जुलै १९८७ मध्ये मी नवी दिल्लीला जायला निघालो. ह्याआधी मी दिल्ली पाहिलेली असल्यामुळे मला नवीन असे काहीच नव्हते...तरीही नवी दिल्ली स्टेशनवर माझा एक ’अलग’ नावाचा सरदारजी मित्र त्याची मोपेड घेऊन हजर होता. त्या काळातही त्याची ती मोपेड जुनी-पुराणी वाटत होती...पण त्याच्या दृष्टीने ती इंपालापेक्षाही भारी होती.
नवी दिल्लीला उतरल्यावर पाहिले तर सरदारजी माझी वाटच पाहात होता. मला पाहताच तो चटकन पुढे धावला आणि माझ्या हातातली छोटी प्रवासी बॅग त्याने आपल्या हातात घेतली आणि म्हणाला...बाकीका सामान किधर है?
मी म्हणालो...बस,इतनाही है.
तो वेड्यासारखा माझ्याकडे पाहात राहिला. ..अबे,इतने सामानसे कैसे करेगा तू गुजारा?
मी म्हटल...मुझे आदत है.
है क्या इसमें?..त्याचा प्रतिप्रश्न.
दो पॅंट,तीन टी-शर्ट,दो लुंगी और बनियन,अंडरवेयर,रुमाल,टुवाल वगैरे सभी जरूरी कपडे...मी.
दोन क्षण तो माझ्याकडे वेड्यासारखा पाहात राहिला आणि म्हणाला...बस्स!इतनेही कपडे? अरे इतने कपडे तो मैं रोज बदलता हूँ! कमालका आदमी हो तुम. और बेडिंग किधर है? या जमिनपर ही सोयेगा?
मी त्याला माझी छोटेखानी वळकटी दाखवली. ती पाहून तो जोरजोरात हसायला लागला.
तू तो सचमूच पागल दिखता है रे. क्या है इसमे?
सतरंजी,एक रजई और दो चादर...मी
साले,यहांके भिखारीके पास भी जादा चीजे होगी. ये दिल्ली है. यहां सर्दीके मोसममें कैसे दिन निकालेगा तू इतने कम कपडेमें और ऐसे बिस्तरसे? मर जायेगा ठंडसे.
मैं इधर जादा दिन नही रुकनेवाला हूँ,कुछ दिनोंमेही वापस जाऊंगा.
अबे,तू ट्रान्सफरपे आया है या टूरपे?
मै आया तो हूँ ट्रान्सफरपेही...मगर इसको टूरमें बदल दूंगा.
माझा तो एकंदर आविर्भाव पाहून त्याने एकवार जोरदार हसून घेतले आणि मग म्हणाला...चल,जो तू ठीक समझे. मग आम्ही दोघे बाहेर आलो. स्टेशनच्या त्या आवारात असंख्य दुचाकी आणि चारचाकी पार्क केलेल्या होत्या. त्यातल्या सर्वात जुनाट अशा त्या ’इंपाला’कडे निर्देश करत तो खुशीत बोलला...ये है मेरी गड्डी. हवाके साथ बाते करती है...चल, बैठ जा पीछे.
अरे,लेकिन इसपे मेरा सामान कहाँ रक्खूँ?
त्याने क्षणाचाही विचार न करता माझी वळकटी त्याच्या पायाशी आडवी ठेवली आणि त्यावर माझी छोटेखानी बॅग...आणि म्हणाला ...चल अभी बैठ.
मी आज्ञाधारकपणे त्याच्या मागे बसलो आणि इंपाला सुसाट निघाली.
रस्त्यात अधून-मधून प्रेक्षणीय स्थळं दिसत होती. ;) अशा वेळी सरदारजीची मान डाव्या उजव्या बाजूला जितकी फिरवता येईल तितकी फिरत असायची. वर...ओहो.क्या कुडी है,क्या माल है...देख,देख,दिल्लीका माल देख ...
अशा वेळी मला ही भिती असायची की...हा उगाच कुठे तरी गाडी ठोकायचा....म्हणून मी त्याला म्हणत असे..अरे बाबा,जरा आगे देखके गाडी चलाओ ना....कही अपघात हो जायेगा.
त्यावर त्याचे उत्तर...डरो मत पुत्तर,मै गये १०सालसे गड्डी चला रहा हूँ....आजतक कभी अॅक्सिडंट नही हुवा...और गड्डी चलाते चलाते इस ट्रॅफिकमें यही तो है टाईमपास...पेण**.... आपल्याकडे ’भ’काराने सुरु होणार्या शिव्या तिथे ’प’ ने सुरु होतात. गाडी चालवता चालवता सरदारजीचे चक्षूचोदन(हा त्याचाच शब्द) सुरु होते आणि त्याच वेळी जोरजोरात त्याचे धावते(अक्षरश:..गाडी धावत असल्याने)वर्णनही अखंडपणे सुरु होते.
मग मी त्याच्याकडे दूर्लक्ष केले आणि आजुबाजूचा परिचित परिसर पाहू लागलो.
दिल्लीचे रस्ते चांगले प्रशस्त आहेत आणि त्याच बरोबर पदपथही प्रशस्त आहेत. रस्त्यापासून साधारण फूट-दीडफूट उंचावर हे पदपथ आहेत. पण गम्मत म्हणजे ह्या पदपथावरून चालणारा पादचारी अभावानेच आढळतो. सगळी दिल्ली रस्त्यावरून वाहात असते. स्वत:ची दुचाकी...सायकल,मोपेड,स्कुटर,मोटरसायकल.चारचाकी मोटरगाडी,तीनचाकी ऑटो-रिक्षा,डीटीसीच्या बसेस,खाजगी बसेस आणि टांगे....टांगे एका विशिष्ट परिसरातच चालतात....पण एकूण दिल्लीकर हा नेहमी कोणत्या ना कोणत्या वाहनानेच प्रवास करत असतो.
शेवटी एकदाची आमची इंपाला आमच्या कार्यालयाच्या आवारात पोचली आणि मी सुटकेचा नि:श्वास टाकला. हातीपायी धड पोचलो ह्यातच सर्व आले म्हणून सरदारजीचे आभारही मानले. सगळं सामान घेऊन आम्ही दोघांनी कार्यालयात प्रवेश केला. काही जुने मित्र स्वागताला उभे होतेच...मग गळामिठी झाली...चहापाणी झाले.
मित्र आपापल्या कामाला निघून गेले. मी तिथल्या प्रमुख साहेबांची भेट घेतली...योगायोगाने हे साहेब मुंबईत चार वर्ष राहून गेलेले होते. त्यांचे माझे संबंधही उत्तम होते त्यामुळे त्यांनीही माझे सहर्ष स्वागत केले. काय हवे नको, दिल्लीत राहण्याची काय व्यवस्था आहे...इत्यादि चौकशी केली. पुन्हा एकदा चहापाणी झाले.
मुंबईहून काही महिन्यांपूर्वी एकजण दिल्लीत बदलीवर आला होता तो मराठी मित्रही भेटला....तुझ्या राहण्याची काही व्यवस्था नसेल तर तू माझ्याबरोबर राहू शकतोस...मी एकटाच राहतोय...वगैरे सांगून माझ्या तिथल्या वास्तव्याची चिंता दूर केली.
मी इथे राहायला आलेलो नाहीये...काही दिवसात परत जायचेच आहे...तेव्हा असेल तशा परिस्थितीत दिवस ढकलू...असा मनाशी विचार करून मी त्याच्याबरोबर राहायची तयारी दर्शवली.
नवी दिल्लीपासून दूर उत्तर प्रदेशच्या हद्दीतील एका नव्याने उदयास येणार्या त्या वसाहतीचे नाव होते..नोएडा.
संध्याकाळी, रामदास...हे त्या मराठी मित्राचे नाव....रामदासबरोबर नोएडाला जाण्यासाठी डीटीसीच्या बसथांब्यावर आलो...आणि जाणवली ती तिथली प्रचंड गर्दी. त्या ठिकाणी जवळपास दहा-बारा वेगवगळ्या ठिकाणी जाण्यासाठीच्या बसेसचे क्रमांक दिसत होते...त्यापैकी फक्त एकच बस आमच्यासाठी होती. बसथांब्यावर बसची वाट पाहणारे लोक अस्ताव्यस्तपणे कसेही उभे होते. कुठेही रांग वगैरे असला प्रकार नव्हता. येणार्या बसेसही खचाखच भरलेल्या होत्या...आणखी एक गोष्ट म्हणजे मुंबईत जशा बस थांब्यावर थांबतात...प्रवासी चढतात उतरतात...असला प्रकार इथे नव्हता. बसेस थांब्यावर थांबत नसत...फक्त त्यांचा वेग कमी होत असे...त्या स्थितीतच लोक चढायचे उतरायचे.
हे सगळे पाहिल्यावर ...माझ्या सामानासकट ह्या असल्या गर्दीत आणि तेही न थांबणार्या बसमध्ये कसे चढायचे?....हा प्रश्न मला सतावत होता. सकाळी सरदारजीच्या हसण्याला कारणीभूत ठरलेले ते माझे किरकोळ सामानही आता मला खूप भारी वाटू लागले.
बसेस येत होत्या आणि जात होत्या..गर्दी कमी झाल्यासारखी वाटतेय न वाटतेय तोवर अजून नव्याने गर्दी जमा होत होती. संध्याकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री ९ वाजेपर्यंत आम्ही बसथांब्यावर नुसते उभेच होतो...ह्या अवधीत नोएडाला जाणार्या ज्या काही पाचसहा बसेस आलेल्या त्या आधीच प्रचंड भरून आलेल्या होत्या...त्यामुळे त्यात प्रवेश करणंच कठीण होतं. शिवाय नोएडा तिथून इतकं दूर होतं की ऑटोरिक्षानेही जाणे परवडण्यासारखे नव्हते...ह्यात अजून एक तिढा होता. दिल्ली आणि नोएडाच्या मध्ये यमुना नदी लागते...त्यांना सांधण्यासाठी तिथे एक मोठा सेतू बांधलेला आहे...तर दिल्लीतून जाणार्या रिक्षा फक्त ह्या सेतूच्या दिल्लीच्या बाजूपर्यंतच जाऊ शकत होत्या..पुढे जाण्यासाठी तो सेतू पायी चालून जाऊन पुढे नोएडात शिरून तिथल्या स्थानिक रिक्षांचा आसरा घ्यावा लागत होता...त्यामुळे हे प्रकरण सर्वार्थाने भारी होते....तेव्हा बससाठी वाट पाहण्याव्यतिरिक्त दुसरा पर्यायच नव्हता.
रात्रीचे नऊ वाजले तरी आम्ही तिथेच ठाणबंद होतो...आता नोएडाला जाणारी एकच बस...शेवटची ९.३० ची होती...ती सुटली तर मग नाईलाजाने पुन्हा कार्यालयात जावे लागणार होते. रामदासने इतका वेळ माझ्यासाठी कसाबसा धीर धरला होता...तो म्हणाला...हे बघ देव, आता ह्या बसमध्ये नाही शिरू शकलो तर रात्रभर इथेच राहावे लागेल नाहीतर पुन्हा कार्यालयात जावे लागेल. मी आता काहीही करून ह्या बसमध्ये घुसणार आहे...तुही कंबर कसून तयार राहा...तुझी वळकटी दे माझ्याकडे...मी आधी घुसतो..तू माझी पाठ सोडू नकोस...घुसायचं म्हणजे घुसायचं...काय?
मी म्हटलं...रामदास..तू म्हणतोस तसे करूया...नाहीतरी मलाही असे तीन तास उभे राहून कंटाळा आलाय...आता शेंडी तुटो वा पारंबी तुटो...घुसायचं म्हणजे घुसायचं...तु हो पुढे...मी कसेही करून तुझ्यामागे येतोच....
माझे बोलणे ऐकून रामदासही सुखावला...हा रामदास म्हणजे चांगला पहेलवान गडी होता...त्यामुळे मला त्याच्या क्षमतेबद्दल अजिबात शंका नव्हती...आज तो केवळ माझ्यासाठी इथे ताबडला गेला होता...एरवी पहिल्याच बसने तो कधीच निघून जाऊ शकला असता...केवळ माझ्या सोयिसाठी तो आत्तापर्यंत शांत राहिलेला होता.
दूरून बस येतांना दिसली आणि रामदासने मला सावधान केले. खरे तर बस भरलेलीच होती..पण आता विचार करायला फुरसत नव्हती....हरहर महादेव...करत रामदासने धडक मारली..मीही त्याच्यामागे..सगळा जीव एकवटून बसचा दांडा पकडला...बस तशी वेगातच होती...जेमतेम एक पाय पायरीवर आणि दुसरा पाय बाहेर..अशा अवस्थेत काही सेकंद गेले..आणि तेवढ्यात मागून एक जबरदस्त धक्का आला...आणि मी आपोआप आत ढकलला गेलो.... कसेबसे मागे वळून पाहिले...एक उभाआडवा पंजाबी...बसच्या दारात आरामात हवा खात उभा होता...मी मनातल्या मनात त्याचे आभार मानले...
शेवटी एकदाचे रात्री साडेदहाला नोएडाला...रामदासच्या खोलीवर पोचलो...हुश्श. गेल्या गेल्या मी तिथे जमिनीवर आडवा पडलो आणि चक्क झोपी गेलो.
मला कुणीतरी उठवत होते...डोळे उघडायला तयार नव्हते...मात्र कानांना ऐकू येत होते....अरे देव, उठ. हातपाय धू. मी मस्तपैकी पिठलं भात बनवलाय, तो खाऊन घे आणि मग निवांतपणे झोप.
मी कसाबसा उठलो,हातपाय धुतले...आणि त्याच्याबरोबर जेवायला बसलो....रामदासने खरंच खूप चविष्ठ असे पीठलं बनवलं होतं....
२ टिप्पण्या:
छान सुरु आहे...लवकर येऊ द्या पुढचं.
धन्यवाद जयश्री.
टिप्पणी पोस्ट करा