माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२४ एप्रिल, २००८

भगीरथाचे वारस!

पाणी म्हणजेच जीवन असे आपण म्हणतो. पण आपल्याला मिळणारे पाणी कुठून येते? कसे येते? वगैरे प्रश्न आपल्याला कधी पडलेत काय? पडले असल्यास त्याची माहिती आपण कधी मिळवण्याचा प्रयत्न केलाय काय? काही अपवाद सोडल्यास आपण एकूण सगळेच जण त्याबद्दल फारसा विचार कधी करत नाही हेच खरे; मग पाण्याचा अभाव, म्हणून पडणारा दुष्काळ, दुष्काळपीडित लोक, त्यांच्यासाठी रोजगार हमी योजना वगैरे सारखी चालणारी सरकारी कामे वगैरेबाबत आपण कधी विचार करत असू असेही वाटत नाही. ह्याला कारण म्हणजे शहरी भागात न जाणवणारी पाण्याची टंचाई. त्याच्या उलट परिस्थिती खेड्यापाड्यात असते. विशेषतः उन्हाळ्यात, नदी, नाले, ओढे आटलेले असतात आणि मग तिथल्या आया-बायांना मैलोन-मैल पाण्यासाठी भटकावं लागतं; हे सगळे आपण वृत्तपत्रात वाचत असतो पण तरी त्याची म्हणावी तशी धग आपल्याला जाणवत नाही हेच खरे. अधेमधे कधी जलवाहिनी दुरुस्तीसाठी अथवा तलावात पाण्याचा साठा कमी आहे म्हणून काही टक्के पाणी कपात वगैरेची घोषणा महानगरपालिकेकडून झाली की आपल्याला त्याची तीव्रता कळते पण ती तेव्हढ्यापुरतीच असते.

पण ह्या जगात सगळेच काही आपल्यासारखे आत्मकेंद्रित आयुष्य जगणारे नसतात. पाणी सद्या जितक्या प्रमाणात आपल्याला उपलब्ध आहे त्याचा जर योग्य पद्धतीने आपण वापर आणि वाटप नाही केले तर भविष्यात पाण्यावरून युद्धे होतील असा गर्भित इशारा काही तज्ञांनी दिलेला आहे हे आपण वाचलेही असेल. काही लोक नुसतेच इशारे देतात, पण काही लोक केवळ इशारे देऊन स्वस्थ बसत नाहीत तर त्यावर तोडगा शोधण्यासाठी अविरत धडपडतात. त्यासाठी आपले आयुष्यही पणाला लावतात. अशाच पैकी एक आहेत 'पाणी पंचायत' चे विलासराव साळुंखे.

मुळातच पाणी पंचायत हा काय प्रकार आहे हे जाणून घ्यायचे असेल तर मग आपल्याला विलासरावांचा सगळा जीवनप्रवास माहिती करून घ्यायला हवा. पाणी अडवा,पाणी जिरवा, पाणी साठवा आणि त्याचे समान वाटप करा... थोडक्यात..पाण्याचे सुयोग्य नियोजन करणे असा जणू मंत्रच आहे विलासरावांच्या कार्याचा. वर म्हटल्याप्रमाणे खेड्यापाड्यात उन्हाळ्यात पाण्यासाठी होणारी परवड पाहिली आणि मग विलासरावांचे विचारचक्र सुरू झाले. त्यातून मग ह्या समस्येचा त्यांनी कसून अभ्यास केला तेव्हा लक्षात आले की सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडूनही महाराष्ट्रातला कैक भाग हा दुष्काळग्रस्त आहे. पावसाचे पाणी नदी,नाले -ओढ्यांतून वाहत जाऊन समुद्राला मिळते हे त्याचे एक कारण. दुसरीकडे जिथे हे पाणी मोठमोठ्या धरणात साठवले जाते त्याचे काय होते? ह्या प्रश्नाचा पाठपुरावा केल्यावर लक्षात आले की सरकारी योजनेमुळे ही जी मोठमोठी धरणे बांधली गेली त्याचा जास्तीत जास्त फायदा हा त्या त्या ठिकाणच्या सधन शेतकर्‍यांनाच झालाय. त्यातूनच भरपूर पाणी लागणारे ऊसासारखे पीक घेतल्यामुळे इतर लोकांपर्यंत पाणी पोचतच नाही. धरणाच्या आसपास असणारे शेतकरीच त्या पाण्याचे लाभार्थी ठरतात आणि इतरजण पाण्याअभावी शेतीच करू शकत नाहीत. म्हणजे एका मर्यादित भागाचा विकास तर बाकी सर्व भकास!

दुष्काळ निवारणार्थ सरकारने हाती घेतलेली पाझर तलाव निर्माण वगैरेसारखी कामे कशी चालतात. त्यात काय फायदे/त्रुटी आहेत वगैरे गोष्टींचा साधकबाधक अभ्यास त्यांनी केला. ह्यातूनच काही धडा घेऊन विलासरावांनी आपली योजना तयार केली. त्यात जमेल तिथे पाणी अडवण्यासाठी छोटे छोटे बांध बांधणे,पाणी साठवण्यासाठी तलाव सदृश खड्डे खणणे,जेणेकरून पावसाचे जास्तीत जास्त पाणी अडवता येईल असे धोरण आखले. अडवलेले,साठवलेले पाणी मग सर्वांना समान वाटून देणे. कमी पाण्यात होणारी पिके घेणे ... हे सगळे कसे करायचे त्याबद्दल योजना आखल्या. हे सगळे एकट्याच्या बळावर करणे वाटते तितके सोपे नाही म्हणून स्थानिक लोकांशी बोलून,त्यांना ह्या गोष्टीचे महत्त्व पटवून त्यात सहभागी करून घेतले. अर्थात हे काम इतक्या सहजतेने झाले नाही. कारण जे आजवर शक्य झाले नाही असले स्वप्न दाखवणारा हा माणूस खरंच काही करून दाखवू शकेल काय? आणि त्यात त्याचा काय स्वार्थ दडलाय? असे काही प्राथमिक प्रश्न तिथल्या स्थानिकांना पडणे स्वाभाविकच होते. पण अडून राहण्याचा विलासरावांचा स्वभाव नसल्यामुळे जे आले त्यांना बरोबर घेऊन त्यांनी काम सुरू केले. ह्या संबंधीचा पहिला प्रयोग त्यांनी पुरंदर तालुक्यातील नायगाव ह्या दुष्काळी गावामध्ये केला. तो कमालीचा यशस्वी झाला.तिथे निर्माण झालेली हिरवीगार शेती, वनसंपदा पाहून जो तो त्या प्रकल्पाला भेट द्यायला येऊ लागला आणि मग ह्यातून पुढे सुरू झाली पुढची वाटचाल,पुढली चळवळ!

मंडळी हे जितक्या सहजतेने लिहिले तितके सहज झालेले नाही. ही चळवळ पुढे कशी गेली, त्याला किती यश आले,सरकारने ह्या असल्या प्रयोगांना किती आणि कसे साहाय्य केले अथवा नाही. त्या त्या वेळच्या सत्ताधार्‍यांनी, विशेषतः लोकनेते म्हणून गाजलेल्यांनी कसा/किती प्रतिसाद दिला, लोकांनी ह्या चळवळीला किती उचलून धरले,विरोध केला हे सर्व जाणून घ्यायचे असेल तर मुळातूनच "भगीरथाचे वारस" हे वीणा गवाणकर लिखित पाणी पंचायतच्या विलासराव साळुख्यांच्या कार्यासंबंधीचे सचित्र कथन वाचायला हवेय.

पेश्याने विद्युत अभियंता असणारे विलासराव एक यशस्वी उद्योजक म्हणून प्रसिद्ध होते. परंतु आधी काही दिवस आपला व्यवसाय सांभाळून आणि नंतर आपली पत्नी आणि विश्वासू सहकारी यांच्यावर उद्योगाची जबाबदारी सोपवून पूर्णपणे त्यांनी ह्या कार्याला वाहून घेतले आणि हे करतानाच देह ठेवला.त्यांची ही कहाणी मुळातूनच वाचण्यासारखी आहे.

भगीरथाचे वारस
लेखिका: वीणा गवाणकर
राजहंस प्रकाशन,पुणे.
किंमत १६०रू.

१३ एप्रिल, २००८

दशरथ पुजारी!



