माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

३० ऑक्टोबर, २००७

मु.पो.अहमदाबाद!३

त्या दिवशी मी माझे काम आटोपून पुन्हा गेस्ट-हाऊसकडे यायला निघालो तेव्हा रात्रीचे दहा वाजून गेले होते.आज जेवणही मनासारखे झाल्यामुळे आम्ही सगळेच खुशीत होतो. बरोबरीच्या त्या दोघांना व्यवस्थित सूचना देऊन त्यांचा निरोप घेऊन जेव्हा त्या दालनाच्या बाहेर पाऊल टाकले तेव्हाच जाणवले की बाहेर थंडगार वारं सुटलं होतं. बाहेरच्या त्या थंडगार हवेने अंगावर एक हलकिशी शिरशिरी आली.त्यावेळी मला आशा भोसले ह्यांनी गायलेले ते मस्त गीत आठवले.

थंडगार ही हवा,त्यात गोड गारवा
अशा सुरम्य संगमी जवळ तू मला हवा
...... यमकाबिमकाची पर्वा अजिबात न करता "हवा" च्या ऐवजी "हवी" असे घातले आणि ते गाणे गुणगुणतच मार्गाला लागलो.

आजूबाजूचा शांत परिसर,त्यात रातकिड्यांचे चाललेले जोशपूर्ण गायन,मधूनच वटवाघळांचा चित्कार आणि घुबडांचा घुत्कार. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या गर्द झाडीमुळे आधीच मंद असणारा रस्त्यावरच्या दिव्यांचा प्रकाश अजून मंद वाटत होता आणि ह्या अशा वातावरणात मी आपल्याच नादात गाणे गात चाललो होतो. माझे ते चालणे अगदी वा.रा.कांत ह्यांनी लिहिलेल्या वाटेवर काटे वेचीत चाललो, वाटते जसा फुला फुलात चाललो ह्या गीताच्या आशयाशी मिळते जुळते होते.गुणगुणणे संपून मी खुल्या आवाजात कधी गायला लागलो ते मलाही कळले नाही इतका मी त्या गाण्याशी एकरूप झालो होतो. त्यावेळी माझे लग्नही झालेले नसल्यामुळे तर ते गीत मी जास्तच समरसून गात होतो असेही असेल. जणू काही माझे गाणे ऐकून एखादी ’वनबाला’ मला आपल्या बाहूत सामावून घ्यायला येणार होती.

ह्या तंद्रीत अर्धा रस्ता कधी पार झाला तेही कळले नाही. गाणंही मनसोक्त आळवून झालं होतं. इतका वेळ मी माझ्याच मस्तीत असल्यामुळे मला आजूबाजूचे भान नव्हते; पण मन जाग्यावर नव्हते तरी डोळे आपले काम करतच होते. तशातच माझ्यापासून साधारण शंभर फुटावर मला काही तरी चमकणारे दिसले आणि माझी तंद्री खाडकन तुटली. "काय असावे बरे?" मी आपल्या मनाशीच म्हणालो. इतक्या वेळ मी अतिशय निर्भय अवस्थेत होतो त्याची जागा किंचित भयाने घेतली.

"भूत तर नसेल? पण भूतांवर माझा विश्वास नाही. जे नाहीच ते इथे तरी कसे असेल? पण समजा असलेच तर? आपला विश्वास नसला म्हणून काय झाले? ते जर भूत असलेच तर आणि त्याने आपल्याला काही केले तर?"

मनातल्या मनात मी हे सगळे बोललो आणि माझ्या शेवट्च्या विचाराने मीच कमालीचा शहारलो. अंगातून एक भीतीची लहर गेली. तोंडाला कोरड पडली. आता करायचे काय? मागेही जाऊ शकत नाही आणि पुढेही जाऊ शकत नाही. मदतीसाठी ओरडावे तर आसपास वस्तीही नव्हती आणि माझा आवाजही मला सोडून गेला होता.

ह्या अवस्थेत क्षण-दोन क्षण गेले आणि मी आता पुरता भानावर आलो. अंगातले सगळे धैर्य गोळा केले आणि पाऊल पुढे टाकले. जे होईल ते होवो. अशा विपरीत परिस्थितीत माझे धैर्य अचानक वाढते असा माझा आजवरचा अनुभव होता आणि आताही मी त्याच निश्चयाने पाऊल पुढे टाकले. अतिशय सावध चित्ताने मी एकएक पाऊल पुढे टाकत होतो आणि ते जे काही चमकणारे होते त्याच्यापासून मी आता साधारण पन्नास फुटावर येऊन उभा राहिलो.तिथेच उभे राहून नीट निरीक्षण केले आणि लक्षात आले की हे भूत नाही तर कुठला तरी प्राणी असावा.आपण उगीचच घाबरलो. ते त्या प्राण्याचेच डोळे होते आणि अंधारामुळे खूपच चमकत होते पण अजून तो प्राणी कोणता हे काळोखामुळे समजत नव्हते.


इतका वेळ भीती भूताची होती पण आता एखाद्या हिंस्त्र श्वापदाशी गाठ होती. आता काय करायचे? पुन्हा एक क्षणभर भीतीने मनाचा ताबा घेतला पण लगेच मी भानावर आलो. माझी आई म्हणायची "वाघ म्हटले तरी खातो आणि वाघोबा म्हटले तरी खातो, मग वाघ्या च का म्हणू नये?" ते शब्द आठवले आणि पुन्हा मनाचा हिय्या करून पुढे चालायला लागलो. मी इतका पुढे आलो तरी ते डोळे जागचे हलेनात. पण एक झाले आता तो जो कुणी प्राणी होता त्याला मी व्यवस्थितपणे पाहू शकत होतो.

जरा निरीक्षण केल्यावर लक्षात आले की तो 'कोल्हा' असावा. रस्त्याच्या मध्यभागी ही स्वारी बसली होती जीभ बाहेर काढून आपल्या भक्षाच्या शोधात.त्याच्या आजच्या भोजनासाठी खास माझी योजना असावी असा एक विनोदी विचार त्या परिस्थितीतही मला चाटून गेला. आता आम्ही अगदी समोरा-समोर आलो होतो आणि आमच्यामधील अंतर जेमतेम २०-२५ फुटांचे असावे. आता हे महाराज जर असाच रस्ता अडवून बसणार असतील तर माझी तरी शहामत नव्हती त्यांना ओलांडून जाण्याची. मग काय करायचे? मागे हटावे तर तो हल्ला करेल आणि पुढे गेलो तरी तेच. माझ्या हातात काहीच नव्हते आणि आजूबाजूलाही कुठे एखादी झाडाची वाळकी फांदीही दिसेना. त्यामुळे काही वेळ माझी स्थिती बुद्धिबळातील 'ठाणबंद' केलेल्या राजासारखी झाली होती आणि आमच्या दोघांच्या हालचाली बंद असल्यामुळे बुद्धिबळातीलच 'स्टेलमेट' म्हणजे निर्नायकी अवस्था झाली होती. ह्यावर उपाय एक त्याने तरी करायचा होता किंवा मलाच काहीतरी करणे भाग होते.

ह्या अवस्थेत काही क्षण गेल्यावर मग मी खाली वाकून दगड उचलण्याची क्रिया केली(त्या रस्त्यावर असा चटकन हाताला लागावा असा दगडही नव्हता!कमाल आहे! आमच्या मुंबईत हवे तितके दगड मिळतात!) आणि अतिशय त्वेषाने तो दगड(नसलेला)त्याच्यावर भिरकावला. ह्या माझ्या अनपेक्षित खेळीने (बुद्धिबळातही मी कैक वेळेला अशा अनपेक्षित चाली करून प्रतिस्पर्ध्याला चकित करत असे)मात्र तो चांगलाच चक्रावला आणि बाजूच्या झाडीत धूम पळाला. तो जरी झाडीत पळाला होता तरी झाडीत उठलेल्या तरंगांवरून तो जास्त लांब गेला नसावा असे माझ्या लक्षात आले म्हणून मी चालत चालत तो आधी ज्या जागेवर बसला होता तिथे पोचलो आणि तो पळालेल्या दिशेला तोंड करुन उभा राहिलो. आताही त्याचे ते चमकणारे डोळे मलाच शोधत आहेत हे दिसत होते. पुन्हा अंगावर एक सरसरून शहारा आला. मग मी पुन्हा दगड उचल आणि भिरकावण्याची क्रिया केली आणि ह्यावेळी मात्र तो पार धूम पळाला. काही क्षण मी तिथेच उभा राहून खात्री केली की हे महाशय पुन्हा येत तर नाहीत ना! पूर्ण खात्री झाल्यावर मात्र एक क्षणही न दवडता झपाझप पाय उचलत गेस्ट-हाऊसकडे रवाना झालो.

२६ ऑक्टोबर, २००७

गप्पाष्टक!४..शब्दच्छल!

गरा: जेवण झालेलं दिसतंय मस्तपैकी
गोरा: अगदी व्यवस्थित!
गरा: माझा आत्ता दुसरा चहा चाललाय
गोरा: अरे वा साहेब! म्हणजे चहाबाज दिसताय पक्के!
गरा: दिवसातून ३-४ वेळा फक्त.
बाकी जहांबाज!
गोरा: हे तर भरपूर झाले माझ्यासाठी!
चहाची आंघोळच झाली की!
गरा: सद्या पाऊस काय म्हणतोय?
गोरा:जोरदार पडतोय. अगदी हिरवळ पसरलेय सगळीकडे. ऋतु हिरवा!
गरा: :) मराठी भाषेची काय मजा आहे पहा ना.
ऋतुला हिरवा म्हटलं की कसं वाटतं!
गोरा: तीच तर अनुभवतोय!
गरा: आणि तेच एखाद्या म्हातार्‍याला हिरवा म्हटलं तर ?
गोरा: तर मग अजूनच मजा!
गरा: म्हातार्‍याची
गोरा: म्हाताराही खूष आणि म्हणणाराही खूष!
गरा: :)
गोरा: हिरवं मन!
हिरवेपणा!
सगळी नुसती हिरवळ!
गरा: :)))))))))))))
थांबला का पाऊस ?
गोरा: छे! अजून बरसतोय! घन हे आले गरजत बरसत! च्या चालीवर अगदी!!!!!!!!!!


