ताईंना एकच मुलगी होती.तिचे खरे नाव कधीच कुणाला लक्षात राहिले नाही कारण तिला सगळेच 'बेबी' म्हणत. बेबी माझ्या मोठ्या बहिणीपेक्षाही चार-पाच वर्षांनी मोठी होती. बेबी रंगाने ताईंसारखीच गोरी होती पण दिसायला मात्र सुंदर आणि नाजूक होती. ताईंही कदाचित त्यांच्या तरूणपणात सुंदर असतील, कुणास ठाऊक; पण आम्ही त्यांना पाहत होतो तेव्हापासून मात्र त्या बटबटीतच दिसत होत्या. ताईंचा आवाज पुरुषी आणि जाडा भरडा होता. त्याउलट बेबीचा आवाज अतिशय गोड होताच आणि मुख्य म्हणजे ती स्वभावाने अतिशय सोज्वळ आणि सौम्य होती. त्यामुळे आम्हाला नेहमीच हा प्रश्न पडायचा की बेबी ही ताईंची मुलगी होती तर त्यांच्या दिसण्या-वागण्यात इतका जमीन अस्मानाचा फरक कसा.
ताईंचे 'दादा' म्हणजे नवरा त्यांच्यापेक्षा खूपच वयस्कर होते.पण अंगा-पिंडाने दादा चांगलेच उंच आणि रुंद होते. कचेरीत जातानाचा त्यांचा रुबाब काही औरच होता. शर्ट-पॅंट, त्यावर कोट,पायात बूट, डोक्यावर गोल 'साहेबी हॅट'आणि डोळ्याला चष्मा. त्यावेळी त्यांच्याकडे पाहताना आम्हाला त्यांच्याबद्दल आदरयुक्त भिती वाटत असे. मात्र दादा घरी असताना कमरेला धोतर, अंगात मलमलचा सदरा आणि गळ्यात रुद्राक्षांची माळ ह्या व्यतिरिक्त अंगावर काहीच नसे. ह्या वेशात दादा अगदीच सोज्वळ आणि एखादे संत महंत वाटत. तसेही ते स्वामी समर्थांचे अनुयायी होतेच. त्यांच्या देवघरात स्वामी समर्थांची एक अतिभव्य तसबीर ठेवलेली होती. सुटीच्या दिवशी त्यांची पूजा-अर्चा तासंतास चालायची. घर सगळे धूप-उदबत्तीच्या वासाने भरलेले असायचे.वृत्तीने अतिशय भाविक असे हे दादा क्वचितच कुणाशी बोलत. पण ते बोलत तेव्हा त्यांचा तो 'धीरगंभीर आणि गडगडाटा' सारखा आवाज ऐकताच समोरचा मनुष्य त्यांच्यापुढे अगदी दीनवाणा व्हायचा.मात्र दादा कधी कुणावर रागावलेले मी तरी पाहिले नाही. तो सगळा मक्ता ताईंकडे होता.
अशा ह्या ताई-दादांच्या बंगल्यासमोर दिवाळीत रांगोळी काढायला बेबीला माझ्या बहिणीची मदत लागायची आणि बहिणीचे शेपूट बनून मीही तिथे जायचो. खरे तर ताईंसमोर जायची मला भिती वाटायची पण ताईंचा एकूणच आमच्या बाबतीत चांगला ग्रह असावा असे वाटते. कारण नेहमी त्यांच्या बोलण्यात ते जाणवायचे. कधीही काही संस्कारांचा विषय निघाला की त्या माझ्या आईकडे बोट दाखवीत. म्हणत, "विद्या(माझी बहीण)च्या आईचे संस्कार बघा. सगळी मुले कशी हुशार आहेत(हे जरा जास्तच होते. खरे तर आम्ही कुणीच म्हणावे असे हुशार नव्हतो. पण म्हणतात ना की वासरात.... तशी गत होती.). नेहमी सगळीकडे पुढे असतात.