अशीच अमुची आई असती सुंदर रूपवती
आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती

हे गीत जेव्हा मी पहिल्यांदा ऐकले तेव्हा साधारण दहा-बारा वर्षांचा असेन नसेन पण ज्या व्यक्तीने हे गाणे गायलेय त्याने त्याचवेळी माझ्यावर चांगलेच गारूड केलेय. त्या गायकाचे नाव आहे दशरथ पुजारी.
दशरथ पुजारी हे एक उत्तम संगीतकार आणि तितकेच उत्तम गायक आहेत. जनकवी पी. सावळाराम ह्यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार नुकताच पुजारींना मिळालाय. हे वृत्त वाचताच मनात उठलेले तरंग कागदावर उमटवण्याची उर्मी आलेय.

३०ऑगस्ट १९३० साली बडोद्यात त्यांचा जन्म झाला. गोपाळराव भातंब्रेकर ह्यांच्याकडे त्यांनी ७ वर्षे आपले गायनाचे धडे गिरवले. खरे तर पुजारींना शास्त्रीय संगीतात पुढे वाटचाल करायची होती पण विधिलिखित काही वेगळेच होते. पुढे काही गोष्टी अशा घडल्या की भावगीतांकडे वळले आणि मग मराठी भावगीतांना एक अवीट गोडीचा गायक आणि उत्तम संगीतकार लाभला. गायक म्हणून त्यांना जास्त संधी मिळाली नाही तरी त्यांनी गायलेली सगळीच गाणी विलक्षण गाजली. त्यामानाने संगीतकार म्हणून तर त्यांची कारकीर्द खूपच भव्य झालेय.

आधी म्हटल्या प्रमाणे दशरथ पुजारी ह्यांनी स्वत: गायलेली गाणी तशी खूपच कमी आहेत. वर सांगितलेले 'अशीच अमुची आई असती ' तसेच ' अजून त्या झुडपांच्या मागे सदाफुली दोघांना हसते ' किंवा 'हरी भजनाविण काळ घालवू नको रे ' हे भक्तिगीत काय, ही सगळी गाणी गाजलेली आहेत.अजूनही आहेत पण चटकन ओठावर आली ती इथे मांडली.

सद्याच्या पिढीने पुजारींना ऐकलेले नसेलही कदाचित पण त्यांनी संगीतबद्ध केलेली अवीट गोडीची आणि गाजलेली कैक गाणी सुमन कल्याणपूर आणि माणिक वर्मा ह्यांनी गायलेली आहेत. त्यापैकी काही गाणी आपण निश्चितच ऐकली असण्याची शक्यता आहे.

सुमन कल्याणपूर ह्यांनी गायलेली काही गीते अशी:
१) आकाश पांघरूनी जग शांत झोपलेले,घेऊन एकतारी गातो कबीर दोहे
२) असावे घरटे अपुले छान
३) केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोडवा
४)अजून नाही जागी राधा, अजून नाही जागे गोकूळ
५) कृष्ण गाथा एक गाणे जाणते ही वैखरी, एकतारी सूर जाणी श्री हरी जय श्री हरी
६) जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे, निराधार आभाळाचा तोच भार साहे
७) चल उठे रे मुकुंदा,झाली पहाट आता
८)झिमझिम झरती श्रावणधारा धरतीच्या कलशात, प्रियावीण उदास वाटे रात
९)ते नयन बोलले काहीतरी, मी खुळी हासले खुळ्यापरी
१०) मृदुल करांनी छेडीत तारा स्मरते रूप हरीचे मीरा
अशी किती तरी अवीट गोडीची गाणी आहेत. सांगावीत तितकी कमी आहेत.
पुजारी साहेबांनी संगीतबद्ध केलेली आणि सुमनताईंनी गायलेली काही गाणी इथे ऐकता येतील.
( सुमनताईंनी गायलेल्या काही गाण्यांचा हा जो दुवा मी दिलेला आहे त्यातील "१) जगी ज्यास कोणी नाही २)मृदुल करांनी छेडीत तारा ३) झिमझिम(रिमझिम) झरती श्रावणधारा आणि ४) सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले" ही गीतेच पुजारी साहेबांनी संगीतबद्ध केलेली आहेत. बाकीची ४ गीते अशोक पत्की आणि १ गीत हे वसंत प्रभू ह्यांनी संगीतबद्ध केलेले आहे ह्याची कृपया नोंद घ्यावी.

कवितेत जरी रिमझिम असले तरी सुमनताईंनी ते झिमझिम असेच गायलेले आहे.
कदाचित "झिमझिम झरती" अशा अनुप्रासामुळे निर्माण होणारी सहजता आणि गोडवा लक्षात घेऊन तसा बदल करण्याचे स्वातंत्र्य पुजारी साहेबांनी घेतले असावे असे वाटते.)



आता माणिक वर्मा ह्यांनी गायलेली काही गीते पाहा.
१)जनी नामयाचि रंगली कीर्तनी, तेथे चक्रपाणी धाव घेई
२)भाग्य उजळले तुझे चरण पाहिले
३) या मुरलीने कौतुक केले,गोकुळाला वेड लाविले
४)चरणी तुझिया मज देई, वास हरी
५)त्या सावळ्या तनूचे मज लागले पिसे ग
६)रंगरेखा घेउनी मी भावरेखा रेखिते
७)क्षणभर, उघड नयन देवा

मंडळी सहज आठवली ती गाणी दिली आहेत. अजूनही बरीच आहेत आणि ती देखिल सुमधुर आहेत.
सुधीर फडके उर्फ बाबुजींसारखाच आवाजात गोडवा असलेला आवाज हे पुजारींचे वैशिष्ट्य आहे. त्यांना पार्श्वगायनात मिळावी तशी संधी मिळाली नाही हे त्यांचे आणि आपल्या रसिकांचेही दुर्दैव म्हणायचे.
*******************************************
हा लेख लिहून चढवायचा राहिला होता. कालच दशरथ पुजारी यांना चतुरंग प्रतिष्ठान आणि म्हैसकर फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा 'चतुरंग संगीत सन्मान ' पुरस्कार जाहीर झाला होता आणि आज(१३ एप्रिल २००८) त्यांच्या निधनाची बातमी आली हा एक दूर्दैवी योग आहे असे राहून राहून वाटतेय.
पुजारी साहेबांना माझी भावपूर्ण आदरांजली.

१२ एप्रिल, २००८

मराठी माणूस,हिंदू माणूस आणि भारतीय नागरिक!..काही साम्यस्थळे!

विषय पाहून चक्रावलात? विषय फार गहन आहे? अहो हे मला माहीत आहे हो. पण मी काठाकाठानेच पोहणार आहे. कारण फार खोलात शिरण्याची माझी क्षमता नाहीये ह्याची मला पूर्ण जाणिव आहे. ह्या तिघांच्यात जाणवणार्‍या दोषांत(मी इथे फक्त दोषांबद्दलच बोलणार आहे) एक समानता आढळते. त्याबद्दलची माझी काही ढोबळ निरीक्षणे मी इथे नोंदवणार आहे. त्यावर आपलीही मते जाणून घ्यावीत म्हणतो.

काही ठळक दोष जे वरील तिघात समान आहेत.

१)कृती कमी उक्ती जास्त. म्हणजे घोषणा करण्याची उपजत आवड पण अंमलबजावणीच्या नावाने बोंब.
२)मुत्सद्दीपणाचा अभाव. जे करायचे त्याची करण्याआधी जाहीर चर्चाच फार,त्यामुळे विरोधकांचे चांगलेच फावते.
३)अती सहिष्णुता. आपल्या विरोधात कुणी अवाजवी बोलले,वागले तरी त्याचा योग्य वेळी योग्य त्या प्रकारे बंदोबस्त करणे तर दूरच पण मनाचा उदारपणा दाखवण्यासाठी तिथे सोयिस्कर दुर्लक्ष करणे.
४)स्वत:च्या माणसांवर उठसूठ टीका करणे. प्रतिस्पर्ध्याला वचक बसेल असे वागण्याऐवजी स्वत:च्याच लोकांना अक्कल शिकवणे.
५)एकीचा अभाव. आपापसात सामंजस्य निर्माण करण्याऐवजी दुही कशी वाढेल अशी वक्तव्ये आणि वागणूक करणे.

मंडळी मी वर लिहिलेले सगळे दोष हे ममा(मराठी माणूस, हिंमा(हिंदू माणूस) आणि भाना(भारतीय नागरिक)ह्यांच्यामध्ये कमीजास्त प्रमाणात आढळतात.पण ह्यामध्ये ममा हा सर्वात कमजोर आहे,त्यानंतर हिंमा आणि मग भाना. हा नेमका काय प्रकार आहे? चला पुढे वाचा.

ममा:आपल्याच प्रदेशात(महाराष्ट्रात)हा आता उपरा ठरायला लागलाय.इथले राजकीय नेते मराठीसाठी आणि मराठी माणसासाठी अमुक करू आणि तमुक करू असा नुसता घोषणांचा मारा करत असतात.पण कृतीच्या नावाने शून्य. कागदोपत्री मराठी भाषा जरी इथली राजभाषा असली तरी सगळे कागदी व्यवहार अजूनही इंग्लिश मध्ये आणि इतर सर्वसामान्य व्यवहार हिंदीमध्ये चालतात.नोकरी धंद्यात इथला भुमिपुत्र म्हणून ज्याला प्राथमिकता मिळायला हवी त्या ममा ला कुणी हिंग लावूनही विचारत नाही. मराठी अस्मितेचे गाजर दाखवून काही लोक आंदोलनं वगैरे करतात आणि त्यात मराठी माणूसच भरडला जातो. परप्रांतीयांना फुकटची इतरांची सहानुभूती मिळते. जे काही मराठी भाषा आणि ममा साठी करायचे ते बिनबोभाटही करता येत असते. पण इथल्या लोकांना,विशेष करून राजकारण्यांना असे काही करण्याऐवजी मोठमोठ्या घोषणा करण्यात आणि स्वत:भोवती दिवे ओवाळून घेण्यातच स्वारस्य असते. त्याला आम ममाशी काहीही देणेघेणे नसते.
अशा तर्‍हेच्या घोषणांमुळे विरोधकांचे मात्र फावते आणि मग आपली एकत्रित शक्ती ह्याविरुद्ध उभी करून महाराष्ट्र आणि ममाला संकुचित,जातीयवादी वगैरे ठरवून मोकळे होतात.

आता जेव्हा संपूर्ण देशाचा विचार करतो तेव्हा ममाच्या जागी हिंमाला ठेवा. इथेही वरचे सर्व निकष लागू होतात. हिंदू नेते हिंदूंच्या भल्यासाठी(हिंदू बहुसंख्यांक असल्यामुळे ते साहजिक आहे) जे करायचे ते बिनबोभाटपणे करू शकतात पण त्यांना तसे काही करण्याच्या ऐवजी फुकट प्रसिद्धी हवी असते. त्यामुळे राणा भीमदेवी घोषणा करायच्या की ज्यामुळे निधर्मीवादाची झूल पांघरलेल्यांच्या हातात एक आयतेच हत्यार मिळते.इथे हिंमाच्या हिताचे म्हणजे दुसर्‍यांच्या अहिताचे असे नसते पण घोषणा करणार्‍यांना काही तरी सनसनाटी निर्माण करायची असते असे त्यांच्या वक्तव्यावरून कुणालाही वाटू शकते; त्यामुळे त्यावरून रण माजते आणि मूळ विषय बाजूलाच जातो.सर्व जनतेला रोजगार हमी.अन्न,वस्त्र,निवारा,पाणी अशा प्राथमिक गरजा पुरवण्यासाठी
प्राथमिकता देण्याऐवजी नसलेले धार्मिक प्रश्न उकरून काढण्यात ह्या नेत्यांना स्वारस्य असते.त्यामुळे होते काय की इथला बहुसंख्य हिंमा हा उपरा ठरतो.त्यातून हिंदूंमधील तथाकथित विद्वान आणि स्वत:ला पुरोगामी म्हणवणारी माणसे नुसते ’हिंदू’ असे काही ऐकले की लगेच कावकाव करायला सुरुवात करतात.त्यांना अन्य धर्मीयांनी स्वत:ला त्या धर्माचे अनुयायी म्हटले तर त्यात काहीही वावगे वाटत नाही पण हिंमा ने आपण हिंदू आहोत असे म्हटले तर ते जातीयवादाचे द्योतक मानले जाते.

हाच निकष आंतर्राष्टीय पातळीवर भाना ला लागू पडतो. चीन,अमेरिका,पाकिस्तान भारताला अक्कल शिकवायचा प्रयत्न करतात. स्वत:हून कधी कुणावर आक्रमण न करणार्‍या भारतीयांना शांतता आणि संयमाचे धडे दिले जातात. दिवसाढवळ्या चालणार्‍या पाकिस्तानी दहशतवादाला आम्ही चोख उत्तर देऊ वगैरे घोषणा सत्ताधारी नेहमीच करत असतात पण प्रत्यक्ष काहीच करत नाहीत. चीनने आपला प्रदेश बळकावला तरी भारताला आंतर्राष्ट्रीय समुदायाकडून सोडा पण इथल्या मार्क्सवादी पक्षाकडूनही पाठिंबा मिळत नाही. मुत्सद्दीपणात भारतीय नेहमीच मार खातात. मग तो ताश्कंद करार असो,अणुभट्टी-करार असो अथवा चीन-पाकिस्तान बरोबरची सीमावादाची बोलणी असोत,प्रत्येक ठिकाणी आपण कमी पडतो.

मंडळी ह्यातला एकेक विषय हाताळायचा म्हटला तरी त्यावर पानेच्या पाने लिहिता येतील इतके हे विषय सर्वव्यापी आहेत आणि माझ्यासारख्याची ती कुवत नाही. तेव्हा मी इथेच थांबतो. ह्या ठिकाणी बरेच मुद्दे अध्याहृत राहिलेले आहेत. ते आपण आपापल्या कुवतीनुसार समजून घ्याल अशी अपेक्षा करतो आणि आता खरंच थांबतो.
इति अलम्!

११ एप्रिल, २००८

बालपणीचा काळ सुखाचा! १२ बायमावशी! २

चित्रपट जरी अडीच तीन तासात संपत असला तरी बायमावशींचे हे चित्रपट आख्यान चांगले आठवडाभर चालायचं. कारण त्यात इतरही उपकथानकं यायची. जमलेल्या आया-बायांच्या प्रतिक्रिया, मध्ये कुठे गाणी आली की ती म्हणण्याचा किंवा माझ्याकडून म्हणवून घेण्याचा असे कैक अन्य पदर असत.

"तुम्हाला सांगते... अमुक तमुकचे आई!" हे असेच एक पालुपद ह्या कहाणी दरम्यान यायचे. ज्या बाईने मध्येच शंका व्यक्त केली असलीच तर किंवा काही प्रतिक्रिया दिली असली तर तिला उद्देशून हे वाक्य फेकले जाई.

मोलकरीण कथा पुढे सुरू....
"तुम्हाला सांगते विद्याचे आई, तो जो लंगोटी वाला मुलगा असतो ना तो आता मोठा होतो. कालिजात जायला लागतो. तिथे त्याचे शीमा(सीमा) बरोबर प्रेम जुळते."
"एका गाण्यात ते पोर मोठे होते? लगेच कालिजात जाऊन पिरेम बी करते?"..... ह्या एक बोलण्यात फटकळ आणि मिस्किल बाई.
"अग्गो बाई! काय सांगू आता हिला? अगो,तीन तासाचा शिनेमा, त्यात काय त्या मुलाचे अख्खे बालपण दाखवणार काय? साधा संडासला जाऊन आलाय असे दाखवायचे तर धा मिन्टे जातील फुकट. बघताय ना आपल्या इथली पोरं! कुणी सरळ आपलं टीपरं उचललं आणि गेलं संडासमध्ये असे होते काय? ते टीपरं मिरवत मिरवत जातंय काय. मध्येच टीपरं बाजूला ठेवून पोरांच्यात खेळायला लागतंय काय! वगैरे वगैरे..(तिरकसपणाने बोलण्यात बायमावशींचा कुणी हात धरू शकत नसे.)
हां! तर मी काय सांगत होते?"
कुणी तरी मग ती.. रमेश देव कालिजात.... असे सुचवते.
मग कथा पुढे सुरू होते.
इतक्यात एक बाई आठवण करून देते.... "बायमावशी अहो ते प्रेम नंतर करतात. लगेच नाही काय. आधी तो डॅन्स आहे ना कोळणीचा."
लगेच बायमावशी..." अग्गोऽऽऽ बाऽऽऽई! राहिलंऽऽऽच की! नाऽय,नाऽय,नाऽऽय! थांबा थांबा हांऽऽ.(इथे सगळ्यांचे प्रश्नार्थक चेहरे)आत्ता आठवलं! ते आधी सांगितलेलं ते प्रेम आता नाही हांऽऽ. ते नंतरऽऽ. तो शीन नंतर! आधी काय आऽस्ते ना की त्यांच्या कालिजात एक नाटक आस्ते."
"अहो नाटक नाही हो गॅदरिंग असते!"... दुसरी बाई.
"ते गॅद्रिंग की फॅद्रिंग काय असेल ते! असो. पण शीमा काय मस्त दिसते हो त्या कोळणीच्या वेशात! तुम्हाला सांगते शेखरच्या आई, नुस्ते बघऽऽतच बसाऽऽऽवे आसे वाट्ते.तिचा तो अंबोडा, त्यातली ती वेऽऽणी आणि मोठ्ठं कुंऽकू. आणि नाचते म्हणजे काऽऽय हो! अऽगदी बिजलीसारखी! इथे एक गाणं हाय... कशी झोकात चालली कोळ्याची पोर, जशी चवथीच्या चंद्राची कोर!
अवो नुस्ती नाचते नाऽय तर गाते पण काय सुरेऽऽख! एकदम गोऽड आवाज बघा!"
"अहो ती नाही गात! आशा भोसले गाते ते गाणे!"...तीच ती मघाची
"अग्गोऽऽऽ बाऽऽऽऽई! सांगतेऽऽऽस काऽऽय! मला मेलीला वाटले की शीमाच गाते! तरी म्हटलं नाच आणि गाणं एकदम जमते कसे हिला?"
बायमावशींचे हे 'अग्गो बाई' हे उच्चार दिवसातनं अनेक वेळा उच्चारले जात असतील. पण त्यातही वैविध्य जाणवायचे. म्हणजे त्यावेळी त्यांना एखाद्या गोष्टीचे किती प्रमाणात आश्चर्य वाटले असेल त्या प्रमाणात ते उच्चार लांबत जात.

अशीच धक्के खात खात कथा पुढे जात असे. मग रदे-शीमा चे प्रेमप्रकरण, त्यावेळचे "हसले आधी कुणी" हे गाणे, मग लग्न, भटजींचा मृत्यू वगैरे थांबे घेत घेत गाडी सुलोचना मोलकरीण बनून रदे-शीमा च्या घरी येते तिथपर्यंत आली की मग शीमाचे बाळंतपण वगैरे कथानक उलगडता उलगडता एका गाण्यावर येऊन थडकत असे.
"तुम्हाला सांगते.... इथे ना एक शीन हाय. त्या शीमाच्या बाळाला झोपवायला सुलोचना एक गाणं गाते..
देव जरी मज कधी भेटला
माग हवे ते माग म्हणाला
म्हणेन प्रभू रे माझे सारे
जीवन देई मम बाळाला
काऽय सांगू? इतक्या गोड आवाजात गाते ना सुलोचना..."
"अहो,सुलोचना नाही ती. आशा भोसलेच गाते हे पण गाणे!"
"अंशे! हे पण गाणे तीच बया गाते? मग दिसली कशी नाय ती शीनमध्ये?"
"अहो ती पडद्याच्या मागून गाते आणि सुलोचना नुसते तोंड हालवते."
"काऽऽऽय तरीच सांगू नकोस! तू काऽऽऽय बघायला गेली होतीसऽऽऽऽ तिला पडद्याच्या मागे? आणि मलाऽऽ सांग... ती, कोण ती, तुझी आशा की बिशा?(इथे बायमावशींचे उपरोधिक बोलणे आणि त्यातला कोकणी खवचटपणा अगदी पराकोटीचा असायचा)एका वेळी किती टाकीजात जाऊन गाणार हाय?" प्रश्न तसा बिनतोड होता.
बाय मावशींचा गैरसमज झाला होता की आशा भोसले प्रत्यक्षपणे पडद्याच्या मागे बसून गाते त्यामुळे त्यांचे हे बोलणे ऐकून काही बायका तोंडावर पदर घेऊन फिदी फिदी हसायला लागल्या. मग माझ्या आईने त्यांना त्यातली गोम समजवून सांगितली आणि ती त्यांना पटली असे दिसले तरी त्या बाईवरचा राग काही केल्या शांत होईना.
"मला शिकवतेय! आगं, मी काय आजच शिनेमा बगतेय काय?"
थोडा वेळ असाच शांततेत जातो आणि मग हळूच कुणी तरी म्हणतं.. "ओ बायमावशी! रागावू नका हो. सांगा ना पुढची गोष्ट. आणि ते गाणं पण म्हणा ना."
इथे बायमावशीही जरा सावरलेल्या असतात. मग लगेच, " नाही बाई. मला नाही जमणार ते गाणं. त्यापेक्षा पम्यालाच बोलवा. तो चांगलं म्हणतो."
झालं. पुन्हा मला फर्मान सुटतं आणि मी खेळ अर्धाच टाकून येतो. काय करणार? आईची आज्ञा शिरसावंद्य होतीच पण गाणं म्हणायचा मला कधीच कंटाळा नसायचा. मग मी सुरू केले "देव जरी मज कधी भेटला...."
"कोण देव? रमेश देव? तू ही देवच की!" तेवढ्यात बायमावशींना विनोद सुचला आणि माझ्या सकट सगळेच हसत सुटलो.
हास्याचा भर ओसरल्यावर पुन्हा गाण्याची फर्माइश झाली आणि मी ते गाणं म्हणू लागलो.
ह्या गाण्यातल्या एकेक शब्दात इतका अर्थ भरलाय आणि ते आशाताईंनी इतके सुंदर गायलेय की काही विचारू नका.मी गाणं शिकलेलो नव्हतो तरी ऐकून ऐकून हुबेहूब गाऊ शकत असे. 'न'कलाकार असल्यामुळे एक आशाताईंचा आवाज सोडला तर त्या गाण्यातल्या भावना मी श्रोत्यांपर्यंत पूरेपूर पोचवू शकलो हे जाणवले. कारण, गाणं संपले तरी बराच वेळ सगळे शांत बसून होते. जणू सगळे त्या 'शीन' मध्येच अजून गुंतलेले होते.

८ एप्रिल, २००८

बालपणीचा काळ सुखाचा! ११ ’बायमावशी!’१

आमच्या लहानपणी चाळीय(चाळपासून चाळीय) अथवा वाडीय(वाडीपासून वाडीय) वातावरण होते. अशा ह्या वातावरणात एखादे तरी सार्वजनिक व्यक्तिमत्त्व असते. कुणी तरी काका, मामा, मावशी, आत्याबाई, आजी-आजोबा असे लोक प्रत्येक चाळीत नक्कीच सापडतील, नव्हे तशी व्यक्तिमत्त्व सापडायची. आमच्या वाडीत असेच एक सार्वजनिक व्यक्तिमत्त्व होते, ते 'बायमावशी ' ह्या नावाने ओळखले जाई. लहानथोर सगळेच त्यांना बायमावशी म्हणायचे. खरे तर त्या माझ्या आईच्या वयाच्या होत्या, पण माझ्या सारख्या लहान मुला-मुलींपासून ते अगदी काठी टेकत चालणारे आजी आजोबा देखिल त्यांना बायमावशी असेच म्हणत! आहे ना गंमत!

आमच्या वाडीच्या अगदी मध्यभागी एक गोलाकार चाळ होती. त्यातल्या एका बिर्‍हाडात बायमावशी आणि त्यांचे यजमान राहायचे. ह्या बायमावशींच्या यजमानांना सर्व वाडकर लोक काका म्हणत. आता ते ओघानेच आले म्हणा. बायको मावशी म्हणून नवरा काका. पण इथे अजून एक गंमत आहे. आम्ही लहान मुलं ह्या काकांचा उल्लेख आपापसात करताना अथवा त्यांच्याविषयी काही बोलायचे असेल तर 'बायमावशींचे काका ' असा करत असू. :-) असो.

बायमावशी-काका ह्या जोडप्याला मूल नव्हते त्यामुळे त्यांचे घर हे आम्हा समस्त वाडीतल्या मुलांसाठी हक्काचे विश्रांतिस्थान झालेले असायचे. काका नोकरीनिमित्त पहाटे पाचला घरातून जे बाहेर पडत ते संध्याकाळी सात-साडेसातला परतत. ह्या मधल्या काळात बायमावशींच्या घरावर जवळपास सर्व वाडीतल्या लहान मुलांचा आणि त्यांच्या आयांचा कब्जा असायचा. दोन खोल्यांच्या त्यांच्या घराची रचना अशी होती की त्यातून जवळपास सगळी वाडी दिसत असे. त्यांच्या घराचे दार आणि स्वयंपाक घराची खिडकी उत्तरेला होती. तिथून आमचे मोठे अंगण, आमची चाळ(ज्यात मी राहायचो) आणि त्याच्या शेवटाला संडास होते ते दिसायचे , तर एक मोठी खिडकी पूर्वेला होती जिच्यातून इतर घरं, मालकांची,बाग, बंगला आणि वाडीचे प्रवेशद्वार दिसत असे. म्हणजे वाडीतली एकूण एक हालचाल त्यांच्या त्या घरातून दिसत असे. अंगण, त्यात खेळणारी मुले, वाळत घातलेले कपडे, धान्य, पापड आणि वाडीतून आत-बाहेर करणारी माणसे, झाडं,पशू-पक्षी वगैरे सगळे हे असे एका नजरेत दिसत असे. त्यामुळे बायमावशींकडे सगळ्या वाडीची खबर असायची.

