माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

१८ जानेवारी, २००८

बालपणीचा काळ सुखाचा! ३

माझी मोठी बहीण माझ्या पेक्षा माझ्यापेक्षा चार वर्षांनी मोठी आहे. मला पुरती समज येईपर्यंत मी तिचे शेपूट म्हणून नेहमी तिच्या मागे-मागे असायचो. ती ही मला तिच्या बरोबर खेळायला घेऊन जायची. तिला लहान व्हायला लागलेले फ्रॉक मी एकदोनदा घालून गेल्याचेही मला अजून आठवतेय. मला कपडे घालणे, पावडर लावणे वगैरे माझा नट्टापट्टाही ती मोठ्या आवडीने करायची. त्यावेळी खेळले जाणारे मुलींचे खेळ म्हणजे सागरगोटे, काचा-पाणी, दोरीवरच्या उड्या, मातीत घरं आखून आणि लंगडी घालून खेळला जाणारा खेळ(नाव आठवत नाही पण त्यात दोन्ही पाय टेकवण्यासाठी एक मामाचे घर असायचे), लंगडी, खेचाखेची, पकडापकडी,डबा ऐसपैस, मागे रुमाल लपवणे वगैरे वगैरे अजून बरेच खेळ असत.

त्यात अजून भर म्हणजे मंगळागौरीला आणि हादग्यात खेळले जाणारे फुगडी, बसफुगडी, रिंगण, खुर्ची का मिर्ची, कोंबडा, पकवा, ऐलमा-पैलमा वगैरे बरेच खेळ होते. आता तितकेसे नीट आठवतही नाही.ह्या सगळ्यामुळे नाही म्हटले तरी मी थोडा बायल्या झालो होतो. हळूहळू मी देखिल हे खेळायला लागलो. त्यात प्रावीण्य मिळवायला लागलो. माझ्या बरोबर हे खेळणार्‍या सगळ्या मुलीच असत. ह्या खेळाच्या अनुषंगाने येणारे शब्द आणि गाणी मला मुखोद्गत होऊ लागली.

त्यातले एक गाणे थोडेसे आठवतेय ते खेचाखेची करण्यासाठी दोन संघ बनवण्यासाठी गायले जाणारे गाणे.....आधी त्यातल्या त्यात मोठ्या असणार्‍या मुली एकमेकींचे हात असे उंच पकडून त्याची कमान करून उभ्या राहत आणि बाकीच्या इतरांनी त्या कमानी खालून जात राहायचे. मग त्या दोघीजणी ते गाणं म्हणत....

संत्रं लिंबू पैशा पैशाला
शाळेतल्या मुली आल्या शिकायला....असेच काहीसे होते. आता नीटसे आठवत नाहीये.पुढे......
खाऊन खाऊन खोकला झाला
पीं पीं पिठलं.......असे म्हणून झटकन दोन्ही हात खाली करून त्यावेळी कुणाला तरी त्यात पकडले जायचे. मग तिला काही सांकेतिक शब्द विचारले जाऊन त्यातला एक शब्द निवडायला सांगितला जाई. उदा. दोन फुलांची नावे... गुलाब आणि मोगरा. खरे तर ही दोन संघांची नावे असत पण आधी उघडपणे सांगितली जात नसत त्यामुळे आयत्या वेळी जो शब्द निवडला जायचा त्या संघात तिला जावे लागे. असे पुन:पुन्हा करून दोन संघ तयार होत आणि त्यांच्यात मग खेचाखेची व्हायची. त्यात मी ज्या संघात असायचो तोच संघ सहसा जिंकत असे कारण शेवटी काही झाले तरी माझ्यात निदान त्या मुलींपेक्षा जास्त शक्ती असायची. अर्थात मी बहुदा माझ्या बहिणीच्या संघातच असायचो. ते कसे ते एक गुपित आहे. ती मला नेत्रपल्लवीने सांगत असे हे गुपित मात्र मी तुम्हाला अजिबात सांगणार नाहीये.

ऐलमा पैलमा गणेश देवा
माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा......एकमेकींचे हात धरून आणि रिंगण करून म्हटले जाणारे असे बरेच काहीसे लांबलचक गाणे होते. त्यावेळी माझेही ते पाठ होते पण आता अधले मधले थोडे फार आठवते. पण सलगपणे असे काही आठवत नाही.

माझी बहीण रांगोळ्या पण खूपच छान काढायची. दिवाळीत तिला प्रचंड मागणी असे. आमची वाडी खूप मोठी होती आणि प्रत्येकाच्या घरापुढे प्रशस्त जागा असायची. मग तिथे झाडून, स्वच्छ सारवून वगैरे त्यावर ठिपक्यांची रांगोळी काढली जायची. दिवाळीचे वेध लागले की मग प्रथम रांगोळीची पुस्तके शोधली जात; नंतर ठिपके पाडण्यासाठी भोके पाडलेले कागद बनवले जात. ८-१० ठिपक्यांपासून ४०-५० ठिपक्यांपर्यंत असे कागद आखून आणि उदबत्तीने त्यात भोके पाडून हे कागद तयार करावे लागत. बहिणीचे बघून बघून पुढे पुढे मी देखिल तिला ह्यात मदत करायला लागलो.रांगोळी काढण्यात माझा हात विशेष चालत नसायचा पण माझी बहीण खूपच झटपट आणि तरीही उत्कृष्ट रांगोळी काढत असे. जवळ जवळ १०-१५ घरांपुढे ती रांगोळ्या काढायची. मी रंग भरताना तिला मदत करत असे. रंगसंगती तीच ठरवत असे. तिच्या त्या रंगसंगतीवर सगळेच खूश असत. कधी कधी तिच्याकडून मी एखाद्या घरची छोटी रांगोळी स्वतंत्रपणे रंगवायला घ्यायचो आणि माझ्या मनाप्रमाणे रंग भरायचो. माझी रंगांची आवडही जरा 'हटके'च होती. त्यामुळे तशी रंगसंगती पाहिली की सगळेजण फिदीफिदी हसत असत. मग माझी बहीण येऊन त्यात काही जुजबी सुधारणा करायची आणि तीच रंगसंगती एकदम मस्त दिसायला लागायची. ती नजर मला कधीच आली नाही. आजपर्यंत मला आयुष्यात कधीच न जमलेले हे एक काम आहे.

तसे बघायला गेले तर मी मुलांचेही खेळ खेळत होतो. गोट्या,बिल्ले,सिगारेटची पाकिटे,खो-खो, लंगडी, पकडापकडी आणि असे अनेक खेळही खेळत असायचो पण जास्त करून बायकी खेळच खेळायचो आणि मुलींच्यातच असायचो. जिथे सहज जिंकता येते तिथेच जास्त रमायचो. मुलगा आणि मुलगी ह्यांच्या केश आणि वेष ह्यामध्ये असलेला दृश्य फरक सोडला तर इतर काही फरक असतो हे मला अजिबात माहीत नव्हते. आज ह्यावर कुणाचा विश्वास बसणार नाही पण ही त्यावेळची वस्तुस्थिती होती. ह्यामुळेच माझ्या संपूर्ण आयुष्यावर कायमचा परिणाम घडवणारी एक घटना माझ्या भाबडेपणामुळे त्यावेळी घडली त्याबद्दल पुढील वेळी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: