माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२१ मार्च, २००८

बालपणीचा काळ सुखाचा! ८

त्या कत्तलीनंतरची पहिली सकाळ ही अपार उजेड घेऊन आली. गोंधळलात ना! मी असा वेड्यासारखा अर्थहीन काय बोलतोय असेही वाटले असेल तुम्हाला. अहो असे व्हायचेच. माझेही तसेच झाले. कारण एरवी जो लख्ख सूर्यप्रकाश आमच्या पर्यंत पोचायला सकाळचे ७-७.३० वाजायचे तोच आज सकाळी ६च्या सुमारास दिसू लागला. सुर्यकिरणांच्या वाटेत येणारे, ते गर्द पानेफुले आणि फळांनी लगडलेले वृक्ष, आता त्यांची वाट अडवायला नव्हते.त्यामुळे मी जेव्हा अंथरुणातून उठलो तेव्हाच जाणवले की आजचा दिवस काही वेगळाच दिसतोय.सूर्यप्रकाश इतका प्रखर होता की क्षणभर डोळे दिपून गेले. हळूहळू त्या प्रकाशाचीही मग सवय झाली.
असेच दिवस जात होते. आम्ही लावलेल्या बर्‍याचशा फांद्यांनी मान टाकलेली होती.एक तर मुळे नसलेल्या आणि निर्दयपणे कापल्या गेलेल्या त्या फांद्या जगल्या असत्या तरच नवल वाटले असते.मात्र आमचे श्रम अगदीच काही फुकट गेलेले नव्हते.
पानं सुकलेल्या अवस्थेतही, घरटी निदान एखादं दुसर्‍या फांद्यांमध्ये अजूनही हिरवटपणा दिसत होता.आशेला जागा होती आणि हीच मोठी सुखकारक गोष्ट वाटत होती. मालकांची बाग असताना आमच्या कुणाच्याही दारात स्वत:चे असे कोणतेही रोप अथवा झाड नव्हते त्यामुळे झाडे जगण्यासाठी,खरे तर जगवण्यासाठी काय करावे लागते हे आम्हा कोणालाच माहीत नव्हते. त्यामुळे जे होईल ते निसर्गावर सोपवून आम्ही निर्धास्त होतो.

आठवडाभरात उरली सुरली झाडे(फांद्या) देखिल पार सुकून गेली.होळी जवळ आलेली त्यामुळे वातावरणात इतका उकाडा निर्माण झाला होता की झाडाला घातलेले पाणी पाचच मिनिटात दिसेनासे होऊन तिथली जमीन कोरडी ठणठणीत दिसायला लागायची. अशा अवस्थेत एका सकाळी मला अतिशय उत्साहवर्धक असा अनुभव आला. घराच्या बाहेर, ओट्यावर नेहमीप्रमाणे मी दात घासत बसलो होतो. आजूबाजूचे निरीक्षण करत असताना नजर एके ठिकाणी स्थिरावली. मातीत रोवलेल्या निष्पर्ण अशा एका काडीवर मला एक हिरवा ठिपका दिसला. आधी काय असावे ते कळले नाही पण मग नीट निरखून पाहिले आणि मला अक्षरश: अत्यानंद झाला. मी नाचत नाचत घरात गेलो आणि सगळ्यांना बळेच बाहेर घेऊन आलो. ते दृश्य पाहिल्यावर सगळेच खूश झाले पण.... ती काडी म्हणा अथवा खुंट म्हणा कोणत्या झाडाचा असावा ह्याबद्दल काहीच अंदाज येत नव्हता. कोणते बरे झाड असावे? सगळ्यांना हाच प्रश्न पडला होता आणि त्याचे उत्तर मिळायला अजून काही दिवस वाट पाहावी लागणार होती.
त्याचाही उलगडा पुढच्या काही दिवसात झाला. मंडळी ती होती मोगर्‍याची काडी, हे त्याला फुटलेल्या पालवीवरून समजले आणि माझ्या दारात लावलेल्या त्या मोगर्‍याच्या काडीला अतिशय लोभस अशी पालवी फुटलेली पाहून नकळत मला ज्ञानेश्वरांच्या 'मोगरा फुलला,मोगरा फुलला!' ह्या ओळी आठवल्या. आता कुठेशी नुसती पालवी फुटलेली असताना मी 'मोगरा फुलला' असे का समजत होतो? कारण मलाही माहीत नाही पण आपल्या हातांनी रोवलेल्या फांद्यांमधील मोगर्‍याची फांदी सर्वप्रथम रुजावी ही भविष्यकाळातील सुगंधाची जणू नांदी असावी असेच मला वाटले होते त्यामुळे मी स्वत:वरच खूप खूश होतो.
आणि मंडळी पुढे जणू वसंतोत्सव सुरू झाला असावा अशा तर्‍हेने हळूहळू प्रत्येकाच्या दारात मृतप्राय वाटणार्‍या त्या खुंटांना एकामागून एक पालवी फुटायला लागली ते पाहिल्यावर तर मला बालकवींची(त्यांचीच ना?) 'मरणात खरोखर जग जगते' ही काव्यपंक्ती आठवली.

सिंध्याने झाडं तोडणी झाल्यावर इमारतीच्या बांधकामाला जलदगतीने सुरुवात केली. सुरुवातीलाच आठदहा कामाठ्यांची कुटुंबे तिथे वसतीला आली त्यांनी काही तासातच त्यांच्यासाठी तिथे पाचसहा झोपड्या उभ्या केल्या.जागेची मोजणी मापणी झाली. त्यावर चुन्याने रेषा आखल्या गेल्या आणि एक दिवस मुहूर्तासाठी वाडीतील यच्चयावत सगळ्या लोकांना आमंत्रण दिले गेले. तो सिंधी आपल्या बायका-मुलांसह प्रत्येकाच्या घरी जाऊन आग्रहाचे आमंत्रण देऊन गेला. झाले गेले विसरून बहुतेकांनी हजेरी लावली. पुजा वगैरे आटोपल्यावर जमिनीवर नारळ फोडला गेला आणि सिंध्याने जमिनीत पहिली कुदळ मारली. खान-पान झाल्यानंतर समारंभ संपला. पुढच्याच पाच सहा दिवसात पुरुषभर उंचीचे ८-१० खड्डे खणून झाले.त्यात पाणी लागले. मग ते काढण्यासाठी मोटारी लावल्या. अशा सगळ्या धबडग्यात होळी आली. होळीसाठी दोन दिवस काम बंद ठेवलेले. बागेशिवायची ही आमची पहिली होळी. आम्हा मुलांना होळीच्या वेळी आजवर लाकूडफाटा,सुकलेला पाला-पाचोळा पुरवणारी बाग ह्या वेळी नव्हती ह्याची जाणीव झाली आणि पुन्हा एकदा मन विषण्ण झाले. पण ती कसर आम्ही सिंध्याने बांधकामासाठी आणलेले बांबू,फळ्या वगैरे पळवून भरून काढली. होळी नेहमी प्रमाणे दणक्यात साजरी केली.


ह्या होळीला आम्हाला अजून एक नवा अनुभव मिळाला. तो म्हणजे त्या कामाठ्यांनी काढलेली सोंगे. कुणी राम,तर कुणी सीता,कुणी हनुमान अशी सोंगे धारण करून ते सगळे वाडीभर फिरत होते. लोक जे काही पैसा,धान्य देत ते आनंदाने घेत घेत पुढे जात होते. त्यांच्या मागून आम्ही सगळी वाडीतली बाळगोपाळ मंडळी त्यांची वानरसेना बनून चालत होतो. ढोलकीच्या तालावर त्यांच्या बरोबर आम्हीही नाचत होतो.ते लोक त्यांच्या भाषेत काही गाणीही म्हणत होते,नाचत होते. आम्हाला भाषा जरी कळत नव्हती तरी गाण्याची उडती चाल आणि त्याबरोबरचा ढोलकीचा ठेका आम्हालाही नाचायला प्रवृत्त करत होता. खूपच धमाल केली त्या दिवशी. त्यानंतर किती तरी दिवस आम्ही ती गाणी वाट्टेल ते शब्द घालून म्हणत नाचत असू.
त्या कामाठ्यांचा मुकादम 'बागाण्णा' आम्हा बालगोपालांवर खूप खूश होता. आम्ही त्याच्याशी आमच्या भाषेत बोलायचो आणि तो त्याच्या भाषेत.कुणाचा कुणाला पत्ता नाही. मग काय? खाणाखुणा करून बोलायचो. तीच तर खरी गंमत होती.संवाद साधण्यासाठी भाषेची आडकाठी असते असे निदान आम्हाला तरी त्याक्षणी जाणवले नाही.

दुसर्‍या दिवशीची धूळवडही दणक्यात झाली. आतापर्यंत आम्ही एकमेकांना मातीत लोळवून ती साजरी करायचो; पण ह्या वेळी आम्हाला आयते खणलेले आणि पाण्याने भरलेले खड्डे मिळाले होते. मग एकेकाला त्यात ढकलून देण्यातला आनंद अनुभवण्यात वेगळीच मजा आली. शेवटी शेवटी तर सगळेच खड्ड्यात! अशी परिस्थिती निर्माण झाली. मग काय विचारता? कुणी कुणाची तंगडी खेचतोय,तर कुणी कोणाला पाण्यात बुडवतोय असले आसुरी आनंद मिळवणारे खेळ सुरू झाले. बरं त्यातून बाहेर पडावे तर खड्डे खोल असल्यामुळे वर चढण्यासाठी शिडी शिवाय तरणोपाय नव्हता. पण ती आणणार कोण?
इतक्यात एकाने दुसर्‍याचा हात इतक्या जोरात धरून खेचला की तो खाली पडला आणि त्याच्या नाका-तोंडात पाणी गेले आणि तो घाबराघुबरा झाला. हे पाहून दुसरा जोरजोरात आरडाओरड करायला लागला. मग काय? बागाण्णा तिथे धावत आला त्याने ते पाहिले मात्र,धावत जाऊन त्याने शिडी आणली आणि मग तिच्या साहाय्याने एकेक करून सगळे बाहेर पडले. पण एकजण शिडीने बाहेर यायला तयार नव्हता. त्याने बागाण्णाकडे हात मागितला. नाईलाज म्हणून बागाण्णाने खाली वाकून त्याला हात देऊन वर ओढण्याचा प्रयत्न केला पण त्या व्रात्य मुलाने बागाण्णालाच खाली खेचले आणि चिखलात लोळवले. बागाण्णा खाली पडताच लगेच तो मुलगा शिडीने झरझर वर आला आणि इतर हसणार्‍या मुलांच्यात सामील झाला.
सगळ्यांना वाटले की आता बागाण्णा त्याला पकडून मारणार म्हणून सगळे जरा दूर जाऊन उभे राहिले. तो ही मनोमन घाबरलेला होता. पण...
नखशिखांत चिखलाने माखलेला बागाण्णा शिडी चढून वर आला आणि हसत हसत विहिरीकडे गेला. विहिरीतून पाणी काढून त्याने स्वतःवर ओतून घेतले,अंगावरचा चिखल धुऊन काढला आणि कुणावरही न रागावता तडक आपल्या झोपडीत निघून गेला. बागाण्णाच्या वर्तनाने अचंबित झालेला तो ही त्याच्या मागोमाग गेला. थोड्याच वेळात त्याला घेऊन बागाण्णा विहिरीकडे गेला आणि विहिरीतून पाणी काढून त्याने त्याला यथेच्छ न्हाऊ घातले. हे पाहून इतरही मुले पुढे सरसावली. बागाण्णाने त्यांनाही असेच न्हाऊ घातले आणि मग बागाण्णाचा जयघोष करत सगळेजण आपापल्या घरी निघून गेले.
तो व्रात्य मुलगा कोण होता हे तुम्ही ओळखले असेलच.

४ टिप्पण्या:

दीपिका जोशी 'संध्या' म्हणाले...

वाह....मस्त धमाल होळी खेळत होतात की...काय त्या आठवणीच राहतात शेवटी...पण कौतुक आहे की बरोबर वेळ साधून होळीच्याच दिवशी ही आठवण आम्हांसमोर ठेवणे..मान गए..
आणि हो समजले बरं का...तो व्रात्य मुलगा कोण होता... :-)

Yogesh म्हणाले...

sahi. nehamipramanech uttam.

अनामित म्हणाले...

pramodkaka,

khupach masta watay wachayla. lawakar yeu dya pudhche bhag.

अनामित म्हणाले...

वा काका,मस्त,दोन्ही भाग उत्तम.