बायमावशी बोलायला,वागायला मिठ्ठास होत्या. तशा त्या मूळच्या गोव्याच्या. त्यामुळे बोलण्यात एक प्रकारचा हेऽऽल आणि गोडवा असायचा.
नवर्‍याला काहीही सांगायचे झाले की म्हणायच्या, "ऐकलाऽऽऽत!"
इतके म्हटले की पुरे असायचे. कारण काका तसे त्यांना घाबरून असत. काका बायमावशींसमोर कधीच बोलत नसत. त्या म्हणतील ती पूर्व असायची. त्यामुळे त्यांनी नुसते, "ऐकलाऽऽऽत" म्हटले की काका धडपडत त्यांच्याजवळ जाऊन अगदी आज्ञाधारक मुलासारखे उभे राहायचे. काका फारसे कधी बोलत नसत. क्वचित प्रसंगी बोलले तर लक्षात येत असे तो त्यांचा अतिशय धीरगंभीर आणि घुमणारा खर्जातला आवाज! बायमावशी घरात नसल्या तर (बाजारहाट वगैरे साठी बाहेर जात) ते आम्हा मुलांशी बोलण्याची आणि त्यातल्याच एखाद्याची थट्टा करण्याची संधी साधत असत. पण क्वचितच बोलण्याचा प्रसंग येत असल्यामुळे ते बोलताना खूप अडखळत असत. मग त्यांनी आमची थट्टा करण्याऐवजी आम्हीच त्यांच्या त्या अडखळत बोलण्याला हसत असू.
तसे काका हट्टी होते. त्यांना सिगारेट प्यायची सवय होती पण तीही त्यांना बायमावशींच्या समोर ओढण्याची हिंमत नसायची. मग त्या घरात नाही असे पाहून ते मला हळूच शुक-शुक करून बोलवायचे आणि सिगारेट आणायला पाठवायचे. येताना त्यातल्याच उरलेल्या पैशाच्या गोळ्या आणायची मला सूट असायची. खरे तर त्यांचे काम करावे म्हणून ही लालूच असायची, म्हणून आम्ही मुलेही बायमावशींची, घरातून बाहेर जाण्याची वाट पाहत असायचो.
बायमावशींच्या समोर दबकून वागण्याच्या ह्या काकांच्या स्वभावामुळे त्यांचा संसार अगदी सुरळीत सुरू होता. काकांनी कमावून आणायचे आणि बायमावशींनी त्यात अगदी व्यवस्थित भागवायचे असा जणू अलिखित करारच त्या दोघांच्यात असावा. तशी काकांची नोकरी खास नव्हती आणि त्यांना पगारही जेमतेमच होता. पण बायमावशींच्या कुशल व्यवस्थापनामुळे त्यातही त्यांचे भागत असे. कधी कुणाकडे त्यांनी हात पसरलेले मी तरी पाहिले नाही.

बायमावशींच्या बोलण्यातले खास शब्द सांगायचे तर, " गो बाय माऽऽझे!, अग्गोऽऽ बाऽऽऽई, मेल्यांऽऽऽनो, सांगता काऽऽऽऽयऽऽ, अंऽऽशेऽऽ!" वगैरे वगैरे. हे शब्द प्रत्येक संभाषणात येणारच. ह्या शब्दांबरोबरच चेहर्‍यावरचे भावही अगदी पाहण्यासारखे असत. तशा त्या काही खास सुंदर म्हणाव्या अशा नव्हत्या पण कुरुपही नव्हत्या. पण चेहरा विलक्षण बोलका होता. जेमतेम पाच फुटापर्यंतची उंची, काळा-सावळा वर्ण, नाकी-डोळी नीटस, थोडेसे कुरळे केस, केसांचा छोटासा अंबाडा आणि त्यात कधी अबोली किंवा मोगर्‍याची वेणी तर कधी गुलाबाचे फूल तर कधी घसघशीत गजरा असा साधारण त्यांचा रुबाब असायचा.

दिवसभर आम्ही लहान मुलं त्यांच्या घरात आत-बाहेर करत असायचो. त्या मोकळ्या असायच्या तेव्हा मग आमच्याशी त्यांचा संवाद चालायचा. त्यात, आज घरी जेवायला काय होते पासून ते आज शाळेत काय शिकवले, झालंच तर, एकमेकांच्या चहाड्या सांगणे, अशा नानाविध गोष्टी आम्ही त्यांना सांगायचो आणि त्याही तितक्याच औत्सुक्याने त्या ऐकून आम्हाला प्रतिसाद देत. मग त्यांना आपली गोष्ट सांगण्यात आमच्यात अहमहमिका लागायची. पण त्याही, एकावेळी सगळ्यांचे ऐकून घेताना कधी रागावल्याचे, चिडल्याचे आम्हाला दिसले नाही. फारच कालवा झाला तर त्या सगळ्यांना शांत करत, हातावर काही तरी खाऊ देत आणि मग एकेकाला त्याची गोष्ट सांगायला सांगत. इथे आमची तोंडे खाण्यात गुंतलेली असल्यामुळे ज्याला विचारलेय तोच बोलायचा आणि त्यामुळे प्रत्येकाला बोलायची संधी मिळायची.

दुपारची जेवणं-खाणं आटोपली की मग त्यांच्या घरात बायकांचा दरबार भरायचा. आम्हा मुलांच्या आया ताटात तांदूळ,गहू किंवा जे काही निवडायचे असेल ते घेऊन तिथे हजर व्हायच्या आणि मग त्यांच्या गप्पा सुरू व्हायच्या. कुणी भरतकाम, विणकाम किंवा काही शिवणकाम घेऊन येऊन बसायच्या. आता बायकांच्या गप्पांचे विषय काय हे सांगायची जरूर आहे काय? एकातून एक असे विषय बदलत चहाच्या वेळेपर्यंत ह्या गप्पा चालत. ह्या गप्पांव्यतिरिक्त अजून एक महत्त्वाचा कार्यक्रम इथे अधून मधून चालायचा तो म्हणजे आपण पाहिलेल्या, नवीन चित्रपटाची कहाणी सांगणे. एकीने सांगायचे आणि इतरांनी त्यावर भाष्य करत करत ऐकायचे असा सगळा मामला असायचा. पण ह्या चित्रपट कहाणी कथनामध्ये बायमावशींचा कुणीच हात धरू शकत नसे. त्यांचे त्यावेळचे हावभाव,शब्दोच्चार आणि कहाणी सांगण्याची धाटणी ही एखाद्या तरबेज कीर्तनकाराइतकी आकर्षक होती.

बायमावशी कथा सांगायच्या त्याची ही एक छोटीशी झलक पाहा..... उदाहरण म्हणून आपण मोलकरीण चित्रपटाची कथा घेऊ या.

