माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

७ ऑगस्ट, २००७

आठवणी! शालेय जीवनातल्या!५

ह्याच सहावीच्या वर्षात शेवटी शेवटी मला एक संधी मिळाली ती आकाशवाणीवर सादर होणार्‍या एका रूपकामध्ये. स्वामी विवेकानंदांचे स्मारक कन्याकुमारी येथे उभारावयाचे ठरत होते आणि शाळांशाळांतून त्यासाठी निधी उभा केला जात होता. त्यासाठीच मुंबई आकाशवाणीतर्फे विवेकानंदांच्या कार्यावर आधारित एक रूपक सादर करण्याचे आमच्या शाळेला आमंत्रण मिळाले. आमचे एक शिक्षक आणि चार विद्यार्थी असा एक गट स्थापन केला गेला(त्यात माझाही समावेश होता). शिक्षकांनी एक संवादवजा रूपक लिहिले आणि त्यांच्यासकट आम्ही इतर चौघांनी त्याची कसून तयारी केली.

ठरलेल्या दिवशी मरीन लाईन्सला आम्ही सर्वजण आकाशवाणी केंद्रावर पोचलो. आधी तिथे रंगीत तालीम झाली. त्यावेळी ध्वनिग्राहक(मायक्रोफोन) मध्ये ठेवून त्याच्या आजूबाजूला उभे राहणे, आपला संवाद म्हणून झाला की तिथून चटकन बाजूला होऊन दुसर्‍याला जागा देणे ह्यासंबंधीचे प्रात्यक्षिक झाले. हा कार्यक्रम ध्वनिमुद्रित न करता तसाच्या तसा(लाइव्ह) प्रसारित करायचा होता त्यामुळे कोणतीही चूक होऊ नये म्हणून आम्ही सगळे केंद्रसंचालकांच्या सूचनेनुसार वागण्याचा आटोकाट प्रयत्न करत होतो. खाकरायचे नाही,खोकायचे नाही वगैरे वगैरे सूचना पाळणे नाही म्हटले तरी खूपच जड जात होते. माझ्यासारख्या अशक्त मुलाला त्या अती-वातानुकूलित कक्षात थंडी वाजत होती. घशात खरखर सुरू झालेली होती आणि त्यामुळे बोलण्याआधी नाही म्हटले तरी खाकरावे लागत होते नाहीतर आवाज नीट घशाबाहेर पडत नव्हता. हे सगळे बघून मग आम्हाला एक दहा मिनिटांची चहा -कॉफी पिण्यासाठी सुट्टी देण्यात आली. गरम गरम कॉफी घशाखाली उतरली आणि मग आम्हा सगळ्या मुलांना अंगाभोवती गुंडाळायला शाली देण्यात आल्या. अशा त्या 'शालीन' अवस्थेत आमचा कार्यक्रम एकदाचा निर्विघ्नपणे पार पडला तेव्हा सगळ्या आकाशवाणी कर्मचार्‍यांसकट आम्हीही सुटकेचा नि:श्वास टाकला.

हा कार्यक्रम शालेय कार्यक्रमाच्या अंतर्गत प्रसारित झाल्यामुळे तो दिवसातून दोन वेळा प्रसारित होणार होता. पण दु्सर्‍या वेळी सकाळच्या कार्यक्रमाचेच ध्वनिमुद्रण पुन:प्रसारित होणार असल्यामुळे आम्हाला घरी जाता आले आणि आमचा आवाज आकाशवाणीवरून कसा येतोय हे ऐकण्याची संधीदेखील मिळाली. पण खरे सांगू का आमच्या शिक्षकांव्यतिरिक्त आम्हा सगळ्याच जणांचा आवाज एकसारखाच वाटत होता. प्रत्येकाला त्याचे संवाद माहीत असल्यामुळेच केवळ हा मी, हा तू, असे आम्ही एकमेकांना म्हणत होतो;पण इतरांना तो फरक जाणवत नव्हता. हा माझ्यासारख्याला एक नवाच अनुभव होता.त्या कार्यक्रमाची एक आठवण म्हणून आम्हा सगळ्यांना एक सोनेरी रंगाचा स्वामी विवेकानंदांची छबी असलेला बिल्ला देण्यात आला. काही दिवस आम्ही तो ऐटीत छातीवर मिरवत असू.

माझ्या ह्या विविध गोष्टीत भाग घेणे आणि त्यात पारितोषिके मिळवण्यामुळे उगीचच सगळेजण मला खूप हुशार समजायला लागले. तसा मी हुशार मुळीच नव्हतो आणि नाही ही वस्तुस्थिती आहे. अभ्यासात मी मध्यममार्गी होतो.दहा ते वीस मध्ये माझा क्रमांक येत असे.पण एकदा अशी प्रतिमा तयार झाली की मग ती पुसणे कठीण होऊन बसते.मलाही ह्या गोष्टीचा बराच त्रास होत असे. माझ्या वर्गातल्या पहिल्या पाच क्रमांकात ज्यांचा समावेश होत असे अशी मुले नेहमी मला त्यांच्यापासून कटाक्षाने दूर ठेवीत. मी देखिल माझ्या बरोबरीच्या(बौद्धिक) मुलांमध्ये राहणे पसंत करत असे. ह्या हुशार मुलांना अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीत विशेष प्रावीण्य नसल्यामुळे वर्गात नाही म्हटले तरी मलाच जास्त भाव मिळत असे. अर्थात मला मात्र त्यांच्या हुशारीबद्दल नेहमीच कौतुक मिश्रित आदर वाटत असे. ही मुले इतके भरभरून गुण कसे मिळवतात? शिक्षकांनी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी ह्यांचे हात नेहमीच वर कसे? अशा वेळी मला माझ्या सुमार बुद्धीचे वैषम्य वाटत असे.पण काय करणार अक्कल अशी विकत थोडीच घेता येते? ती तर उपजतच असते.

ह्याच वर्षी आमच्या वर्गात एक विनायक नावाचा अत्यंत हुशार मुलगा दाखल झाला. गोरापान,नाकी डोळी नीटस,खणखणीत आवाज आणि माझ्यासारखाच छोट्या चणीचा हा मुलगा आल्या आल्या आमच्यातलाच एक होऊन गेला आणि बघता बघता तो आमचा नेता देखिल झाला. अतिशय कुशाग्र बुद्धी,आपले म्हणणे ठासून मांडणे आणि ते समोरच्याच्या गळी उतरवणे ह्यातही तो पटाईत होता. त्याचे हे गुण लवकरच दिसायला लागले.तो येईपर्यंत आम्ही प्रत्येक बाकावर एक मुलगा एक मुलगी असे बसत असू.आम्हा मुला-मुलीमध्ये तसा काही भेद असतो हे आमच्या मनात देखिल नव्हते. एकमेकांशी वागण्यात कोणत्याही प्रकारचा वेगळेपणा नव्हता. एकमेकांच्या गळ्यात गळे घालणे,वेळप्रसंगी मारामारी करणे,चिडवणे,रागावणे-रुसणे वगैरे सगळे प्रकार चालत आणि त्यात आप-पर भाव नव्हता.पण विनायक आला आणि बघता बघता त्याने आम्हा मुला-मुलींचे दोन तट केले. मुली वेगळ्या बसायला लागल्या.मुला-मुलींमधला सुसंवाद बघता बघता विसंवादात परिवर्तित झाला. मुलांचे नेतृत्व साहजिकच विनायकाकडे तर मुलींचे नेतृत्व मोहिनीकडे गेले. विनायक येईपर्यंत आमच्या वर्गात मोहिनीचाच पहिला क्रमांक अबाधित होता त्याला आता ग्रहण लागले आणि ती दुसर्‍या क्रमांकावर ढकलली गेली. त्या सहावीच्या वर्षात विनायकाने आपला पहिला क्रमांक काही सोडला नाही.

मुलीना नावे ठेवण्यात विनायक पटाईत होता. तो मुलींविषयी बोलताना 'म्हशी' असे विशेषण लावून बोलायला लागला. आम्हालाही ते विशेषण आवडले आणि सगळेचजण त्याचा मुक्त वापर करायला लागले.साहजिकच मुलीही चिडल्या आणि आम्हाला 'रेडे' संबोधायला लागल्या. पण आमच्यावर त्याचा परिणाम शून्य झाला हे पाहून मुली वैतागल्या. त्यांनी आमच्या वर्गशिक्षकांकडे तक्रार केली की मुले आम्हाला 'म्हशी' असे चिडवतात.त्यावर विनायकाने लगेच "मग त्या आम्हाला रेडे म्हणतात ते का नाही सांगितले?" असा प्रतिप्रश्न केल्यावर ते शिक्षक हसायला लागले. ते हसणे पाहून मुली अजून चिडल्या आणि त्यांनी शिक्षकांना म्हटले, "सर, तुम्ही हसता का? मुलांना तुम्ही शिक्षा का करत नाही?"
सर म्हणाले, "शिक्षा कशाकरता करायची? तुम्हाला ते 'म्हशी' म्हणतात आणि तुम्ही त्यांना 'रेडे' म्हणता. मग झाली की फिटंफाट. एक गोष्ट मात्र मला तुम्हा दोघांची आवडली."
आमच्या प्रश्नार्थक चेहर्‍यांकडे बघून सर म्हणाले, "तुम्ही एकमेकांना चिडवताना का होईना एका जातीचे समजताय हेही काही कमी नाही!"
सरांचे उत्तर ऐकून आमचे सगळ्यांचेच चेहरे पाहण्यालायक झाले होते.

क्रमश:

२ टिप्पण्या:

Yogesh म्हणाले...

वाचत आहे आणि खूप आवडले ... :)

पुढच्या भागाची प्रतीक्षा...

ज्योती कपिले म्हणाले...

Nice memories👍👌