बालपणी इच्छा असूनही आणि शिक्षण देण्याची बाची परिस्थिती असतानाही फक्त बाला जडलेल्या दारूच्या व्यसनापायी शिक्षण घेता आलं नाही. अनेक हालअपेष्टांना सामोरं जावं लागलं. तिथूनच सुरू झालेली जीवनाची ओढाताण शेवटपर्यंत टिकली. तरीही आयुष्यात आपण काहीतरी करायचंच, कोणीतरी मोठ्ठं बनायचं ही जिद्द ठेवली. त्यासाठी झटत राहिलो. दारूपायी घराची झालेली परवड बघितल्यामुळे आयुष्यभर दारूला शिवलो नाही.
अनेकांनी हिडीसफिडीस केले, पण परत परत खेटे मारत राहिलो. त्यात काही चांगली माणसे भेटली. त्यांनी प्रोत्साहन दिलं आणि माझ्यातली शाहिरी कला बहरली. कलेच्या आवडीमुळे कधी कधी गाण्याच्या कार्यक्रमात जास्त पैसे मिळत असतानाही फक्त २० रुपयांसाठी नाटकात कामं केली. घरी उपासतापास करावे लागले. बोटावर मोजण्याइतके कलाकार सुखवस्तू जीवन जगले, बाकीचे कलाकार खडतर जीवनाशी झुंजतच राहिले. खडतर जीवन जगत रहाणार्या कलाकारांपैकी मीही एक...........
मित्रहो हे मनोगत आहे सुप्रसिद्ध लोकशाहीर श्री विठ्ठल उमप ह्यांचे. "जांभूळ आख्यान" मुळे संपूर्ण महाराष्टाला परिचित असलेले शाहीर विठ्ठल उमप ह्यांचे "फु बाई फू " हे आत्मचरित्र नुकतेच वाचनात आले. छोट्या छोट्या किश्शांच्या स्वरूपात लिहिलेले हे आत्मचरित्र आपल्याला शाहीरांच्या समग्र जीवनाचे दर्शन घडवते. गरिबी, अपमान, कौतुक,मानसन्मान वगैरे गोष्टींनी भरलेले प्रसंग वाचतांना शाहीरांच्या मोठेपणाची आणि त्याचवेळी अंगी असलेल्या विनम्रपणाची साक्ष पटते. लहान-थोर साहित्यिक, संगीतकार,गायक, नाट्य-चित्रपट कलावंत, राजकारणी, समाजकारणी, मंत्री वगैरे मोठ्या लोकांकडून भरपूर कौतुक होऊनही ह्या माणसाचे पाय जमिनीवरच आहेत.
लोकगीत गायक म्हणून ते आपल्या सगळ्यांना सुपरिचित आहेतच. त्यांच्या काही मोजक्याच गाण्यांच्या ध्वनिमुद्रिका निघालेल्या आहेत पण त्या प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यातील " फु बाई फू फुगडी फू, ये दादा आवार ये,बाजीराव नाना तुमडीभर देना,माझी मैना गावाकडे राहिली, हे खरंच आहे खरं श्री भीमराव आंबेडकर, फाटकी नोट मना घेवाची नाय, प्रथम नमू गौतमा चला हो प्रथम नमू गौतमा " ही गाणी विशेषत्वाने सांगता येतील.
लोककला सादर करून आपल्या सारख्या रसिकांना रिझवणार्या एका सच्चा कलाकाराचे वास्तवातले जीवन किती हलाखीचे असते हे कळण्यासाठी तरी प्रत्येकाने हे चरित्र वाचलेच पाहिजे.
ह्या छोटेखानी आत्मचरित्राला सुप्रसिद्ध सिने आणि नाट्य कलावंत श्री निळू फुले ह्यांची प्रस्तावना लाभलेली आहे.
प्रकाशक आहेत : शिवा घुगे, प्रभात प्रकाशन, वरळी, मुंबई
किंमतः १००रुपये.
