माझ्या ह्या हावरट मित्राचे नाव होते गोपाळ; पण आम्ही त्याला गोप्याच म्हणत असू. तर एकदा अचानकपणे ह्या गोप्याचे आईवडील,गोप्या आणि त्याचा तीनचार वर्षांचा असलेला लहान भाऊ असे सगळे जण संध्याकाळच्या वेळेला आमच्या घरी आले. त्यांच्या येण्याचे प्रयोजन काय असावे हे आधी माहीत नव्हते पण आल्यावर त्याच्या आईने ते(गोप्याची मुंज करायची होती) माझ्या आईला सांगितले. माझी मुंज सामुदायिक पद्धतीने झालेली असल्यामुळे त्यात खर्च खूपच कमी येतो हे त्यांना कुठुनसे कळले होते आणि म्हणून ह्याबद्दलची नेमकी माहिती घेण्यासाठी ते उभयता आपल्या दोन्ही मुलांसह आलेले होते.
मला कळायला लागले त्याच्या आधीपासूनच आमच्या घरात वीज नव्हती त्यामुळे रात्री आम्ही कंदील आणि चिमणीचा वापर करत असू. त्याप्रमाणे स्वयंपाकघरात एक मोठी चिमणी आणि बाहेरच्या खोलीत एक कंदील असा आम्ही वापरत असायचो.
ही मंडळी आल्यानंतर आधी मोठ्यांचा आपापसात एकमेकांची ओळख करून घेण्याचा कार्यक्रम झाला. तशी गोप्याची आई आधी आमच्या घरी एकदा येऊन गेलेली होतीच पण त्याचे वडील आमच्याकडे पहिल्यांदाच येत होते. त्यामुळे ती औपचारिकता उरकल्यावर मग गप्पा सुरू झाल्या. चहा-पाण्याची तयारी करायला आई आणि तिच्याबरोबर गप्पा मारायला गोप्याची आई दोघी स्वयंपाकघरात गेल्या. आमच्या दोघांचे वडील आपापसात गप्पात रंगले. माझे वडील तसे गप्पिष्ट होतेच आणि त्यात गोप्याचे वडीलही तसेच होते. त्यामुळे गप्पा चांगल्याच रंगल्या. गोप्या आणि माझी इतर भावंडे आम्ही ओट्यावर बसून आपापसात शाळेतील गमतीजमतीवर गप्पा हाणायला लागलो.
ह्या सर्वात एकटा पडला तो गोप्याचा लहान भाऊ. तो आमच्यापेक्षा खूपच लहान असल्यामुळे इकडे धाव तिकडे धाव असे करत होता आणि मधनं-मधनं कंदिलाजवळ जाऊन त्याच्या काचेला हात लावायचा प्रयत्न करत होता. आम्हा मुलांपैकीच कोणी तरी मग त्याचे बकोट पकडून त्याला बाहेर घेऊन जात असू.थोड्या थोड्या वेळाने हे घडत होते. त्याचे वडील हे सगळे बघत असूनही अतिशय शांत होते पण माझ्या वडिलांच्या मनात भिती होती की एखादे वेळेस त्याने खरोखरच त्या काचेला हात लावलाच तर खूपच अनर्थ होईल. म्हणून चटकन उठून त्यांनी तो कंदील उचलला आणि वर दाराच्या खिळ्याला टांगला.
चहापाणी,खाणेपिणे झाले आणि मग गोप्याच्या बाबांनी नेमका मुद्द्याला हात घातला. सामुदायिक मुंजीबद्दलची माहिती ते माझ्या वडिलांकडून जाणून घ्यायला लागले. मग वडिलांनी त्याबद्दलचे एक पत्रक काढून त्यांना वाचायला दिले. कंदील वर असल्यामुळे पत्रक वाचण्यासाठी लागणारा प्रकाश अपुरा होता म्हणून त्यांनी माझ्या वडिलांना कंदील खाली घ्यायला सांगितले. कंदील खाली घेताना माझ्या वडिलांनी त्यांना मुलाला आवरण्यासंबंधी सूचना दिली पण त्यांनी ते हसण्यावारी सोडून दिले.
कंदिलाच्या प्रकाशात त्या पत्रकाचे वाचन सुरू असताना गोप्याच्या लहान भावाला त्याच्या आईने धरून ठेवले होते; पण कसे कुणास ठाऊक त्याने तिच्या हातांची पकड सोडवली आणि एकदम कंदिलाकडे धाव घेतली आणि कोणी काही करण्याआधी जाऊन तडक दोन्ही हातांनी कंदिलाची काच पकडली. जोराचा चटका बसताच त्याने भोकांड पसरले. जे होऊ नये असे वाटत होते तेच झाले होते. त्या चिमुकल्या जीवाचे हात चांगलेच पोळले होते. रंगाचा बेरंग झाला होता आणि मग त्या चिमुकल्या हातांवर उपचार सुरू झाले. माझ्या आईने चटकन एक तसराळे भरून थंड पाणी आणून त्यात त्याचे हात बुडवले. वडिलांनी ते निळ्या शाईसारखे असणारे औषध फडताळातून शोधून काढले आणि मग तेही त्याच्या हातांवर ओतले. पण इतक्या नाजूक जीवाला त्याचा काही खास फायदा झाला नाही.
हे सगळे रामायण घडले तरी ते दोघे आईबाप आश्चर्यकारकरीत्या कमालीचे शांत दिसत होते. शेवटी माझ्या वडिलांना राहवले नाही आणि त्यांनी गोप्याच्या वडिलांना जरा कठोरपणे सुनावले, "अहो,हा लहानसा जीव इतका तळमळतोय तरी तुम्ही इतके शांत कसे? चला, उठा आणि लगेच त्याला डॉक्टरकडे न्या बघू ." पण तरीही ते शांतच होते. मग माझ्या आईनेही गोप्याच्या आईला तेच सुनावले आणि मग मोठ्या नाईलाजाने तरीही कोणत्याही प्रकारची घाई न करता अतिशय थंडपणाने त्या दोघांनी त्या मुलाला डॉक्टरकडे नेले.
त्यांच्या जाण्यानंतरही माझ्या आई-वडिलांना बसलेला मानसिक धक्का ओसरलेला नव्हता.ते दोघे सख्खे आईबाप असूनही आपल्या मुलाच्या बाबतीत असे का वागले? हे कोडे मात्र कधीच उलगडले नाही.
1 टिप्पणी:
नेहमीप्रमाणेंच झकास. पुढील भाग लवकर टाका आता.
टिप्पणी पोस्ट करा