माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२ फेब्रुवारी, २००८

बालपणीचा काळ सुखाचा! ४

मुलींमध्ये खेळून मी त्यांच्या खेळात प्रवीण झालो होतोच पण त्यामुळे मुलांच्या खेळात आपोआप कच्चा लिंबू ठरायचो. मुले(मुलगे) माझ्याशी खेळताना सहज जिंकत. गोट्या,बिल्ले,सिगारेटची पाकिटे हे सगळे खेळ खेळताना मी नेहमीच हरायचो. ह्या खेळात एक छोटेसे रिंगण आखून त्याच्यापासून थोड्या अंतरावर एक आडवी रेषा आखली जायची. तिथे बसून मग ज्या वस्तूने(एका वेळी गोट्या तर गोट्या अशा पद्धतीने) खेळत असू(गोट्या,बिल्ले,सिगारेटची पाकिटे वगैरे)त्या वस्तू रिंगणात टाकायच्या.त्यापैकी एक जरी गोटी रिंगणाबाहेर गेली तरी आपला डाव गेला. मग दुसर्‍याने तसेच करायचे. पण जर का सर्व गोट्या रिंगणातच राहिल्या तर त्यातील एक गोटी आपला प्रतिस्पर्धी बोटाने दाखवत असे . नेमकी ती गोटी सोडून इतर कोणत्याही एकाच गोटीला आपल्या हातात असणार्‍या गोटीने नेम धरून मारायचे आणि त्या दोन्ही(हातातील आणि जिला मारतोय ती)गोट्या इतर दुसर्‍या कोणत्याही गोट्यांना स्पर्श न करता रिंगणाबाहेर घालवल्यास तो डाव जिंकता येत असे असे.पण माझा नेम कधीच लागत नसे आणि मी नेहमीच त्यात हरायचो.गोट्यांनी खेळायचे इतरही बरेच खेळ होते. आणखी एका खेळात मातीत छोटा खड्डा करून(त्याला आम्ही ’गल अथवा गील’ म्हणत असू) खेळण्याचा खेळ होता. त्याला ’गलगोप’ म्हणत. तसेच अजून एक ’कोयबा’ नावाचा खेळ होता. अजून बरेच होते पण त्यांची नावे आता विसरलो.

हे खेळ मी जरी सहजतेने हरत असायचो तरी मला त्याचे विशेष वाईट वाटायचे नाही. पण काही मुले,विशेष करून माझ्यापेक्षा थोडी मोठी मुले मला त्यांच्यात खेळायला घ्यायची नाहीत त्याचे मात्र वाईट वाटायचे. मी मुलींच्यात जास्त खेळायचो म्हणून मला काही मुलींप्रमाणे ही मुले देखिल "मुलीत मुलगा लांबोडा,भाजून खातो कोंबडा" असे चिडवायचे. ह्या चिडवण्याचे मला खूप वाईट वाटायचे. त्यामुळे हळूहळू माझे मुलींच्यातले खेळणे कमी होऊन मी मग मुलांचे असे मानले गेले क्रिकेट, आबादुबी, लगोरी, भोवरेबाजी, तारघुसणी(हा खेळ केवळ पावसाळ्यातच खेळता येत असे) हुतुतू वगैरे खेळ खेळायला लागलो.अर्थात ह्यात मी लिमलोणचाच असायचो. हल्लीच्या भाषेत ’चिरकुट’(अहो ऑर्कुट नव्हे हो)!

माझ्या अजून एक लक्षात आले की मोठी मुले आपापसात काही तरी सतत कुजबुजत असत पण मी त्यांच्या जवळ गेलो की ती गप्प बसत किंवा विषय बदलत. असे बर्‍याच वेळा होत असे. "तुम्ही काय बोलता ते मलाही सांगा ना?" असे मी म्हटले की ते मला नेहमी "तू लहान आहेस अजून. तुला कळणार नाही!" असे म्हणायचे. मग मी खट्टू होत असे. खरे तर आता मी पाचवीत गेलो होतो म्हणजे तसा लहान नव्हतो; पण ह्या मुलांच्या लेखी मी लहानच होतो. मग एक दिवशी मी हट्टच धरला. त्यांना म्हटले, " मी आता लहान नाही. तुम्ही काय बोलता ते मलाही सांगा!"
त्यावर बरेच आढेवेढे घेत एकाने सांगितले,"तू मोठा झालास ना? मग सारखा त्या मुलींच्यात का खेळतोस?"
मग त्यावर माझे उत्तर असे होते, "लांब केस आणि कपड्यातला फरक सोडला तर आपल्यात आणि त्यांच्यात काय फरक आहे? आणि का नाही खेळायचे त्यांच्याशी? मला आवडते. ते खेळही आवडतात म्हणून मी खेळतो."
त्यांनी एकमेकांकडे हसून पाहिले आणि त्यातला एकजण म्हणाला, "जा आता! म्हणूनच म्हटले की तू अजून लहान आहेस!"
नेहमीप्रमाणेच मी खट्टू झालो पण हे सारखे सारखे असे का बोलतात? हे जाणून घ्यायचेच असे ठरवले आणि त्यांच्या खनपटीस बसलो. मी म्हटले,"आज जर तुम्ही मला सांगितले नाही तर मी माझ्या आणि तुमच्या आईबाबांना तुमचे नाव सांगेन!"
ह्यावर ते सगळे हसायला लागले. पण मग त्यातल्या एकाने मला विश्वासात घेत "मी सांगितले असे सांगणार नसशील तर" ह्या अटीवर माझ्या कानात सांगितले.त्याने जे सांगितले ते सगळे नीटसे कळले नाही पण काही तरी विचित्र मात्र वाटले. मग मी पुन्हा खोदून खोदून त्यांना विचारल्यावर त्यांनी मला ते ’गुपित’(मुलगा आणि मुलीतला शारीरिक भेद) सांगितले. ते ऐकून माझ्या भावविश्वाला प्रचंड तडा गेला होता तरी ते तसे असेलच हे मानण्याची माझी अजिबात मानसिक तयारी नव्हती.
"पण मग हे लोक इतक्या आत्मविश्वासाने कसे सांगतात?" हा प्रश्न काही मला स्वस्थ बसू देईना. आता ह्याचा काही तरी सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे हे माझ्या मनाने घेतले. पण कसे? ते मात्र कळेना.

एक दिवस असाच मी खेळत असताना माझ्याबरोबरची एक मुलगी जरा आडोशाला गेली. ती तिथे काय करते आहे हे लक्षात येताच माझ्या मनात ठाण मांडून बसलेल्या प्रश्नाचा किडा डोक्यात वळवळू लागला. आपल्याला त्या मुलांनी जे काही सांगितले त्याची आता शहानिशा करता येईल असे वाटून त्याच ओघात मी तिच्या दिशेने जायला लागलो. हे तिच्या लक्षात आले आणि ती आपले कपडे सावरीत आणि रडत रडत पळाली. ती अशी का गेली ते मला काही कळले नाही म्हणून मी तिला "अग थांब! थांब!" असे म्हणत चार पावले तिच्या मागे गेलो. पण ती केव्हाच पसार झाली. "जाऊ दे झालं!" असा विचार करून मी पुन्हा खेळात गुंतलो.

ती मुलगी थेट तिच्या घरी गेली आणि तिने माझी तक्रार तिच्या आईकडे केली.तिची आई तिला घेऊन माझ्या आईकडे आली आणि झालेला प्रकार तिने माझ्या आईला सांगितला. दूरून मी हे पाहत होतो.मी नेमके काय चुकीचे केले हे मला समजत नव्हते त्यामुळे मी तसा बिनधास्तच होतो. पण आईने जेव्हा मला हाक मारून बोलावले तेव्हा तिच्या आवाजातली ’जरब’ जाणवून हे लक्षात आले की आपले काही तरी चुकले असावे आणि आता मार खावा लागणार. एरवी आईने हाक मारल्याबरोबर लगेच घरी परतणारा मी आज मात्र तिथेच उभा राहून पुढे काय घडणार आहे त्याचा अदमास घेत होतो. आतापर्यंत आईच्या हातात छडी आलेली होती आणि ती माझ्याच दिशेने चाल करून येत होती हे पाहिले मात्र, मी तिथून पोबारा केला. लगेच माझ्या आईने तिथे असलेल्या इतर मुलांना आणि माझ्या दोघा भावांना मला पकडून आणायला पाठवले. ह्या सगळ्यांना मी बराच वेळ गुंगारा दिला पण अखेरीस त्यांच्या तावडीत सापडलो आणि मग त्या सगळ्यांनी मिळून मला आईसमोर नेऊन उभे केले.

आधीच आईचा राग धुमसत होता त्यात मी पळून जाऊन निष्कारण तेलच ओतले होते. तिच्या समोर मला उभे करताच तिने मला बेदम मारझोड करायला सुरुवात केली. मी फटके वाचवायचा प्रयत्न करत होतो पण आईचा नेम अजिबात चुकत नव्हता. सटासट फटके बसत होते आणि मी अगदी लोळागोळा होईपर्यंत आई मला मारत होती. तोंडाने ती मला आणि स्वत:लाही दोष देत होती. "हेच संस्कार केले काय तुझ्यावर? आता मला तोंड दाखवायला कुठे जागा ठेवली नाहीस! माझंच नशीब फुटकं म्हणून तुझ्यासारखा दिवटा माझ्या पोटी आला!" असे म्हणत ती अजून जोरात फटके मारत होती.(हा मार खातानाही मला माझे (चुकले तर खरेच)नेमके काय चुकले हे कळत नव्हते; पण ते विचारण्याची माझी हिंमत नव्हती ) शेवटी आजूबाजूला जमलेल्या आयाबायांना माझी दया आली आणि त्यांनी माझ्या आईच्या हातातली छडी काढून घेतली आणि त्या तिला घरात घेऊन गेल्या. त्या दिवशी सबंध दिवसभर मला जेवायला मिळाले नाही आणि माझ्याबरोबर आईने स्वत:ला देखिल तीच शिक्षा करून घेतली.

ह्या सर्व प्रसंगामुळे माझ्या मनात स्त्रियांविषयी प्रचंड भिती आणि अविश्वास निर्माण झाला. त्याचेच प्रत्यंतर म्हणजे माझे मुलींच्यातले खेळणे अजिबात बंद झाले. इतकेच नाही तर आई,बहीण आणि शाळेतल्या शिक्षिका सोडल्यास(त्याही नाईलाज म्हणून) अन्य कोणत्याही, अगदी काकी,मामी,मावशी वगैरे नात्यातल्या इतर स्त्रियांशी देखिल मी बोलायला प्रचंड घाबरत असे.इतकेच नव्हे तर त्यांच्याकडे मान वर करून बघण्याचीही हिंमत मी करत नसे.स्त्रियांबद्दल एक प्रकारची अढीच माझ्या मनात घर करून बसली.पुढे जशी अक्कल आली तेव्हा मला कळले की मी किती ’गंभीर’ चूक केली होती आणि त्यावरची आईने केलेली शिक्षा किती योग्य होती ते.

अर्थात झाले ते एका दृष्टीने चांगलेच झाले. कारण आईच्या ह्या शिस्तीनेच मी वेळोवेळी सावरलोय.मी स्त्रियांशी बोलत नव्हतो किंवा त्यांच्याकडे नजर वर करून पाहण्याची हिंमत करू शकत नव्हतो तरीही स्त्री-पुरुषांमधले नैसर्गिक आकर्षण मला स्वस्थ बसू देत नव्हते.परंतू ह्या झालेल्या प्रसंगाचा एक फायदा नेहमीच झाला की एखाद्या स्त्रीबद्दल मनात आकर्षण उत्पन्न झालेच तर मला सर्वप्रथम माझ्या आईचा ’त्या’ वेळचा तो क्रुद्ध चेहरा नजरेसमोर दिसत असे आणि इतर विचारांना बाजूला सारून साहजिकच माझे मन ताळ्यावर येत असे. मी माझे लग्न ठरेपर्यंत कोणत्याही स्त्रीच्या वाटेला गेलो नाही(अर्थात तसा प्रसंग कोणत्याही स्त्रीने देखिल येऊ दिला नाही हेही तितकेच खरे)आणि आज माझी पत्नी हयात नसतानाही त्याचे पालन करू शकतोय ह्याचे कारण त्यावेळी झालेली ती शिक्षाच होय. त्या विशिष्ट प्रसंगी मला आईचा खूप राग आला होता पण आज मागे वळून पाहताना नक्कीच जाणवते की तिच्या त्या शिक्षेनेच मी नेहमी सन्मार्गावर राहिलोय.

पुरुषाच्या उच्छृंखतेला आवर घालण्याची शक्ती केवळ स्त्री मध्येच आहे. मग ती आई,बहीण,पत्नी अथवा इतर कोणत्याही स्वरूपातली असो.

२ टिप्पण्या:

कोहम म्हणाले...

Atyaananda....

Aapala manapasun ani frankly lihilela lekh khup aavdadala....ani asha changalya lekhala ekahi comment nahi hyache vaitahi vaTale.

प्रशांत म्हणाले...

छान लिहिलय.

मी पण असाच एक प्रयत्न सुरु केलाय म्हणजे माझ्या बालपणीच्या आठवणी ताज्या करायचा खरं तर आम्ही गावरान माणस मातीत खेळणारी आणी कधी कधी मातीच उचलुन खाणारी(लहानपणी).. आसो ..

तुमच्या लेखातुन खुप काही शीकायला मिळाल.

मी लाजत होतो सगळ्या गोष्टी मांडायला पण अता प्रयत्न नक्किच करीन..

खरच लेख फ़ार छान आहेत.