थोडक्यात जांभूळ आख्यान शाहीरांच्याच शब्दात
एकदा कर्ण द्रौपदीच्या रंगमहाली आला. त्याला पाहून द्रौपदी मोहीत झाली. तिच्या मनी पाप आलं. द्रौपदीने कर्णाला भोजनासाठी बोलावलं. हे द्रौपदीचे वागणं कृष्णदेवानं अंतरमनानं ओळखलं. द्रौपदीचे हे पाप उघड करण्यासाठी कृष्ण द्रौपदीसह पांडवांना घेऊन वनभोजनाकरिता जांभूळ वनात जातो. भोजन झाल्यावर कृष्णाला फळं खायची इच्छा होते. कृष्ण फळं आणण्यासाठी भीमाला जांभूळ वनात पाठवतो, पण त्या जांभूळ वनातल्या सर्व झाडांची फळं कृष्णदेव आपल्या मायावी शक्तिनं गडप करतो आणि एकाच झाडाला एकच जांभूळ ठेवतो. भीम जांभूळ वनात गेल्यावर त्याच्या दृष्टीला एका झाडाला एकच जांभूळ दिसतं. भीम ते जांभूळ तोडून आणतो. मोठ्या आनंदानं कृष्णाला सांगतो, "देवा वनात हे एकच जांभूळ होतं तेच तोडून आणलं."
कृष्ण भीमाला म्हणतो, " अरे भीमा हे तू काय केलंस? अरे! या जांभूळ वनात एक महान ऋषी तपाला बसलाय. तो रोज सकाळी हे जांभूळ खाऊन दिवस काढतो. भीमा आता तो महाकोपिष्ट ऋषी येईल, त्याला जांभूळ तोडल्याचे कळेलच. तो आपल्या सर्वांना शाप देईल. आपण सगळे मरून जाऊ."
"देवा-देवा! आता याला काही उपाय सांगा" अशी प्रत्येक जण कृष्णाची विनवणी करतो. द्रौपदीही विनवणी करते.
"आपण हे जांभूळ जसं तोडलं तसंच ते त्या झाडाला लावून द्यावं" असे कृष्णदेव सगळ्यांना सांगतो.
मग धर्म,भीम,अर्जुन,नकुल,सहदेव हे सर्वजण जांभूळ झाडाला लावण्याचा प्रयत्न करतात, पण काही केल्या ते जांभूळ झाडाच्या देठी लागत नाही. शेवटी कृष्ण द्रौपदीला म्हणतो, " द्रौपदी, हे पाच पांडव तुझे भ्रतार. तुझ्या सत्वाच्या पुण्याईनं हे फळ लाव देठी."
तिच्या हातूनही ते जांभूळ देठी लागत नाही. द्रौपदी खिन्न मनानं लज्जीत होऊन उभी रहाते.
द्रौपदी म्हणते, " भगवंत असं का अघटीत झालं? माझ्या मनी तर कसलंबी पाप आलं नाही. माझं पाच भ्रतार हे पाच पांडव सोडून इतर समदे पुरूष मला पित्याप्रमाणे आहेत."
कृष्ण म्हणतो, " पण मनी खळबळ झालीच ना?"
द्रौपदी म्हणते, " काय सांगू देवा, रूप त्याचं आनंदाहून इशेस दिसं, लागला नजरेचा बाण त्याचा, काळजाला लागलं पिसं. पाच पुरूषोत्तम भ्रतार पांडव माझं सहावा असता कर्ण, सहा वार झाले असते पूर्ण. सहाव्या वारी भोग घेतला असता त्याच्या प्रितीचा."
झाडाची उडविली फळं,केली देवगत
एका झाडाला एक फळ लईच निर्मळ
देठी गाभुळलं
कर्णाला पाहून द्रौपदीचं मन पाकुळलं
हे जांभूळ आख्यान मधील मी गायलेलं गाणं रसिकांच्या मनात घर करून राहिलं.
२ टिप्पण्या:
Khupach sundar mahiti ani post keli ahey aapan sir...Thanks !
Sachin Susheel.
धन्यवाद ससु(ल्या)! :)
टिप्पणी पोस्ट करा