माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

८ ऑगस्ट, २००७

आठवणी! शालेय जीवनातल्या! ६

सांस्कृतिक कार्यक्रमाच्या तासाला हे मुलांविरुद्ध मुली प्रकरण खूपच तापायचे.मुलींमध्ये बर्‍याच जणी अशा होत्या की त्या चांगल्या गाऊ शकत. मुलांमध्ये मी आणि अजून एकदोन जण गाणारे होते. कधी कधी गाण्याच्या भेंड्या लावल्या जायच्या. त्यात इतकी अटीतटीने लढत व्हायची की काही विचारायची सोय नाही. विनायक आणि मोहिनी ह्या दोघांचे आवाज खणखणीत होते मात्र त्या दोघांना गाण्याचे अंग नव्हते. तरीदेखील ते ती कसर श्लोक,आर्या,ओव्या वगैरे म्हणून भरून काढत. दोघांचे पाठांतर इतके जबरदस्त होते की आमची गाणी राहायची बाजूला आणि त्या दोघातच जुगलबंदी चालायची आणि कुणीही त्यात हार जात नसे.तास संपेपर्यंत हा धुमाकूळ चालत असे.

वर्गात मला शिक्षकांसकट सगळेजण 'बाप्पा' म्हणायचे(देवबाप्पा चे लघुरूप).पहिल्या पहिल्यांदा मला ह्याचा राग येत असे. पण हळूहळू ते पचनी पडायला लागले. तरीही जमेल तिथे आणि जमेल तसे मी प्रत्युत्तर देत असे. मी देखिल इतरांना नावे ठेवण्यात मागे नसे.कुलकर्णी नावाच्या मुलाला सगळेजण 'अप्पा' म्हणत.अर्थात हे नाव मीच ठेवले आणि सगळ्यांना ते आवडले(कुलकर्णी सोडून). तेव्हा आमची अप्पा-बाप्पाची जुगलबंदी लागत असे. त्याने मला बाप्पा म्हटले की त्याला अप्पा म्हणायचे हे ठरलेले होते. त्यामुळे तो चिडायचा आणि मला मारायला धावायचा. तो माझ्यापेक्षा चांगलाच उंच आणि दणकट होता. त्यामुळे मी सहज त्याच्या हातात सापडायचो आणि मला मार पडायचा. पण मी त्याला अप्पा म्हणणे सोडले नाही.एकदा मला कुणीतरी एक म्हण सांगितली आणि ती मलाही खूप आवडली. मग मी त्याचा प्रयोग अप्पावरच केला आणि अप्पा एकदम गारच झाला. ती म्हण आता सगळ्यांनाच माहीत असेल.
"सोनार,शिंपी,कुलकर्णी अप्पा,त्यांची संगत नको रे बाप्पा!"
आधी तो रागावला पण मग त्याच्या लक्षात आले की माझ्यात शारीरिक ताकत नसली तरी माझी मौखिक ताकत प्रचंड आहे आणि त्यात तो कमी पडत असे. म्हणून मग त्याने माझ्याशी दोस्ती करायला सुरुवात केली आणि अशी ही आमची अप्पा-बाप्पाची जी जोडी जमली ती आजतागायत टिकून आहे.

ह्या अप्पाच्या घरी मी जात असे तेव्हा त्याच्या घरातील सगळेजण माझ्याकडे अगदी कुतूहलाने पाहत असत. कारण?सांगतो. अप्पाच्या घरात सगळेच उंच होते. मी तर त्याच्या लहान बहिणींहूनही बुटका होतो त्याचीही त्यांना खूप गंमत वाटत असे.पहिल्यांदाच मी जेव्हा त्याच्या घरी गेलो होतो तेव्हा माझ्या बुटकेपणावर त्यांचे बरेच हसून झाले. मग अप्पाने त्याच्या आईला जेव्हा सांगितले की मी गातो तेव्हा त्याच्या आईने मला लगेच आपल्या जवळ बसवून घेतले आणि गाणं म्हणायला सांगितले. मीही आढेवेढे न घेता एक भावगीत गाऊन दाखवले तेव्हा ती माझ्यावर विलक्षण खूश झाली आणि तिने माझ्या हातावर खाऊ दिला.

माती सांगे कुंभाराला,पायी मज तुडविशी
तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायाशी

असे ते गीत होते. सुप्रसिद्ध संगीतकार आणि गायक श्री. गोविंद पोवळे ह्यांनी गाऊन गाजवलेले ते भावगीत माझ्या तोंडून ऐकताना अप्पाची आई आणि घरातील इतर इतके तल्लीन झाले होते की माझे गाणे संपल्यावर क्षणभर सगळे नि:स्तब्ध बसून होते. ते शब्द आणि ती चाल एकमेकांना इतके अनुरूप आहेत की कुणाही श्रोत्याची अशीच अवस्था त्या गाण्यामुळे होत असे.त्या दिवसापासून मी त्यांच्या घरातलाच एक झालो. मग त्या माउलीला नेहमीच मी गाणे म्हणून खूश करत असे.हल्लीच अप्पाच्या घरी गेलो होतो तेव्हा ही आठवण निघाली.
त्याची आई नेहमी त्याला माझ्याबद्दल विचारत असे, " अरे कसा आहे तो देवबाप्पा? अजून तसाच बुटका आहे काय रे? आणि गाणी म्हणतो का अजून?"
अप्पा हसून उत्तर देत असे, " अगं आता तो पूर्वीचा बुटका बाप्पा राहिला नाही. बराच उंच झाला आहे आणि त्याचे केसही पिकलेत आता. हल्ली गाणी म्हणतो की नाही माहीत नाही पण म्हणत असावा.तो भेटला ना की मी सांगेन हं त्याला."
हे सगळे मला सांगताना त्याचा स्वर गहिवरला होता. साहजिकच होते ते कारण आज ती माउली ह्या जगात नाही. हे ऐकून मलाही वाईट वाटले.
तिला माझ्या तोंडून पुन्हा तेच "माती सांगे कुंभाराला" ऐकायचे होते.
कुणाचा जीव कशात गुंतून पडेल काही सांगता येत नाही हेच खरे.

क्रमश:

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: