बंगलोरमधील आमचा दिनक्रम काहीसा असा होता. सकाळी ६वाजता उठून सर्व आन्हिके उरकेपर्यंत ९ वाजायचे. मग आम्ही तिथेच बाजूला असलेल्या एका छोटेखानी उपाहारगृहात जाऊन न्याहारी करायचो. साधारणपणे, गरमागरम इडल्या आणि फिल्टर कॉफी हा आमचा नेहमीचा शिरस्ता होऊन बसला होता. क्वचित प्रसंगी गोड शिरा किंवा उपमा देखिल होत असे. पण इडल्या इतक्या झकास असत की आम्हाला त्या शिवाय अजून काही घ्यावेसे वाटतच नसे. ह्या इडल्या प्रकरणामुळे आम्हाला हे उपाहारगृह इतके आवडले की रात्रीचे जेवण देखिल आम्ही इथेच घ्यायला सुरुवात केली.
इथे एक गंमत झाली. एका रात्री आम्ही तिथे जेवायला गेलो आणि जेवणाची वर्दी दिली. पण पदूने(हो,सांगायचेच राहिले की आम्ही प्रतोदला 'पदू' आणि हरिशला'हर्या'असेच हाक मारायचो) आज नेहमीच्या थाळी ऐवजी फक्त आमटी-भात(करी-राईस) मागवला. जेवण आले आणि नेहेमीच्या सवयीप्रमाणे पदूने त्या आमटीत चमचा घालून ढवळायला सुरुवात केली. त्याला त्या आमटीत काहीतरी जाड-जाड लागले म्हणून त्याने ते चमच्याने उचलून बघितले तर काय? एक मासा होता.. म्हणजे ती फिश-करी होती.
पदूने वेटरला बोलवले आणि हिंदीत विचारले,"ये क्या है? इसमें मासा कैसे आया?"
वेटरला काही कळले नाही. तो म्हणाला," मासा क्या ओता है?"
"ये देको,ये है मासा!". .. म्हणून पदूने चमच्याने उचलून तो मासा त्याला दाखवला.
"अच्चा!मच्ची!ये तो फिश-करी है!"..वेटर
"मेरेको खाली करी-राईस चाहिये, ये नही!" पदू.
"काली करी-रैस नै है!".... वेटर.
"तो ये लेके जाओ और मेरेको थाली लेके आओ!"... पदू.
"अबी ये वापिस नै लेंगा. तुम काओ नै तो फेक दो पैसा देना पडेंगा!"...वेटर.
पदू पेटला,म्हणाला,"एक पण पैसा नही देगा! समजतोस काय स्वतःला? मेरेको खानेकाच नही!"... असे म्हणून त्याने ती बशी बाजूला ढकलली आणि बाहेरचा रस्ता धरला. तो वेटर पण पेटला आणि त्याने पदूचा हात धरून त्याला थांबवायचा प्रयत्न केला.
त्यावर उसळून पदू म्हणाला,"तुम कौन हे मेरेको अडवनारा? मेरेको नही खानेका और पैसा भी नही देनेका. बोल तू क्या करेगा रे?" आणि असे म्हणून एकदम हमरी-तुमरीवर आला.
मग मी मध्ये पडलो. पदूला बाहेर नेले आणि त्या उपाहारगृहाच्या मालकाला झाला प्रकार समजावून सांगितला. तो समजूतदार निघाला. त्याने आमची माफी मागितली आणि पुन्हा जेवायची विनंती केली पण पदू रागावला होता म्हणून आम्ही तिथून न जेवताच बाहेर पडलो.
माझ्या मनात एक प्रश्न होता की आज पदू आमटीतला मासा बघून असा का बिथरला? कारण तो जरी माझ्यासारखाच जातीने ब्राह्मण होता तरी अभक्ष्यभक्षण त्याला निषिद्ध नव्हते(मी पूर्ण शाकाहारी म्हणून मला तो नेहमीच चिडवत असे). मग आज असे काय झाले ?
तो जरा शांत झाल्यावर मी त्याला विचारले,"पदू,आज मासा बघून तू असा का चिडलास? खरे तर तू खूश व्हायला हवे होते."
"अरे आज माझा मूडच नव्हता असले काही खाण्याचा. त्यांतून आज गुरुवार आहे आणि मी तो पाळतो. मी काय खावे न खावे तो साला वेटर कोण ठरवणार? मी इमानदारीत त्याच्याशी बोललो तर तो जादाच भाव खायला लागला. तू मध्ये पडला नसतास तर चोपला असता साल्याला.".. वगैरे वगैरे.
मित्रहो त्यादिवसापासून आम्ही तिथे जाणे बंद केले. मला पण मानसिक धक्का बसला होता. मनात शंका-कुशंका येत होत्या. मी नकळत(अज्ञानात आनंद) काही अभक्ष्यभक्षण तर नाही ना केले?(का कुणास ठाऊक मला पहिल्यापासूनच ह्या सर्व गोष्टींचे कधीच आकर्षण वाटले नाही उलट कल्पनेनेही शिसारी येते...... आवडीने खाणार्या सर्वांची माफी मागून). तेंव्हापासून नियमच केला की केवळ शाकाहारी खानपान गृहातच जायचे. उगीच मनात शंका-कुशंका येऊन खाणे बेचव लागायला नको.
आता संध्याकाळच्या माझ्या जेवणाची पंचाईत होऊन बसली. कारण त्याठिकाणी त्या उपाहारगृहासारखीच अन्य दोन उपहार गृह होती. त्यामुळे त्या दोघांना कसलाच प्रश्न नव्हता. मी मात्र कधी केळी तर कॉफी-ब्रेड(चहा -कॉफीच्या बर्याच टपर्या होत्या) खाऊन आला दिवस ढकलत होतो. म्हणून मग ठरवले की दर रविवारी तरी शहरात जाऊन कुठे चांगले जेवण मिळते का ते बघायचे.
पहिल्या रविवारी काही विशेष यश आले नाही. एका उडप्याकडे ओनियन उत्तपा खाऊन पोट भरले. पण माझ्यासाठी अजूनही आम्ही शोध जारी ठेवला. विचारता विचारता आम्हाला कळले की मॅजेस्टिक(हा बंगलोर शहराचा मध्यवर्ती भाग आहे आणि ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या भागात किमान २०-२५ सिनेमा गृह आहेत) भागात 'मराठी मित्र मंडळ' आहे आणि तिथे मराठी पद्धतीचे जेवण मिळते. आम्ही ते शोधून काढले. पण सांगायला वाईट वाटते की इतके रद्दड जेवण आजपर्यंत कुठेच खाल्ले नाही. तिथले कारभारी जुजबी मराठी बोलत होते आणि बाकी सर्व काम करणारी मंडळी बहुधा कन्नड अथवा अन्य भाषिक होती. त्यामुळे अशा लोकांनी बनवलेले जेवण हे मराठी पद्धतीचे तर सोडाच पण कन्नड,तेलगू किंवा गुजराथी,पंजाबी अशा कोणत्याच व्याख्येत बसणारे नव्हते.कसेबसे जेवलो आणि फुटलो तिथून.
पुन्हा शोध जारी. शोधता शोधता आम्हाला एका ठिकाणी पाटी दिसली 'वाघेश्वरी'! गुजराथी थाळी. आमच्यातल्या हर्याने आता पुढाकार घेतला. ह्र्या पक्का गुजराथी होता. तो लगेच त्या कारभार्याला जाऊन भिडला. चौकशीसाठी तोंड उघडले पण तोंडातून फक्त आ............ शिवाय काहीच निघेना.(हर्या तोतरा होता त्यामुळे तो सहसा तोंड उघडत नसे. खरे तर हा आमचा गटप्रमुख होता. उमदे व्यक्तिमत्त्व,पावणे सहा फूट उंची,बीई(इलेक्ट्रॉनिक्स)अशी शैक्षणिक पात्रता असून देखील ह्या एका कमतरतेमुळे मार खायचा).
मी पुढे झालो आणि हिंदीतच त्या कारभार्याला विचारले,"आपके पास गुजराथी थाली मिलती है ऐसा लिखा है. क्या सच्ची गुजराथी थाली है की खाली नामके वास्ते ऐसा लिक्खा है?"
तो लगेच म्हणाला,"ए भाय,एकदम चोक्कस! चोक्कस छे! तमे आओ ने! बेसो तो खरा. ५ रुपयांमा केटला पण खाव!"
मग त्याने एकदोन पदार्थ मागवले. आमच्या हर्याने चाखून बघितले आणि स्वारी एकदम खूश. म्हणाला," सस्स्स्स सरस!"
आम्ही लगेच हात धुतले आणि जागेवर जाऊन बसलो. त्या छोट्याश्या खानावळीत ५-६ टेबले होती. एकदोन भरली होती. आमच्या साठी तीन रिकाम्या थाळ्या आणल्या. आमच्या समोर त्यात थोडे पाणी घालून स्वच्छ फडक्याने पुसल्या. मग एकामागून एक वाढपी यायला लागले आणि थाळ्या सजायला लागल्या. गरमागरम अन्नाच्या सुवासाने भूक चाळवली. कारभारी स्वतः जातीने येऊन उभा राहिला आणि त्याने आम्हाला सांगितले. "शरु करो. अनमान नथी करता. जेटलु जोय एटलु मांगजो."
दोन्ही हात सरसावून आम्ही सुरुवात केली आणि पहिला घास तोंडात घातला मात्र ... तिघांच्या तोंडून एकदम "वा!" असा उद्गार निघाला. मग काय आम्ही सुटलो,खातच सुटलो. एव्हढे चविष्ट अन्न कितीतरी दिवसांनी खात होतो. दुष्काळातून आल्यासारखे आम्ही तुटून पडलो त्या अन्नावर.
पदू पट्टीचा खवैया. त्याने लगेच माझ्याशी पैज लावली की जास्तीत जास्त फुलके(एव्हढे मऊ लुसलुशीत आणि वर साजुक तुपाची धार)कोण खाईल? मी आपले हो ला हो केले. आणि झाली सुरुवात. एक नाही,दोन नाही. चांगले वीस फुलके मीच खाल्ले(हर्याने जेमतेम ७-८च खाल्ले) आणि पदूने मोजून ३० खाल्ले.(ते आतले आचारी बाहेर आले बघायला की कोण बकासुर आलेत). अहो ह्या आमच्या पैजेपायी बाकीचे गिर्हाईक ताटकळत बसले होते. माझ्या हे लक्षात आले होते पण खूप दिवसांनी असा योग आला होता आणि मला सुद्धा मोह आवरला नाही. एकूण ते सर्व जेवणच एव्हढे चविष्ट होते तरी केवळ पोटाची पिशवी भरली म्हणून आम्ही थांबलो नाही तर त्या वाघेश्वरी वाल्याची खैर नव्हती. भरल्या पोटाने (आणि तरी देखील एक प्रकारच्या अतृप्तीने) आम्ही उठलो आणि हात धुतले तेंव्हा कुठे त्या वाढप्यांनी आणि आचार्यांनी मोकळा श्वास घेतला असावा. पैसे चुकते करताना कारभार्याने आम्हाला विचारले,"केम भाय? केउ हतु भोजन?"
"सरऽस! बहु सऽरस!"... आम्ही तिघेही एका सुरात बोललो.
कारभार्याने मग आमची आस्थेवाइकपणे चौकशी केली आणि आम्ही मुंबईचे आहोत हे कळल्यावर जणू काही कोणी माहेरचे माणूस भेटावे असा आनंद त्याला झाला. त्याने लगेच आमच्यासाठी मसाला पान मागवले आणि इथे असे पर्यंत जरूर या,खानावळ तुमचीच आहे म्हणून निरोप दिला. दुर्दैवाने हा आमचा शेवटचा रविवार असल्यामुळे पुन्हा आम्ही तिथे जाऊ शकलो नाही. पण आयुष्यभर पुरेल असे चविष्ट अन्न आणि त्याहिपलिकडे मिळालेली आपुलकी मी कधीच विसरू शकणार नाही.
५ टिप्पण्या:
आयला तुमच्या कार्यालयात दोनदोन त्प्तरे होते तर. त्यांच्या नादाने त तुम्ही पण न न् नाही ना तोतरे ब ब्ब बोलायला? मजाच आली.
तोतरे
E.C.I.L.(Electronics Corporation of India Ltd), hyderabad chi athavan zali.
tithe hi jevanachya sutti chyaveli hech drushya asayache. jewanache varnan ekdam ditto.
Prachi
काका, मस्त लेख. आज खूप दिवसांनी तुमच्या ब्लॉगवर येणे झाले. त्यात यादीमध्ये बंगलोर दिसले म्हणून इथपर्यंत येऊन पोहोचलो. मी देखील गेली सहा वर्षे बंगलोरला आहे आणि आज ३५ वर्षांनंतर देखील भात- रस्समं सोडून मराठी सोडाच पण चांगलं उत्तर भारतीय जेवण अभावानेच मिळतं. उलट ह्या लोकांनी उत्तर भारतीय पदार्थ मनसोक्त बिघडवले आहेत. इथे जर कुणी आयुष्यात पहिल्यांदा भेळ खाईल तर तो पुन्हा कुठल्या चौपाटी वर गेला तरी भेळ खाणार नाही इतकी वाईट भेळ इथे मिळते. इथे गुमान इडली खावी. डोसे खावे तर तामिळ माणसाच्या हॉटेल मध्ये. ते मस्त कमी तेलकट आणि कुरकुरीत डोसे बनवतात...
टिप्पणी पोस्ट करा