"हां! तर काय माहीतेय काऽऽय? ती आपली... कोण ती हो? हां! आठवलं बघा! सुलोचना! काय वो ती दिसते? खरंच! अगदी सोज्वळ बाई बघा! आणि तिचा तो नवरा! काऽऽऽय बरंऽऽऽऽ त्याचं नाऽऽऽऽऽव? जाऊ द्या. आता आठवत नाय! मग आठवलं की सांगते हां.
हां, तर, तो नवरा देवळातला भटजी असतो. कीर्तन तर इतके मस्त करतोऽऽऽऽ की काय सांगू? बाय माऽऽऽऽझे! अवो लोकं नुसती डोलतात त्याच्या कीर्तनात. तर पैला शीन देवळाचा हाय(बायमावशींची भाषा म्हणजे अर्धी कोकणी अर्धी मराठी. त्यामुळे हाय,नाय सारखे उच्चार भरपूर). तर ते भटजी रामायणातली कथा सांगताहेत हां. राम वनवासाला गेलाय आणि इथे दशरथ त्याची आठवण काढून काढून रडतोय. इथे बघा एक गाणं हाये... (बायमावशी गुणगुणून दाखवतात). हे श्रीरामा,हे श्रीरामा, एक आऽऽस मज एक विसाऽऽवा, एक वाऽऽर तरी राऽऽम दिसाऽऽऽवा... तुम्हाला सांगते विद्याचे आई(माझ्या आईला उद्देशून), अवो तो भटजीचा लहान मुल्गा, ढुंगणाला लंगोटी लावलेला(मोठा झाल्यावर हाच रमेश देव होतो हां ), हे गाणं म्हणत म्हणत येतो.
ओ विद्याचे आई! तुमच्या पम्याला(म्हणजे मला) बोलवा की. त्याला येते हे गाणे. त्या पोरासारखेच रंगून म्हणतो. ते गाणं किती हो करुण आहे नाही? किती आर्ततेने गायलंय त्या पोराने. तुम्हाला सांगते.... मी तर नुस्ती पदराने डोळे पुसत होते,नाकाने नुस्ते.. सूं सूं चालले होते."
इथे सगळ्या बायकां आपापले डोळे पदराला पुसत असतात. थोडा वेळ सूं सूं आणि नाकं शिंकरण्याचे आवाज येत असतात.
माझी आई उठून बाहेर येते आणि मला बोलावते. मी आपला खेळ सोडून नाईलाजाने तिथे जातो. मग बायमावशी आपली फर्माइश करतात.
"अरे पम्या ! (मला पम्या म्हणणार्‍या तीनच व्यक्ती... एक माझी आई,दुसरी माझी मोठी बहीण आणि तिसर्‍या ह्या बायमावशी..... बाकी माझी नावे अनंत आहेत. त्याबद्दल पुन्हा कधी तरी) म्हण की ते रामाचे गाणे. "
माझा प्रश्नार्थक चेहरा बघून मग आई मला आठवण करून द्यायची आणि मग मी ते गाणे अगदी आरंभ संगीतापासून शेवटपर्यंत गात असे. मला स्वत:लाही हे गाणे खूप आवडायचे, त्यातली आर्तता हृदयात कालवाकालव करायची, त्यामुळेच कदाचित मी ते गाणे खूपच प्रभावीपणे गायचो. गाणे ऐकताना इथे सगळ्या बायकांचे पदर पुन्हा डोळ्याला लागलेले असायचे. माझ्या बरोबर खेळणारी मुलेही ओट्यावर येऊन माझं गाणं संपण्याची वाट पाहत थांबलेली असायची. गाणं संपताच मी पुन्हा खेळायला जायचो.

५ एप्रिल, २००८

बालपणीचा काळ सुखाचा! १०

इमारतीचे काम जोरात सुरू झाले. कामगारांचा राबता वाढला. तसे आमचे तिथले खेळणे कमी होऊ लागले. बघता बघता इमारतीचा पाया तयार झाला आणि काही कारणाने पुढचे काम थांबले. थांबले कसले ठप्पच झाले. तसाही पावसाळा तोंडावर आलेला होताच. त्यामुळे काम थंडावणार होतेच; पण ते अजिबात बंदच पडले ते का हे काही कळले नाही.आम्हा मुलांना ह्या गोष्टीचा खरे तर फायदाच झाला. त्या तयार कोब्यावर(पाया) आमचे पकडापकडीचे खेळ रंगू लागले. ह्या ठिकाणी खेळताना एका गोष्टीची मात्र आम्हाला काळजी घ्यावी लागत होती, ती म्हणजे तिथे असलेली उघडी विहीर.सिंध्याने ही जाणीवपूर्वक बुजवलेली नव्हती. कारण त्या विहिरीचे पाणी त्याला बांधकामासाठी हवे तसे वापरता येत होते आणि इमारतीच्या बांधकामातच ती सामावली गेलेली होती. तिच्या वरूनच इमारतीचा जिना वर चढणार होता. तेव्हा इमारत पूर्ण झाल्यावर त्यावर तो झाकण बसवणार होता. तशी ती विहीर फार मोठी नव्हती पण सदोदित भरलेली मात्र असायची. वाडीतली धीट मुले त्यात पोहत देखिल. अर्थात त्यात मी नव्हतोच. मला पहिल्यापासूनच पाण्याची भिती वाटायची आणि मी त्यापासून नेहमीच चार हात दूर असायचो. आमच्या घरात नळ येण्याआधी मात्र आम्ही ह्याच विहिरीचे पाणी वापरत असू. तेव्हा विहिरीतून पाणी उपसणे,बादल्या भरून आणून घरातले पाण्याचे पिंप भरणे ही कामे आम्ही तिघेही भाऊ नित्यनेमाने करत असू. पण पोहण्या वगैरेचे मात्र कधी नाव नाही काढले.

तसे आम्ही जवळपास दिवसाचा बहुतेक वेळ (शाळा,अभ्यास,जेवणा-खाण्याचा वगळून) खेळण्यातच घालवत असू. दिवसभर खेळून झाले की मग जेवण होण्याआधी रात्री चांदण्यात त्या कोब्यावर बसून आमच्यात शिळोप्याच्या गप्पा सुरू होत. त्यातले विषय मात्र सतत बदलत असत. कधी सिनेमा तर कधी नवीन आलेली गाणी. कधी मारामार्‍यांविषयी तर कधी एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या.कधी कुणी गोष्ट सांगे तर कधी कुणाला आलेला एखादा भन्नाट अनुभव. असे अनेक विषय चघळता चघळता गाडी एका विषयावर हटकून येत असे आणि तो विषय म्हणजे भूत आणि भुतांविषयीचे अनुभव.अगदी खरं सांगायचे तर आमच्यापैकी कुणीही भूत पाहिलेले नव्हते किंवा कुणाला तसला काही अनुभवही नव्हता. पण एकाने काही सांगितले की आपणही काही कमी नाही हे दाखवण्यासाठी दुसरा अहम-अहमिकेने काही तरी रचून सांगायचा आणि मग ह्या अशाच गजाली रंगत जायच्या. काही मोठी मुले (दादा आणि त्याच्यासारखी काही)सोडली तर आम्ही चिल्लर-पिल्लर अत्यंत घाबरटच होतो. मी तर अंधारालाही घाबरायचो. आमच्या चाळीसमोरच तर ही इमारत तयार होत होती. ह्या दोन्हीत जेमतेम तीस-एक फुटाचेच अंतर होते. कोब्यावर बसल्यावर समोर आमच्या चाळीतील सगळ्या खोल्या , त्यातली माणसे दिसत असत. त्या खोल्यांमधल्या प्रकाशाची तिरीपही आम्ही जिथे बसायचो तिथपर्यंत आलेली असायची. पण अशा भुताच्या गोष्टी सुरू झाल्यावर त्या ऐकताना कितीही भिती वाटली आणि तिथून निघून जावेसे वाटले तरी माझी एकट्याने घरी जाण्याची हिंमत होत नसे. कारण? आमच्या चाळीच्या आणि ह्या होणार्‍या नव्या इमारतीच्या वाटेत(म्हणजे आमच्याच अंगणात) दोन मोठी झाडे होती. त्यातले एक झाड होते बकुळीचे आणि दुसरे चिंचेचे.चिंचेच्या झाडावर भुते असतात असे कुणी तरी केव्हा तरी बोललेले ऐकले होते आणि तेव्हापासून अंधार झाल्यावर एकट्याने त्या झाडाजवळ जायची माझी कधीच हिंमत व्हायची नाही. खरे सांगायचे तर हे चिंचेचे झाड आमच्याच 'नत्र आणि युरिया'वर पोसलेले होते. रोज रात्री झोपायच्या आधी आम्ही आमचा जलभार ह्याच्याच मुळाशी हलका करायचो तरीही त्या झाडाची मनातली भिती मात्र कधी कमी नाही झाली. रात्री चंद्राच्या प्रकाशात त्या झाडाच्या फांद्यांच्या असंख्य हलणार्‍या सावल्या पाहिल्या की पोटात भितीने ढवळून येत असे. ह्या दोन्ही झाडांच्या सहवासातच रात्रीची शतपावली मी वडिलांच्या सह करत असे तेव्हा मात्र ही भिती जाणवत नसे. पण एकट्याने तिथे जाणे सोडाच पण अगदी घराच्या ओट्यावर बसून त्या चिंचेच्या झाडाकडे पाहणेही मला भितीदायक वाटायचे.

शतपावली करताना वडील आमच्याकडून पाढे म्हणवून घेत. मग स्तोत्रांची उजळणी होई. हे सगळे झाल्यावर मग आम्ही भाऊंना(माझे वडील) त्यांच्या लष्करी जीवनातल्या अनुभवांबद्दल(माझे वडील दुसर्‍या महायुद्धात दोस्त राष्ट्रांच्या सैन्यात होते आणि त्यांना ब्रह्मदेशात पाठवलेले होते)विचारायचो. त्यांचे ते अनुभव ऐकतांना माझ्यात अगदी वीरश्री संचारायची.सैनिकांची कवायत घेताना कशा आज्ञा देतात त्या वडील अगदी साभिनय दाखवायचे आणि आमच्याकडून त्याप्रमाणे करून घ्यायचे.
त्यांचा आवाज इतका दणदणीत होता की तेव्हा आजूबाजूचे लोकही(अगदी सुरुवातीला)आपापल्या घरातही दचकत असत. घरातून बाहेर येत... काय झालं म्हणून बघायला. पण मग नंतर त्यांनाही त्याची सवय झाली. त्यांच्या आवाजात त्या सगळ्या आज्ञा ऐकताना खूप मजा यायची आणि हे सगळे पाहायला आणि अनुभवायला आमच्या वाडीतील यच्चयावत वानरसेना हजर असायची. अशा वेळी माझी टीचभर छातीही गर्वाने फुगलेली असायची. हा सगळा कार्यक्रम आटोपून झोपायला जाण्याची वेळ झाली की मग आमचे 'नित्यकर्म' उरकायला एकट्याने त्या चिंचेच्या झाडाखाली जाताना माझा आधीचा आवेश पार गळपटलेला असायचा.मी आपला सगळा धीर एकवटून कसाबसा तिथे जाऊन ते उरकून तसाच सुसाट घरी येत असे. घरात शिरल्यावर मात्र पुन्हा जीवात जीव यायचा.

त्या दिवशी दुपारचे जेवण आटोपून मी बाहेर ओट्यावर येऊन पुस्तक वाचत बसलो होतो. अंगणात काही जण खेळत होते. एव्हढ्यात हसल्याच्या आईचा आवाज आला. ती हसल्याला शोधत होती. खेळणार्‍या त्या मुलांना विचारत होती की त्यांच्यापैकी कुणी हसल्याला पाहिलेय काय. बहुतेकांनी नाही असेच उत्तर दिले. मग ती आपली वाडीभर शोधत फिरली पण त्याचा कुठेच पत्ता नव्हता. आमच्या वाडीत शिरण्याचे दोन मार्ग होते. एक मालकांच्या घरासमोरून येणारा(हमरस्ता) आणि एक आमच्या चाळीच्या संडासाजवळून दुसर्‍या वाडीत जाणारा रस्ता... तोही पुढे फिरून हमरस्त्याकडेच येत असे. त्यामुळे आम्ही मुले पकडापकडी खेळताना ह्या दोन्ही रस्त्यांचा वापर करत असू. हे सगळे माहीत असल्यामुळे त्याच्या आईने आजूबाजूलाही शोध घेतला पण हसल्याचा कुठेच पत्ता नव्हता.

मग तिने चिमण्याला पाठवले त्याला शोधायला. तोही शोधून दमला. हा हा म्हणता ही बातमी वाडीभर पसरली. मग सगळेच जण त्याला शोधायला लागले. शोधता शोधता असे लक्षात आले की त्याचे कपडे आणि विहिरीतून पाणी काढायचा दोरी बांधलेला डबा विहिरीपाशी आहे. मग काय विचारता? एकाहून एक शंका-कुशंका डोक्यात यायला लागल्या. त्याची आई रडायला लागली. आपला मुलगा विहिरीत पडला असावा अशी तिला दाट शंका येत होती. वस्तुनिष्ठ पुरावा पाहिल्यानंतर बर्‍याच जणांचे तसेच मत बनले. जसजसा वेळ जायला लागला तसतसे वातावरण गंभीर व्हायला लागले. वाडीतली वडीलधारी पुरुष माणसे कामानिमित्त बाहेर गेलेली होती. अशा अवस्थेत काय करायचे ? कुणालाच काही कळेना. मग मालकांच्या गड्याला, श्वना ला (ह्याचे खरे नाव यशवंत होतेपण आम्ही मुले त्याचा श्वनाच म्हणत असू.) बोलावले. तो आला. त्याच्या बरोबर अजून काही वाडीतली गडी मंडळी आली. त्यांनी सगळ्यांनी धडाधड विहिरीत उड्या मारल्या. अगदी तळापर्यंत शोध घेतला पण काहीच सुगावा लागेना. सगळी मंडळी हताश झाली. एव्हाना संध्याकाळचे चार वाजायला आले होते. शेवटचा एक प्रयत्न म्हणून श्वनाने पुन्हा एकदा पाण्यात बुडी मारली. साधारण एक मिनिटाने तो बाहेर आला आणि मग खरा उलगडा झाला.... हसला विहिरीतच पडलेला आहे आणि तो विहिरीच्या तळाला असलेल्या एका कपारीत अडकलाय!!!
आता मात्र समस्त महिला वर्गाचा आणि आम्हा चिल्ल्या-पिल्ल्यांचा संयम सुटला आणि हळूहळू स्फुंदता-स्फुंदता त्याचे मोठ्या आक्रोशात रुपांतर झाले. हसल्याच्या आईचा तर शोक पाहवेनासा झाला होता. तिला सावरायला पुढे सरसावलेल्या बायकांनाही ती आवरेनाशी झाली होती. त्यांच्या ताब्यातून सुटून विहिरीकडे धाव घ्यायचा सतत प्रयत्न करत होती. कसे बसे तिला धरून घरी नेले. इथे मग ही बातमी सैरावैरा सगळ्या भागात पसरली. कुणीतरी पोलिसांना ती कळवली. मग त्यांनी बंब वाल्यांना कळवली आणि अर्ध्या एक तासातच बंब जोरजोरात घंटा वाजवत आमच्या वाडीत दाखल झाले. आधी त्यांनी वरूनच गळ टाकून शोध घेण्याचा प्रयत्न केला पण बराच वेळ तो प्रयत्न अपेशी ठरला. मग शेवटी त्यांच्यातलाच एक पट्टीचा पोहोणारा खाली उतरला आणि मोठ्या मेहनतीने त्याने तो गळ हसल्याच्या कपड्यात अडकवून त्याचे कलेवर विहिरीबाहेर आणण्यात यश मिळवले.

विहिरीबाहेर आणलेल्या त्याच्या त्या टम्म फुगलेल्या कलेवराकडे पाहून पुन्हा मोठा कालवा झाला. त्याच्या शरीरातले पाणी काढून टाकण्यात आले पण आता खूप उशीर झालेला होता. हसला आता कायमचाच आमच्यातून निघून गेला होता. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास तो विहिरीवर अंघोळीला गेला होता आणि तेव्हाच तो बहुधा पाय घसरून पडला असावा. दुर्दैवाने कुणाच्याही वेळीच लक्षात न आल्याने तो प्राणाला मुकला होता.

भुतांच्या गोष्टी ऐकून घाबरणारा मी, मला आता नव्याने घाबरण्यासाठी कारण मिळाले. त्यानंतर कैक महिने मी त्या विहिरीच्या आसपास रात्री तर सोडाच दिवसाही कधी फिरकलो नाही.वाडीतली लोकं आणि त्यांचे ऐकून आमच्यातलीच काही मुले "हसला काल रात्री तिथे विहिरीवर बसून अंघोळ करत होता" असले काहीबाही सांगू लागली आणि हे ऐकून आपली तर बुवा टरकली. तेव्हापासून , रात्री जेवायला बोलावल्याशिवाय घरात न परतणारा मी सूर्यास्ता आधीच घरी जाऊन हातपाय धुऊन चुपचाप अभ्यास करत बसायला लागलो.