गोरा: आज डब्यात काय आहे?
गरा: फ्रुट सॅलड
म्हणजे फ्रुट्स आणि सॅलड
जरा हलका आहार घ्यायचाय असं ठरवलंय आता
गोरा: छान विनोद आहे! :)))))))))))
गरा: त्यामुळे रोज हा प्रश्न विचारलात तरी उत्तर हेच मिळेल
अजून थोडे दिवस तरी, कंटाळा येईपर्यंत
गोरा: कुणाचा? माझ्या प्रश्नाचा की फ्रुट सॅलडचा!!!!!
की दोघांचाही?
गरा: हा विनोद सुध्दा चांगला आहे
गोरा: तुमच्या संगतीने हल्ली जमायला लागलाय!
गरा: ढवळ्याशेजारी बांधला पवळ्या
गोरा: अगदी बरोबर! ह्याचा पुढचा प्रवास अजुन अधिक मजेशीर होणार आहे.
गरा: कसा काय देवा ?
गोरा: म्हणजे मी गाण्यांना चाली लावायला लागणार आणि तुम्ही रावसाहेबी सुचना करणार! एकूण संगतीचा परिणाम हो!
गरा: :-)
गोरा: कशी आहे आयडियाची कल्पना?
गरा: चांगली आहे
गोरा: काय आहे की तशा मी बर्‍याच गाण्यांना चाली लावलेल्या आहेत. पण बाबूजी म्हणाले की तुम्ही तुमच्या चाली लोकांना ऐकवू नका! नाहीतर माझे गाणे कुणीच ऐकणार नाहीत. म्हणून सोडून दिला तो धंदा! नाहीतर................
गरा: वाचले बाबुजी.
पण लोकांच्या दुर्दैवाने आता तुमच्या मार्गातला बाबुजींचा अडसरही दूर झालाय
मग बघताय काय ? काढा पेटी
गोरा: कधी वाचले तुम्ही बाबूजी? म्हणजे त्यांचे चरित्र वाचलेत काय? :-)
गरा: हो, बाबुजींचे चरित्र पण वाचले
गोरा: आता पेटी कुठून काढू? मी विडी-सिगारेट पीत नाही हो!
गरा: आता "काढायची पेटी" असं म्हणालो, काड्याची नाही
गोरा: तेच हो! आमच्यासारख्यांना दोन्ही सारखेच!
गरा: एकाने आग लागते तर दुसर्‍याने आग शमते
गोरा: पण दोघांचा आगीशी संबंध आहे ना? मग झाले तर.
गरा: मग "पेटवा" की आता
गोरा: हल्ली भुमिका बदललेय आम्ही! पेटवायचे आणि पेटायचे दिवस राहिले नाहीत.तेव्हा आता विझवणे जास्त बरे वाटते!
गरा: आता फक्त कानाखाली "पेटवणं" जमत असेल :-)
गोरा: तेही सोडले! हल्ली आम्ही 'अहिंसावादी' झालोय!
गरा: अरेरे, काय हे या वयात येवढी निरिच्छा ?
गोरा: आता जग जिंकायचंय 'प्रेमाने'(ही 'प्रेमा' कोण ते मात्र विचारू नका)!
गरा: छान आहे हा उपक्रम


गरा: :-) हल्ली काही लिखाण केलंत की नाही ?
गोरा:नाही हो.लिहायचा कंटाळा येतोय हल्ली.
गरा:मलाही लिहायचा कंटाळा आहे. म्हणून मग आपण दोघांनी मिळून एक ठेवली पाहिजे.
(सेक्रेटरी हो!)
गोरा: तिला 'ठेवाय'च्या ऐवजी तीच आपल्याल ठेवेल तिच्या पायाशी!
गरा: हरकत नाहीत, "देवाने" पाय दोन दिले आहेत, वाटून घेता येतील
तुम्ही काही "वाटून" घेऊ नका
गोरा: पण काय 'वाटायचे', ते कूणी 'वाटायचे' आणि कशाला 'वाटायचे' हे कोण आणि कसे ठरवणार?
गरा: आता अजून कोणाची "वाट" पहाण्यापेक्षा आपणंच दोघे ठरवून टाकूया
लागली तर "वाट" आपलीच लागणार आहे
सेक्रेटरी ही आपल्याला वहि"वाटी"तच मिळाली आहे असं समजून करुया "वाट"णी
गोरा: होय तेही खरेच ह्या 'वाटा-वाटी'त कुणी तरी 'वाटमारी' करून जायचा की!
गरा: हो, लोकांना "वाटे"ल, ही सार्वजनिक "वाट" आहे म्हणून
गोरा: आणि 'वहिवाट' व्हायची! :-)
गरा: म्हणून ही "वाट" आपलीच आहे, हे आपल्याच "वही"त आधी लिहून ठेवूया
गोरा: ही 'वाट' कधीच संपणार नाही अशी आहे.
त्यापेक्षा मला 'वाट'ते की आपण एक तमाशाचा फड काढू या त्या काळू-बाळू सारखा आणि त्यात सोंगाड्याची भुमिका करता येईल दोघांना!
गरा: हो, पण दोघांच्या हातात संगणक मात्र हवा, बोलताना मला सुचत नाही असं आणि "वाट" लागते.
गोरा: आपण दोघांनी 'वाटू'न घेऊ या काय बोलायचे ते! नाही तर प्रेक्षक आपली 'वाट'लावतीलच! काळजी 'वाटू'न घेऊ नका!!!!!!!!
गरा: आपण एक काम करु, "वाट"वे नावाचीच सेक्रेटरी पाहू
म्हणजे नावात सुद्धा २ वाटा
वाट आणि वे
म्हणजे "वाटून" घेताना मारामारी होणार नाही, कसं ?
गोरा: वा! वा! मस्तच आहे 'वाट'णी! मला 'वाट'लंच होतं की तुम्ही ह्यातून काही तरी 'वाट' ही काढणारच!
गरा: मग काय तर, पळ"वाट धरायची नाही हे तर वडिलांनी शिकवलंच आहे
कितीही वाट लागली तरी वाट सोडायची नाही
वडिलांना "वाट"लं नव्हतं मला हे जमेल असं
गोरा: अगदी खरे आहे.तरी देखिल प्रसंगी चोर'वाट' माहित असलेली बरी असते की नाही? नाहीतर 'वाट' बघून बघून घरच्यांची 'वाट' लागायची!
गरा: चोरांच्या "वाटे"ला जाऊ नको असंही वडिल म्हणाल्याचं आठवतंय
तशा "वाटे"वर काटे असतात असं म्हणायचे ते
गोरा: मग एखादी पाय'वाट' शोधावी.आणि गाणे म्हणत चालावे 'वाटे'वर काटे वेचीत चाललो, 'वाट'ते जसा फुला-फुलात चाललो!
गरा: मला वाटतं पाय"वाटे" पेक्षा आड"वाटे" लाच काटे जास्त असावेत ना ?
काट्याची "वाट" पाय"वाट" होईलच कशी ?
चालणार्‍याच्या पायाची "वाट" लागेल की हो
गोरा: म्हणजे चालून चालून आपण ती पाय'वाट' करायची आणि मग लोक ती वहि'वाट' म्हणून वापरायला लागतील!
गोरा: अहो, हे संभाषण छापून ठेवा हो, नाहीतर "वाट"वे बाईंची लिहिता लिहिता "वाट" लागेल
आणी त्यांनी आपली "वाट" धरली तर
दुसरी शोधताना आपली "वाट" लागेल
गोरा: आता हे 'वाट'ण खूप झालं !
गरा:आता त्या ’वाट’णाचं काय करणार?
गोरा: आता ते'वाट'ण इतरांना 'वाटा'यचे आहे. बघू या त्यांना कितपत आवडते ते!
गरा: आणि मिरचीचा चक्क एक "वाटा" टाका त्यात.
होऊ दे झणझणीत
गोरा: नको हो ! आधीच ह्या 'वाट'णामुळे लोक कासावीस होतील आणि अजून त्यात मिरची! म्हणजे त्यांना तिकडची 'वाट' धरावी लागेल ना!
गरा: तिकडची "वाट" बंदच होईल असं बघा.
म्हणजे लोकांना वाचताना त्या "वाटे"ला जायची बुद्धीच होणार नाही
गोरा: मग वैद्यांची 'वाट' 'धरावी लागेल !
गरा: लोकांना "बिकट वाट वहिवाट" हे गाणं म्हणत म्हणत "वाट" पहावी लागेल
गोरा: खरंय! बाकी बोलता बोलता 'वाट' कशी सरली ते कळलंच नाही! आता धरा की घरची वाट!

मु.पो.अहमदाबाद!२

पहिला दिवस निव्वळ श्रमपरिहारार्थ गेला. दुसर्‍या दिवशी सकाळी प्रोफेसर साहेबांनी आमच्या सगळ्यांचे बौद्धिक घेऊन कामाची रूपरेषा समजावून दिली.त्यानंतर यंत्रसामुग्रीची जुळवाजुळव, उभारणी, तपासणी आणि ती कार्यान्वित करण्याची जबाबदारी आमचे मुंबईचे साहेब आणि मी ह्या दोघांवर टाकली गेली. बाकीचे दोघे लागेल ती शारिरिक मदत करण्यासाठी होते.सर्वप्रथम आम्हाला जिथे प्रत्यक्ष काम करायचे होते ती जागा पाहिली.तिथे ज्या गोष्टींची कमी जाणवली(इलेक्ट्रिक पॉईंट्स,टेबल-खुर्च्या वगैरे)त्यांची यादी बनवून ती संबंधित व्यक्तीकडे सोपवून त्वरीत अंमल बजावणी करून घेतली.काय गंमत आहे पाहा. एरवी सहजासहजी न हलणारे हे सरकारी कर्मचारी(आम्हीही सरकारीच होतो म्हणा)आम्ही म्हणू ते काम अतिशय तातडीने पार पाडत होते. त्यामुळे त्या संध्याकाळपर्यंत आमचे जोडणी, उभारणी आणि तपासणीचे काम पूर्ण होऊ शकले.आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करायची खोटी होती.

ह्या सर्व यंत्र उभारणीत माझाच सहभाग जास्त होता आणि ते स्वाभाविकही होते. साहेब म्हणून ते मोठे दोघे फक्त खुर्चीवर बसून सुचना देण्याचे काम करत होते.दुसरे दोघे आयुष्यात पहिल्यांदाच ती यंत्र पाहात होते त्यामुळे त्यांच्याकडून हमाली व्यतिरिक्त आणखी कोणतीही अपेक्षा करणे योग्य नव्हते. राहता राहिलो मी.ज्याला कामाची पूर्ण माहिती होती,ते करायची मनापासून तयारी होती आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मी पदाने सर्वात कनिष्ट असल्यामुळे कुणाकडून कोणतीच अपेक्षा करू शकत नव्हतो.तरीही मी अतिशय सहजतेने ते काम पार पाडले. अर्थात त्याबद्दल प्रोफेसर साहेबांनी माझे सगळ्यांसमक्ष तोंड भरून कौतुकही केले.
हा प्रोफेसर मुळचा बंगाली होता.पण वैमानिक दलात नोकरी निमित्त सदैव देशभर फिरलेला होता. तिथून मग तो आमच्या खात्यात आला तो सेवानिवृत्त होईपर्यंत राहिला.माझ्या आडनावावरून तो मला बंगाली समजला. "सो मिश्टोर देब(देव चा खास बंगाली उच्चार..बंगाली लोकात ’देब’हे नाव आणि आडनाव असे दोन्हीही आहे)आय ऍम प्राऊड ऑफ यू! यू हॅव डोन(डन) अ नाईश जॉब!
हे बंगाली इंग्लीश,हिंदी आणि त्यांची बंगाली एकाच पद्धतीने बोलतात. तोंडात गुलाबजाम नाही तर रोशोगुल्ला(रसगुल्ला) ठेऊनच उच्चार केल्यासारखे जिथे तिथे ’ओ’कार लावतात. ’व’ चा ’ब’ करतात. पण तरीही ऐकायला गोड वाटते.

