माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२० ऑक्टोबर, २००७

बकुळ!

सद्या मी जिथे राहतो त्या विभागात एक बकुळाचे झाड आहे.ते झाड एका इमारतीच्या परिसरात लावलेले आहे;पण त्याच्या बर्‍याच फांद्या रस्त्यावरदेखील पसरलेल्या असल्यामुळे सकाळी सकाळी तिथे फुलांचा सडा पडलेला दिसतो.हमरस्ता असल्यामुळे वाहतूक सारखी चालूच असते आणि त्यामुळेच ह्या फुलांकडे म्हणावे तसे लक्ष लोकांचे जात नाही. काही तुरळक ज्येष्ठ नागरिक पहाटे -पहाटे ही फुले वेचताना दिसतात हे अलाहिदा! ह्या फुलांवरूनच माझ्या बालपणीचा बकुळवृक्ष आणि त्यासंबंधीच्या काही आठवणी जाग्या झाल्या.



आम्ही ज्या वाडीत राहत होतो त्या वाडीची रचना साधारण अशी होती की वाडीत शिरताना डाव्या बाजूला मालकांचा बैठा बंगला आणि त्याला जोडूनच एक चाळ.पुढे आल्यावर उजव्या बाजूला मालकांची वाडी(ज्यात फळझाडे-फुलझाडे आणि एक नेहमीच तुडुंब भरलेली विहीर होती). डाव्या हाताला एक छोटीशी झोपडी. अजून पुढे आले की डाव्या हाताला अजून दोन चाळी (एक लांबलचक तर दुसरी टुमदार बंगल्याच्या आकारातली) आणि उजवीकडे अजून एक चाळ(ह्याच चाळीतल्या पहिल्या खोलीत माझे जवळपास ३०-३२ वर्षे आयुष्य गेले) आणि त्याच्या समोर मोठे अंगण. हे अंगण आमची चाळ आणि मालकांची फळबाग ह्यांच्या मधोमध होते‍. जणू दोघांच्या हद्दी दर्शविणारे.

ह्याच अंगणात नेमके आमच्या(पहिली खोली) आणि शेजार्‍यांच्या(दुसरी खोली) दारासमोर एक दुशाखी बकुळवृक्ष होता. ह्या दुशाखेमुळे बुंध्यात एक छानशी बेचकीसारखी जागा दोन खोडांच्या(शाखा) मध्ये निर्माण झाली होती. त्याचा आम्ही सिंहासनासारखा उपयोग करत असू. आमच्या दारासमोर जी शाखा होती ती थोडी वाकडी पसरून मग वर आभाळाच्या दिशेने गेलेली होती तर दुसरी शाखा किंचित तिरकी होऊन आभाळाच्या दिशेने झेपावली होती.ह्या वाकड्या फांदीवर चढून खाली अंगणात उड्या मारणे, फांदीला लोंबकळणे,झोपाळा बांधणे आणि पकडापकडीच्या खेळात सारखे माकडासारखे खालीवर करत राहणे हा आमचा नित्याचा परिपाठ होऊन बसलेला होता.