२ एप्रिल, २००८

बालपणीचा काळ सुखाचा! ९

इमारतीच्या कामासाठी सामान येऊन पडायला लागले. सिमेंट,रेती,सळया,दगड,खडी वगैरेचे ढीग उभे राहिले.आम्हा मुलांना त्यातल्या रेतीत खेळायला मजा यायची.त्यात आम्ही कधी किल्ले बनवायचो, कधी त्याच रेतीत घसरगुंडी आणि उड्या मारण्याचा खेळ खेळायचो. पण सर्वात मजा यायची ती कुस्त्या खेळायला.तासंतास आम्ही तिथे एकमेकांशी कुस्त्या खेळायचो.त्याच सुमारास मुंबईतल्या वल्लभभाई पटेल स्टेडियमवर 'फ्री-स्टाइल'(हल्ली डब्ल्युडब्ल्युएफ आहे ना तसेच) कुस्त्या चालायच्या. त्यात किंगकॉंग-दारासिंग ही मुख्य जोडी होती. ह्यांच्यातले सामने तुफान रंगायचे.त्या शिवाय रंधावा(दारासिंगचा धाकटा भाऊ),मायटी चॅंग...हा जिलेटीन चॉप मास्टर,टायगर जोगिंदर आणि असे किती तरी देश-विदेशातले मल्ल येऊन एकमेकांना आव्हानं देऊन कुस्त्या खेळत असत. वृत्तपत्रात त्यासंबंधीच्या मोठमोठ्या जाहिराती येत. त्यात कुणी दारासिंगला आव्हान दिलेले असे. मग त्याखाली दारासिंगचे ते सुप्रसिद्ध वाक्य लिहिले असे...."पहले रंधावा से लडो,उससे हराओगे तो ही मुझसे लडो!"
हे वाक्य वाचले की आम्ही मुलेही जाम खूश होत असू.मग आपापसात आमचे ज्यावर एकमत होत असे ते वाक्य म्हणजे, "दारासिंग म्हणजे वाटले काय तुम्हाला महाराजा? असा कुठल्या तरी फालतू चिरकुटाशी थोडीच लढणार? पहिल्यांदा आपली लायकी तर त्या चिरकुटाला सिद्ध करू द्या,चिल्लर पिल्लरना हरवू द्या,मग रंधावाला हरवू द्या आणि मग या दारासिंग समोर.आमच्या दृष्टीने दारासिंग म्हणजे एक अलौकिक व्यक्तिमत्त्व होते.

ह्या कुस्त्या खरे तर लुटूपुटीच्या असत.पण हे कळण्याचे आमचे ते वय नव्हते. दुस्र्‍या दिवशी वृत्तपत्रात येणार्‍या कुस्त्यांच्या वर्णनावर आणि निकालावर आम्ही अक्षरश: तुटून पडत असू. ज्याच्या हातात पहिल्यांदा वृत्तपत्र यायचे तोही मग जरा भाव खाऊन घ्यायचा. मग इतरांच्यावर मेहरबानी करतोय असे दाखवत त्या बातमीचे मोठ्याने वाचन करून त्यांची दुधाची तहान ताकावर भागवायची, असले प्रकार चालत. त्यात दारासिंगने कोणत्या डावावर कुस्ती मारली हे देखिल आम्हाला पुढे पुढे पाठ झाले. 'इंडियन डेथ लॉक' हा दारासिंगचा रामबाण डाव होता तर 'किंग कोब्रा' हा रंधावाचा रामबाण डाव होता. नेमके हे काय प्रकरण होते हे आम्हाला माहीत नव्हते पण वृत्तपत्रातल्या वर्णनावरून आमचे आम्हीच काही ठरवले होते ... जसे की प्रतिस्पर्ध्याला खाली पाडून त्याच्या नरड्यावर पाय रोवून उभे राहणे म्हणजे 'इंडियन डेथ लॉक' आणि आपले दोन्ही हात एका बाजूला घेऊन प्रतिस्पर्ध्याची मानगुट त्या हाताच्या कात्रीत पकडायची म्हणजे 'किंग कोब्रा'.. हे चूक की बरोबर? कुणाला ठाऊक? आणि त्याने फरक तो काय पडणार होता आमच्या सारख्यांना. आम्ही हे सगळे डावपेच आमच्या रेतीतल्या कुस्तीत वापरायचो. एकमेकांवर वार-प्रतिवार करायचो.

आम्हा तिघा भावात माझा मोठा भाऊ.... दादा हा माझ्यासारखाच चणीने छोटासाच होता पण त्याच्यात विलक्षण ताकद होती. त्याच्यापेक्षाही वयाने आणि आकाराने मोठ्या मुलांना तो भारी पडायचा. म्हणून तो आमच्यातला दारासिंग होता. तो कधीच हरायचा नाही. म्हणजे निदान आमच्या वाडीत तरी त्याला कुणी हरवणारे नव्हते. त्यामुळे मी आपोआप रंधवा झालो..... अहो हसताय काय? खरंच सांगतो. तसा मी लेचापेचा होतो; माझ्यात शक्ती कमी होती पण युक्ती मात्र भरपूर होती.मग आमच्या कुस्त्या सुरू व्हायच्या. माझ्या बरोबरीच्या(ताकतीने) मुलांना मी सहज हरवत असे पण थोडी वजनाने भारी असलेली मुले मला पार चेचून टाकत. मग शेवटी दादाला उतरावे लागे मैदानात.
दादा उतरला की मग आम्ही सगळे जोरजोरात टाळ्या,शिट्ट्या वाजवायचो. खूप आरडाओरडा करायचो. हे सगळे वातावरण निर्मितीसाठी असायचे. एकदा का कुस्ती सुरू झाली की मग आमची पांगापांग व्हायची. कारण दादा आणि त्याचा प्रतिस्पर्धी(जो कोणी असेल तो) हे म्हणजे दोन मदोन्मत्त रेडेच झुंज खेळताहेत अशा तर्‍हेने कधी एकमेकांना टकरा मारत किंवा रेटारेटी करत इथेतिथे फिरत असत. त्यामुळे ते मैदान सोडून कैक वेळेला बाहेर यायचे आणि मग आम्हा प्रेक्षकांची नुसती धावपळ व्हायची. हो! अहो, चूकून त्या दोघा रेड्यांची टक्कर आम्हाला लागली तर मग आमची काही खैर नव्हती.
कुस्त्या कितीही अटीतटीच्या झाल्या तरी शेवटी विजय दादाचाच व्हायचा. कारण दादा शक्तिमान होता तसाच चपळ आणि युक्तिवानही होता. त्यामुळे आपल्यापेक्षा भारी प्रतिस्पर्ध्याला तो नेहमी हुलकावण्या देत दमवत असे आणि मग अचानक असा काही वेगात पटात घुसायचा की त्या हादर्‍याने प्रतिस्पर्धी नामोहरम व्हायचा.

आमच्या वाडीत त्या काळी इतकी मुले होती की ह्या कुस्त्या संपायचे नाव नसे. आम्हा तिघा भावांसारखेच अजूनही काही दोघे-तिघे भाऊ भाऊ ह्यात उतरत असत. ह्यात एक गुजराथी जोडी होती. धाकटा हसमुख(हसला...म्हणायचे सगळे त्याला) आणि मोठा चिमण(चिमण्या म्हणायचो ह्याला). ह्यातला हसला हा दिसायला अतिशय देखणा,गोरा पान असा होता.पण भयंकर व्रात्य. सारखा खोड्या काढायचा. माझे आणि त्याचे तर नेहमीच वाजायचे. मग मी भडकून त्याला चोपायचो पण तोही इतका निर्लज्ज होता की कितीही मारा.. त्याची मस्ती कमी व्हायची नाही. मात्र कधी कधी तो चिमण्याकडे माझी तक्रार करायचा. मग चिमण्या मला एकटा गाठून मारायचा. तो माझ्या पेक्षा मोठाही होता आणि शक्तिमानही होता.
मग चिमण्याची तक्रार घेऊन मी दादाकडे जायचो की मग दादा त्वेषाने चिमण्याला आव्हान द्यायचा. हे आव्हानही मोठे नाटकी असे. तानाजी धारातीर्थी पडल्यावर शेलारमामा उदयभानाला लढाईचे आमंत्रण देतो. त्याच्या तोंडी जे वाक्य आहे, "दुष्टा! उदयभाना! माझ्या तान्याला मारलेस? चल आता मी तुझी खांडोळी करतो!"(आम्हाला दुसरीला एक धडा होता. 'गड आला पण सिंह गेला.' त्या धड्यात हे वाक्य होते. हा धडा आम्हा तिघा भावांचा अक्षरश: तोंडपाठ होता आणि लढाई-लढाई खेळताना आम्ही त्यातल्या वाक्यांचा असा समर्पक वापरही करत असू.)
त्याच चालीवर दादा म्हणायचा , " दुष्टा चिमण्या! माझ्या भावाला मारलेस? चल आता तुझी खांडोळी करतो!"
मग त्यांची मारामारी सुरू व्हायची. दोघेही तुल्यबल होते.पण शेवटी दादा त्याला भारी पडायचा. मग दादा त्याला जमिनीवर पाडून त्याला दाबून ठेवायचा आणि मग मीही माझा हात साफ करून घ्यायचो. त्या अवस्थेतही चिमण्या मला धमक्या द्यायचा, "साल्या,बघतो तुला,एकटा भेट!" मी आपला "हाहाहाहाहाहा" असे राक्षसी हास्य करून त्याला चिडवत असे. त्यावेळी त्याचा होणारा चडफडाट बघण्यासारखा असायचा.