दुसर्‍या दिवसापासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.आधी वाटले तितके काम कठीण नव्हते पण आता लक्षात आले की काम कठीण नसले तरी ते व्यवस्थित आणि सुरळीत पार पडावे असे वाटत असेल तर अजून काही माणसांची जरूर आहे. मग त्यावर त्या दोन साहेबांच्यात खल झाला. त्यांनी दिल्लीशी संपर्क स्थापून मग अजून काही लोकांची मागणी केली. त्याप्रमाणे मागणी मान्य होऊन दिल्ली आणि मुंबईहून प्रत्येकी अजून ३-३ म्हणजे सहा माणसे येतील असे कळले. अर्थात ती सर्वजण येईपर्यंत तरी आम्हा तिघांनाच ते काम करायचे होते.आमचे हे काम दिवसरात्र चालणारे होते त्यामुळे काम न थांबवता आम्ही तिघे आळीपाळीने ते करत होतो. एकावेळी दोघांनी काम करायचे; त्यावेळी तिसर्‍याने विश्रांती घ्यायची. असे सगळे आलटून पालटून चालत होते. त्यात खरे तर मीच जास्त ताबडला जात होतो कारण ह्या कामाबरोबरच सगळ्या यंत्रसामुग्रीची देखभाल आणि जरूर पडल्यास दुरुस्तीची कामगिरीही माझ्याच शिरावर होती.वर त्यांच्या शंका-कुशंकांचे निराकरण करणेही मलाच निस्तरावे लागत होते.पण खरे सांगू का त्यातही एक वेगळाच आनंद होता आणि मी तो पूर्णपणे उपभोगत होतो.

आमची काम करण्याची जागा गेस्ट हाऊस पासून साधारण अर्धा ते पाऊण किलोमीटर दूर होती. तिथे पायी चालत जावे लागे.पण त्याचे काही विशेष नव्हते. उलट तसे चालण्यातही एक आनंदच होता. ह्या अर्थस्टेशनचा परिसर कैक एकर दूरवर पसरलेला होता. मध्यभागी गेस्ट हाऊस,कंट्रोल रूम,तसेच इतर कार्यालयांच्या इमारती होत्या.त्याच्या आजूबाजूला खूप छान राखलेली हिरवळ,त्यात थुईथुई नाचणारी पाण्याची कारंजी, मधूनच जाणारे काळेभोर डांबरी रस्ते आणि दूरदूर पर्यंत पसरलेले नैसर्गिक रान होते.ह्या सगळ्या वनश्रीने नटलेल्या निसर्गरम्य प्रदेशामुळे इथे चित्रपटाची चित्रीकरणे पण होत असतात.सकाळी हा सगळा परिसर गजबजलेला असतो.
तिथूनच थोडे दूर एका बाजूला थोड्याश्या उंचवट्यावर ती महाकाय तबकडी(डिश ऍंटेना) आकाशाकडे ’आ’वासून होती. त्याच तबकडीच्या सावलीत एका दालनात आम्ही काम करत होतो. इथे जागा घेण्यामागे इतरेजनांपासून दूर आणि व्यत्ययाविना काम करता येणे हेच प्रयोजन होते.दिवसा तिथे चूकून माकून कुणी स्थानिक कर्मचारी तबकडीची देखभाल करण्याच्या निमित्ताने असायचा पण संध्याकाळ झाल्यावर मात्र एक भयाण शांतता तिथे नांदायला लागायची.अवघ्या वातावरणात एक प्रचंड गुढ भरलेले असायचे.

२३ ऑक्टोबर, २००७

मु.पो.अहमदाबाद!१

आता मला नेमके साल आठवत नाहीये पण १९८०-८५ च्या दरम्यानची ही गोष्ट असावी. . मुंबईहून मी,माझे दोन वरिष्ठ (निव्वळ पदाने)सहकारी आणि एक साहेब असे चौघेजण अहमदाबादला कार्यालयीन कामासाठी गेलो होतो. अहमदाबादच्या उपग्रह भूस्थिर केंद्रात(सॅटेलाईट अर्थ स्टेशन) जाऊन काही खास संशोधन करण्याच्या कामगिरीसाठी आम्ही तिथे जाऊन पोचलो. दिल्लीहून एक मोठा साहेब आमच्या गटाचा प्रमूख म्हणून आला होता. त्या केंद्रात प्रवेश करण्यापासून ते तिथेच राहून काम करण्यासाठी लागणार्‍या सगळ्या परवानग्या त्याने आधीच काढून ठेवलेल्या होत्या. आमच्या राहण्याचाही बंदोबस्त तिथल्याच गेस्ट-हाऊसमध्ये केला होता.

आमचे क्रमांक एकचे साहेब हे प्रोफेसर आणि आम्ही इतर चौघे त्यांचे सहाय्यक आहोत आणि अतिशय महत्वाचे संशोधन करण्यासाठी आमचा तिथे मुक्काम आहे असा समज तिथल्या कर्मचार्‍यांचा करून देण्यात आला होता.मी सोडलो तर इतर चौघे अतिशय व्यवस्थित राहात. रोज गुळगुळीत दाढी,परीटघडीचे कपडे,मितभाषीपणा ह्यामुळे ते तिथल्या साहेब लोकांसारखेच दिसायचे. माझा पोशाख मात्र तसा 'हटके' होता. कमरेला गडद निळ्या रंगाची जीन्स, वर कोणताही भडक रंगाचा टी-शर्ट, डोळ्याला गडद रंगाचा गॉगल्स आणि कपाळावर अस्ताव्यस्त रुळणारे केस. तेव्हा मी नेत्रस्पर्शी भिंगे म्हणजे शुद्ध मराठीत ज्याला 'कॉंटॅक्ट लेन्सेस' म्हणतात ती वापरायचो आणि तिथल्या उन्हाचा, धुळीचा त्रास होऊ नये म्हणून तो गॉगल्स वापरत होतो. त्यावेळी माझ्या हनुवटीखाली असणारी दाढी मी व्यवथित राखून होतो(मला तितकीच दाढी आहे;संपूर्ण गालभर नाही. तशी 'ती दाढी' हीच माझी ओळख झालेय. हल्ली अमिताभने ’कौबक’ मध्ये तशी दाढी वापरायला सुरुवात केल्यापासून लोक मला मी अमिताभची नक्कल करतोय असे म्हणायला लागले.पण खरे तर अमिताभनेच माझी नक्कल केलेय हे लोकांना सांगूनही पटत नाही. असो. एकदा एखाद्याच्या नावाच्या मागे मोठेपण चिकटले की लोक तो करेल तीच फॅशन असे मानतात.)

मी जरी पदाने कनिष्ठ होतो तरी अनुभवाने माझ्या दोघा वरिष्ठ सहकार्‍यांपेक्षा जास्त संपन्न होतो. ते दोघे नुकतेच इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरची डिग्री घेऊन आमच्या कार्यालयात चिकटले होते. प्रत्यक्ष कामाचा असा खास अनुभव नसल्यामुळे अलिखितपणे मीच त्यांचा बॉस झालो होतो. त्यामुळे ते मला 'बॉस' असेच म्हणत.काम करताना आलेली कोणतीही अडचण मी सहज सोडवत असे त्यामुळेही असेल ते मला मानत होते

तसा दिसायला जरी मी काटकुळा होतो तरी एकूण माझे विक्षिप्त दिसणे आणि तिथले गुढ वागणे ह्याचा संमिश्र परिणाम म्हणजे तिथले सगळे मला मी कुणी तरी 'शास्त्रज्ञ' आहे असेच समजायचे. माझे इतर दोघे साथी मला 'बॉस' म्हणत त्याचाही कदाचित तो अदृष्य परिणाम असावा. तसे वाटायला आणखी एक कारण होते. त्या केंद्रातील सर्वसामान्य कर्मचार्‍यांना जिथे प्रवेश वर्जित होता अशा एका अतिशय 'खास' जागेत आमचे हे काम चालत असे.तिथल्या केंद्र संचालकांनी आम्हाला त्या जागेचा ताबा देताना एकही प्रश्न विचारलेला नव्हता कारण त्यांनाही दिल्लीहून तसे आदेश आलेले असावेत. आम्ही तिथे काय करणार आहोत हे देखिल त्यांनी विचारले नव्हते आणि काय करतो आहोत हे पाहायला ते एकदाही तिथे फिरकले नाहीत. फक्त तिथल्या अतिशय महत्वाच्या आणि वरिष्ठ अधिकार्‍याला बोलावून "ह्यांना लागेल ती मदत त्वरीत द्यायची" असा आदेश दिला होता. तिथल्या सुरक्षा अधिकार्‍यांनाही त्याचप्रमाणे आदेश देऊन आम्हा पाच जणांच्या हालचालीवर,कामकाजावर कोणतेही निर्बंध येणार नाहीत ह्याची पक्की काळजी घेण्याबद्दल बजावले होते. ह्या सर्व गोष्टींमुळे नकळत आमच्या भोवती असलेले गुढतेचे वलय अधिकच मोठे झाले.

तिथल्या वास्तव्यात आमचे वागणे,आमच्या हालचाली गुढ वाटाव्यात अशाच असत. कॅंटिनमध्ये जेवताना,न्याहारी करताना आम्ही तिघे एकत्रच असायचो पण एकमेकांशी बोलण्याऐवजी जास्ती करून मुद्राभिनय आणि सांकेतिक भाषेत आणि कमीत कमी शब्दात आम्ही आपापसात व्यवहार करायचो. ह्या आमच्या वागण्याचे नाही म्हटले तरी तिथल्या स्थानिक कर्मचार्‍यांना कुतुहल वाटत असायचे आणि ते आमच्याशी बोलायचा प्रयत्न करायचे.पण आम्हाला सक्त सूचना होती की इथे आपण आणि आपले काम ह्या व्यतिरिक्त कुणाशी संबंध वाढवायच्या भानगडीत पडायचे नाही. तेव्हा आम्ही निव्वळ हसून वेळ साजरी करायचो.

२२ ऑक्टोबर, २००७

गप्पाष्टक!३

गोरा: सुप्रभात!

गरा: सुप्रभात
गोरा: तुम्ही नाही नाही म्हणता बाकी मस्तच लिहिलंत हो. वाचकांच्या उड्या पडताहेत त्यावर. त्या अभिजितवरही दडपण टाकतोय. पण दाद देत नाहीये.
गरा: मी तरी कुठे देत होतो आधी.
पण आता सुटका नाही हे जेंव्हा कळलं तेंव्हा लिहून टाकलं :-)
त्याला सांगा, तू गाणं वाजव मग आम्ही "दाद" देऊ
गोरा: प्रयत्न करतोय हो. मी असा सोडणार नाही रणांगण!
गरा: देवाला काहीही कठीण नाही
गोरा: ते आहेच. पण काही भक्त 'नामदेवा'सारखे हट्टी असतात ना!
गरा: सगळेच असतात बहुतेक, पण देवापुढे भक्तांना आपला हट्ट सोडावाच लागतो शेवटी
अहो भक्त या हट्टात जिंकले तर देवाचं देवपण काय राहिलं मग ?
देव हरता कामा नये कोणत्याही परिस्थितीत.
गोरा: अहो देव आणि भक्त हे अद्वैताचे नाते आहे. तेव्हा कुणाचीही हारजीत होत नसते. त्यातून तो 'अभिजित' आहे. :-)
गरा: कभी"जीत" दुसरे की भी होती है!
गोरा: पण अभी'जित' त्याचीच दिसतेय ना!
गरा: अभी आपको मनावर लेना गिरेगा.
गोरा: मनावर,किलोवर वगैरे घेतलेच आहे आणि कार्य सिद्धीस गेल्याबिगर (चैन) पडणार नाही.
गरा: तथास्तु! असं म्हणायची पाळी आता भक्तावर आली आहे.
गोरा: म्हणुनच म्हटलंय 'अद्वैताचे नाते'!
गरा: अद्वैत म्हणजे एकरुपता ? तेच "ना ते" ?
गोरा: होय. म्हणजेच स्वत:चा स्वत: केलेला पराभव ठरेल तो. भक्त आणि देव शरीराने वेगळे असले तरी एकाच मनात नांदतात.
नांदतो देव हा आपुल्या अंतरी!
गरा: छान
गोरा: सद्या काय नवीन हालहवाल?
गरा: नवीन काही नाही
गोरा: कळफलकाबाबतची(सिंथेसायजर) प्रगती कितपत झाली?
गरा:चालू आहे जोरदार, नवनवीन शोध लागताहेत रोज
गोरा: मग त्याचीच एक सु'रस' कहाणी लिहा की!
गरा: या कहाणी ला "सूर"स कहाणी म्हणावं लागेल खरं तर
गोरा: तसं म्हणा हवं तर! पण 'लिहा' की! हमकु वाचनेसे मतलब हाये! :-)
गरा: आता मी काही "वाचत" नाही.. तुमच्या हातून ;-)
गोरा: तुम्ही लिहा हो म्हणजे आम्ही 'वाचू'!
गरा: हो, रिक्षाच्या मागे लिहिलेलं वाचलंय मी "वाचाल तर वाचाल"
ही घोषवाक्य किती विचित्रपणे लिहिलेली असतात रिक्षांवर. कधीतरी
कोणीतरी अडाणी माणसं पेन्ट करतात बर्‍याच वेळेस.
एका रिक्षेवर लिहिलं होतं "जोशी केळं तोटी केळं"
आता याचा अर्थ काय ? ओळखा पाहू
गोरा: जो शिकेल तो टिकेल! हाहाहा!
गरा: अरे वा! हुशार आहात
गोरा: आता तुम्ही ह्या असल्या प्रासंगिक विनोदावरही लिहाच.प्रतिक्रियांचा पुर येईल त्यावर.
गरा:पण खरी प्रतिक्रिया आपल्याला न ओळखणार्‍या माणसाची. इथे सगळे गोतावळ्यातले लोकच ’वा,वा’ करतात.
गोरा: काही प्रमाणात ते खरेच असते;पण गोतावळा हळू हळू वाढतो ना!
गरा: तरी शेवटी तो गोतावळाच.
गोरा: नाही. तसं नाही. आधी न ओळखणारा प्रतिसाद देतो आणि मग तोही गोतावळ्याचाच एक भाग होतो.
गरा: अच्छा
गोतावळ्याबाहेरच्या प्रतिक्रिया मिळण्यासाठी नामांकित संकेतस्थळी लेखन टाकायला पाहिजे.
जालनिशीवर सहसा गोतावळाच चक्कर टाकतो.
गरा: हे सगळं तुम्हीच करु शकाल, कारण आज आता मला कामाकडे वळावं लागेल
गोरा: चालेल. बघू या कसे जमते ते!
गरा: धन्यवाद सर!
गोरा: एकदम सर! झाडावर चढल्यासारखे आणि मागे 'प्रो. ठिगळे' अशी पदवी लावल्या सारखे वाटतेय! :-)
गरा: :-)))))))))))))))) ठिगळं ही बहुधा मागेच लागतात कारण तोच जास्त घर्षणाचा भाग असतो
गोरा: अजून एक गंमत सांगू का?
गरा: बोला!
गोरा: तुमच्या सौ. म्हणजे आमच्या वहिनी साहेबांनी मला 'काका' बनवले आहे. मला ते संबोधन चालेल असे मी म्हटले पण.....
गरा: हाहाहा! "मामा" नाही बनवलं हेच नशीब तुमचं
गोरा: कन्या म्हणाली," बाबा! तुम्ही त्यांचे काका! तर त्यांच्या मुलाचे आजोबा! आणि तो तर माझ्याच वयाचा आहे!
मग मी तुम्हाला बाबा का म्हणायचं?
गरा: छान निरिक्षण आहे :-)
गोरा: आता काय बोलणार?
गरा: म्हणजे मामा बनवलं असतं तरी तुमचा "आजोबा"च झाला असता शेवटी
गोरा: आता तुम्हीही मला काका नाहीतर सासरेबुवा म्हणा! :-)
गरा: सासरेबुवा बरं वाटतंय जरा, कारण हे संबोधन माझ्या नशिबातच नव्हतं कधी
गरा: का हो?
गरा: हिचे वडील आमचं लग्न व्हायच्या आधीच गेले
मी त्यांना पाहिलंच नाहिये
गोरा: पण चुलत,मामे,मावस वगैरे सासरे असतीलच ना! त्यात आता माझी भर!
गरा: :) जावयाचे लाड करावे लागतील, परवडणार नाही!
गोरा: आता करतोच आहे ना! :-)
रोज उठून हालहवाल विचारतोय.
गरा: सासरेबुवा, या दिवाळीला मला एक स्कूटर पाहिजे.
गोरा: दिली! चावीची की स्प्रिंगची हवीय!
गरा: चावीची, पेट्रोल वर चालणारी,खरीखुरी.
नाहीतर सूनबाईला नांदवणार नाही नीट.
गोरा: पण एक अट आहे. ती चालवत चालवत आखातात जायचं! आणि रस्त्यात कुठेही थांबायचे नाही!
गरा: चालेल (म्हणजे चालवेन) म्हणजेच (चालवून घेईन).
टाकी फुल करुन द्यायची तुम्ही ही माझी अट.
गोरा: हो आणि पेट्रोल तिथेच भरायचे(कारण तुम्हाला ते फुकटच मिळते ना!)
गरा: मुंबईपासून काय ढकलत नेऊ का ?
गोरा: मग??? समजलात काय?
गरा: मी स्कूटर मागितली आहे, ढकलगाडी नाही.
गोरा: मग मी स्कुटरच देतोय ना!
गरा: उद्या स्कूटरची नुसती हॅंडल्स द्याल आणी म्हणाल "हीच स्कूटर".
गोरा: आता मला जे परवडणार आहे तेच देणार ना! मी काय तुम्हाला विमानही घेऊन देईन.
गरा: काय "टर" उडवताय राव माझी
गोरा: टर नाही हो. मी विमान उडवायचे म्हणतोय! :P
गरा: नको. आता मला काही नको.हौस फिटली.
गोरा: बरं ते जाऊ द्या. जेवायला येताय काय?
जेवणाचे आमंत्रण आलंय.
गरा: आज काय केलंय ते सांगा आधी.
गोरा: शाही खिचडी!!!!!!!!!!
गरा: अरे वा, मेजवानीचा बेत आहे.
घ्या जेवून.
गोरा: मग येताय?
गरा: आज नको, परत कधीतरी
गोरा: बरं मग टाटा . नंतर भेटू.
गरा: टाटा

२१ ऑक्टोबर, २००७

गप्पाष्टक!२

गणपतरावांच्या गुगलटॉकचा 'हिरवा दिवा' लागलेला पाहून गोपाळराव खुशीत आलेत.आज काय गप्पा मारताहेत चला ऐकू या!

गोपाळराव: सुप्रभात! श्लोनेक!
सकाळी सकाळी एकदम हिरवा दिवा? वा! क्या बात है!
गणपतराव: जरा थांबा हा, सकाळच्या चहाचा आस्वाद घेतो आणि येतो.
गोरा: चालू द्या! निवांत!

गरा: बोला साहेब, कसं काय ?
गोरा: मजेत!आपण दोन दिवस चांगलीच मजा केलेली दिसतेय!
गरा: वीकएंडला नेहेमीच मजा असते
गोरा: मग कुठे बाहेर गेला होतात फिरायला की घरच्या घरी पार्ट्या चालू होत्या?
गरा: एक दिवस माझ्या घरी डिनर होतं, एक दिवस एका मित्राने हॉटेल मधे डिनर पार्टी ठेवली होती.आणि दुसर्‍या मित्राकडे एकदा लंच :-)
गोरा: म्हणजे डीनर डीप्लोमसी चाललेय तर!

गोरा: तुम्ही जागा बदलताय असे कळले! खरे आहे काय आणि का?
गरा: तुमचं हेरखातं जोरदार काम करतंय तर :-)
गोरा: :) कानून के हात बहूत लंबे होते है जानी!
गरा: मोठी जागा घेतोय आणि कार्यालयापासून जरा जवळ देखिल.
गोरा: मग काय चालत चालत जाणार कार्यालयात? की कारभारीण गाठोड्यात कांदा-भाकर बांधून रोज घेऊन येणार आहे?
गरा: दोन्ही शक्य आहे :-)
गोरा: चला म्हणजे त्या निमित्ताने अंगावरील काही पौंड गमावता येतील आणि पेट्रोलवरले काही पौंड वाचवता येतील. रस्तेही गुळगुळीत होतील हे अजून एक चांगले होईल! :)
गरा: वजनी गमावून चलनी कमवायचे :-)
गोरा: आयडियाची कल्पना चांगली आहे ना!
गरा: मग काय तर!
गोरा: मग कधी जाताय नव्या जागेत?
गरा बहुतेक पुढच्या आठवड्यात शिफ्ट होईन
गोरा: तुमच्या मित्र मंडळींपासून दूर जाणार आहात की जवळ पोहोचणार आहात?
गरा: दूर,पण फार दूर नाही.
साधारण १५ किमी
गोरा: म्हणजे ह्याचा अर्थ काय समजायचा? कंटाळलात काय सगळ्यांना! रोज पीडतात काय? माझ्याचसारखे!!!!!
गरा: नाही, तसे नाही. मोठी जागा पाहिजे होती
संगीतासाठी एक "शेपरेट" खोली पाहिजे होती
गोरा: संगीताची बाकी मजा आहे बरं का!
गरा: माझी पण आहे की!
गोरा: :) म्हणजे तिच्या बरोबरीने मग कविता,गजल,वीणा,सतार,सारंगी वगैरे पण येणार असतील ना!
गरा: प्रतिभा, कल्पना यांना विसरलात काय ?
गोरा: अरे हो!मजा आहे बुवा एका माणसाची!
गरा: :-)
गोरा: साहेब एक दहा-पंधरा मिनिटांनी येतो. एक काम आहे!
गरा: ठीक आहे.

गरा: या साहेब
गोरा: बोला आज काय नवी खबर देताय!
गरा: काहीच नाही, तुम्हीच हेरखात्यात आहात. तुम्ही शोधायची तर आम्हाला विचारताय? :-)
गोरा: म्हणूनच! दुसर्‍याकडून बातम्या काढून घेणे हे आमचे एक प्रमूख काम आहे ! :D
गरा: चालू द्या :-) लगे रहो गोपाळ भाई!
गोरा: बरे, संगीता कशी आहे? सद्या रुसलेय की प्रसन्न आहे?आणि त्या नव्या कळफलकाचे(सिंथेसायजर) उद्घाटान कधी करताय?
गरा: सध्या कळफलकाचे तंत्रज्ञान समजावून घेणे चालू आहे.तांत्रिक बाजूंमुळे इतर गोष्टींकडे दुर्लक्ष होतंय.पण या आठवड्यात एका महत्वाच्या गोष्टीवर ताबा आला
तबल्याची सॅंपल्स मी आता माझ्या कळफलकावरुन वाजवू शकतो
गोरा: अजून तिथेच अडकलाय?कमाल आहे तुमची.
एकदा माझ्याबरोबर बसा! नीट समजाऊन देतो.म्हणजे संगीताकडे असे दूर्लक्ष होणार नाही. :)
गरा: अजून म्हणजे ? अजून २ वर्ष लागतील या नव्या उपकरणाची सगळी अंगं समजावून घ्यायला
गोरा: फारच मंद बुवा तुम्ही! जरा त्या मोदबुवांची शिकवणी लावा. मग बघा कसे झरझर कळायला लागेल.
गरा: त्यांच्या वरदहस्तामुळेच २ वर्ष म्हणालो मी, नाहीतर ४ लागली असती
गोरा: हा अपमान आहे त्यांचा! तुमचा धि:क्कार असो!
अहो चुटकीसरशी शिकवतील ते तुम्हाला! दोन वर्षे म्हणजे खूपच जास्त होतात!
गरा: अहो ते लहरी आहेत फार
त्यांचा शिष्यांचा गोतावळा पण मोठा आहे
त्यातून म्या पामराला कितीसा वेळ मिळणार ?
हा, रोज त्यांचे पाय चेपले तर मात्र शक्य आहे.पण सध्या माझेच येवढे दुखतात की मीच कोणीतरी बुवा (म्हणजे बाई नाही) ठेवावा म्हणतोय पाय चेपायला.
गोरा: तुमच्यावर मेहरबान आहेत असे ऐकतोय! तुमचे तबलावादनही फार आवडले आहे ना! माझ्याकडे नेहमी बोलून दाखवतात ते तसे! तबलजी कसा असावा? तर गणपतरावासारखा असे सगळ्यांना ऐकवत .असतात!
गरा: फुकटातला तबलजी कोणाला नाही आवडणार ?
गोरा: मुलगा नाव काढेल असेही म्हणाले!
गरा: नाव काढतोच मी त्यांचं संधी मिळेल तेंव्हा (बदनामी करायची संधी काय नेहेमीच येते कां ?).
गोरा: पण तुम्ही काही म्हणा(नावं ठेवा) तरी ते तुमच्याबद्दल नेहमीच चांगले बोलतात!
गरा: हे सगळं मी पुढच्या विश्व(व्यापी) संगीत महोत्सवाची बिदागी सांगेपर्यंत.
एकदा त्यांना कळलं की मी फुकटात वाजवणार नाही की पहा कसे कोकलत फिरतील माझ्या नावाने.
गोरा: बिदागी, बिदागी काय करता सारखे? अहो बुवांबरोबर तुम्हाला वाजवायला मिळाले हे तुमचे अहोभाग्य आहे. आता बघा तुमच्या घरासमोर रांगा लागतील कलाकारांच्या! सगळे तुम्हालाच त्यांच्या साथीला बोलावतील.
गरा: रांगा लागताहेत तबलजींच्या ! तुम्हाला बिदागी दिली का, हे विचारणार्‍यांचीच संख्या जास्त आहे
गोरा: अहो तुम्ही पण सांगा की त्या झाकीर सारखा आकडा!
बुवांना कुणी विचारलेच तर तेही तेच सांगतील ह्याची खात्री आहे. आपणच आपला भाव वाढवायचा असतो एवढेही कळत नाही तुम्हाला? अगदीच कच्चे आहात बुवा ह्या क्षेत्रात! खूप काळजी वाटते तुमची!
गरा: बुवांकडून शिकायला मात्र भरपूर मिळालं, व्यवहारात चोख रहाण्याचे धडे
गोरा: मग! आता कसे?
गरा: बरं आता दुसर्‍या एखाद्या कार्यक्रमाचा वृत्तांत कधी ?
गोरा: बघू या! हल्ली लोकांना ते ऑरकेस्ट्राचे सुमार कार्यक्रम जास्त आवडतात ना!
गरा: मग लिहा की त्यावर.
वार्ताहरांनी पण लोकाभिमुख असलं पाहिजे.
गोरा: हल्ली खूप प्रयत्न करूनही काहीही जमत नाहीये मनासारखे.
गरा: हं, दिसतंय खरं.
संगणकाने बराच वेळ खालेल्ला दिसतोय तुमच्या प्रतिभासाधनेतला.
झाला का तंदुरुस्त ?
गोरा: ते तर आहेच! आणि इतरही कामं बरीच रखडलेत.
दूरध्वनीने देखिल मान टाकलेय.
गरा: अरे बापरे, मग तर तुम्हाला भरपूर मोकळा वेळ मिळाला पाहिजे
गोरा: पण सद्या संगणकाच्याच मागे आहे. तो जोपर्यंत पूर्ण कार्यक्षमतेने चालत नाही तोपर्यंत जीवाला स्वस्थता मिळणार नाही!
गरा: "जिवा" बघेल हो सगळं.
तुम्ही लेखनाकडे लक्ष केंद्रित करा
गोरा: ते आहेच हो.त्याच्यावरच तर सगळी भिस्त आहे! पण तो देखिल कधी तरी घाबरतो ना!
गरा: संगणकाची प्रगती कुठवर आलीये ?
गोरा: संगणक हळू हळू मार्गावर येतोय!
बरं साहेब थोडे पोटात अन्न ढकलतो आणि येतो.
गरा: बरं, आज वेळ मिळेल यानंतर असं वाटत नाहिये मला, तरी देखील बघू.
गोरा: काहो?
गरा: मीटींग्ज आहेत जरा
गोरा: म्हणजे परत पार्टी?
गरा: नाही
गोरा: मग बौद्धिक आहे की काय?
गरा: हो
गोरा: मग येताय का जेवायला?
गरा: चालू द्या
गोरा: बरं मग भेटू या! टाटा-बिर्ला!
गरा: टाटा

२० ऑक्टोबर, २००७

बकुळ!

सद्या मी जिथे राहतो त्या विभागात एक बकुळाचे झाड आहे.ते झाड एका इमारतीच्या परिसरात लावलेले आहे;पण त्याच्या बर्‍याच फांद्या रस्त्यावरदेखील पसरलेल्या असल्यामुळे सकाळी सकाळी तिथे फुलांचा सडा पडलेला दिसतो.हमरस्ता असल्यामुळे वाहतूक सारखी चालूच असते आणि त्यामुळेच ह्या फुलांकडे म्हणावे तसे लक्ष लोकांचे जात नाही. काही तुरळक ज्येष्ठ नागरिक पहाटे -पहाटे ही फुले वेचताना दिसतात हे अलाहिदा! ह्या फुलांवरूनच माझ्या बालपणीचा बकुळवृक्ष आणि त्यासंबंधीच्या काही आठवणी जाग्या झाल्या.



आम्ही ज्या वाडीत राहत होतो त्या वाडीची रचना साधारण अशी होती की वाडीत शिरताना डाव्या बाजूला मालकांचा बैठा बंगला आणि त्याला जोडूनच एक चाळ.पुढे आल्यावर उजव्या बाजूला मालकांची वाडी(ज्यात फळझाडे-फुलझाडे आणि एक नेहमीच तुडुंब भरलेली विहीर होती). डाव्या हाताला एक छोटीशी झोपडी. अजून पुढे आले की डाव्या हाताला अजून दोन चाळी (एक लांबलचक तर दुसरी टुमदार बंगल्याच्या आकारातली) आणि उजवीकडे अजून एक चाळ(ह्याच चाळीतल्या पहिल्या खोलीत माझे जवळपास ३०-३२ वर्षे आयुष्य गेले) आणि त्याच्या समोर मोठे अंगण. हे अंगण आमची चाळ आणि मालकांची फळबाग ह्यांच्या मधोमध होते‍. जणू दोघांच्या हद्दी दर्शविणारे.

ह्याच अंगणात नेमके आमच्या(पहिली खोली) आणि शेजार्‍यांच्या(दुसरी खोली) दारासमोर एक दुशाखी बकुळवृक्ष होता. ह्या दुशाखेमुळे बुंध्यात एक छानशी बेचकीसारखी जागा दोन खोडांच्या(शाखा) मध्ये निर्माण झाली होती. त्याचा आम्ही सिंहासनासारखा उपयोग करत असू. आमच्या दारासमोर जी शाखा होती ती थोडी वाकडी पसरून मग वर आभाळाच्या दिशेने गेलेली होती तर दुसरी शाखा किंचित तिरकी होऊन आभाळाच्या दिशेने झेपावली होती.ह्या वाकड्या फांदीवर चढून खाली अंगणात उड्या मारणे, फांदीला लोंबकळणे,झोपाळा बांधणे आणि पकडापकडीच्या खेळात सारखे माकडासारखे खालीवर करत राहणे हा आमचा नित्याचा परिपाठ होऊन बसलेला होता.

झाडाला जेव्हा फुले लगडायची तेव्हाचा घमघमाट तर काही विचारू नका. नुकताच बहर आलेला असला की खाली पडलेली फुले कमी प्रमाणात असत. मग ती वेचताना स्पर्धा लागत असे. कंदिलाच्या प्रकाशात कधी मध्यरात्री तर कधी पहाटेच्या संधी प्रकाशात फुले वेचण्याचा आनंद काही वेगळाच असे. ऐन बहराच्या काळात तर सगळा परिसरच सुगंधमय होऊन जात असे. आम्हा छोट्या मुलामुलींची तर कोण जास्त फुले जमवतेय ह्याची स्पर्धा लागत असे.वर फुलांनी लगडलेले झाड आणि खाली गालिच्यासारखा पसरलेला त्यांचा सडा! एखाद्या हवेच्या झुळुकीनेही अंगावर वर्षाव व्हायचा फुलांचा. साक्षात सुगंधाने न्हाऊन निघत असू आम्ही. किती वेचू आणि किती नको असे होऊन जात असे. मुलींच्या परकराचे-फ्रॉकचे ओचे आणि आम्हा मुलांचे सदर्‍या-चड्ड्यांचे खिसे-पिशव्या भरल्या तरीही फुले जमवण्याचा सोस कमी होत नसे.खरे तर आम्हा मुलांना(मुलगे) त्याची काय जरूर होती? पण तो सुवासच असा होता की मनाला पिसे करत असे आणि आम्ही यंत्रवत ती फुले गोळा करत असू. नंतर त्या फुलांचे गजरे करून आपल्या आईला-बहिणीला देण्यात एक वेगळेच समाधान होते. कधीमधी आम्ही मुले ही फुले खातही असू. ताजी फुले गोड आणि चविष्ट लागत. ह्या फुलांचे वैशिष्ट्य म्हणजे ही फुले सुकली तरी ह्यांचा सुगंध जात नाही. त्यामुळे अशा फुलांचा सुगंधी तेल बनवायला देखिल उपयोग होत असे. अशा प्रकारचे सुगंधी तेल दिवाळीच्या अभ्यंग स्नानाला उपयोगी पडत असे.