झाडाला जेव्हा फुले लगडायची तेव्हाचा घमघमाट तर काही विचारू नका. नुकताच बहर आलेला असला की खाली पडलेली फुले कमी प्रमाणात असत. मग ती वेचताना स्पर्धा लागत असे. कंदिलाच्या प्रकाशात कधी मध्यरात्री तर कधी पहाटेच्या संधी प्रकाशात फुले वेचण्याचा आनंद काही वेगळाच असे. ऐन बहराच्या काळात तर सगळा परिसरच सुगंधमय होऊन जात असे. आम्हा छोट्या मुलामुलींची तर कोण जास्त फुले जमवतेय ह्याची स्पर्धा लागत असे.वर फुलांनी लगडलेले झाड आणि खाली गालिच्यासारखा पसरलेला त्यांचा सडा! एखाद्या हवेच्या झुळुकीनेही अंगावर वर्षाव व्हायचा फुलांचा. साक्षात सुगंधाने न्हाऊन निघत असू आम्ही. किती वेचू आणि किती नको असे होऊन जात असे. मुलींच्या परकराचे-फ्रॉकचे ओचे आणि आम्हा मुलांचे सदर्‍या-चड्ड्यांचे खिसे-पिशव्या भरल्या तरीही फुले जमवण्याचा सोस कमी होत नसे.खरे तर आम्हा मुलांना(मुलगे) त्याची काय जरूर होती? पण तो सुवासच असा होता की मनाला पिसे करत असे आणि आम्ही यंत्रवत ती फुले गोळा करत असू. नंतर त्या फुलांचे गजरे करून आपल्या आईला-बहिणीला देण्यात एक वेगळेच समाधान होते. कधीमधी आम्ही मुले ही फुले खातही असू. ताजी फुले गोड आणि चविष्ट लागत. ह्या फुलांचे वैशिष्ट्य म्हणजे ही फुले सुकली तरी ह्यांचा सुगंध जात नाही. त्यामुळे अशा फुलांचा सुगंधी तेल बनवायला देखिल उपयोग होत असे. अशा प्रकारचे सुगंधी तेल दिवाळीच्या अभ्यंग स्नानाला उपयोगी पडत असे.

फुलांनंतरचा मोसम हा बकुळीच्या फळांचा! तसे हे फळ अतिशय लहानसे( साधारण मध्यम आकाराच्या बोराएवढेच) पण चवीला अतिशय मधुर! फळ कच्चे असतानाचा ह्याचा पोपटी-हिरवा रंग जितका आकर्षक तितकाच पिकलेल्या बकुळाचा केशरी-लालचुटुक रंगही तोंडाला पाणी आणत असे. कच्च्या बकुळाचा उपयोग आम्ही पतंगी चिकटवण्यासाठी करत असू. ह्या कच्च्या बकुळात असलेला चिकटपणा कोणत्याही इतर गोंदांइतकाच प्रभावी आहे.पिकलेली बकुळफळे काढण्यासाठी बरेच जण झाडावर अगदी वरपर्यंत चढत;पण आम्हाला घरातून आईची सक्त ताकीद असे की झाडावर चढायचे नाही त्यामुळे विरस होत असे. कधीमधी आई दुपारची वामकुक्षी घेत असण्याचा फायदा घेऊन आम्हा तिघा भावंडांपैकी कुणी झाडावर चढलेच तरी खाली राहिलेल्यांचा गोंगाट(वर चढलेल्याला "अरे तिकडे तिकडे! नाही नाही जरा बाजूला! हां बरोबर!" वगैरे ओरडून सांगणे) ऐकून आईला चटकन अंदाज येत असे(कारण अगदी दारातच होते ना झाड! काय करणार!) आणि मग ती लगेच अंगणात येऊन आम्हाला खाली उतरायला भाग पाडत असे. अशा वेळी खूप विरस होत असे.पण काय करणार! आईच्या पुढे बोलणे म्हणजे सगळ्यांसमोर बोलणी आणि मार खावा लागेल आणि आपलीच इतर सवंगड्यांसमोर इज्जत जाईल म्हणून गप्प बसणे भाग असे. हा बकुळ वृक्ष आमच्या दारात होता ह्याचा नेहमीच अभिमान वाटत असे मात्र अशा वेळी तो आपल्याच दारात असण्याचा राग येत असे.

