माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

१८ जानेवारी, २०१२

मायबोली शीर्षक -गीत आणि मी!

२०११च्या मायबोली गणेशोत्सवात मायबोली शीर्षक-गीत लेखनाची स्पर्धा घेतली गेली.ह्या स्पर्धेतील विजेत्या गीताचे अधिकृतरित्या शीर्षक-गीत बनवण्याचे मायबोलीच्या व्यवस्थापनाने ठरवले. गीत निवड समितीत सहभागी एक सदस्य योग उर्फ योगेश जोशी ह्याने ह्या स्पर्धेत यशस्वी ठरणार्‍या गीताला स्वरसाज चढवण्याची तयारी दर्शवली.. त्यानंतर उल्हास भिडे ह्यांच्या ’भाषा मराठमोळी, हर अंतरी फुलावी ... ह्या गीताची निवड झाली आणि मग आधी ठरल्याप्रमाणे त्या गीताला संगीतबद्ध करण्याची कारवाई योगेशने सुरु केली.

हे गीत सर्वस्वी मायबोलीचेच वाटावे म्हणून योगशने अशी कल्पना मांडली की ह्या गीतगायनासाठी प्रथितयश किंवा नामांकित कलाकार न घेता मायबोलीच्या सदस्यांमधूनच गायक/गायिका म्हणून निवड करावी आणि मायबोली व्यवस्थापनाने ती कल्पना मान्य केली. अर्थात ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नव्हती; पण सर्व मायबोलीकरांचा ह्या गोष्टीला सक्रिय पाठिंबा मिळेल ह्याबाबत योगेशला जणू खात्री असावी. गणेशोत्सवाच्या निमित्ताने माझी योगेशशी ओळख झालेलीच होती. तेव्हा साहजिकच मुंबईत असे कुणी मायबोलीकर गायक-गायिका आहेत का अशी त्याने माझ्याकडे विचारणा केली...मायबोली गणेशोत्सवाच्या वेळी मी काही गीतांना चाली देऊन ती काही लोकांकडून गाऊन घेतली होती...इतकीच खरं तर माझी मायबोलीवरची कामगिरी होती..त्यामुळे मला तसे फारसे मायबोलीकर ओळखत नव्हतेच...वर्षाविहार २०११ला हजेरी लावल्यामुळे त्यातल्या त्यात काही मुंबईकर/पुणेकर माबोकरांशी जुजबी म्हणता येईल अशी ओळख झालेली होती...त्या आधारावर मी काही जणांशी ह्याबाबत संपर्क साधून विचारणा केली पण दूर्दैवाने त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.ही गोष्ट मी योगेशच्या कानावर घातली.

खरं तर अशा गोष्टीसाठी मायबोलीवरूनच जाहीर आवाहन करावं असं माझ्या मनात आलं होतं...तसं मी योगेशला सुचवावं असंही मला वाटत होतं...पण मी ते सुचवण्याआधीच मायबोली व्यवस्थापनाने तसे जाहीर आवाहनही केले...आणि मग देशविदेशातल्या मायबोलीकरांनी त्याची दखल घेऊन त्यात जी कलाकार मंडळी होती त्यांनी ह्या प्रकल्पात भाग घेण्याची जाहीर इच्छा प्रदर्शित केली...हुश्श! चला, आपल्याला कुणी दाद दिली नाही तरी आता बरीच मंडळी स्वत:हून पुढे आलेत तेव्हा आता हे कार्य व्यवस्थित मार्गी लागेल हे नक्की...आता मायबोली, योगेश आणि ते कलाकार काय ते जाणोत...आपण आपल्या विश्वात रमूया..असा विचार करून मी स्वस्थचित्त झालो.

अहो पण ते कसं शक्य होतं? मला योगेशचा निरोप आला...काका, तुम्हालाही मी ह्यात गायक म्हणून गृहित धरतोय आणि मुख्य म्हणजे मुंबईतल्या कलाकारांना एकत्र जमवण्याची कामगिरी मी तुमच्यावर सोपवतोय..चालेल ना? विषय माझा आवडीचा असल्यामुळे त्यात न चालण्यासारखे काहीच नव्हते...बाकी आजवर कधीही वाद्यांच्या साथीने, तालासुरात गायलेलो नसल्याने मी गायक म्हणून कितपत चालून जाईन ह्याची मलाच खात्री नव्हती..तसे मी योगेशला बोलूनही दाखवले...त्यावर..ते माझ्यावर सोपवा...असे त्याने म्हटले आणि मग मी सगळा भार त्याच्यावर टाकून निश्चिंत झालो.

मुंबईतल्या ज्या मंडळींनी नावं दिली होती त्यापैकी भुंगा (मिलिंद पाध्ये) ह्याला मी वविपासूनच ओळखायला लागलो होतो...दुसरी रैना..मायबोलीच्या गणेशोत्सव २०११मध्ये तिने माझी एक चाल गायलेली होती म्हणून तिला ओळखत होतो..गऊ २०११मध्ये माझी दुसरी एक चाल गाणारी अगो(अश्विनी)..तिची आई म्हणून अनिताताईंबद्दल ऐकून होतो...अशा तिघांशी संपर्क साधून त्यांना एकत्रितपणे एका ठिकाणी जमवून योगेशने तयार केलेली संगीतरचना सगळ्यांनी मिळून गाण्याचा सराव करणे ही कामगिरी माझ्याकडे सोपवण्यात आली...त्याप्रमाणे आमची पहिली बैठक माझ्याच घरी झाली...दिनांक १५ऑक्टोबर २०११रोजी!
IMG_1152.jpg
योगेश, अनिताताई, रैना आणि भुंगा

ह्या बैठकीला स्वत: योगेशही हजर होताच...आमची सराव बैठक छानच झाली....त्यानंतरची दुसरी सराव बैठक अनिताताईंच्या घरी झाली..त्या बैठकीला मी, योगेश, भुंगा, रैना, अनिताताई आणि माबो शीर्षकगीताचे रचयिता श्री उल्हास भिडेही हजर होते...ही बैठकही उत्तम झाली....दिनांक २४ऑक्टोबर २०११रोजी!
त्यानंतर प्रत्यक्ष ध्वनीमुद्रणासाठी वाकोला-सांताक्रुझच्या इम्पॅक्ट स्टुडिओत २ नोव्हेंबर २०११ रोजी आम्ही जेव्हा एकत्र जमलो तेव्हा त्यात अजून एक छोटा कलाकार सहभागी झाला होता...सृजन पळसकर...अमोल पळसकरचा मुलगा. ध्वनीमुद्रणाआधीही आम्ही सगळ्यांनी पुन्हा एकत्र सराव करून घेतला आणि त्यानिमित्ताने नरडी साफ करून घेतली...त्यानंतर मग आम्हा सगळ्यांच्या आवाजात दोन ओळी समुहगायनाच्या रूपात ध्वनीमुद्रित करून घेतल्या गेल्या... मग रैना,सृजन आणि अनिताताईंच्या आवाजात वैयक्तिकपणे संपूर्ण गाण्याचे ध्वनीमुद्रण करण्यात आले...तोवर त्यादिवशीची वेळ संपली होती...मी आणि भुंगा बाकी राहिलो होतो.

DSC07648.JPG
ध्वनीमुद्रण प्रमुख नदीम

IMG_1190_0.jpg
संगीतकार योगेश,संगीतसंयोजक प्रशांत लळित आणि ध्वनीमुद्रण प्रमुख नदीम तांत्रिक चर्चा करतांना...उल्हासजी आणि भुंगा उत्सुकतेने ऐकताहेत.

त्यानंतर पुन्हा एकदा ध्वनीमुद्रणासाठी स्टुडिओ उपलब्ध झाल्यावर मी, भुंगा आणि स्वत: योगेश ह्यांच्या आवाजात वैयक्तिकपणे पूर्ण गाण्याचे ध्वनीमुद्रण करण्यात आले...माझ्या आयुष्यातील अशा तर्‍हेचा हा पहिलाच अनुभव
असूनही मला स्वत:ला त्याबद्दलचे कोणतेही दडपण जाणवले नाही...मात्र त्याच वेळी आपण जे काही गाणार आहोत ते तालाच्या बंधनात गायचंय हे दडपण मात्र सतत होतं...त्याचा परिणाम म्हणजे माझं गाणं तालात व्यवस्थितरित्या बसलं...पण त्याच वेळी शब्दातल्या भावना मात्र मी नेमकेपणे व्यक्त करू शकलो नाही...गाणं एकूण सपाट झालं होतं.
त्यानंतर पुण्याच्या कलाकारांचं ध्वनीमुद्रण ठरलं...मला आणि भुंग्याला अजून एक संधी मिळाली..ध्वनीमुद्रणाची. मी योगेश आणि भुंगा असे तिघेही दिनांक १८ नोव्हेंबर २०११रोजी भुंग्याच्याच गाडीतून सकाळी दहाच्या सुमारास पुणेमुक्कामी पोहोचलो..तिथे स्मिता पटवर्धनच्या घरी सगळे जमणार होते...तिथे आमच्या आधीच विवेक देसाई,सई कोडोलीकर आणि पद्मजा जोशी असे तिघेजण हजर होतेच..स्मिताला मात्र कामावर जावं लागलं होतं...त्यानंतर इथे पुन्हा आम्ही सगळ्यांनी गाण्याचा वैयक्तिकपणे आणि एकत्रपणे सराव केला....त्यानंतर जेवण झालं..थोडा वेळ विश्रांती घेतली आणि मग ध्वनीमुद्रणासाठी जाण्याआधी स्मिता आली होती..तिचा सराव करून घेऊन आम्ही निघालो...प्रत्यक्ष ध्वनीमुद्रणासाठी एरंडवणे येथील ’साऊंड आयडियाज’ स्टुडिओत.

IMG_1252.jpg
योगेश,सई, पद्मजा, विवेक देसाई आणि भुंगा

IMG_1254.jpg
जेवणाची वाट पाहात आहेत...पद्मजा,सई,गिरीराज, योगेश, भुंगा,विशाल कुलकर्णी आणि विवेक(गिरीराज आणि विशाल आम्हाला खास भेटायला आले होते)

IMG_1280.jpg
ध्वनीमुद्रण प्रमुख जयदीप

इथेही आधी काही विशिष्ठ ओळी सामुहिक रुपात गाऊन ध्वनीमुद्रित केल्या गेल्या...त्यानंतर स्मिता, पद्मजा, सई, विवेक, भुंगा, स्वत: योगेश आणि शेवटी मी...अशा क्रमाने प्रत्येकाच्या आवाजात काही विशिष्ठ ओळी ध्वनीमुद्रित केल्या गेल्या...ध्वनीमुद्रण संपेस्तोवर रात्रीचे साडेबारा झाले होते...तशाही स्थितीत पुणेकरांचा निरोप घेऊन मी, योगेश आणि भुंगा मुंबईला निघालो...भुंग्याने आजची गाण्याची संधी अतिशय उत्तम रितीने साधलेली होती ह्यात तीळमात्र शंका नव्हतीच...पण त्याने इतक्या अपरात्रीही मुंबईपर्यंतचे सारथ्यही अतिशय कुशलतेने केले हे त्याहूनही विशेष म्हणावे लागेल... आधी योगेशला त्याच्या ठाण्याच्या घरी आणि नंतर मला...माझ्या घरी मालाडला सोडून...ह्यावेळी १९ नोव्हेंबर २०११चे पहाटेचे साडेपाच वाजले होते..... मगच भुंगा त्याच्या घरी गोरेगांवला पोचला.

हा झाला गीतासंबंधीचा छोटेखानी वृत्तांत...ज्याच्याशी मी प्रत्यक्षपणे निगडित होतो... आता ह्यातून मला काय फायदा झाला त्याबद्दल थोडेसे....
मी एक हौशी गायक आणि किंचित ’चाल’क आहे हीच माझी आजवरची खरी ओळख ...त्यामुळे आजवर कधीही सूर-ताल वगैरेचा फारसा विचार गांभीर्याने न करताच गात आलेलो आहे,चाली लावत आलोय .. त्यातूनही ताल तर अगदीच बेताल म्हणावा इतका माझ्याशी फटकून वागणारा...अशा परिस्थितीत संगीतकार योगेशने ह्या गीतगायनात मला सहभागी करून घेणे हेच खरे तर आधी माझ्यासाठी मोठे आश्चर्य होते आणि म्हणूनच नंतर ती एक मोठी जबाबदारी होऊन बसली...त्याचा परिणाम म्हणून मग त्याने पाठवलेले नमुना गीत मी हजारो वेळा ऐकलं आणि त्यामुळेच की काय मी ते गीत बर्‍याच प्रमाणात आत्मसात करू शकलो...मी इथे दोन गोष्टी नमूद करू इच्छितो..१)ह्या संपूर्ण गीतामध्ये माझ्या वैयक्तिक आवाजातली किमान अर्धी ओळ जरी समाविष्ट झालेली असेल तर ते माझ्या दृष्टीने खूप मोठे इनाम ठरेल.
२) ह्या गीत गायनाच्या निमित्ताने माझ्यातला तालाबाबतचा बराचसा (अजून पूर्णपणे म्हणता येणार नाही) न्युनगंड दूर झालाय असे मी म्हणेन...आणि त्याचे संपूर्ण श्रेय मी योगेशलाच देईन...त्याने मला ह्यात गायनाची संधी दिली नसती तर कदाचित असा बदल माझ्यात घडलाही नसता....म्हणूनच माबो शीर्षकगीतामुळे झालेला हा माझा सर्वोच्च फायदा आहे असे मी मानतो.

मायबोली शीर्षकगीताची झलक पहा: पूर्ण गीत लवकरच ऐकायला मिळेल..तोवर ह्यावर समाधान माना.


झलक मधील गाय़कः

१. मायबोली आलापः भुंगा (मिलिंद पाध्ये)
२. धृवपदः अनिताताई (अनिता आठवले), योग (योगेश जोशी)
३. समूहः मुंबई, पुणे, दुबई येथिल सर्व गायक
संपूर्ण श्रेयनामावली:
मुंबई: रैना (मुग्धा कारंजेकर), अनिताताई, प्रमोद देव, भुंगा, सृजन (सृजन पळसकर- मायबोलीकर युगंधर व भानू यांचा मुलगा)
पुणे: विवेक देसाई, सई (सई कोडोलीकर), पद्मजा_जो (पद्मजा जोशी), स्मिता गद्रे, अंबर (अंबर कर्वे), सायबर मिहीर (मिहीर देशपांडे)
दुबई (सं. अरब अमिराती): देविका आणि कौशल केंभावी (मायबोलीकर श्यामली ची मुले), सारिका (सौ. योग), दीया (योग व सारिकाची मुलगी), वर्षा नायर, योग
कुवेतः जयावी- जयश्री अंबासकर
ईंग्लंडः अगो (अश्विनी गोरे)
अमेरिका: पेशवा, अनिलभाई
ऑडियो व्हिज्युअल टीम - आरती खोपकर (अवल), नंदन कुलकर्णी (नंद्या), हिमांशु कुलकर्णी (हिम्सकूल) आणि आरती रानडे (RAR)

९ टिप्पण्या:

Suhas Diwakar Zele म्हणाले...

व्वा व्वा... अप्रतिम झालंय गीत.

आवडलं :)

प्रमोद देव म्हणाले...

धन्यवाद सुहास!

विशाल विजय कुलकर्णी म्हणाले...

अभिनंदन काका ! सुरेख आणि महत्वाचे म्हणजे सुरेल झालेय गीत !!
अवांतर : रच्याक पहिल्या फ़ोटोत ताटात ते काय आहे? सगळं मिलिंदानेच संपवलं की काय? :P

प्रमोद देव म्हणाले...

विशाल, अरे त्या मी आणलेल्या मस्तपैकी आणि खुसखुशीत अशा कचोर्‍या होत्या...त्याच्याबरोबरोबरच योगेशने आणलेला खास तिकडचा मेवा होता आणि रैनाने आणलेली काजूकतली देखील होती. :P

गाणारी आमची तोंडं अधूनमधून त्यासाठीही चालतच होती. :)

sanket म्हणाले...

व्वा व्व्वा व्वा !! अगदी सुरेख गीत जमलेय.. आवडलं हो ! :) लवकरच पूर्ण गीत येऊ द्या.

प्रमोद देव म्हणाले...

संकेत,अरे मीही त्या पूर्ण गीताची प्रतीक्षा करतोय...मलाही नक्की माहीत नाहीये...माझा एकट्याचा आवाज त्यात नेमका किती ऐकायला मिळणार आहे .

D D म्हणाले...

अभिनंदन!
लवकरच पूर्ण गीत येऊ द्या.

चैताली आहेर. म्हणाले...

mastach ha kaka..... abhinanadan...!
geet pan chhanach.. :)

प्रमोद देव म्हणाले...

धन्यवाद डीडी आणि चैताली.