अर्थात माझी बहीण आमच्या सगळ्या भावंडात हुशार होती हे मान्यच करायला हवे. त्यामुळेही असेल की 'गाड्याबरोबर नळ्याला यात्रा' ह्या न्यायाने आम्ही इतर भावंडेही हुशार ठरत असू. त्यात अजून एक भर म्हणजे बेबी अभ्यासात तशी यथातथाच होती. त्यामुळेही असेल कदाचित माझ्या बहिणीची हुशारी तिच्यापुढे जास्त उठून दिसत असावी. असो. तर एकूण काय तर ताईंच्या लेखी आम्ही सगळे हुशार होतो. त्याचा एक फायदा मला व्हायचा. मला त्यांच्या त्या पडवीतल्या झोपाळ्यावर बसायला मिळायचे. मग ताई माझ्याकडून श्लोक,गाणी वगैरे म्हणवून घेत आणि त्या बदल्यात घसघशीत खाऊही देत. अशावेळचे ताईंचे रूप काही वेगळेच भासे. इतके झाले तरी माझी त्यांच्याबद्दलची भिती मात्र कधीच कमी होत नसे. कारण मधेच कधीतरी त्यांना तिथे कुणीतरी बागेत शिरतेय अशी चाहूल लागायची आणि त्या तिथूनच "थांब! आलो मी!" म्हणायच्या की इथे मी भितीने थरथर कापायला लागायचो. त्यांच्या लक्षात आले की लगेच त्या "अरे तुला नाही" असे म्हणून समजूत घालायचा प्रयत्न करायच्या. पण त्यांचे साधे कुजबुजणेही सहजपणे आल्यागेल्याच्या कानावर पडण्या इतपत मोठ्या आवाजात असल्यामुळे ओरडणे कसे असेल ह्याची कल्पना यावी. मी जात्याच घाबरट असल्यामुळे हळूच तिथून पळता कसे येईल ह्याची संधी शोधायचो.
ताई क्वचितप्रसंगी विनोदही करायच्या.त्यांना हास्य-विनोद वर्ज्य नव्हता. मात्र त्यांचे ते विनोद आणि त्या बरोबरचे त्यांचे ते गडगडाटी राक्षसी हास्य आम्हा पोरांना घाबरवून टाकत असे.त्याची ही एक झलक.
एकदा आम्ही सगळी भावंडं आईवडिलांसोबत भायखळ्याच्या राणिच्या बागेत(आताचे जिजामाता उद्यान)गेलो होतो. दिवसभर तिकडचे सगळे प्राणी-पक्षी बघून,मस्तपैकी खाऊन-पिऊन आणि मजा करून घरी परतलो. वाडीत शिरताक्षणी ताईंचा पहिला प्रश्न आला तोही सणसणत!
"काय? मग आज कुठे जाऊन आली मंडळी?"
त्यांच्या त्या गडगडाटामुळे आम्ही मुलं आई-वडिलांच्या मागे लपलो. पण माझ्या बहिणीने सांगितले(ती ताईंना विशेष घाबरत नसे. कारण बेबीशी मैत्री असल्यामुळे ती बराच वेळ तिथेच असायची)की "आम्ही आज राणीचा बाग बघायला गेलो होतो."
झालं. तिचे बोलणे संपले नाही तोच पुन्हा ताई गडगडाटल्या, "राणीचा बाग, तेथे मोऽऽठे मोऽऽठे वाऽऽऽऽघ!"
आणि स्वत:च स्वत:च्या विनोदावर गडगडाटी हसू लागल्या.
त्यांचे पाहून आम्ही मुलेही नाईलाजाने हसू लागलो आणि संधी साधून तिथून हळूच सटकलो.
२ टिप्पण्या:
अगदी खरे...बालपणीचा काळ हा खरंच सुखाचा असतो...
दीपिका जोशी 'संध्या'
देव साहेब,
बालपणातल्या आठवणी झकास लिहित आहात, या भागातल्याही तितक्याच आवडल्या !!!
टिप्पणी पोस्ट करा