माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

३० डिसेंबर, २०१०

चाल शंभरीच्या निमित्ताने!

मंडळी,मला सांगायला आनंद होतोय की ’त्यांची कविता माझे गाणे’ ह्या माझ्या जालनिशीवर चढवलेल्या चालींचं शतक पूर्ण झालंय. ह्या निमित्ताने मागे वळून पाहतांना काही गोष्टींचा पुन्हा एकदा उल्लेख करणे जरूरीचे आहे.
सर्वप्रथम, मी हे सांगू इच्छितो की कवितांना चाली लावण्याचा छंद मला शालेय जीवनापासूनच होता. मात्र त्यावेळी चाल लावली आणि विसरली असेच होत असे,कारण ध्वनीमुद्रणाचे कोणतेही साधन उपलब्ध नव्हते. त्यामुळे चाली लावल्या तरी त्या राखून ठेवता आल्या नाहीत...पण छंद सुरुच होता.

असेच एकदा महाजालावर वावरतांना, एक संगीतकार श्री.विवेक काजरेकर ह्यांच्याशी माझा परिचय झाला आणि मग सुरु झाला माझ्या चालींच्या ध्वनीमुद्रणाचा सिलसिला...ह्याबद्दल सविस्तर मी माझ्या हे गजवदना ह्या पहिल्या चालीसंबंधी लिहितांना लिहिलंय तेव्हा इथे तेच सगळं सांगत बसत नाही.

चाली रचल्यावर सुरुवातीला बरेच चांगले,गंमतीशीर अनुभव आले; त्याबद्दलही आधी लिहून झालंय...पण एक सांगतो की सुरुवातीला माझ्या चाली ऐकणार्‍या आणि प्रतिसाद देणार्‍या श्रोत्यांची संख्या हळूहळू कमी होत गेली.श्रोतेच कशाला, बर्‍याचदा अगदी कवी/कवयित्रींकडूनही फारसा प्रतिसाद नाही मिळाला. इथे प्रतिसाद चांगला/वाईट असा दोन्ही असला तरी अपेक्षित आहे...पण तो ही मिळणे कमी झाले.रोजच्या गप्पांमधले कैक जण तर मला चक्क टाळायला लागले. ;) तर काही नवे श्रोतेही लाभले ! तरीही मी हटलो नाही.

इथे एक गोष्ट स्पष्ट करतो की चाली मी कुणाला छळण्यासाठी किंवा कुणावर;विशेष करून कवी जातीवर बदला घेण्यासाठी लावत नाहीये. :D
चाल लावणे हा माझा छंद आहे,विरंगुळा आहे. त्यामुळे माझे तत्व एकच...कुणी निंदा,कुणी वंदा,मी जोपासतो चाली लावण्याच्या छंदा!
आता चाल लावली म्हटल्यावर ती कुणी तरी ऐकावी अशी इच्छा तर असतेच... आमचे मित्र काजरेकरसाहेब प्रत्येक नवी चाल आवर्जून ऐकतात आणि त्यावर खाजगीत अभिप्रायही देतात/सुधारणा सुचवतात . माझ्या चाली आवर्जून ऐकणारी त्यांच्यासारखी दुसरी व्यक्ती ह्या महाजालावर शोधूनही सापडणार नाही.

मी आजवर लावलेल्या कैक चाली ह्या निश्चितच श्रवणीय आणि लोकप्रिय होण्यासारख्या आहेत हे मी आत्मस्तुतीचा दोष पत्करूनही सांगेन.;पण त्याच बरोबर हेही सांगतो की माझ्या आवाजाच्या,गाण्याच्या मर्यादा अशा प्रमूख दोषांमुळे माझ्या चाली नेमकेपणाने श्रोत्यांपर्यंत पोचू शकत नाहीत.ह्यात भरीस भर म्हणजे मी ह्या चाली कोणत्याही संगीत साजाशिवाय गात असल्यामुळे श्रोत्यांना त्या शुष्क वाटतात...हे म्हणणे मला स्वत:लाही पटतं;पण दूर्दैवाने मला कोणतंही वाद्य वाजवता येत नसल्यामुळे आणि माझ्या मित्र परिवारात कुणीच असे संगीत साथ करणारे नसल्यामुळे माझ्या गाण्यावर मर्यादा येतात.

माझ्या चालींवर एखाद्या जाणत्या व्यक्तीकडून काही संस्कार झाले तर त्या कशा श्रवणीय होऊ शकतात ह्याचे दोन नमुने मी इथे देत आहे.

१)आषाढाचा मास:कवयित्री:प्राजु:; गायक आणि संगीत संयोजक: विवेक काजरेकर
२)मेघ आषाढाचा गर्जे:कवी:राघव; गायक आणि संगीत संयोजक: विवेक काजरेकर
आता माझी अशी अपेक्षा आहे की ज्या व्यक्तींना खरोखरच माझ्या चाली आवडत असतील/आवडल्या असतील आणि त्यांच्यापैकी कुणी स्वत: गायक/गायिका असल्यास त्यांनी अशी एखादी माझी चाल त्यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित करून पाठवावी.जर कुणाला ह्या चालींवर काही सांगितिक संस्कार करायचे असतील तर ते जरूर करू शकतात...कारण मी हे सगळे जे काही करतो आहे ते केवळ हौस,छंद म्हणून..ज्यात कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार नाहीये...मी ज्या कवी/कवयित्रींच्या कवितांना चाली लावतो त्यांना ना मी किंवा ना ते...कुणीही कुणाला पैसे देत नसतो...हा निव्वळ हौसेचा मामला आहे. तेव्हा,जर कुणाला ह्या छंदात,हौसेत सामील व्हायचे असेल तर जरूर या,त्यांचे स्वागतच होईल.

आता चालींची शंभरी झाली(आणि श्रोत्यांच्या कानाचीही...कोण कोण पुटपुटतंय ते? ;) ) मग पुढे काय?
पुढे काय म्हणजे? ह्यापुढेही चाली लावणं सुरुच राहणार आहे....
कुणीतरी मला गंमतीनं म्हणालंय...तुम्हाला एक जीवनगौरव पुरस्कार देऊन टाकूया....म्हणजे चाली लावणं आपोआप बंद होईल. :D
पुरस्कार काय मला हवे तेवढे मिळतील हो,पण मीच नको म्हणतोय. ;)
माझा खरा पुरस्कार म्हणजे चाली लावण्यातला आनंद...तो मला रोजच मिळतो! :)

७ टिप्पण्या:

मुक्त कलंदर म्हणाले...

काका चाली खरोखरच श्रवणीय झाल्या आहेत.. अल्बम काढण्यास हरकत नसावी..

जयश्री अंबासकर म्हणाले...

काका......१०० चाली.....!! ग्रेट !! मनापासून अभिनंदन !! हौस म्हणून चाली जरी देत असलात तर त्याची शंभरी गाठणं म्हणजे गंमत नाही !! तुमच्या चिकाटीला दाद द्यावी लागेल.

माझ्याही बर्‍याच कवितांना तुम्ही चाली दिल्या आहेत. त्यातल्या काही चाली आवडल्या आणि मी ते तसं तुम्हाला कळवलंही वेळोवेळी. आपल्या शब्दांचा कोणीतरी इतका खोलवर विचार करुन चाली लावतं ही नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. असा आनंद उपभोगायला यापुढेही आवडेल :)

Gangadhar Mute म्हणाले...

अभिनंदन देवसाहेब चालींचे शतक झाल्याबद्दल.
मी काही ऐकल्या आहेत. त्या आवडल्याही आहेत.
पुढील प्रवासासाठी शुभेच्छा. :)

हेरंब म्हणाले...

काका, शंभर नंबरी अभी आणि नंदन :)

मी अत्त्यानंद म्हणाले...

भारत,जयश्री,मुटेसाहेब आणि हेरंब , अभिप्रायाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

दिलीप बिरुटे म्हणाले...

शंभर चालीं.... अभिनंदन....!

मी अत्त्यानंद म्हणाले...

धन्यवाद बिरुटेसाहेब!