त्यावेळी मी चौथीत होतो. अभ्यासात बर्यापैकी होतो. दरवर्षी नियमित पणे चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन वरच्या वर्गात जात असे. माझा धाकटा भाऊ माझ्यापेक्षा तीन वर्षांनी लहान होता. तो अभ्यासात हुशार होता. तसा तो सगळ्याच गोष्टीत हुशार होता. गोट्या खेळण्यात तो त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या माझ्यासारख्यांना सहज हरवत असे. त्याचा नेम अचूक असल्यामुळे गोट्या,बिल्ले,सिगरेटची पाकीटे वगैरेचा खजिनाच त्याने जिंकून गोळा केला होता.त्याचे लक्ष अभ्यासात कमी आणि खेळात जास्त असा सगळा प्रकार होता.
माझी चौथीची परीक्षा मी चांगल्या गुणानी उत्तीर्ण झालो आणि आता मला माध्यमिक शिक्षणासाठी जवळच असलेल्या दुसर्या खाजगी शाळेत प्रवेश घेण्याचे वेध लागले होते. माझा हा हुशार भाऊ मात्र पहिलीतच चक्क एका विषयात नापास झालेला होता आणि तो म्हणजे गणित विषय होता. हा निकाल बघून आम्हा सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. कारण कोणतेही गणित तो तोंडी अगदी सहजगत्या सोडवत असे. आम्हा सगळ्यांना रोज दिवेलागण झाली की शुभंकरोती,परवचा वगैरे सगळ्या गोष्टी म्हणण्याची आई-वडिलांनी सवय लावलेली होती आणि म्हणूनच ज्याचे अडीचकी पर्यंतचे पाढे पाठ होते तो असा गणितात कसा नापास होईल हे कोडे उलगडेना. त्यातून त्याला गणितात 'शून्य भोपळा' मिळालेला होता. हे देखिल अतिशय नवल वाटण्यासारखे होते.
ह्या संबंधात माझ्या वडिलांनी त्याला विचारले तेव्हा त्याला काहीच सांगता आले नाही ;पण त्याच्याच बरोबरच्या आमच्याच वाडीतील एका मुलाने पुरवलेली माहिती गंमतीशीर होती.त्याच्या म्हणण्यानुसार हा माझा भाऊ परीक्षेच्या दिवशी शाळेत गेला होता आणि त्याच्या खिशात नेहमीप्रमाणे गोट्याही होत्या. आम्ही शाळेत नेहमीच वर्ग भरण्याआधी चांगले अर्धातास जात असू आणि तिथे आपापसात खेळत असू.तर परीक्षेच्या दिवशी तो असाच शाळेच्या मागच्या बाजूला इतर काही मुलांबरोबर गोट्या खेळत बसला. खेळताना वेळेका़ळाचे कोणतेही बंधन नसल्यामुळे त्या दिवशीच्या गणिताच्या परीक्षेला तो हजरच राहिला नाही आणि साहजिकच त्याला त्यात शून्य गुण मिळाले. हे सगळे त्याच्याही लक्षात आले नाही. त्या दिवशी त्याने घरी येताना दोन्ही खिसे भरून गोट्या जिंकून आणल्या होत्या आणि त्याच खूषीत तो बाकीचे सगळे विसरला होता.
आता प्रश्न पडला की काय करायचे? सुखासुखी एक वर्ष फूकट कसे घालवायचे? मग माझ्या वडिलांनी आमच्या हेड-मास्तरांना एक चिठ्ठी लिहिली आणि त्यात भावाचे ते सगळे प्रताप लिहून दिलगिरी व्यक्त केली. तसेच त्याची पुन्हा एकदा गणिताची परीक्षा घेण्याची विनंती केली. ही चिठ्ठी त्यांनी मला दिली आणि सांगितले की हेड-मास्तरांना नेऊन दे म्हणून! मंडळी काय सांगू मला तर घामच फूटला पण वडिलांची अवज्ञा करणे म्हणजे मार खाणे हे माहित असल्यामुळे त्यांना नाही म्हणणे शक्यच नव्हते आणि तिथे त्या महा-भयंकर हेड-मास्तरांच्या समोर जाणे हेही अशक्य होते. मग आता काय करणार? 'इकडे आड आणि तिकडे विहीर' अशा परिस्थितीत मी सापडलो होतो.
कोणताच इलाज नसल्याने मी माझ्या लहान भावाला घेऊन शाळेत गेलो. हेड-मास्तरांच्या खोलीच्या आसपास बराच वेळ रेंगाळत राहिलो पण आत जाण्याची हिम्मत होत नव्हती.हातपाय थरथरत होते. वेळ निघून चालला होता आणि ज्यासाठी आलो होतो ते काम करण्याची हिम्मतही हळूहळू कमी होत होती. आमचे दोघांचे घुटमळणे चालूच होते इतक्यात साक्षात जमदग्नीचा अवतार असे ते महा-भयंकर प्रकरण अंगावर चाल करूनच आले. आमचे तिथले ते तसे घुटमळणे त्यांच्या काक दृष्टीतून सुटणे अशक्यच होते हे आम्ही साफ विसरलो होतो.त्यांनी करड्या आवाजात प्रश्न केला. "इथे काय चाललेय तुमचे? आता शाळेला सुट्टी सुरू झालेली आहे मग इथे कसले उपद्व्याप करताय?आणि कोण तुम्ही?उत्तरादाखल मी कसेबसे त्यांच्या दिशेने बघितले आणि पुन्हा मान खाली करून त्यांच्या दिशेने हात करून ती चिठ्ठी त्यांना दिली.त्यांनी मोठ्या त्रासिक नजरेने चिठ्ठी उलगडून बघितली,वाचली आणि आम्हाला दोघांना त्यांनी आत बोलावले. मला वाटले आता बहुदा छडीचा प्रसाद मिळणार! आपले काही खरे नाही! इथून पळून जावे असा विचार मनात आलाच होता तेव्हढ्यात इतका वेळ गायब असलेला शाळेचा शिपाई नेमका टपकला आणि आता इथून सुटका नाही हे लक्षात आल्यामुळे नाईलाजाने कसायाच्या मागे जाणार्या बोकडाप्रमाणे आम्ही दोघे आत गेलो.
आत गेल्याबरोबर हेमांनी प्रथम मलाच धारेवर धरले.पण मी ह्यावर्षी उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झालोय आणि अमूक अमूक शाळेत ५वीत प्रवेश घेणार आहे हे ऐकून चेहेर्यावरचे करडे भाव किंचित सौम्य झाले.मग भावाची परीक्षा सुरू झाली. त्यांनी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची सटासट आणि बिनचूक उत्तरे त्याने दिली आणि मग त्या जमदग्नीचे एक सौम्य रूप आम्हाला पाहायला मिळाले. लगेच त्या चिठ्ठीवर त्यांनी माझ्या वडिलांना उद्देशून 'कु. विलास वरच्या वर्गात गेला' असे दोन शब्द लिहिले आणि 'जा ! तू आता दूसरीत गेलास!' असे भावाला म्हणून चक्क मिशीतल्या मिशीत हसले!मग आम्ही दोघांनी पुढे होऊन त्यांना नमस्कार केला आणि त्यांचा आशिर्वाद घेऊन मोठ्या आनंदात रमत-गमत घरी पोचलो.
२ टिप्पण्या:
chaan....tumacha blog vachayla khup maja yete...me regularly vachato...
छान लिहिला आहे लेख. अगदी सगळा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला. किती तपशील लक्षात आहे तुमच्या! तुमच्या स्मरणशक्तिला दाद!:-)
टिप्पणी पोस्ट करा