माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

१ ऑगस्ट, २००७

आठवणी! शालेय जीवनातल्या!४

वक्तृत्व स्पर्धेनंतर घेण्यात आलेल्या गीतगायन स्पर्धेतही मी भाग घेतलेला होता. त्या स्पर्धेतही ज्या लोकांनी भाग घेतला होता त्यांनी नेहमीची सगळ्यांना माहीत असलेली नामांकित गायक-गायिकांनी गायलेली गाणी गायली. मी मात्र एक अगदी कुणालाच माहीत नसलेले बालगीत गायले. त्या गीताला चालही मीच दिली होती. ती चाल तशी साधीच होती;पण हे गीत गाताना मी दोन कडव्यांच्या मध्ये तोंडानेच वाद्यसंगीत वाजवत असे. त्यामुळे त्या गाण्याचा श्रोत्यांवर एक वेगळाच परिणाम झाला. ते गीतही फार गमतीशीर होते.

अशी कशी बाई ही गंमत झाली
फराळाची ताटली चालू लागली॥धृ॥
कुशीवर झोपून लाडू कंटाळला
टुणकन ताटलीच्या बाहेर आला
गड गड गड गड गोलांटी रंगली ॥१॥
असे बरेचसे काही गमतीशीर वर्णन पुढे होते.आता ते पुढचे सगळे विस्मरणात गेले. पण ह्या गाण्याने लहानथोर सर्व श्रोत्यांना मनसोक्त हसवले,डोलवले.एकूण सगळ्यांनाच ते गीत आवडले. हे गीत कुणी रचलेले होते हे काही मला आजतागायत माहीत नाही. मात्र ते माझ्यापर्यंत आले ते आमच्या वाडीत पाहुणे म्हणून आलेल्या एका लहान मुलीकडून. तिने ते गाणे आम्हा सर्व सवंगड्यांना म्हणून दाखवले आणि मला ते इतके आवडले की मी ते लगेच लिहून घेतले आणि त्याला चाल लावली.

त्यानंतर निबंध स्पर्धा झाली. निबंधाचा विषय अर्थातच टिळक आणि त्यांचे कार्य ह्या संबंधी होता आणि तो आधीच जाहीर करण्यात आलेला होता. तेव्हा त्याचीही तयारी सगळे घरूनच करून आलेले होते. माझ्यासाठी हा निबंधही माझ्या मोठ्या बहिणीनेच लिहून दिलेला होता आणि मी तो तोंडपाठ करून आलो होतो. तसाच्या तसा मी माझ्या(सुवाच्य पण वळणदार नव्हे) हस्ता़क्षरात लिहिला.

संध्याकाळी सर्व स्पर्धांचा निकाल घोषित झाला. त्यात माझ्या गटात मला मी भाग घेतलेल्या पठण,वक्तृत्व,गीतगायन आणि निबंध ह्या चारही स्पर्धांमध्ये पहिला क्रमांक मिळालेला होता. हे कळताच माझ्या मित्र मंडळींनी शाबासकी देण्याच्या निमित्ताने माझी पाठ बुकलून काढली. मी एका दिवसात ’शाळेतला सगळ्यात हुशार विद्यार्थी’ म्हणून प्रसिद्ध झालो. सर्व शिक्षकांनी माझे विशेष कौतुक केले. अर्थात ह्या मध्ये वक्तृत्व आणि निबंध स्पर्धेतले यश हे निव्वळ माझ्या पाठांतराचे नसून ते माझ्या बहिणीच्या कसदार लेखणीचे होते हे मी कसे विसरू. मला एरवी निबंधामध्ये दहापैकी साडेतीन अथवा चार गुणच मिळत असत आणि इथे स्पर्धेत चक्क पहिला क्रमांक!काहीतरीच! वक्तृत्व स्पर्धेतल्या माझ्या गोष्टीच्या वेगळेपणाचे श्रेयही तिचेच होते. नाहीतर मी देखिल त्या शेंगा-टरफलं,शुद्ध लेखन(संत,सन्त,सन् त(हा शब्द इथे लिहिता येत नाहीये)) वगैरेमध्येच अडकलो असतो. असो. त्या दिवशी मोठ्या जोश्यातच मी घरी आलो.

दुसर्‍या दिवशी म्हणजे १ऑगस्ट रोजी बक्षीस समारंभाच्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार आणि साप्ताहिक मार्मिकचे संपादक श्रीयुत बाळ ठाकरे(त्यावेळी ’बाळ’म्हणुनच ओळखले जात. बाळ चे बाळासाहेब व्हायला अजून बरीच वर्षे जायची होती. त्यावेळेला शिवसेनेचा जन्मही झालेला नव्हता.).चार वेळा बक्षीस घ्यायला मी त्यांच्यासमोर गेलो तेव्हा न राहवून ते म्हणाले, " अरे ह्याने एकट्यानेच भाग घेतला होता काय स्पर्धेत?"
मी गीता-पठणाचे बक्षीस घ्यायला गेलो तेव्हाची त्यांची प्रतिक्रिया अतिशय मार्मिक होती. माझ्या ’देव’ ह्या आडनावाचा त्यांनी मोठ्या खुबीने असा संबंध जोडला.
बाळ ठाकरे म्हणाले, "संस्कृत ही तर देववाणी म्हणजे देवांचीच भाषा. तेव्हा ह्या ’देवाला’ गीता पठणात पहिले बक्षीस मिळाले त्यात नवल ते काय?" ह्यावर श्रोत्यांमध्ये खसखस पिकली.
असाच प्रसंग दुसर्‍या ’गोरे’ नामक मुलाच्या बाबतीत घडला.आदल्या वर्षीच्या वार्षिक परीक्षेत त्याला इंग्लिश विषयात त्याच्या इयत्तेत सर्वाधिक गुण मिळालेले होते. तेव्हा त्याला त्याचे बक्षीस देतानाही ते म्हणाले, "इंग्लिश ही बोलून चालून गोर्‍यांचीच भाषा! तेव्हा इंग्लिश मधले पहिले पारितोषिक ह्या ’गोरे’ला मिळणे स्वाभाविकच आहे. त्यांच्या ह्या कोटीलाही हशा आणि टाळ्यांनी श्रोत्यांनी दिलखुलास दाद दिली.

मित्रहो ती चारही बक्षिसे घेऊन नाचत नाचत मी घरी आलो. प्रथेप्रमाणे ते सगळे देवासमोर ठेवले,त्याला नमस्कार केला आणि गीता पठणाचे बक्षीस जरा जाडजूड वाटत होते म्हणून सर्वप्रथम तेच उघडले. त्यातल्या पुस्तकावरचे चित्र बघून खूश झालो. लेखकाचे(साने गुरुजी) नाव पाहून अजून खूश झालो. त्या पुस्तकाचे नाव होते गीता-हृदय. चला साने गुरुजींनी लिहिलेल्या छान गोष्टी वाचायला मिळणार ह्या आनंदात मी पुस्तक उघडून आत पाहिले तो काय? पुन्हा गीता?म्हणजे भगवद्गीता हो. अहो तुरुंगात असताना विनोबा भाव्यांनी कैद्यांसमोर केलेले गीतेचे निरूपण साने गुरुजींनी स्वत:च्या शब्दात उतरवून काढलेले होते. मी डोक्याला हात लावला. पुन्हा गीतेने माझा पोपट केला होता.

मी असा हतोत्साहित होऊन बसलेलो असताना माझ्या भावाने दुसरे बक्षीस उघडून बघितले आणि तो आनंदाने ओरडला. "अरे हे बघ काय! मस्तपैकी गोष्टीचे पुस्तक! सॅम्सन आणि दलायला!"मी पटकन त्याच्या हातून ते पुस्तक हिसकावून घेऊन बघितले तर त्यावरच्या सुंदरशा रंगीबेरंगी मुखपृष्ठाने मी एकदम खूश झालो आणि मग घरभर नाचत सुटलो.राहिलेली दोन बक्षिसे काय आहेत हे बघण्याची तसदी न घेता सरळ ओट्यावर जाऊन पुस्तक वाचायला सुरुवात केली.ती दोन बक्षिसे नंतर उघडली तेव्हा त्यातही छोटी गोष्टींची पुस्तके होती.त्याक्षणी त्या गोष्टीच्या पुस्तकांची कमाई ही मला जगातल्या सर्वात अनमोल अशा खजिन्यापेक्षाही मोलाची वाटत होती.

मित्रहो ही बक्षिसे कमी होती म्हणूनच की काय मला त्याच वर्षी(टिळक पुण्यतिथीनिमित्तच) स्थानिक वाचनालयात आणि ब्राह्मण सभेत झालेल्या दोन वेगवेगळ्या वक्तृत्व स्पर्धेतही पहिल्या क्रमांकाची पारितोषिके मिळाली. ’घबाडयोग’ म्हणतात तो हाच असावा बहुधा. वाचनालयातर्फे मला मिळालेले बक्षीस तर मी कधी स्वप्नातही इच्छिलेले नव्हते.ते बक्षीस म्हणजे एक चामड्याचे सुबक असे पेटीसारखे दफ़्तर होते. त्याकाळी अतिश्रीमंत मुलेच ते वापरत असत. आम्ही निम्नस्तर मध्यमवर्गीय कापडाच्या पिशव्यांच दफ़्तर म्हणून वापरत असू(ती तसली दफ़्तरे आम्हाला अप्राप्यच होती). ते बक्षीस पाहून तर माझा आनंद गगनात मावेना. माझ्या वर्गातीलच नव्हे तर समस्त शाळेतील(काही गर्भ श्रीमंत मुले सोडून)मुलांनी त्या दफ़्तराचे आणि माझेही भरभरून कौतुक केले. ते दफ़्तर मी चांगले नववी पर्यंत वापरले. पायात चपला असायच्या-नसायच्या,गणवेशही सामान्य दर्जाच्या कापडांचा आणि खांद्यावर हे महागडे आणि सुंदर दफ़्तर असा सगळा विजोड मामला होता.पण ते माझ्या गावीही नव्हते.
ब्राह्मण सभेकडून मिळालेले बक्षीस होते एक पैसे साठवण्याची पेटी(सेविंग बँक-पिगी बँक). तीही अतिशय रंगीबेरंगी होती. त्या पेटीत पाच रुपए घालून बक्षीस म्हणून दिल्यामुळे त्याचेही मोल माझ्यासाठी खूपच होते. अर्थात आजवर कधी आम्हा मुलांना स्वतंत्रपणे खर्चायला एक पैसाही दिला गेलेला नसल्यामुळे पुढे त्या पेटीत कसलीच भर पडली नाही. घरात कमावणारा एक आणि खाणारी तोंडे सात! त्यामुळे बचत वगैरेसाठी तर सोडा पण महिन्याची दोन टोके जुळवणे कठीण होऊन बसे. मात्र माझ्या आई-वडिलांचे आहे त्यात समाधान मानण्याचे धोरण असल्यामुळे आम्हाला जे मिळत होते तेही खूप वाटत होते.त्यामुळे त्या पेटीत पैसे टाकण्यासाठी मी कधी हट्ट केला नाही.

अशा तर्‍हेने माझे हे इयत्ता सहावीचे वर्ष अतिशय संस्मरणीय ठरले.

क्रमश:

1 टिप्पणी:

vivek म्हणाले...

फारच सुंदर लिखाण देव साहेब. चारही लेखांबद्दल संयुक्त प्रतिक्रिया इथेच देतो.

आज टिळक पुण्यतिथि. तुमचं लिखाण वाचून शाळेतल्या त्या तद्दन "पकाव" भाषणांची आठवण झाली. खरंच त्या शेंगा टरफलांनी वात आणला होता. त्यामुळेच तुमच्यासारखं एखादं "हटके" भाषण झालं तर त्याला बक्षिस मिळायलाच पाहिजे. एकंदरीत तुम्ही शालेय जीवनात शाळेला बक्षिसांच्या रुपात भरपूर "लुटलेलं" दिसतंय.

शाळेतल्या त्या भाषणांची सुरुवात सुद्धा "मित्रांनो, आज मी तुम्हाला XXXX बद्दल दोन शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतपणे ....." अशा एकसुरी वळणाची का असायची याचं कुतुहल वाटतं.

या एकसुरी भाषणांवरुन अजून एक गोष्ट आठवली. एक काळ असा होता की शाळेच्या गायन स्पर्धेत "केशवा-माधवा" आणि "देहाची तिजोरी" या गाण्यांनी भयंकर उच्छाद मांडला होता. (पुढे रेल्वेमधल्या भिकार्‍यांनी या दोन्ही गाण्यांचा प्रोफाईल अजून खाली आणला) खरंतर त्या वयातल्या मुलांना पालकांनी किंवा शिक्षकांनी वेगळं काहीतरी करण्यासाठी मार्गदर्शन करणं आवश्यक आहे.

तुम्ही गाता हे माहित होतं पण तुम्ही चाल देखील लावू शकता हे आजच कळलं. ऎकवा की एकदा तुमची चाल.

शाळेत असताना हस्ताक्षर स्पर्धेत मात्र मी हटकून भाग घ्यायचो आणि पहिलं बक्षिसही मिळवायचो. (आत्ताचं माझं अक्षर पाहिलंत तर तुमचा यावर विश्वास बसणार नाही कदाचित). बक्षिसही ठरलेलं असायचं. (आमच्या शाळेने बहुतेक घाऊक बाजारातून याची खरेदी टनाच्या हिशेबात केली असावी) ते म्हणजे चक्क २ फुटी पेन्सिल. एका टोकाचा वापर लिहिण्यासाठी आणि दुसर्‍या टोकाला असायचा एक "पंजा". त्यामुळे त्याचा उपयोग लिहिण्याऎवजी पाठ खाजवण्यासाठीच जास्त व्हायचा. खरं म्हणजे पेन्सिलीचा उपयोग लिखाणाची खाज भागवण्यासाठी व्हायला पाहिजे नाही कां ? असो.

(ता. क. :तुमच्या शालेय जीवनात भलतीच "गीता" तुम्हाला छळत होती असं दिसतंय. असतं एकेकाचं नशीब :-)

येऊ देत अजून आठवणी. पुढील लिखाणासाठी शुभेच्छा