माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

१ मार्च, २०१०

पोपट झाला रे!

 मंडळी माझा अगदी पोपट झालाय. खरंच सांगतो. हा पोपट कधीचा होईल असे वाटत असतानाच ती वेळ मात्र साधारण महिन्याभराने पुढे ढकलली गेली इतकंच....पण प्रत्यक्ष ग्रहण लागण्याआधी जसे वेध लागतात ना तसेच तो काल म्हणजे हे पोपट होण्याचे वेध होते असे म्हणता येईल.  गोंधळलात? हे पोपट प्रकरण काय आहे समजून घ्यायचंय...तर मग वाचा.

त्याचं काय आहे की साधारण महिन्यापूर्वी मी मिसळपाववर, त्याच संकेतस्थळाचा होळी विशेषांक काढण्यासाठी एक निवेदन दिलं. त्याला बर्‍याच जणांनी फक्त शुभेच्छा दिल्या; सक्रिय सहकार्याचे कुणीही आश्वासन दिले नाही. त्याचप्रमाणे मिपा प्रशासनानेही त्याबाबत कोणताही उत्साह दाखवला नाही. त्यामुळे तो प्रस्ताव साफ बारगळला.

मागे मी स्वतंत्रपणे  ’शब्दगाऽऽरवा’ हा हिवाळी विशेषांक काढला होता त्यावेळी जे सहकारी होते त्यांच्याच सहाय्याने मग हा होळी विशेषांक काढायचा निश्चय केला. ह्यावेळी अंकाचा विषय ठेवला विनोद आणि तत्संबंधी साहित्य. मात्र हा विषय ऐकताच बर्‍याच जणांनी माघार घ्यायला सुरुवात केली. गंभीर लिहिणे एक वेळ जमेल पण विनोदी लिहिणे नाही जमणार असे म्हणून एक एक जण पाऊल मागे घ्यायला लागला. लेख पाठवण्याची शेवटची तारीख ठरवली होती १९ फेब्रुवारी २०१० आणि अंक प्रकाशनाची तारीख २८ फेब्रुवारी अशी निश्चित केली होती.

साधारणपणे १०फेब्रुवारीपर्यंत एकही लेख आलेला नव्हता..तेव्हाच ह्या पोपट होण्याचे नक्की झाले...वेध लागले असे म्हणता येईल. म्हणजे नाहीच आले असे नाही म्हणता येणार.. तसे काही लेख आले..पण त्यातले काही विषयाला धरून नव्हते तर काही तसे असूनही पूर्वप्रकाशित असल्यामुळे आमच्या अटीत बसणारे नव्हते. त्यामुळे त्यांना सविनय नकार देऊन पुन्हा नव्याने लेखन करावे असे आवाहन केले गेले. पण त्यांच्यापैकी एकानेही पुन्हा काही लिहून पाठवले नाही. अशा तर्‍हेने पहिला जोरदार तडाखा बसला.  पुढे हळूहळू मित्रांशी प्रत्यक्ष संवाद साधत, काही जणांचे मन वळवण्यात आणि त्यामुळे एकूण ११ लहानमोठे लेख मिळवण्यात मला थोडेफार यश आले  त्यात माझ्या एका लेखाची भर घालून मी अंक तयार केला.

अंकाची नव्या पद्धतीने सजावट आणि पीडीएफ संस्करण करण्याची जबाबदारी ’माझी दुनिया’ने स्वीकारली आणि जुन्या पद्धतीच्या(जालनिशी स्वरूपाच्या) अंकाची बांधणी मी करण्याचे मनावर घेतले. तशातच व्यंगचित्रकार ’मीनानाथ धस्के’ ह्यांनी एक सुंदर व्यंगचित्र काढून दिले...जे मुखपृष्ठ म्हणून उपयोगी पडले. ’कांचन कराई’ने आमच्या अंकाचे ’हास्यगाऽऽरवा’चे ओळखचिन्ह बनवून दिले. अशा तर्‍हेने अंक तर तयार झाला. लेखकांच्या मर्यादित प्रतिसादामुळे संपादनाचे काम खूपच कमी होते त्यामुळे अंक खूपच लवकर तयार झाला. मग २८तारखेपर्यंत वाट का पाहा..म्हणून तो आम्ही २४ तारखेलाच प्रकाशित केला.

