दहा वर्ष झाली त्या गोष्टीला. तरीही प्रसंग कालच घडल्यासारखा वाटतोय. आज इतक्या वर्षानंतरही तिची उणीव पदोपदी भासतेय.
जनकवी भा.रा. तांबे ह्यांनी म्हटल्याप्रमाणे..
जन पळभर म्हणतील हाय हाय
मी जाता राहिल कार्य काय....
हे तर खरंच आहे. राम-कृष्ण गेले तरी जगरहाटी सुरूच आहे की. कोण कुणासाठी थांबलंय? दोन मिनिटांची मूक श्रद्धांजली,बारावं-तेरावं आणि वर्षश्राद्ध किंवा स्मृतिदिन ह्याउप्पर आपण दुसरं काय करतोय? जाणारं माणूस जातं, मागे रहिलेली माणसं क्षणिक हळहळतात आणि पुन्हा आपल्या कामाला लागतात. हे असंच चालायचं हो. कुणी तरी म्हटलंच आहे ना....
एकटेच येणे येथे,एकटेच जाणे
एकट्याच जीवाचे हे एकटेच गाणे....
ह्या जगात येणेही एकटेच आणि इथून जाणेही एकटेच. येतांना लोक ’त्या’ला(जीवाला) रडवतात आणि स्वत: हसतात आणि ’तो ’ जाताना लोकांना रडवून जातो. हाच का काव्यात्म न्याय?
दहा वर्षांपूर्वी ’ती’ही अशीच गेली मला सोडून...माझ्या पदरात एक लहान लेकरू टाकून. कसं जाववलं तिला? माझं तिच्यावरचं आणि तिचं माझ्यावरचं प्रेम, तिची लेकरावरची माया आणि तिचीच... जगण्याची दूर्दम्य इच्छा देखिल तिला परावृत्त नाही करू शकली...जाण्यापासून. एरवी कुठेही जातांना तिला माझी सोबत लागायची; पण ह्या अनंताच्या प्रवासाला ती एकटीच निघून गेली. तिला एकटीला भिती कशी नाही वाटली?
आमचं दोघांचं ठरलं होतं..अगदी म्हातारं होईस्तो जगण्याचं..एकमेकांच्या साथीने.
अहो,असं काय करताय,ती कानटोपी घाला ना,सर्दी होईल अशानं. आताशा सोसत नाही तुम्हाला थंडी....असं थरथरत्या आवाजात तिचं म्हणणं..
मग मी म्हणावं...अगं,तुही घे हो ती शाल लपेटून अंगाभोवती. हवेत किती गारठा पडलाय बघ, नंतर मग खोकत बसतेस रात्रभर.....
असं अगदी भविष्यातली चित्रं रंगवत आम्ही गप्पा मारायचो...मी माझं वचन पाळलं,पण तिने तिचे वचन नाही पाळलं. अर्धा डाव टाकून गेली...असं करणं शोभलं का तिला?
आम्ही दोघेच असतांना तासंतास एकमेकाशी गप्पा मारायचो. रोज गप्पा मारण्यासारखं काय असतं हो एवढं?असा प्रश्न कुणालाही पडेल; पण आम्हा दोघांना कधी तसा प्रश्नच पडला नाही. आमच्या गप्पांना कोणत्याच विषयाचं वावडं नव्हतं की बंधनही नव्हतं. माझं बोलणं ऐकतानाचं तिचं ते टक लावून पाहाणं.....जाऊ द्या... आता फक्त आठवणीच आहेत. जातांना तिला इतकंही कळू नये की आता माझं बोलणं कोण ऐकेल म्हणून?
१९डिसेंबर १९८६ ला माझ्या जीवनात आली...माझी प्रिया.... आणि १९ डिसेंबर १९९९ ला निघून गेली अनंताच्या प्रवासाला.... तेरा वर्षांचा सुखी संसार असा अचानक सोडून ती का बरं गेली असावी....आजही ’ह्या’ प्रश्नाचे उत्तर अजूनही मिळालेलं नाहीये मला....
???
५ टिप्पण्या:
maajhe saasre aani baba doghahi yach phase madhun jat aahet..
aani mi aani majha navra tumchi mula jyala samore jatayat tya phase madhye aahot..
I am so sorry...
काका, माझ्या शब्दांनी तुमचं दु:ख कमी होणार नाही पण तुमचं दु:ख मी समजू जरूर शकते. तुम्हाला टॅगलंय हे सांगायला आले होते, तेव्हा ही पोस्ट वाचली.
http://www.mogaraafulalaa.com/2009/12/blog-post_24.html
काका, खूप वाईट वाटलं. देव तुम्हाला तुमच्या दु:खातून बाहेर पडण्याचे बळ देओ.
याला म्हणतात आयुष्य शब्दात पकडणं. खूप छान लिहिलंय. डोळे ओलावले. पण तुम्ही कुणाच्याच प्रतिक्रियांना उत्तरे का नाही देत ते नाही कळले.
विजयजी, नेमकं काय उत्तर द्यावं हेच कळत नाही. अशा बाबतीत नुसते धन्यवाद म्हणणंही योग्य वाटत नाही.
टिप्पणी पोस्ट करा