फुलांनंतरचा मोसम हा बकुळीच्या फळांचा! तसे हे फळ अतिशय लहानसे( साधारण मध्यम आकाराच्या बोराएवढेच) पण चवीला अतिशय मधुर! फळ कच्चे असतानाचा ह्याचा पोपटी-हिरवा रंग जितका आकर्षक तितकाच पिकलेल्या बकुळाचा केशरी-लालचुटुक रंगही तोंडाला पाणी आणत असे. कच्च्या बकुळाचा उपयोग आम्ही पतंगी चिकटवण्यासाठी करत असू. ह्या कच्च्या बकुळात असलेला चिकटपणा कोणत्याही इतर गोंदांइतकाच प्रभावी आहे.पिकलेली बकुळफळे काढण्यासाठी बरेच जण झाडावर अगदी वरपर्यंत चढत;पण आम्हाला घरातून आईची सक्त ताकीद असे की झाडावर चढायचे नाही त्यामुळे विरस होत असे. कधीमधी आई दुपारची वामकुक्षी घेत असण्याचा फायदा घेऊन आम्हा तिघा भावंडांपैकी कुणी झाडावर चढलेच तरी खाली राहिलेल्यांचा गोंगाट(वर चढलेल्याला "अरे तिकडे तिकडे! नाही नाही जरा बाजूला! हां बरोबर!" वगैरे ओरडून सांगणे) ऐकून आईला चटकन अंदाज येत असे(कारण अगदी दारातच होते ना झाड! काय करणार!) आणि मग ती लगेच अंगणात येऊन आम्हाला खाली उतरायला भाग पाडत असे. अशा वेळी खूप विरस होत असे.पण काय करणार! आईच्या पुढे बोलणे म्हणजे सगळ्यांसमोर बोलणी आणि मार खावा लागेल आणि आपलीच इतर सवंगड्यांसमोर इज्जत जाईल म्हणून गप्प बसणे भाग असे. हा बकुळ वृक्ष आमच्या दारात होता ह्याचा नेहमीच अभिमान वाटत असे मात्र अशा वेळी तो आपल्याच दारात असण्याचा राग येत असे.

असेच एकदा पकडापकडी खेळताना आमच्यातलाच एक मुलगा वाकड्या फांदीवरून धप्पकन खाली पडला आणि त्याचा पाय तुटला. आणि मग तर आईची करडी नजर आमचा सतत पाठलाग करत असे. आम्हाला तिने निक्षून सांगितले की हे असले अघोरी खेळ खेळत जाऊ नका(आता झाडावर चढण्याचा आणि त्यावरून खाली उड्या मारण्याचा आनंद आईला कसा कळणार? पण आमची प्राज्ञा नव्हती आईपुढे बोलायची ). त्यामुळे मग आम्ही एक नवीनच खेळ सुरू केला राजा-राजा खेळण्याचा. बहुधा माझा मोठा भाऊ राजा होत असे आणि त्या बकुळीच्या बुंध्याच्या बेचक्यांत (सिंहासनावर) बसून राज्यकारभार करत असे. आमच्या वाडीत खूप मुले होती आणि आमचे कुटुंब वाडीतील एकमेव ब्राह्मण कुटुंब असल्यामुळे नकळतपणे आमच्याकडे नेतृत्व आले होते. तसे आम्ही अभ्यासात बऱ्यापैकी होतो;पण उगीचच लोक आम्हाला हुशार समजत. असो. मुद्दा तो नाही. तर अशा भरपूर लोकसंख्येमुळे आम्ही खेळणाऱ्या मुलांचे दोन तट पाडून हा राजा-राजाचा खेळ खेळत असू. मग एकमेकांबरोबर युद्ध करणे,युद्धातील बंद्यांचा न्यायनिवाडा करणे,जनतेच्या तक्रारी ऐकणे आणि न्याय करणे वगैरे खेळ होत असे. ह्या सर्व खेळावर कुठे तरी चंद्रगुप्त-चाणक्य ह्यांच्या कथेचा प्रभाव असायचा.

अशा ह्या बहरणार्‍या आणि आमची आयुष्ये समृद्ध करणार्‍या बकुळवृक्षावर एक दिवस कु्र्‍हाड पडली. आमच्या समोर असणारी मालकांची फळबाग तर कधीच उध्वस्त करून त्या जागी एक इमारत उभी राहिली होती आणि आता पाळी होती बकुळवृक्षाची आणि त्याच बरोबरीने आमचीही चाळ पाडून तिथे उभे राहणार्‍या टोलेजंग इमारतीची. आमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर त्या आमच्या सख्यावर,ज्याच्या अंगा-खांद्यावर बागडलो त्याच्यावर(काय उपमा देऊ? सुचतही नाही! आज इतक्या वर्षांनी ती आठवण लिहितानाही जीव कासावीस होतोय) चालणार्‍या करवती आणि कु्र्‍हाडी बघून आमच्या मनात विलक्षण कालवाकालव झाली. त्याचे शेवटचे दर्शन घेताना हळूहळू मन पूर्व स्मृतींमध्ये गेले आणि मनाला तो विलक्षण सुगंध पुन्हा सुखावून गेला.भानावर आलो तेव्हा तो वृक्षराज केव्हाच धाराशायी झाला होता.मात्र त्याचा बुंधा म्हणजे आमचे सिंहासन अजूनही शाबूत होते. त्याने मात्र त्या करवती-कुर्‍हाडींनाही दाद दिली नाही. दोन करवतींची पाती तुटली आणि एका कु्र्‍हाडीचा दांडा तुटला तेव्हा त्या लाकूडतोड्यांनी त्याला तसेच ठेवून आपला गाशा गुंडाळला.

पुढे इमारतीचा पाया खणण्याच्या वेळीच तो बुंधा मुळासकट उपटला गेला;पण शेवटपर्यंत लढत राहण्याचा त्याचा तो संदेश आजही मी माझा आदर्श मानतो.

१५ ऑक्टोबर, २००७

गप्पाष्टक!१

दोन मित्रांमधील हा सुखसंवाद आहे. एक(गणपतराव) आखातात नोकरीनिमित आहे आणि दुसरा(गोपाळराव)भारतात आहे.दोघेही नेहमी गप्पा मारण्यासाठी मसणात(एमएसएन ला गणपतराव मसण म्हणतात)आणि गुगलटॉकवर एकत्र भेटतात. गणपतराव हा बोलण्यात चतुर,हजरजबाबी(पुलं जिंदाबाद), संगीतकार, शौकीन/जाणकार आहे तर गोपाळराव हा "एक ना धड" अशा वर्गातला आहे. पण दोघांचा समान आवडीचा विषय म्हणजे संगीत,पुलं आणि शेयरबाजार.बघूया काय बोलताहेत ते.

गोपाळराव: सुप्रभात!
गणपतराव: सुप्रभात
गोरा: कामात आहात?
गरा: विशेष नाही. आताच आलो.
गोरा: आज उशीरा आलात?
गरा: नाही, रोजचीच वेळ.
गोरा: मला वाटले ७ वाजता येता म्हणून.
गरा: नाही, शक्य होत नाही ते  :-)
७ ला यायला मला ६.३० ला निघावं लागेल.
गोरा: मग आजपासून एकान्तवास आठवडाभर?
गरा: कालपासूनच चालू झाला एकान्तवास. कुटुंब परतलंय ना भारतात.
गोरा: सकाळी किती वाजता उठता?
गरा: ६ वाजता.
गोरा: म्हणजे घाईच होत असेल ना!
गरा: नाही, १ तासात आरामात आटोपतं माझं.
गोरा:  :-)  आता जेवणाची काय सोय आहे?
गरा: दुपारी कार्यालयातल्या हॉटेलमध्ये खाणार, आणि संध्याकाळी कुठेतरी बाहेर, नाहीतर घरीच आमटी भात करू शकतो.
गोरा: घरीच खाल्लेलं बरं. त्यातून तुमची पथ्यं असतीलच ना!
गरा: हो ना.पण आठवडाभरासाठी मोडली तरी हरकत नाही आणि अरेबिक खाणं सात्विक असतं, विशेषत: शाकाहारी.
गोरा: नको हो. नाहीतर इथे येण्याच्या आधी तब्ब्येत बिघडायची.
गरा: तेही खरं आहे.
गोरा: आणि मग सौं चे लेक्चर ऐकून घ्यायला लागेल.
गरा: जाताना ती २ प्रकारच्या आमट्या करून गेली होती. इथे अन्न ७-८ दिवस टिकू शकतं. त्यामुळे बरं पडतं.
गोरा: अहो तरी देखिल शेवटी ताजं ते ताजं!
गरा: हो, मगर नाविलाज को क्या विलाज ?
गोरा: विलाज है ना! स्वत: बल्लवाचारी बनायचं!
गरा: त्यात बराच वेळ जातो. मला जाण्याआधी बरीच कामं उरकायची आहेत आणि मी कुठेही खाल्लं तरी तब्येतीला जपून खातो.
गोरा: नाही, सकाळचं एक ठीक आहे पण संध्याकाळी तर करता येईल ना.
गरा: संध्याकाळीच वेळ नाहिये आता. मोठी लिस्ट आहे कामाची.
गोरा: काय? सौ. बरेच काही सोपवून गेलेल्या दिसतात!
गरा: काही तिची कामं, बरीचशी माझी.
गोरा: इथे येण्याआधी पुरी नाही झाली तर शिक्षा वगैरे करणार आहेत की काय? :-)
गरा: शिक्षा ? :-)))))))))))))) छे हो.
गोरा: मग आता संगीतसाधना करायलाही वेळ नसणार तर.
गरा: जमलं तर ते ही करणार आहे.एक 'अर्धवट दाढी' झाली आहे, ती पूर्ण करायची आहे.
गोरा: हाहाहाहा! तुम्ही स्वत: कविता वगैरे करता का हो?
गरा: नाही, पण भविष्यात चाळा करायचा आहे त्याही क्षेत्रात.
गोरा: म्हणजे मग नामवंत कवींच्या पोटावर पाय येणार आहे तर!  :-)
गरा: :-))))))))))))))))))))) पोटासाठी मी काही केलं असतं तर आतापर्यंत  अब्जाधीश झालो असतो :-)
गोरा: वा! मग मलाही जरा सांगता आलं असतं की मी अब्जाधीशाचा मित्र आहे म्हणून!
गरा: आता तुम्ही कोट्याधीशापासून सुरुवात करू शकता.(कारण मी कोट्या चांगल्या करू शकतो ...... असं माझी मित्रमंडळी म्हणतात :-) )
गोरा: ते तर मी सांगतच असतो हो. अरबस्थानातला शेख माझा दोस्त आहे म्हणून! :-)
त्या हिशेबने मी पण कोधी(कोट्याधीश)आहेच की!
गरा: चला ५० लाख माझे, ५० तुमचे.
गोरा: चालेल. सद्या इतके भांडवल पूरे आहे!
गरा: पुरे? अहो शेअर बाजारात ५० लाखाचे ५ हजार करायला वेळ लागणार नाही आपल्याला.
गोरा: नाही. म्हणजे माझे पाच हजार होतील तेव्हा तुमचे कैक कोटी होतील ना! कारण मी जे काही करेन त्याच्या उलट तुम्ही करायचे आहे!
गरा: हे हे हे!
गोरा: कसा आहे धंदा? फायद्यात चालायला काहीच हरकत नाहीये.
गरा: "तुमचा तोटा तोच माझा फायदा" असं माझ्या धंद्याचं ब्रीदवाक्य ठेवायला हरकत नाही ना ?
गोरा: ठेवा. चांगलं बोधवाक्य आहे!
गरा: यातून तुम्हीच बोध घ्या :-)
गोरा: मी आता सुधारण्या पलीकडे गेलोय! :-)
गरा: आणि मी "अली'कडे!
गोरा: दोन्ही अर्थाने!!!!!!!!!!!!!!!!!!!!
गरा: मी "अली" याच अर्थाने म्हटलं होतं :-))))))))))) या अली!
गोरा: आता तुमचा मित्र आहे म्हटल्यावर मला ते कळणारच ना!!!!!!!
गरा: मग काय तर!!
गोरा: बरं आता जरा संगीताकडे वळू या.
गरा: बायको गेल्यावर संगीताकडे वळलो असं म्हणतील लोकं.
गोरा: हाहाहा!तशी ती(संगीता) पहिलीच बायको आहे ना!
गरा: लौकिक अर्थाने.
गोरा: ह्या सवतीला त्यांनी मान्यता दिलेय आधीच?
गरा: सरस्वती(म्हणजे माझी बायको) ही सवत. संगीता नव्हे!
गोरा: तशा दोघी एकमेकींच्या सवती! पण गुण्यागोविंदाने नांदताहेत ना! मग झालं तर!
गरा: माझ्या एका नातेवाईकाचं नाव 'गोविंद गुणे' आहे, त्याना देखील आम्ही "गुण्यागोविंदाने" असंच म्हणतो :-)
गोरा: वा! क्या बात है! पुलंचा वरदहस्त आहे तुमच्यावर!!!!!!
गरा: ते कुठे आणि मी कुठे ? म्हणजेच "ते स्वर्गलोकात सुखात नांदताहेत, आणि मी खितपत पडलोय इहलोकात" :-)
गोरा: ते आता वर आणि तुम्ही इथे खाली!!!!!!! रंभा तेल थापत असेल त्यांच्या डोक्यावर आणि उर्वशी पंख्याने वारा घालत असेल.
गरा: क्या टेलीपथी है.मान गये उस्ताद!
गोरा: जमतंय तर मलाही थोडे थोडे, तुमच्या सहवासात राहून!
गरा: जमणारच हो.म्हणतात ना,"ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या, आणि वाण नाही पण गुण लागला". अगदी तसेच! हाहाहा!
चला! गोपाळराव नंतर बोलू या. साहेब तिथे कोकलतोय माझ्या नावाने. सारख्या उचक्या लागताहेत!
गोरा: हरकत नाही उद्या भेटू. तोवर रामराम!