त्या तारखेपासून आजवर अंकाला मिळालेला प्रतिसाद अतिशय अल्प प्रमाणात आहे. विशेष करून आमच्याच हिवाळी अंकाला मिळालेला प्रतिसाद पाहता होळी विशेषांक म्हणजे चक्क ’पडेल कामगिरी’ आहे असे म्हटल्यास ते अधिक समर्पक होईल.
वैयक्तिक रित्या, संपादक म्हणून, अंकाची बांधणी, त्यातील साहित्यिक दर्जा  आणि इतर संबंधित गोष्टींबाबत अंक तसा छोटेखानी असला तरीही मी नक्कीच समाधानी आहे. मात्र त्याला वाचकांचा मिळालेला अत्यल्प प्रतिसाद पाहता मी हेच म्हणेन....पोपट झाला रे! थोडक्यात वाचकांना आम्ही आकर्षित करू शकलेलो नाही ही वस्तुस्थिती आहे. वाचकांनी पाठ फिरवल्यामुळे फारशा प्रतिक्रियाही आलेल्या नाहीत त्यामुळे आम्ही नेमके कुठे कमी पडलो हे समजण्यास कोणताच मार्ग नाही.

असो. ह्यावेळी होळी विशेषांकाकडे  पाठ फिरवून वाचकांनी आमचा पोपट केला......तरीही आम्ही खचून गेलेलो नाहीये. आजच्या इतक्याच किंबहुना जास्त जोमाने आता ’वर्षा विशेषांका’ची तयारी सुरु  करायला आम्ही कटीबद्ध आहोत...तेव्हा आपण जरूर आमचं जोरदार स्वागत कराल ह्याची खात्री वाटते.

हास्यगाऽरवाच्या सर्व व्यक्त/अव्यक्त वाचकांना, मन:पूर्वक धन्यवाद.

३ टिप्पण्या:

शांतीसुधा (Shantisudha) म्हणाले...

Kaka,

mala asa vatata ki vachak sadhya baryach pramanat vyasta aahet. Mee swataha ekada Hasyagarava var dikavale hote. pan mala sadhya upalbdha asalela vel aani hasyagarava madhil lekhanchi lambi yancha gunottar vyasta aahe. tyamule mee vichar kela ki jara jodun sutti milali aani tyat vachayala vel milala ki vachen.

Tuacha hasyagarava ha upkram/ank changalach asanar. pan velechya ganitamule kadachit bhet deun vachanaryanchi sankhya kami aahe. mhanaje tumacha popat zala asa hot naahi na!!

Kanchan Karai (Mogaraafulalaa) म्हणाले...

मला वाटलं होतं, वर्षा विशेषांकाचा बेत बारगळला की काय. काका, मला होळी विशेषांकाची बातमी कळल्या कळल्या लगेच मी लेख पाठवते अशी प्रतिक्रिया दिली होती हं! मधेच थोडं काम निघालं पण तुम्ही दिलेल्या मुदतीच्या आधी मी लेख पाठवून दिले.

काका, सुरूवातीला यश मिळालं तर ते टिकवायचं कसं हेही शिकावं लागतं. सुरूवातीला जर टक्केटोणपे खाल्ले तर सर्वोत्तम निर्मिती कशी असावी, यासाठी आपल्या चुकाच आपल्याला मार्गदर्शन करतात. आपला सकारात्म दृष्टीकोन आपल्याला यश मिळवून देणार, हे नक्की! मला तर तुमच्या अंकासाठी लेख पाठवायला आवडतात. वर्षा विशेषांकातही माझा सहभाग असेलच. आगामी सर्व अंकांसाठी शुभेच्छा!

अनामित म्हणाले...

श्री प्रमोदजी देवसाहेब

कळवण्यास अत्यंत दु:ख होते की, आपला दावा साफ चुकीचा आहे. आपला होळी विशेषांक अजिबात पडेल नसुन बर्‍यापैकी तरेल (तरलेला) आहे. :-)

अभिनंदन. आपल्या व आपल्या सहकार्‍यांच्या उत्साहाचे, प्रयत्नांचे कौतुक आहे.

वर्षा विशेषांकाला शुभेच्छा!

सहज