माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२७ जुलै, २००७

आठवणी! शालेय जीवनातल्या!१

हल्लीच व्यायामशाळेत एक छोटा मुलगा भरती झालाय. साडेतीन-पावणेचार फूट उंचीचा तो मुलगा तसा साधाच आहे. म्हणजे विशेष लक्ष वेधून घेण्यासारखे असे त्याच्यात काहीच नाही;पण इतका लहान मुलगा पहिल्यांदाच आल्यामुळे कुतूहल जागृत होणे स्वाभाविक आहे. त्यातून इतक्या लहान वयात असा वजनं उचलण्याचा व्यायाम करणे केव्हाही फायदेशीर नसते असे शास्त्र सांगते. त्यामुळेच का होईना मला त्याच्याबद्दल कुतूहल वाटले आणि मी त्याला त्याचे नाव,कितवीत शिकतो वगैरे प्रश्न विचारले तेव्हा असे कळले की तो ’आठवीत’ शिकतोय! आठवीतला मुलगा आणि इतका छोटा? क्षणभर मला धक्काच बसला;पण त्याच वेळी माझे मन भूतकाळात डोकावले आणि मग त्यातून आठवणींची मालिका तयार होऊ लागली.
माझ्या पूर्वायुष्यात डोकावल्यावर मला मी शाळेत असताना कसा होतो ते आठवले. ११वी(शालांत परीक्षा) च्या पूर्व परीक्षेच्या(प्रिलिम)वेळेपर्यंत माझी उंची जेमतेम ४फूट ११ इंच इतकीच होती आणि वजन जेमतेम ३५ किलोच्या आसपासच होते. डोळ्याला जाड भिंगाचा चश्मा होता(हा दहावीत असताना लागला)आणि हे माझे रूप आठवताच मला तो मुलगा माझीच प्रतिमा वाटू लागला.
मी पाचवीत माध्यमिक शाळेत दाखल झालो तेव्हाचे रूप आठवले तर अजूनच गंमत वाटली.उंचीने बुटका,अशक्त असे माझे ध्यान आठवून मलाच हसू आले. तसा चेहरा बर्‍यापैकी होता आणि नाही म्हणायला उजळ रंग ह्यामुळे जरा त्यातल्या त्यात समाधान वाटण्यासारखी परिस्थिती होती.बाकी सगळा आनंदी-आनंदच होता. ह्या पाचवीतलाच एक मजेशीर प्रसंग आहे.
१ ऑगस्ट ह्या टिळक पुण्यतिथीनिमित्त आमच्या शाळेत पाठांतर स्पर्धा होत असत!.रोज सकाळी पहिल्या तासाला प्रार्थनेनंतर प्रत्येक वर्गात गीतेच्या एखाद्या अध्यायाचे सामुदायिक पठण होत असे. आमच्या वर्गाला १५ वा अध्याय म्हणावा लागे. "उर्ध्वमुलं अध:शाखं अश्वथं प्राहु रव्यं(की रव्ययम... आता विसरलो बघा!). त्यामुळे नैसर्गिकपणे तो आमचा सगळ्यांचा पाठ झालेला होता आणि पाठांतर स्पर्धेत तोच म्हणायचा होता. तेव्हा बाईंनी(वर्गशिक्षिका) इतरांबरोबर माझेही नाव स्पर्धेत दाखल केले.
स्पर्धेच्या दिवशी(३१ जुलै) सभागृहात सगळ्यांच्या समोर एकेकट्याने सभामंचावर जाऊन तो अध्याय घडाघडा म्हणून दाखवायचा हे किती दिव्य काम होते हे पहिल्या काही स्पर्धकांच्या मध्ये मध्ये अडखळण्यामुळे माझ्या चांगलेच लक्षात आलेले होते आणि म्हणून मी शक्यतो अध्यक्ष बाईंना दिसणार नाही अशा तर्‍हेने एका उंच मुलाच्या आडोशाला बसलो होतो. मनात धाकधूक होतीच की आता सगळ्यांच्या देखत आपलीही अशीच फजिती होणार म्हणून तोंडातल्या तोंडात तो अध्याय सारखा पुटपुटत होतो. बघता बघता माझ्या नावाचा पुकारा झाला. मी माझ्यातच दंग असल्यामुळे मला तो ऐकूच आला नाही;पण आजूबाजूच्या सवंगड्यांनी ढोसून मला त्या भावसमाधीतून वास्तवात आणले आणि नाईलाजास्तव मला उठून मंचावर जाणे भाग पडले. हातपाय थरथरत होते,घसा सुकला होता. केविलवाण्या नजरेने मी बाईंकडे पाहिले(माफ करा! मला जाऊ द्या असे दर्शवीत) पण बाई तर माझ्याकडे सस्मित नजरेने पाहत होत्या. त्यांच्या नजरेत कुठे तरी मला एक आश्वासक पाठिंबा दिसला. त्यांनी आज्ञा केली ," हं! म्हण आता!"
त्यांच्या त्या शब्दांची जादू म्हणा किंवा अजून काही म्हणा(त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होऊन) मी अत्यंत आज्ञाधारकपणे दोन्ही हात जोडले आणि क्षणभर डोळे मिटून सुरुवात केली. आणि अहो आश्चर्यम! माझा नेहमीचा खणखणीत आवाज काम देऊ लागला होता! पहिल्या काही श्लोकांतच शरीराची थरथर,मनाची चलबिचल पूर्णपणे थांबली होती आणि अगदी शेवटापर्यंत कुठेही न अडखळता अस्खलितपणे मी ते पठण पूर्ण केले आणि टाळ्यांच्या कडकडाटात(आयुष्यातल्या पहिल्याच टाळ्या) आपल्या जागेवर जाऊन बसलो. माझ्यानंतरही काही जणांनी उत्तमपणे पाठांतर सादर केले आणि मग सर्वात महत्त्वाच्या आणि कुतूहलाच्या विषयाकडे सगळ्यांचे डोळे लागून राहिले आणि तो म्हणजे स्पर्धेचा निकाल!
परीक्षकांनी आपापसात विचारविनिमय करण्यासाठी दहा मिनिटांचा वेळ घेतला आणि मग त्यांचा निर्णय ठरल्यावर त्यांनी निकाल घोषित केला. निकालाची घोषणा आमच्या माननीय मुख्याध्यापकांनी केली. त्यांनी पहिला क्रमांक घोषित केला आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. मी खूपच लांब बसलेलो असल्यामुळे मला ते नाव ऐकूच आले नाही पण पाठीत पडलेल्या रट्ट्यांमुळे लक्षात आले की ते नाव माझेच होते आणि मीही इतरांबरोबर टाळ्या वाजवल्या. मला तर सुखद आश्चर्याचा धक्काच बसला होता. आयुष्यातील पहिलीच स्पर्धा आणि लगेच पहिले बक्षीसही! मला त्यावेळी इतका आनंद झाला होता की डोळ्यातून आपोआप अश्रू ओघळले.बक्षीस समारंभ दुसर्‍या दिवशी पाहुण्यांच्या हस्ते होणार होता आणि त्यांच्यासमोरही आम्हा तिघांना पुन्हा एकदा ते पठण सादर करायचे होते.
स्पर्धेनंतर आम्ही आपापल्या वर्गात जायला निघालो. माझा वर्ग तिसर्‍या मजल्यावर होता. शेजारीच आठवीचाही वर्ग होता. मधली सुट्टी संपायला अजूनही थोडा अवकाश असल्यामुळे मुले वर्गाच्या बाहेर दंगामस्ती करण्यात गुंगलेली होती. आठवीची मुले तर माझ्यापेक्षा चांगली फूटभर तरी उंच होती. मी माझ्या वर्गात जाण्याआधीच त्यांच्यापैकी एकाने "ए छोटू आला!" अशी आरोळी दिली आणि दुसर्‍याने मला अलगद उचलून उंच धरले.वर्गाच्या बाहेर असलेल्या चिंचोळ्या मार्गिकेच्या कठड्याच्या भिंती अर्ध्याच असल्यामुळे मला मात्र खाली पडण्याची भिती वाटत होती आणि ती मुले चेंडू जितक्या सहजतेने फेकावा तितक्याच सहजतेने एकमेकांकडे मला फेकत होते. भितीने मी अर्धमेला झालो होतो. कोणत्याही क्षणी मी तिसर्‍या मजल्यावरून खाली भिरकावला जाईन अशी भिती माझ्या मनात होती;पण ते त्या मुलांच्या गावीही नव्हते. तेव्हढ्यात मला शोधत शोधत शाळेचा एक वयस्कर शिपाई एखाद्या देवदूतासारखा मदतीला धावून आला आणि माझी त्या मुलांच्या तावडीतून सुटका झाली. माझी आजची कामगिरी ऐकून माझ्या वर्गशिक्षकांनी खास शिक्षकांच्या खोलीत मला बोलावले आहे असा निरोप घेऊन तो मला न्यायला तिथे आला होता. शिक्षकांच्या खोलीत जाताच मी तिथे उपस्थित असलेल्या सर्व शिक्षकांना नमस्कार केला आणि आमच्या वर्गशिक्षकांसमोर(बाईंसमोर) उभा राहिलो. त्यांनी माझे तोंड भरून कौतुक केलेच आणि पुढ्यातली दोन ग्लूकोज बिस्किटेही आग्रहाने खायला लावली. दुसर्‍या दिवशी पाहुण्यांसमोर पुन्हा असेच नीट म्हण असे सांगून वर्गात जाण्याची अनुमती दिली.
दुसर्‍या दिवशी सभागृह खचाखच भरलेले होते. माझ्यासारखेच इतर स्पर्धेतले(वक्तृत्व,पठण,निबंधलेखन,चित्रकला वगैरे) विजेतेही तिथे पहिल्या रांगेत बसलेले होते. वक्तृत्व स्पर्धेतील आणि पठण स्पर्धेतील माझ्यासकट सगळ्या विजेत्यांनी त्यांचे त्यांचे कौशल्य दाखवून झाल्यावर पाहुण्यांनी सगळ्यांना बक्षिसे प्रदान केली आणि मग लोकमान्य टिळकांच्या आयुष्यातील काही असामान्य घटनांवर एक भाषण करून कार्यक्रमाची सांगता केली.
बक्षीस काय आहे हे पाहण्याची उत्सुकता खूपच लागून राहिली होती;पण आईने बजावले होते की घरी येऊन प्रथम देवासमोर ते बक्षीस ठेव आणि नमस्कार करून मगच ते उघड! तेव्हा घाईघाईत घरी आलो(माझे घर आणि शाळा ह्यातले अंतर निव्वळ तीन मिनिटांचे होते;पण तो वेळही मला तेव्हा युगासारखा वाटला.). हातपाय धुऊन बक्षीस देवासमोर ठेवले,नमस्कार केला आणि मग धसमुसळेपणाने बक्षिसावरचे वेष्टन फाडून काढले तर आत एक जाडजूड पुस्तक आढळले. गोष्टीचे पुस्तक असावे म्हणून आनंदलो आणि मग नाव बघितले तेव्हा मात्र एकदम खट्टू झालो. त्या पुस्तकाचे नाव होते ’गीता प्रवचने’! लेखक विनोबा भावे! पाचवीतल्या मुलाला काय बक्षीस तर गीतेवरचे पुस्तक! मी ते पुस्तक कोपर्‍यात फेकून दिले आणि खेळायला पळालो!

क्रमश:

1 टिप्पणी:

अनामित म्हणाले...

सुंदर! छान आठवणी सांगितल्या आहेत. लहान मुलाला गीता भेट देणे ही त्या काळातली कदाचित फॅशन असावी. हल्लीच्या मुलांना हॅरी पॉटरची प्रत मिळत असावी!:-) तुमच्या लेखावरून मला माझी इयत्ता पाचवी आठवली. धन्यवाद!