असं बोलला??? मी तर हसून हसून बंगलोर डोक्यावर घेतलं असतं!!
टिप्पणी पोस्ट करा