माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२२ मार्च, २००८

चाळीस वर्षांनंतर पुन्हा एकदा!

मी सद्या ज्या इमारतीत राहतोय तिथे येऊन मला जेमतेम चारच वर्षे झालीत.मात्र ह्या इमारतीत गेली कैक वर्षे राहिलेली कुटुंबे एकमेकांना फारशी ओळखतही नाहीत ह्याची जाणीव झाली आणि ठरवले की ह्यावर काही तरी तोडगा काढायलाच हवा. ह्या वर्षी मी आमच्या इमारतीच्या कार्यकरिणीचा नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून सुत्र हाती घेतली. माझ्याप्रमाणेच नवनिर्वाचित सचिव आणि खजिनदार अशा आम्ही तिघांनी मिळून आमच्या इमारतीतील सर्व कुटुंबियांचे एक स्नेहसंमेलन कार्यकारिणीच्याच खर्चाने २६ जानेवारी २००८ रोजी आयोजित करण्याची घोषणा केली. सर्वांनी त्याला अनुमोदनही दिले आणि "कोई आनेवाला नही"(ह्या ठिकाणी मी एकमेव मराठी माणूस आहे;बाकी सगळे गुजराथी) अशी वर प्रतिक्रिया देखिल व्यक्त केली. आम्ही तिघांनी त्यामुळे खट्टू न होता जोमाने तयारी सुरु केली. जसजसा तो दिवस जवळ येऊ लागला तसतसे लोक आपणहून पुढे यायला लागले आणि सांगायला आनंद वाटतो की समारंभ अगदी झोकात साजरा झाला. झाडून सगळी लहानथोर मंडळी त्या दिवशी प्रथमच इमारतीच्या खाली घातलेल्या मंडपात जमा झाली. खेळ खेळली. जेवली, लोकांनी एकमेकांशी ओळखी करून घेतल्या . आम्हा तिघांचे पुन:पुन्हा अभिनंदन करून असेच समारंभ वरचेवर व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली गेली.
लगेचच येणार्‍या होळीला असाच काही कार्यक्रम करावा अशी काही तरूण मंडळींनी गळ घातली आणि त्यासाठी स्वत:हून रुपये ३००० तिथल्या तिथे जमा करून खजिनदारांकडे सूपूर्त केले. होळीच्या दिवशी असे काही आयोजन असू नये असे माझे वैयक्तिक मत मी व्यक्त केले आणि इतर दोघेजणही माझ्याशी सहमत दिसले. मात्र होळी साजरी करायची असेल तर त्याबाबतचा पुढाकार तरूणांनीच घ्यावा असे मी आवाहन केले.मी स्वत: मात्र सहभागी होऊ शकणार नाही पण इतरांनी तो आनंद जरूर लुटावा असेही सांगितले.त्या वेळेस सगळ्यांनी त्याला मान्यता दिली आणि नंतर आम्ही आमच्या रोजच्या धबडग्यात हे विसरूनही गेलो.

आज दिनांक २२ मार्च २००८. सकाळची साडेनऊची वेळ. दाराची घंटी वाजली. मी दरवाजा उघडून पाहिले तर आमचे तरूण मंडळ हातात रंगांच्या पुड्या घेऊन मला आवाहन करायला आलेल्या.
"अंकल,(हल्ली काका का म्हणत नाहीत कुणास ठाऊक) अंकल आईये ना होली खेलने!"
"मी रंग खेळत नाही त्यामुळे मी त्यात भाग घेणार नाही. तुम्ही तुमचा आनंद आपापसात साजरा करा ." असे मी त्यांना म्हटले. काही वर्षांपूर्वीच माझ्या दोन्ही डोळ्यांवर मोतिबिंदुची शस्त्रक्रिया झालेली असल्यामुळे तर मी साधा गुलालही लावून घेत नाही.
पण त्यांचा आग्रह मला मोडवला नाही म्हणून "फक्त टिळा लावणार असाल तरच दरवाजा उघडतो" असे म्हटले. त्यांनी ते मान्य केले आणि मी बाहेर पडलो. कबूल केल्याप्रमाणे त्या पाच सहा जणांनी मला टिळा लावला आणि ते निघून गेले. मी त्यांचा आणि त्यांनी माझा मान राखल्यामुळे दोघेही खुश झालो.
दहा एक मिनिटाने पुन्हा घंटी वाजली. त्या मागोमाग आवाजही आला "प्रमोदभाय! आओ! दरवाजा खोलो!"
जाऊन पाहतो तो आमचे सचिव रमेशभाई आणि खजिनदार हिरेनभाई मला बोलवायला आले होते. स्वत: ते नखशिखान्त रंगलेले होतेच.
मी पुन्हा माझी डोळ्यांची अडचण सांगितली. त्यावर त्यांनीही समजूतदारपणे "आपको हम रंग नही लगायेंगे.खाली टिका लगायेंगे. लेकीन आप हमारे साथ नीचे आईये. आप नही आयेंगे तो मजा नही आयेगी!" असे म्हटल्यावर माझा नाईलाज झाला आणि मग मीही त्यांच्याबरोबर मैदानात उतरलो.
खाली गेलो तर बायका,मुले,पुरूष सगळे हजर होते.कुणीही ओळखू येणार नाही असे एकेकाचे चेहरे आणि कपडे रंगलेले होते. एकमेकांवर रंग आणि पाणी उडवण्याची स्पर्धा चाललेली होती. कुणी स्वखुशीने तर कुणी नाईलाजाने आपापले चेहरे रंगवून घेत होते. माझ्या तिथे जाण्यामुळे त्यांना "नवा बकरा" सापडल्याच्या आनंदात काही जण आले मात्र माझी परिस्थिती कळल्यावर मग रंग चेहर्‍याला नाही तर मग अंगावर उडवला तर चालेल असे मानून(माझीही त्याला हरकत नव्हती) रंगांची उधळण करून मलाही रंगवले. काही जणांनी(मला विचारून) अंगावर पाणीही उडवले. मी मात्र कुणालाच रंगवले नाही. रंगवण्यापेक्षा रंगण्यात म्हणा किंवा रंगवून घेण्यात मला जास्त आनंद वाटतो. मी त्या सगळ्यांसोबत तास-दीड तास तिथे उभा राहिलो आणि मग घरी परतलो.

मंडळी आता तुम्ही म्हणाल, "ह्या! ह्यात काय विशेष असे सांगण्यासारखे आहे? आम्ही तर दरवर्षी हा आनंद मुक्तपणे अनुभवत असतो!"
खरं आहे तुमचे. म्हटले तर विशेष नाहीच आहे.पण...
मी माझी शालांत परीक्षा १९६८ साली पास झालो. त्यावर्षी मी जी धुळवड साजरी केली होती त्यानंतर आज बरोबर चाळीस वर्षांनी धुळवड साजरी केली.तीही दुसर्‍यांच्या आग्रहाखातर आणि आनंदाखातर! मधल्या काळात ती साजरी न करण्याच्या मागे म्हटले तर कोणतेही संयुक्तिक कारण माझ्याकडे नाहीये. नंतर वापरात आलेले ऑईल-पेंट, रासायनिक रंग वगैरे अशी कारणे आहेत. नाही असे नाही. पण दुसरे कोणतेही कारण मला तरी दिसत नाही. माझा हट्टी स्वभाव(नाही म्हणजे नाही; अजिबात नाही) हे कदाचित त्याचे कारण असू शकेल.
पण आज इतक्या वर्षांनंतर कुणाच्या तरी विनंतीला मान दिल्यामुळे त्यांना झालेला आनंद आणि त्या आनंदात माझेही काही क्षण आनंदात गेले असे मला वाटले आणि ह्यात आपलीही सोबत असावी म्हणून हा लेखन प्रपंच.

वय वाढले की हट्टीपणा कमी होतो की वाढतो? हा मात्र एक संशोधनाचा विषय ठरावा.

४ टिप्पण्या:

दीपिका जोशी 'संध्या' म्हणाले...

वॉव वॉव....मस्तच एकदम...नजरेसमोर चित्र उभं केलत की एकदम...रंग खेळल्याचे...खूप आवडले..सोसायटीज मधे खूपदा असे दर्शनास येते जे चूक आहे हे निदर्शनास आणून द्यायला प्रमोद देवांसारखे लोक असतील तर समाजात लोक जवळ निश्चित येतील... :)

vivek म्हणाले...

प्रमोदजी

तुमच्यातला हा बदल खूपच स्वागतार्ह आहे. तत्वांना चिकटून राहून त्याप्रमाणे वागताना फक्त आपला "इगो" सुखावला जातो बरेचदा. पण त्याचबरोबर आपण काही आनंदाच्या क्षणांना देखील मुकत असतो किंवा इतरांना मुकवत असतो. काही वेळेला आपण तत्व बाजूला ठेवली तर त्यातून इतरांना आनंद मिळू शकतो याची जाणीव तुम्हाला होळीच्या निमित्ताने झाली हे छान. आता मात्र हे पुढे कधीही विसरु नका. मी स्वत: काही तत्वं बाळगून त्यांना चिकटून रहाणारा प्राणी आहे, पण आपली तत्वं काळानुसार बदलली पाहिजेत किंवा काही काळ इतरांच्या आनंदासाठी शिथिल करायला हरकत नाही असं माझंही मत झालंय.

vivek म्हणाले...

तुमच्या प्रश्नाला माझं उत्तर (माझ्या बालबुध्दीप्रमाणे)

वय वाढलं की काही जुने हट्ट वाढतात, काही नवीन हट्ट चालू होतात आणि काही हट्ट कमी होतात (किंवा सोडून द्यावे लागतात) :-) बालहट्टांप्रमाणेच या हट्टांच्या मागेही काही लॉजिक नसतं (स्वत:ची परिक्षा बघण्याव्यतिरिक्त). त्यातून आनंदापेक्षा त्रासच जास्त होतो. आपल्याला आणि इतरांनाही. या हट्टांचं एक वैशिष्ट्य असं की कित्येकदा आपल्याला देखील "कशाला करतोय आपण इतका अट्टाहास" अशी जाणीव होते. पण हट्टी स्वभाव परत तिथेच वळायला लावतो. स्वानुभवावरुन सांगतोय.

अनामित म्हणाले...

तुम्ही आपला हट्ट बाजुला सारुन रंग खेळलात आणि सगळ्यांच्या आनंदात सहभागी झालात हे वाचुन फार बरे वाटले. आणि बरोबर ४० वर्षानी हा योग यावा हेही खासच.