माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२१ ऑगस्ट, २००७

आठवणी!शालेय जीवनातल्या!९

सहावीत जे नवे सर शाशि साठी आले होते ते जसे आम्हाला समरगिते-समूहगीते शिकवत तसेच योगासनं शिकवत. पावसाळ्यात मैदान ओले असले की आणि एरवीही ते आम्हाला योगासनं आणि मलखांब करायला प्रवृत्त करत. माझ्या वयाची बहुतेक मुले ही चणीने लहान असल्यामुळे म्हणा अथवा नैसर्गिक कोवळेपणामुळे म्हणा योगासनं पटापट शिकत गेली. तरीही माझे त्यातील प्रावीण्य सरांच्या नजरेत भरले आणि त्यांनी मला योगासनाच्या प्रात्यक्षिकासाठी निवडले. माझ्या कडून आधी ते काही कठीण वाटणारी आसने करून घेत. त्यांचे त्यात समाधान झाले की मगच ते मला सर्वांसमक्ष ते आसन करायला लावत आणि मग माझे बघून आणि सरांच्या आदेशाप्रमाणे इतर मुले तसे करत.

त्या वर्षात आम्हाला पद्मासन,बद्धपद्मासन,कुक्कुटासन,आकर्णधनुरासन,शलभासन,सर्वांगासन,ताडासन ही आणि अशीच सहजसाध्य वाटणारी आसने शिकवली. त्याच बरोबर सूर्यनमस्कार देखिल शास्त्रोक्त पद्धतीने कसे घालायचे तेही शिकवले.मलखांब करायला खूपच मजा येत असे.पण मलखांबावर माझ्यापेक्षा सहजतेने वावरणारी काही मुले होती त्यांना त्यातली प्रात्यक्षिके करण्यासाठी निवडले. ती दोन-तीन मुले इतक्या सहजतेने आणि चपळतेने त्या मलखांबावर वरखाली होत असत की आम्ही ते बघण्यातही दंग होत असू. एक प्रकारची लय त्यात असायची. आणि किती विविध प्रकारच्या कसरती त्यावर सादर केल्या जात ते आठवून आजही अंगावर काटा येतो.

मी शाळेतल्या स्पर्धांमध्ये (वक्तृत्व इत्यादी) भाग घेऊन बक्षिसे मिळवत होतो तरी शारीरिक खेळात नेहमीच मागे असे. हुतुतू-कबड्डी,लंगडी-खोखो,धावणे अथवा इतर मैदानी खेळ खेळण्यात इतरांच्या तुलनेत मागासलेलाच होतो. शारीरिक क्षमता कमी असल्यामुळे ह्यापैकी कशातही प्रावीण्य सोडा पण बर्‍यापैकी खेळणे देखिल जमत नसे. मात्र एक होते की निरीक्षणामुळे मला त्यातल्या युक्त्या,बारकावे माहीत झाले होते पण त्याचा काय उपयोग होणार? कारण शारीरिक क्षमता नसेल तर आपण हे ताकदीचे खेळ खेळू शकत नाही आणि मग खेळलोच नाही तर त्या युक्त्या कधी वापरणार? पण माझा नैसर्गिक स्वभाव म्हणा की अन्य काही म्हणा मी कधीही सहजासहजी हार मानत नसे आणि म्हणून माझ्यापेक्षा ताकदीने जास्त असलेल्या मुलांच्यात मुद्दामहून खेळायचा प्रयत्न करत असे. त्यांच्या दृष्टीने मी लिमलोणचा असे‍. ज्या संघात एखादा गडी कमी पडतोय असे दिसले की मग माझी वर्णी लागायची. पण मला तेवढी संधीदेखील चालत असे. मग कबड्डी खेळताना मी माझे प्रयोग करत असे आणि बर्‍याच वेळा तोंडघशी पडत असे. ढोपरं फोडून घेणे हा प्रकार तर नित्याचाच होऊन गेला होता.पण खेळण्याची आग काही शांत होत नसे.ह्यातनंच मी माझी अशी एक खास 'पकड' तयार केली आणि त्याचा वापर करून बर्‍याच वेळा हातपाय जायबंदी देखिल करून घेतले होते.

ह्या कबड्डीची नशा दिवसेंदिवस अशी काही चढत गेली की त्यापुढे खरचटणे,लागणे,मुरगळणे असले प्रकार क्षुद्र वाटायला लागले.मग मी आमच्या वाडीतल्या मुलांच्यात कबड्डी खेळायला सुरुवात केली. तिथेही तेच! पण जिद्द हरलो नाही. त्याचा परिणाम असा झाला की जेव्हा आमच्या वाडीचा कबड्डीचा संघ बनवला गेला तेव्हा मलाही त्यात सामील केले होते.ह्या आमच्या संघाचा सामना दुसर्‍या एका वाडीच्या संघाशी घ्यायचे ठरले. त्या संघात आमच्यासारखेच सामान्य दर्जाचे खेळाडू होते. मात्र त्यांचा संघनायक खूपच धष्टपुष्ट असा राजस्थानी मारवाडी होता. त्याला खेळातले तंत्र विशेष असे अवगत नव्हते तरीही त्याच्या ताकदीच्या जोरावर त्याने आमचा धुव्वा उडवला. तो जेव्हा स्वारी करत असे तेव्हा एकदोघांना बाद केल्याशिवाय कधीच जात नसे. त्याला हात लावायला देखिल सगळे घाबरत असत. कारण? आमच्यापैकी ज्याने म्हणून त्याला धरायचा प्रयत्न केला होता त्याला त्याने अक्षरश: फरफटत नेले होते. परिणामी सगळ्यांचीच ढोपरे आणि कोपरे फुटली. मी देखिल माझ्या त्या खास पकडीचा प्रयोग त्याच्यावर केला आणि परिणाम असा झाला की पुरता सोलवटून निघालो. त्या माणसात काही रेड्यांची शक्ती असावी असा तो आम्हाला सहज लोळवत आणि फरफटवत नेत असे.

ह्यानंतर आठवडाभर तरी आम्ही कबड्डीचे नाव काढले नाही.मात्र डोक्यात किडा वळवळतच होता. ह्याचा वचपा कसा काढायचा?विचार करता करता करता मला एकदम युक्ती सुचली आणि मी इतरांना ती सांगितली.पण इतरांनी त्यात विशेष रस दाखवला नाही. मग मी मनाशी ठरवले की आता जे करायचे ते न बोलता. आम्ही पुन्हा जेव्हा कबड्डी खेळायला सुरुवात केली तेव्हा मी माझ्याच वर्गातल्या एका बाळसेदार मुलाला आमच्यात खेळायला आमंत्रित केले होते.त्याचा खेळ आणि ताकद बघून माझे म्हणणे मग इतरांना पटले. हा माझा मित्र(विजय) एक जैन मारवाडी होता आणि त्याच्याकडे निव्वळ शक्ती नव्हती तर खेळातले कसब देखिल होते.आम्ही सगळ्यांनी दोन दिवस कसून सराव केला आणि मग पुन्हा एकदा त्या दुसर्‍या वाडीच्या संघाशी सामना घेण्याचे निश्चित करून टाकले.

प्रतिस्पर्धी संघनायक तर हुशारीतच होता. त्याला आमच्याकडून कोणताच विरोध होणार नाही असे वाटत होते म्हणून त्याने आमचे आव्हान सहज स्वीकारले. ठरलेल्या दिवशी आमचे दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे ठाकले.प्रतिस्पर्धी संघनायकाने ओलीसुकी जिंकून पहिली स्वारी केली आणि आमचे दोन गडी बाद करूनच तो परतला.मग माझा मित्र त्यांच्यावर चाल करून गेला. त्याने खोलवर मुसंडी मारून दोघांना बाद केले आणि परतीच्या प्रवासात अजून एकाला म्हणजे एकूण तिघांना बाद करून तो आला. आम्ही सगळे आनंदाने नाचायलाच लागलो. लागलीच तो मारवाडी चाल करून आला आणि त्याने पुन्हा आमच्यातल्या दोघांना बाद केले.परत जात असताना त्याला माझ्या मित्राने हूल दिली म्हणून त्याला बाद करण्यासाठी मारवाडी पुन्हा जोरात माघारी फिरला आणि तो मोका साधून मी माझी खास पकड केली.पण मारवाडी मला खेचत न्यायला लागला आणि त्याच वेळी विजयने त्याच्या पटात शिरून त्याला तिथेच दाबून टाकला. हे पाहून बाकीचे सगळे त्याच्या अंगावर झोपले आणि अशा तर्‍हेने आम्ही त्या मारवाड्याला बाद केले.

नुसता जल्लोष!!! काही मिनिटे आम्ही तिथे नाचून थयथयाट करून आमचा आनंद व्यक्त केला.मग विजयने स्वारी करून त्यांची दाणादाण उडवली. बघता बघता त्यांच्यावर लोण चढला. आता मारवाडी त्वेषाने आक्रमण करता झाला;पण आमचे त्याच्याबद्दलचे भय संपलेले होते त्यामुळे त्याच्या त्वेषाचा आम्हाला फायदाच झाला. आम्ही त्याला खोलवर घुसायला प्रवृत्त करत होतो आणि तो देखिल बिनधास्तपणे आत घुसला होता. आता मला माझ्या पकडीविषयी खात्री(आणि विजयचे पाठबळ)असल्यामुळे मी त्याच्यावर समोरून उडी मारून त्याचे दोन्ही खांदे पकडून त्याला खाली बसवण्याचा प्रयत्न केला.त्याने नेहमीच्या सवयीने मला झिडकारण्याचा प्रयत्न केलाच पण त्याच वेळी विजयसकट सगळ्यांचा त्याच्याभोवती गराडा पडला आणि पुन्हा सगळ्यांनी त्याला पार दाबून टाकले.

आता खेळाची सगळी सूत्रे आमच्या कडे होती. दोन वेळा पकडीची नामुष्की पत्करल्यामुळे मारवाडी हबकला आणि हळूहळू त्याचा जोष कमी पडायला लागला आणि मग जे व्हायचे तेच झाले. अत्यंत दारुण असा पराभव पदरी पाडून मारवाडी मान खाली घालून चालता झाला. सगळ्यांनी विजयला डोक्यावर घेतले आणि त्याची मैदानभर मिरवणूक काढली. मी देखिल जाहीरपणे आणि मनातल्या मनात देखिल खूश होतो.काट्याने काटा काढण्यात यशस्वी झालो होतो त्याचा एक आसुरी आनंदही उपभोगत होतो.

क्रमश:

२ टिप्पण्या:

Prasad Chaphekar म्हणाले...

maja aali khup waachtana.!!!

deepanjali म्हणाले...

जे आपल्याला आवडते ते इतरांपर्यंत पोहचले पाहीजे.
असा लहानसा प्रयत्न आहे.म्हणूनच मला वाटते .
की तू सूद्धा आमच्या अड्डयात सामील व्हावे .
एकदा येऊन पहा आमच्या ब्लोग अड्डयावर (www.blogadda.com)