असेच एकदा पकडापकडी खेळताना आमच्यातलाच एक मुलगा वाकड्या फांदीवरून धप्पकन खाली पडला आणि त्याचा पाय तुटला. आणि मग तर आईची करडी नजर आमचा सतत पाठलाग करत असे. आम्हाला तिने निक्षून सांगितले की हे असले अघोरी खेळ खेळत जाऊ नका(आता झाडावर चढण्याचा आणि त्यावरून खाली उड्या मारण्याचा आनंद आईला कसा कळणार? पण आमची प्राज्ञा नव्हती आईपुढे बोलायची ). त्यामुळे मग आम्ही एक नवीनच खेळ सुरू केला राजा-राजा खेळण्याचा. बहुधा माझा मोठा भाऊ राजा होत असे आणि त्या बकुळीच्या बुंध्याच्या बेचक्यांत (सिंहासनावर) बसून राज्यकारभार करत असे. आमच्या वाडीत खूप मुले होती आणि आमचे कुटुंब वाडीतील एकमेव ब्राह्मण कुटुंब असल्यामुळे नकळतपणे आमच्याकडे नेतृत्व आले होते. तसे आम्ही अभ्यासात बऱ्यापैकी होतो;पण उगीचच लोक आम्हाला हुशार समजत. असो. मुद्दा तो नाही. तर अशा भरपूर लोकसंख्येमुळे आम्ही खेळणाऱ्या मुलांचे दोन तट पाडून हा राजा-राजाचा खेळ खेळत असू. मग एकमेकांबरोबर युद्ध करणे,युद्धातील बंद्यांचा न्यायनिवाडा करणे,जनतेच्या तक्रारी ऐकणे आणि न्याय करणे वगैरे खेळ होत असे. ह्या सर्व खेळावर कुठे तरी चंद्रगुप्त-चाणक्य ह्यांच्या कथेचा प्रभाव असायचा.

अशा ह्या बहरणार्‍या आणि आमची आयुष्ये समृद्ध करणार्‍या बकुळवृक्षावर एक दिवस कु्र्‍हाड पडली. आमच्या समोर असणारी मालकांची फळबाग तर कधीच उध्वस्त करून त्या जागी एक इमारत उभी राहिली होती आणि आता पाळी होती बकुळवृक्षाची आणि त्याच बरोबरीने आमचीही चाळ पाडून तिथे उभे राहणार्‍या टोलेजंग इमारतीची. आमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर त्या आमच्या सख्यावर,ज्याच्या अंगा-खांद्यावर बागडलो त्याच्यावर(काय उपमा देऊ? सुचतही नाही! आज इतक्या वर्षांनी ती आठवण लिहितानाही जीव कासावीस होतोय) चालणार्‍या करवती आणि कु्र्‍हाडी बघून आमच्या मनात विलक्षण कालवाकालव झाली. त्याचे शेवटचे दर्शन घेताना हळूहळू मन पूर्व स्मृतींमध्ये गेले आणि मनाला तो विलक्षण सुगंध पुन्हा सुखावून गेला.भानावर आलो तेव्हा तो वृक्षराज केव्हाच धाराशायी झाला होता.मात्र त्याचा बुंधा म्हणजे आमचे सिंहासन अजूनही शाबूत होते. त्याने मात्र त्या करवती-कुर्‍हाडींनाही दाद दिली नाही. दोन करवतींची पाती तुटली आणि एका कु्र्‍हाडीचा दांडा तुटला तेव्हा त्या लाकूडतोड्यांनी त्याला तसेच ठेवून आपला गाशा गुंडाळला.

पुढे इमारतीचा पाया खणण्याच्या वेळीच तो बुंधा मुळासकट उपटला गेला;पण शेवटपर्यंत लढत राहण्याचा त्याचा तो संदेश आजही मी माझा आदर्श मानतो.

३ टिप्पण्या:

जयश्री म्हणाले...

अरे वा........ तुमच्या बकुळीचा सुगंध अगदी आतपर्यंत पोचला :)

अनामित म्हणाले...

काका मलाही अत्यंत आवडतं हे फुल.... यावेळेस नासिकला बकुळीचा सडा पाहिला , योगायोगाने हातात कॅमेराही होता म्हणून फोटो काढला चटकन!!

Unknown म्हणाले...

Mla pahije ek rupat bakudich kute midel,pl plea sanga.