१२ ऑक्टोबर, २००७

आठवणी!शालेय जीवनातल्या!१३

सहावीत असतानाच जानेवारीत माझी मुंज झाली. दादरला ब्राह्मण सहाय्यक संघात सामुदायिक मुंजीचा कार्यक्रम होता. तिथेच माझीही मुंज लागली. माझे वडील वाह्यात खर्चाच्या विरुद्ध होते. एक संस्कार म्हणून मुंज करायचीच आहे तर ती अशी सार्वजनिक असली म्हणून कुठे बिघडते असे त्यांचे ठाम मत होते. त्यामुळे आम्हा तिघा भावांच्या मुंजी ह्या अशाच सार्वजनिक पद्धतीनेच झालेल्या होत्या.

                                                      सगळ्यात बुटका....उजवीकडचा...तो मीच.

मुंजीत इतर बटुंबरोबरच माझाही गोटा केला गेला. डोक्यावर एक छोटासा घेरा आणि शेंडी सोडली तर अगदी तुळतुळीत गोटा करून माझे मऊरेशमी केस(ज्याचा मला खूप अभिमान होता) पार नाहीसे करून जणू माझा अहंकारच ठेचला होता.त्या तशा गोटा केलेल्या अवस्थेत शाळेत जायला लाज वाटत होती म्हणून डोक्यावर एक पी-कॅप घालून मी शाळेत गेलो.

माझ्या मुंजीची आणि त्यात केलेल्या चमन गोट्याची बातमी आधीच वर्गात पोचली होती. सगळे जण "ताजी-वाशी-आजी" करण्यासाठी टपलेलेच होते. मी ही "रामराम" म्हणून ते टाळण्यासाठी मोठ्या तयारीत गेलो.वर्गात शिरतानाच जोरात "रामराम" म्हणायचे म्हणजे कोणी मारणार नाही असे मनाशी ठरवतच शाळेत पोचलो; पण सगळेच "ओंफस" झाले. वर्गात शिरण्या अगोदरच एका दोघांनी मला पकडले, माझी टोपी काढली आणि सणसणीत "ताजी-वाशी-आजी "(टकलावर जोरात टपल्या आणि डोक्याच्या मागच्या भागावर सणसणीत चपराक) करून घेतले. त्यांच्या त्या माराने मी विद्ध झालेलो असतानाच आणखी काही जणांची कुमक माझ्यावर चालून आली आणि त्यांनी मला धरून वर्गात नेले. वर्गात नेतानाही मार पडतच होता. त्या दिवशी "रामराम" बोलता आलेच नाही पण "मरामरा"(मरेस्तोवर) मार मात्र खायला लागला. माझा चेहरा, गोटा सगळे लाल लाल होईपर्यंत मुलांनी मला यथेच्छपणे टपल्या मारून मारून रडकुंडीला आणले होते. शाळा भरल्याची आणि त्यानंतर प्रार्थनेसाठी घंटा वाजली तेव्हाच कुठे मला श्वास घेण्याची फुरसत मिळाली.त्या दिवशी त्यानंतरही अगदी दिवसभर,संधी मिळेल तशी प्रत्येकाने मला टपल्या मारण्याची संधी साधून घेतली. कुठून झाली गोटा करण्याची दूर्बुद्धी असे झाले; पण माझ्या हातात कुठे काय होते?

त्यानंतर चारेक दिवसांनी २६ जानेवारी ह्या प्रजासत्ताक दिनानिमित शाळेत झेंडावंदनाला गेलो होतो तेव्हाचा प्रसंग!

झेंडावंदनासाठी आम्हा मुलांना २०-२० मुलांच्या रांगा करुन उभे केले होते. आज "एडी मिलाव" आणि "कदम खोल" वगैरे आज्ञा नेहमीच्या शारिरीक शिक्षणाच्या सरांऐवजी खुद्द आमचे मुख्याध्यापक देत होते. झेंडावंदनाच्या आधी झेंड्याला "वंदन" करण्याची रंगीत तालीम ते स्वतः जातीने घेत होते. हे करत असताना त्यांनी मध्येच एकदम "ए! तू! तू इकडे ये"! असे म्हटले. ते कुणाला उद्देशून बोलले हे काही कळलेच नाही. निदान मला तरी नसावे असे मला वाटले.

इतक्यात सर स्वतः रांगेत घुसले आणि चालत चालत नेमके माझ्यापाशी येऊन थांबले.माझ्या पाठीत एक रट्टा मारून म्हणाले "इतका वेळ काय हवेशी बोलत होतो काय? लक्ष कुठेय तुझे? आणि ही टोपी कशाला घातलेय? काढ ती"!मी आपले "सर,माझी मुंज झालेय...... (नुकतीच, म्हणून गोटा केलाय. सगळी मुलं टपल्या मारतात म्हणून मी टोपी घातलेय..... हे सगळे मनातल्या मनात)माझे बोलणे पूर्णपणे ऐकून न घेता त्यांनी ती टोपी जप्त केली. वर एक सणसणीत टपली हाणली आणि पुन्हा पुढचे आदेश द्यायला गेलेसुद्धा. त्यांची पाठ वळताच एक दोघांनीही आपले हात साफ करून घेतले. झाल्या प्रसंगाने माझा अपमान झाला असेच मला वाटले. झालेल्या अपमानाने आणि नाहक पडलेल्या माराने मी अक्षरशः रडवेला झालो होतो. कसेबसे एकदा झेंडावंदन उरकले आणि आम्ही वर्गात गेलो.

थोड्याच वेळात शिपाईदादा आले "बोलावलेय" असा मुख्याध्यापकांचा निरोप घेऊन. आता पुढे काय वाढून ठेवलेय ह्या भीतीने मी घाबरत घाबरत त्यांच्या समोर जाऊन उभा राहिलो. पण तसे काही विपरीत घडले नाही. त्यांनी माझ्याकडे हात पुढे करून माझी टोपी परत केली आणि सांगितले की झेंडावंदनाला पुन्हा टोपी घालू नकोस म्हणून! मला कळेना टोपी घातल्याने काय फरक पडतो ते; पण विचारण्याची हिंमत होत नव्हती. तरीही सगळे धैर्य एकवटून मी विचारलेच. "सर, रागावणार नसाल तर एक विचारु?"सरांनी एकवार माझ्याकडे रोखून बघितले आणि म्हणाले, "विचार! नाही रागावणार!"

"सर! मोठमोठे नेते आणि मंत्री झेंडावंदनाच्य वेळी टोप्या घालतातच ना! मग मी घातली तर तुम्ही का रागावलात?"सर किंचित हसले आणि माझेही दडपण दूर झाले. ते म्हणाले, "अरे गांधी टोपी हा आपल्या स्वातंत्र्य लढ्याचा एक अविभाज्य भाग आहे. ती टोपी खादीची असते आणि खादीचा स्वराज्याच्या कल्पनेशी जुळलेला संबंध म्हणजे कधीच न तुटणारा धागा आहे. मंत्री जे खादीचे कपडे वापरतात तो त्यांचा गणवेश आहे आणि गांधीटोपी हा त्याचाच एक अविभाज्य भाग आहे; पण ही तू घातलेली टोपी आपली नव्हे. ती परदेशी आहे आणि ती तुझ्या गणवेशाचा भागही नाही. झेंडावंदनाच्या वेळेस गणवेशाखेरीज दुसरी कोणतीही गोष्ट अंगावर असता कामा नये असा संकेत आहे आणि म्हणूनच मी तुला ही टोपी काढायला लावली".

सरांच्या समोर मी मान डोलावली खरी पण मला तरी ते काही फारसे पटले नाही. हीच गोष्ट न मारता त्यांनी मला आधी सांगितली असती तर कदाचित पटलेही असते. असो, एकूण काय तर तुळतुळीत गोट्यामुळे मुलांकडून आणि टोपीमुळे सरांकडून मार खाणे हे बहुधा विधिलिखित असावे.

क्रमश:

११ ऑक्टोबर, २००७

सहज सुचलं म्हणून!

"हे फक्त माझ्याच बाबतीत का घडते?"
असा प्रश्न मला पडत असे; पण आता जेव्हा माझा जनसंपर्क वाढलाय तेव्हा हे लक्षात आले की हे इतर कैक जणांच्या बाबतीतही घडतंय! आपण फक्त स्वतःचाच विचार करतो त्यामुळे सगळ्या जगात आपणच कसे आगळे-वेगळे आहोत असा विचार आपल्याला कधी सुखावतो तर कधी दुखवतो.
उदाहरणच द्यायचे झाल्यास: कल्पना करा की तुम्ही बस थांब्यावर उभे आहात. कित्येक बशी(बस चे मराठी अनेकवचन) तुमच्या समोर येताहेत पण नेमकी तुम्हाला हव्या असणार्‍या क्रमांकाची बस येत नसते. बराच वेळ वाट पाहून तुम्ही थकता आणि शेवटी 'एकदाची' तुमची बस येते. तुम्ही अगदी खुश होऊन त्यात चढण्याची तयारी करता आणि मग लक्षात येते की बसमध्ये पायरीवर उभे राहाण्याची देखिल जागा नाहीये. तुमच्या डोळ्यासमोर बस निघून जाते आणि वरचा प्रश्न स्वतःलाच विचारता!

दुसरे उदाहरणः आज शेयर बाजार चढणार आहे / अमूक अमूक शेयर वाढणार आहे असे ऐकून /वाचून/स्वतः अगदी अभ्यास करून वगैरे तुम्ही काही खरेदी करता. खरोखरच शेयर बाजार अगदी सूज येण्यासारखा वाढतो पण नेमका तुम्ही विकत घेतलेला शेयर खाली खाली जातो. आत्ता वाढेल,मग वाढेल असा विचार करून तुम्ही स्वस्थ राहता(निदान वरवर तरी) आणि त्याची पडझड बघत स्वतःला वरचा प्रश्न विचारता.
कधी बाजार खाली जाणार आहे,हातात असतील ते सगळे विकून टाका असा सल्ला तज्ञ देतात आणि तुम्ही तसे करता. तज्ञांचा सल्ला अचूक निघतो. फक्त तुम्ही विकलेले शेयर्स सोडून. तुमच्या हातातून ते शेयर्स निसटताच वेगाने वरच्या दिशेने धावतात आणि जे हातात असतात ते उलट दिशेने (खालच्या) केव्हाच रसातळाला पोचतात. आता पुन्हा तुम्ही स्वतःलाच वरचा प्रश्न विचारता!

रेल्वे गाडीत कधी नव्हे ती खिडकी जवळची जागा मिळते. गार हवा मिळतेय म्हणून तुम्ही खूश. लगेच पिशवीतून पुस्तक काढून वाचण्याचा घाट घातला जातो. चार-पाच स्टेशने गाडी पुढे जाते आणि अचानक जोराचा पाऊस येतो. खिडकी बंद करण्याचा प्रयत्न करता पण ती नेमकी बिघडलेली असते. कशी बशी बंद करता पण तोवर तुम्ही अर्धे अधिक भिजले असता.पुस्तक भिजलेले असते. पाचेक मिनिटात पाऊस थांबतो. आजुबाजुचे लोक खिडकी उघडा म्हणून कोकलतात. पुन्हा खिडकी उघडताना खटपट करावी लागते.पावसाचे येणेजाणे चालुच असते. असेच संपूर्ण प्रवासभर हे उघडझाप प्रकरण चालू असते. खिडकीजवळ जागा मिळाल्याचा आनंद केव्हाच हरपलेला असतो . पुन्हा वरचाच प्रश्न!

मंडळी ह्यालाच म्हणतात सामान्य माणूस . अशा ह्या माणसालाच हे सगळे प्रश्न रोज नव्याने पडत असतात. आपला काय अनुभव आहे ह्या बाबतीत?

२ ऑक्टोबर, २००७

आठवणी!शालेय जीवनातल्या!१२

बेडकी प्रकरण घडल्यानंतर असाच एक प्रकार आमच्या वर्गात घडला.आम्हाला विज्ञान शिकवायला केळकर नावाचे सर होते. अंगपिंडाने मजबूत, गोरे पान,तुळतुळीत टक्कल ,पोटाचा नगारा(तुंदिलतनु) असे त्यांचे दृष्यरूप होते. ह्यामुळेच की काय शाळेतली टारगट मुले त्यांचा उल्लेख 'बाप्पा' म्हणून करीत.(एक सोंड लावली असती तर खरेच बाप्पा म्हणून शोभले असते.)

विषय शिकवण्यात सरांचा हातखंडा होता. एरवी गंभीर असणारे सर प्रसंगी विनोदही करीत.कधी कधी रागावत तेव्हा पट्ट्यांचा प्रसादही देत. पण एकूण खूप चांगले आणि विद्यार्थीप्रिय असे शिक्षक होते केळकर सर.
मी त्यांचा लाडका विद्यार्थी होतो. शिकवताना नेहमी मला विचारत "काय देवबाप्पा? समजतेय ना?"
मी होय म्हटले की त्यांचे समाधान होई.

एकदा सर शिकवत असताना फळ्यावर आकृती काढण्यासाठी वर्गाला पाठमोरे उभे होते. मुले दिसेल तशी ती आकृती वहीत उतरवून घेत होती. तेव्हढ्यात कुणीतरी "बाप्पा" असे ओरडले. मला वाटले की मलाच कुणीतरी हाक मारतंय म्हणून मी उभा राहून मागे पाहू लागलो; पण सगळे खाली माना घालून आकृती उतरवण्यात मग्न होते. सरांनीही एकदा मागे वळून पाहिले आणि पुन्हा ते आकृती काढण्यात मग्न झाले. सर मला देखील बाप्पाच म्हणत आणि शाळेतील टारगट मुले सरांना बाप्पा म्हणतात हेही त्यांना माहित होते. त्यामुळे ह्या बाप्पा हाकेचे त्यांना विशेष असे काहीच वाटले नाही.

सरांची पाठ पुन्हा आमच्याकडे झाल्यावर पुन्हा कुणीतरी " ए बाप्पा" असे ओरडले. ह्यावेळी मात्र सर चटकन वळले आणि जोरात ओरडले "कोण रे तो?कोण बोलतोय बाप्पा?प्रसाद हवाय का?"
पण मुले खाली माना घालून आकृती उतरवून घेताहेत हे पाहिल्यावर त्यांनी पुन्हा आपला मोर्चा फळ्याकडे वळवला.त्यांची पाठ वळताच पुन्हा कुणी तरी ओरडले "ए बाप्पा,टकल्या"!
इथे सरांची खात्रीच झाली की हे त्यांनाच उद्देशून कुणीतरी बोलले होते. आवाज मागच्या बाकांकडून आला होता हेही त्यांनी हेरले. एक क्षणभर त्यांनी वर्गावरून नजर फिरवली आणि ताड ताड चालत ते सर्वात शेवटच्या बाकाजवळ गेले.

त्या बाकावर दोन मुले बसत होती. एकाचे आडनाव होते वैद्य. मुलगा तसा वयाने मोठाच होता. अंगाने हडकुळा पण उंचीला सहा फूट तरी असावा;मात्र अतिशय गरीब स्वभावाचा. त्याच्या तोंडावरची माशी देखिल उडत नसे. त्याच्या बाजुलाच बसणारा दुसरा म्हणजे सखाराम साळवी. उंची जेमतेम पाच फूट. पण छाती ३६" ते ३८" असावी. हा मुलगाही नापास होत होत आमच्या वर्गात आलेला. शाळेच्या कबड्डी संघाचा कप्तान होता तो,शरीरसौष्टवपटु होता आणि मुख्य म्हणजे 'दादा'(गुंड) होता. खिशात नेहमी चाकू असायचा. भाषा अशुद्ध असायची. मात्र आम्हा वर्गमित्रांशी अतिशय प्रेमाने वागायचा.माझे तर त्याला विशेष कौतुक वाटायचे. "तू काय मस्त संकृत(संस्कृत) बोलतो रे(पक्षी:गीतापठण).आपल्याला ह्या जन्मी तरी येनार न्हाय.आपल्याला अभिमान हाय तुजा की तू आपला दोस्त हायेस"!

तर सर अशा त्या दुकलीजवळ पोचले. आम्हाला वाटले आता वैद्यची काय खैर नाही. सर त्याला निष्कारण मारणार. कारण तो बिचारा कधीच तोंड उघडत नसे. आणि सखारामला हात लावणे हे सरांनाच काय सरांच्या बापालाही जमणे शक्य नव्हते ह्याबद्दल तर खात्रीच होती. त्या दोघांपैकी कुणीही तो आवाज काढलेला नव्हता हेही नक्की होते . पण सरांचा पक्का समज झालेला होता. सर तिथे पोचताच दोघेही उठून उभे राहिले. एक क्षणभर सरांनी दोघांचे निरीक्षण केले आणि... काडकन् एकाच्या कानाखाली खेचली.क्षणभर आमचा आमच्या नजरेवर विश्वासही बसला नाही;पण सरांनी चक्क सखारामच्या कानाखाली 'बाप्पा' काढला होता. बाप रे! केव्हढे हे धारिष्ठ्य?

तेवढ्यात मधल्या सुटीची घंटा झाली आणि सर निघून गेले . सगळेजण सखारामकडे धावले. आम्हाला एकच भीती होती की आता सरांची काय खैर नाही. शाळा सुटल्यावर सखाराम त्यांना आपला इंगा दाखवणार. आम्ही ते पाहायला एकीकडे उत्सुक होतो आणि दुसरीकडे काळजीतही पडलो होतो.
मी सखाराम जवळ जाऊन त्याला म्हटले, " तू आवाज काढला नाहीस आणि काढणार नाहीस ह्याची मला खात्री आहे आणि वैद्यची तर हिंमतच नाहीये. मग असे असताना आणि तुझ्यात शक्ती असताना तू निमूटपणे सरांचा मार का खाल्लास? तू त्यांचा हात का धरला नाहीस? उलटून का मारले नाहीस त्यांना"?माझ्यासारखाच प्रश्न सगळ्यांना पडलेला होता.आता ह्यावर सखाराम काय बोलतो ते ऐकायला आम्ही अधीर झालो होतो.
पण सखाराम शांतच होता.तितक्याच संयत स्वरात तो म्हणाला....ह्ये बग देवा. नीट आईक. कसे बी झाले तरी ते आपले सर हाईत.आपल्याला न्यान देतात.प्रेम करतात आपल्यावर. मंग त्येनला रागवाय्चा आन शिक्षा करायचाबी आधिकार हाय.(हा मी सखारामचा नवीनच अवतार पाहात होतो.)

अरे पण तू काहीही केले नसताना त्यांनी शिक्षा केली ना तुला? मग उगाच गप्प का बसतोस?चांगला धरून हाण त्यांना आणि त्या बेडकीला पण.(माझा जुना राग उफाळून आला होता.मनात म्हटले होऊन जाऊ दे एका फटक्यात दोन्ही कामं!)

मारलं तर मारू दे! एवड्याश्या माराने मला काय बी धाड भरनार नाय. अरे बाबा विचार कर. ज्याने आवाज केला त्याने जर सरांच्या हातचा फटका खाल्ला आसता तर पानी बी मागितलं नसतं. लई जोरात मारलं बग. आपून म्हनून सहन केलं.त्यो वाचला ह्ये काय कमी हाय काय?

मग तू त्यांना मारणार नाहीस? तुझ्या अपमानाचा बदला घेणार नाहीस? हे तुझं काही तरीच!

अरे बाबा आईक माजं! मी ताकत कमावलेय ती अशी गुर्जींना मारायला न्हाय. त्येंचे केवडे उपकार हायेत आपल्या सगल्यावर! आसे गुर्जी नसते तर मी आज निसता रस्त्यावर मारामाऱ्या करत बसलो असतो.त्येंनी शिकवून आपल्याला एवडे मोठे केले मग त्येंना कसे मारनार! माझा बाप बी मला मारतो.मंग आता सांग,मी त्येला बी मारू काय?अंगातल्या ताक्तीचा उपेग आपल्याच मानसांना मारायला केला तर पाप लागंल माझ्या राजा!(हा तर चक्क पाप-पुण्ण्याच्या गोष्टी करत होता.हे सगळे माझ्यासाठी नवे होते.)

सखाराम पुढेही असेच काही बोलत होता आणि मी मात्र मनातल्या मनात खजील होत होतो. अंगात इतकी शक्ती असताना सखाराम त्याचा वापर सरांवर करायला तयार नव्हता. का? तर ते आपल्याला ज्ञान देतात म्हणून. आणि मी? मी बदला घेण्याच्या गोष्टी करतोय.इतकेच नाही तर स्वत:ला जमत नाही म्हणून त्याला प्रवृत्त करतोय. छी:! माझी मलाच लाज वाटायला लागली आणि सखारामचे ते नवे रूप बघून माझा त्याच्याबद्दलचा आदर दुणावला.

खाली मान घालून मी आपल्या जागेवर येऊन बसलो.
"उथळ पाण्याला खळखळाट फार " ह्या म्हणीचा अर्थ आज मला नव्याने समजला होता.

क्रमश: