ह्या सहावीच्या वर्षी मी शाळेत टिळक पुण्यतिथीच्या झालेल्या विविध स्पर्धांत भाग घेतला. पाठांतर स्पर्धा ,वक्तृत्व स्पर्धा,निबंध स्पर्धा आणि गीतगायन स्पर्धा . ह्यावेळी पाठांतर स्पर्धेत आम्हाला गीतेचा बारावा अध्याय म्हणायचा होता जो आम्ही रोज प्रार्थनेनंतर म्हणत असू त्यामुळे त्याबद्दल मला काळजी नव्हतीच. "एवं सतत युक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते" अशी काहीशी त्याची सुरुवात होती(मित्रहो आता ह्याच्या पुढचे काही आठवत नाही. माफ करा).
नेहमी प्रमाणे मी माझे पठण दणदणीतपणे सादर केले. बक्षीस मिळणे न मिळणे हा वेगळा भाग होता.त्याचा विचार केला नाही कारण त्याची घोषणा इतर सर्व स्पर्धा झाल्यावर होणार होती. मला चिंता होती ती वक्तृत्व स्पर्धेची! कारण आयुष्यात पहिल्यांदाच ह्या स्पर्धेत मी भाग घेत होतो. विषय अर्थातच टिळक आणि त्यांच्याबद्दलची माहिती. आता तुम्हाला माहीत आहेच की ह्या अशावेळी टिळकांच्या त्याच त्याच गोष्टी सांगितल्या जातात(शेंगा,टरफले,शुद्धलेखन वगैरे वगैरे) आणि स्पर्धक ,श्रोते आणि परीक्षक ह्या सगळ्यांच्या संयमाची कसोटी लागते. पण माझे भाषण ह्या सगळ्यांपासून वेगळे होते.मी टिळकांबद्दल सांगितलेली गोष्ट ह्या आधी कुणीच म्हणजे अगदी मी देखिल ऐकलेली नव्हती. ही गोष्ट म्हणजे हे भाषण मला माझ्या मोठ्या बहिणीने लिहून दिले होते. त्यासाठी तिने वाचनालयातून एक पुस्तक शोधून आणलेले होते आणि त्या आधारेच तिने ते भाषण मला लिहून दिले. मी ते मन लावून पाठ केले होते पण आता इथे सभागृहात आल्यावर नाही म्हटले तरी दडपण आलेच होते. सुदैवाने माझा क्रमांक बराच मागे होता म्हणून मी थोडासा शांत होतो आणि त्याच वेळी अस्वस्थही होतो.
शेवटी एकदाचे माझे नाव पुकारले गेले आणि मी यंत्रवत मंचावर पोचलो. हातपायाची थरथर जाणवत होतीच. समोर इतके सगळे जण बसलेले होते तरी त्यांचे चेहरे देखिल दिसत नव्हते इतका डोळ्यासमोर काळोख दाटला होता आणि घशाला कोरड पडली होती. काही क्षण मी त्याच अवस्थेत उभा होतो. परीक्षकांनी घंटी वाजवून मला त्या अवस्थेतून बाहेर काढले आणि भाषण सुरू करण्याची सूचना केली. मी उगीच इथे-तिथे पाहिले आणि माझी नजर टेबलावर ठेवलेल्या तांब्या-भांड्याकडे गेली. मला त्याक्षणी पाण्याची अतिशय निकड भासत होती म्हणून अतिशय करुणार्द्र मुद्रेने परीक्षकांकडे पाहून पाणी हवे असल्याचे सूचित केले आणि त्यांनीही अतिशय उदारपणे मला ते पिण्याची अनुमती देऊ केली. पडत्या फळाची आज्ञा घेऊन मी एक भांडंभर घटाघट पाणी प्यायले आणि माझ्या जीवात जीव आला. मी एक आवंढा गिळला आणि मनातल्या मनात देवाचे स्मरण करून धाडदिशी सुरुवात केली. "अध्यक्ष महोदय आणि माझ्या मित्रमंडळींनो आज मी तुम्हाला लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांबद्दल एक गोष्ट सांगणार आहे ती तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्याल अशी अपेक्षा करतो".
