माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

१६ मार्च, २००८

बालपणीचा काळ सुखाचा! ७ (कत्तल!)

दादांचे वडील की आजोबा(नक्की माहीत नाही) मामलेदार होते. त्यामुळे आमची वाडी आणि अशाच अनेक वाड्यांचा मिळून एक मोठ्ठा भूभाग.... ज्या सबंध भागाला 'मामलेदार वाडी' असे संबोधत ती त्यांच्या मालकीची होती. प्रचंड अशी जायदाद त्यांनी गोळा केलेली होती. त्यांचे सगळे वारसदार (दादा आणि दादांचे बरेचसे सख्खे, चुलत/मावस वगैरे नातेवाईक) तिथेच आजूबाजूला त्यांच्या त्यांच्या बंगल्यात राहत असत. त्यापैकीच एकाच्या मुलाशी(जो नात्याने दादांचा नातू लागत होता)बेबीचे सूत जुळले. खरे तर बेबी त्याची 'आत्या' लागत होती; पण तो भाचा(की पुतण्या) असला तरी तिच्यापेक्षा वयाने मोठा होता. बेबीच्या हट्टामुळे नाईलाजास्तव तिचे त्याच्याशी लग्न लावावे लागले आणि ह्या धसक्याने दादा जे आजारी पडले ते त्यातून कधीच न उठण्यासाठी. काही महिन्यातच त्यांनी ह्या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने आणि बेबीच्या कृतीने ताई देखिल हवालदिल झाल्या आणि त्याही आजारी पडल्या. त्यांचे ते दरबार भरवणे खूपच कमी झाले. त्या कधी -मधी पडवीत बसलेल्या असल्या तरी आता कुणाशीही बोलत नसत. कुणी त्यांच्या तब्येतीची चौकशी केलीच तर जुजबी बोलून त्याला वाटेला लावत. दिवसभर विमनस्क स्थितीत बसलेल्या आणि शून्यात दृष्टी लावलेल्या ताईंना बघायची कुणालाच सवय नव्हती; पण आता सगळेच चित्र बदललेले होते.

ताईंच्या अशा अवस्थेमुळे त्यांचे कारभारात खास लक्ष लागेना आणि मग हळूहळू त्यांनी सगळा कारभार गुंडाळायला सुरुवात केली.
आधी त्यांनी त्यांच्या जायदादीच्या वाट्यातील ती बाग विकायला काढली जी आम्हा सगळ्यांसाठी एक आकर्षण होते. हा हा म्हणता ती बातमी वाडीभर पसरली आणि लहानथोर अशा सगळ्या वाडी-करांमध्ये एक प्रकारचे नैराश्य आले. ती बाग म्हणजे आमच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग होऊन बसलेली होती. रोज सकाळी उठल्यावर प्रथमत: त्या बागेचे दर्शन घडत असे की ज्यामुळे दिवसभर अतिशय प्रसन्न वाटायचे. डौलात डुलणारे ते उंचच उंच ताडमाड, ते सळसळणारे वड-पिंपळ, फळा-फुलांनी लगडलेली ती सर्व लहान-थोर झाडे, तो जाई-जुईचा सुगंध, रातराणीचा धुंद करणारा सुवास, प्राजक्ताची ती नाजूक आरक्त देठयुक्त सुवासिक फुले... आणि अजून कितीतरी... हे सगळे सगळे आता नष्ट होणार! ह्यापुढे ह्या सगळ्यांशिवाय आपल्याला जगावे लागणार.. ह्या कल्पनेनेच आम्हा सगळ्यांना नैराश्य आले. काही भाडेकरूंनी ताईंना कळकळीची विनंती केली की त्यांनी ती बाग विकू नये म्हणून; पण ताईंना आता पैलतीर खुणावत होते. मागे कुणी वारस नव्हता. एकुलत्या एका मुलीशी संबंध तोडून टाकलेले. मग कुणाच्या जीवावर हे सगळे आता निभवायचे? भाडेकरूंना नकार देताना त्यांच्याही जीवावर आले होते पण दुसरा मार्गच नव्हता. आपण जिवंत आहोत तोवर सगळी निरवा-निरव त्यांना करायची होती. मोठ्या कष्टाने त्यांनी सगळ्यांची विनंती अव्हेरली

ती बाग एका सिंध्याने विकत घेतली होती आणि मग एक दिवस तो सिंधी काही माणसांना घेऊन आला ... ज्यांच्या हातात कुर्‍हाडी,करवती अशी हत्यारे होती आणि मोठ-मोठे दोरखंड होते. आम्हा मुलांत कुतूहल निर्माण झाले की हा काय प्रकार आहे?
आणि जेव्हा सगळा प्रकार लक्षात आला तेव्हा तर आम्ही पार थिजून गेलो होतो. ह्या सिंध्याला तिथे इमारत बांधायची होती आणि म्हणून त्याने इथली सगळी झाडे तोडायला ही सगळी फौज आणलेली होती. इतकी वर्ष ज्यांनी ह्या झाडांची जीवा-भावाने मशागत केली होती ते माळीदादा नि:स्तब्ध होते. माडाच्या झाडावर जेव्हा पहिली कुर्‍हाड पडली तेव्हा त्यांना ते बघवले नाही. मुसमुसत आणि डोळ्याला रुमाल लावत, जडावलेल्या पावलांनी ते तिथून निघून गेले. आम्हा मुलांचीही तीच अवस्था झाली होती.आम्ही हताश होऊन त्या अमानुष हत्या पाहत होतो आणि डोळ्यांतून अखंड धारा पाझरत होत्या.काही जण मुक्त कंठाने रडत होते. मोठ्या माणसांचीही काही वेगळी अवस्था नव्हती. ताईंनी तर त्या दिशेला असलेली खिडकीच बंद करून टाकली. सगळ्या वाडीवर सुतकी कळा पसरली होती.

एक एक वृक्ष धराशायी होताना पाहून काळीज तिळतीळ तुटत होते. फुलझाडे,वेली ह्यांची कत्तल करताना त्या लोकांना फार कष्ट नाही पडले; सटासट होणार्‍या विळ्या-कोयत्यांच्या वाराने त्या नाजूक वेली आणि फुलझाडे निमूटपणे मान टाकत होत्या; पण ते मोठ-मोठे वृक्ष पाडताना मात्र एकेकाचे घामटे निघाले. सतत सात दिवस ही कत्तल चालली होती. आम्ही मुले सकाळी शाळेत जाताना जे काही दिसेल ते डोळे भरून पाहून घेत होतो. शाळेतून घरी आल्यावर काही दिसेल ना दिसेल ह्याची शाश्वती नव्हती. आंबा,चिकू,पेरू सारखी मोठी झाडे तोडताना आधी त्यांच्या फांद्या तोडून टाकल्या जात होत्या. त्या फांद्यांना लागलेल्या छोट्या कैर्‍या,चिकू,पेरू वगैरे जे हाताला लागेल ते आम्ही जमेल तितके तोडून घेत होतो. ती फळे खाण्याच्या लायकीची असोत नसोत. निदान अजून काही दिवस तरी आम्ही त्यांच्या सहवासात अशा तर्‍हेने राहू शकणार होतो... ही भावनाच खूप मोठी होती. फुलझाडे,वेली वगैरेच्या फांद्या जितक्या उचलता आल्या तितक्या सर्व लोकांनी उचलल्या आणि आपापल्या दारात लावल्या. त्यातून काही जगल्या तर निदान तो सहवास आम्हाला हवाहवासा वाटत होता.

२ टिप्पण्या:

दीपिका जोशी 'संध्या' म्हणाले...

खूपच छान..खरे आहे..आपल्या जागेची त्यावरील झाडांची किंमत आपल्यालाच...तो सिंधी काय जाणे...सुंदर शब्दांकन नेहेमीप्रमाणेच...

दीपिका जोशी 'संध्या'

संवादिनी म्हणाले...

chaan....avadala....