मैदान माणसांनी तुडुंब भरले होते. मुंगी शिरायला देखिल जागा नव्हती. भक्तगण ज्यांची आतुरतेने वाट बघत होते ते 'अनंत कोटी ब्रह्मांड नायक सद्गुरु स्वामी बाबा अत्त्यानंद बापू महाराज' हे एकदाचे प्रकट झाले.
कमरेला चौकडीची लुंगी,उघडे बंब,डोळ्याला दिवस-रात्र(डे ऍंड नाईट) चष्मा, खास राखलेली हनुवटीखालची छोटीसी काळी-पांढरी(पांढरीच जास्त!) दाढी,डोक्यावर विरळ झालेले तसेच काळे-पांढरे केस अशा अवतारातल्या(अवतारच तो!) महाभागाला पाहून काही जण शंकित झाले.
अरे हा कसला महाराज? अशी शंका आपापसात व्यक्त करू लागले.
काही नाही हो, सगळा भंपकपणा हल्ली सगळीकडे वाढलाय! इतक्या बाबा-बुवांमधे आणखी एकाची भर झाली म्हणायचे! सगळेच एकजात चोर आहेत! एकेकाचे नखरे पहा काय आहेत ते.
हे उद्गार घेलाशेठला ऐकवेनात. तो लगेच पुढे सरसावला आणि म्हणाला, तुमी घाटी लोक एकदम पागल हाय! अरे हे स्वामी हाय ना ते एकदम चोक्कस हाय! ते शेर बजार बाबत जे सांगते ना ते एकदम फीट्ट असते(शेठजी म्हटला की शेअर बाजारा बद्दलच बोलणार! म्हणतात ना 'भटा,भटा! तुझे वर्म काय? तर, कापसाचे जानवं! तसलाच हा प्रकार). पेला वखताला मी तेचा लेक्चर ऐकला तवा मी ते परमाने शेर बजार मंदी पैसा लावला पन मला घाटा झाला. मला लई दुक झाला. मी स्वामीला प्रायवेटमंदी विचारला तवा तेने मला जे उत्तर दिला ना तवापासून मला लई फायदाच फायदा जालाय. तुमाला घाटी लोकांला तेंचा इंपोटन्स(महत्व) कलनार नाय. जरा तेची भासा नीट समजून घेइल ना तर तुमचा बी कल्याण होऊन जाईल.
घेलाशेठचे अनुभव ऐकून लगेच मी पुढे सरसावलो. शेअर बाजार म्हटल्या बरोबर माझ्याच सारखे अजून काही जण पुढे सरसावले आणि घेलाशेठला चिकटले. मी घेलाशेठला प्रश्न केला, ते म्हाराज काय बोलले आमाला पण सांगा ना!
घेलाशेठ सांगू लागला! अरे तुमाला सांगतो मी स्वामीचा पेली वखत लेक्चर ऐकला ना तवा स्वामी बोलला व्हता की, आज शेर बाजारमंदी शेर विकून टाका. असेल-नसेल तेवडा विका. दोन दिवसांनी परत विकत घ्या कमी भावामंदी!
मी लगेच माज्याजवल्चे समदे शेर विकूनशान टाकले आनि मार्केटमंदी एकदम तेजी आली. माजा लई नुसकान जाला. मी येऊन स्वामीचा पग धरला आनि तेला समदा सांगितला. स्वामीने माज्या डोस्क्यावर हात ठेवला आनि मला बोलला, शेठजी तुमाला आमची भासा कलली नाय. आमी 'विका' असे सांगतो तवा तुमी विकत घ्यायचे असते आनि 'विकत घ्या' असे सांगतो तवा विकायचे असते!
मंग मी तसाच केला तवापासून मला कदी बी घाटा नाय जाला. अरे आपन तर हे स्वामीचा दर्सन घेतल्याबिगर चाय बी पीत नाय. एकदम पॉवरबाज हाय हा स्वामी.
घेलाशेठचे ते स्वामीपुराण ऐकून मी म्हटले, ह्याऽऽ! त्यात काय! माझ्या बाबतीतही हे असेच घडते! मी माझ्याकडचे शेअर्स विकले की बाजार चढतो आणि विकत घेतले की बाजार कोसळतो. हे तर कोणत्याही सामान्य गुंतवणुकदाराच्या बाबतीत अगदी असेच घडते. मी सुध्दा माझ्या मित्रांना सांगतो की, बाबानो मी जसे करेन त्याच्या अगदी उलट तुम्ही करा म्हणजे तुमचा नेहमीच फायदा होईल आणि तसे करणार्यांना फायदाही होतो. तेव्हा तुमचा हा स्वामी मला काही पॉवरबाज वगैरे वाटत नाही. माझ्यासारखाच पदोपदी ठेचा खाल्लेला एखादा गुंतवणुकदार दिसतोय. असो. तुम्हाला फायदा होतोय ना, मग घ्या फायदा!
माझ्या ह्या वक्तव्यावर घेलाशेठने माझ्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकत मौनव्रत धारण केले.
क्रमश:
३ टिप्पण्या:
Majeshir ahe. Yeu det pudhacha bhag lavkar.
अरे वा.......सगळ्यांच्या अगदी मनातलं बोल्लात. बस स्टॉपवर सुद्धा आपल्या समोरच्या थांब्यावर जास्त बस थांबतात.
आने दो और भी :)
ब्लॉगची नवी सजावट एकदम सुरेख! मस्त दिसतोय ब्लॉग आता :)
अस कस म्हनता आपन. आमचा स्वामि लई पोवरफुल हाय
टिप्पणी पोस्ट करा