त्यानंतर राजधानी एक्सप्रेसच्या वेगात आणि डौलात मी ती गोष्ट सांगितली. शेवटी सगळ्यांचे आभार मानले आणि टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात जागेवर जाऊन बसलो. अध्यक्षांसकट सगळेच खूश झालेले दिसत होते कारण त्या सगळ्यांना मी शेंगा,टरफले आणि शुद्धलेखनाच्या दलदलीतून बाहेर काढले होते. काय होती ती गोष्ट? आता आठवते तशी थोडक्यात सांगतो.
टिळक त्यावेळी महाविद्यालयात शिकत होते. व्यायामाने बलदंड शरीर बनवलेले टिळक 'बाळ' ह्या नावाऐवजी आता 'बळवंतराव' ह्या नावाने ओळखले जात होते. आपल्या मित्र-मंडळींसह त्यांच्या वाड्याच्या गच्चीवर गप्पा-टप्पा चालू होत्या. विषय अर्थातच इंग्रजांची गुलामगिरी आणि भारताचे स्वातंत्र्य हाच होता. टिळक आणि त्यांची ही मित्र-मंडळी ही जहाल मतवादी म्हणून ओळखली जात आणि म्हणूनच त्यांच्या हालचालींवर इंग्लिश पोलिसांचे बारकाईने लक्ष होते.बोलता बोलता टिळकांनी मित्रांना प्रश्न केला, "आता ह्या क्षणी जर का पोलीस आपल्या सगळ्यांना पकडायला आले तर कोण कोण काय करेल?कुणी म्हणाले, "मी दारामागे लपेन." कुणी म्हणाले, "मी त्यांच्याशी वाद घालेन."कुणी काय आणि कुणी काय. ज्याला जे सुचले त्यांनी ते उत्तर दिले. शेवटी मित्रांनी टिळकांना विचारले, "बळवंतराव,तुम्ही काय करणार?"
क्षणाचाही विचार न करता टिळक म्हणाले, "मी हेच करीन." आणि त्यांनी गच्चीवरून थेट खाली उडी मारली. मित्र घाबरले . बळवंतरावांना कुठे लागले तर नसेल ना ह्या काळजीने ते सगळे खाली येण्यासाठी जिन्याजवळ आले आणि पाहतात तो काय? स्वत: टिळक हसत हसत वर येताना दिसले. टिळकांना हसताना पाहून मित्रांचीही कळी खुलली आणि ते देखिल त्यांच्याबरोबर हास्यात सामील झाले.
एका मित्राने टिळकांना विचारले, "बळवंतराव काय हे धाडस? अहो कुठे लागले असते तर? ह्यापुढे असा अविचार करू नका."
टिळक म्हणाले , "बाबांनो, आपण देशसेवेच्या गोष्टी करतो मग असे जीवाला घाबरून कसे चालेल?देशासाठी तन-मन-धन अर्पण करण्याची आपण प्रतिज्ञा केलेली आहे मग आता मागे हटून कसे चालेल?"
दुसरा मित्र म्हणाला, "बळवंतराव, अहो तुम्ही चक्क पळून गेलात! ह्याचे तुम्ही कसे समर्थन कराल?"
टिळक म्हणाले, "बचेंगे तो और भी लढेंगे" हे दत्ताजी शिंदेचे वचन विसरलात काय? पोलीस कोठडीत पिचून मरण्यापेक्षा हे धाडस केव्हाही चांगलेच. अशा प्रसंगी लागणारे शारीरिक बळ असावे म्हणून तर आम्ही वर्षभर कसून व्यायाम केला मग त्याचा उपयोग कधी करणार? म्हटलंच आहे ना 'शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम'!"
ह्या उत्तराने मित्रांचे समाधान झाले आणि त्यांनीही शरीर बळकट करण्यासाठी व्यायाम करण्याची शपथ घेतली.(मित्रांनो टिळक नेमके काय म्हणाले ते आता शब्दश: आठवत नाहीये(आत्ता इथे हरितात्या हवे होते म्हणजे त्यांनी माझी सुटका केली असती). तरीही जसे आठवले तसे लिहिले आहे.काही चूक असल्यास माफ करावे.)
क्रमश:
४ टिप्पण्या:
मीसुध्दा ही गोष्ट आज पहिल्यांदाच वाचली. धन्यवाद.
:) धन्यवाद घारेसाहेब.
kaka, mala mahit hoti hi gosht adhich :)
पुण्याच्या मुली मुळातच हुशार! :)
धन्यवाद प्रिया.
टिप्पणी पोस्ट करा