काय झालंय ह्या लोकांना? एव्हढ्या तेव्हढ्यावरून का चिडतात? का मारामार्या करतात?उठसुठ बाबा-बुवांच्या भजनी का लागतात? का स्वतःची आणि दुसर्याची अशी फसवणुक करतात? का पैसा,मानमरातबाच्या मागे लागतात? शांत ,स्वस्थ आयुष्य जगण्या ऐवजी एकमेकांशी सतत स्पर्धा का करतात. हार झाली तर रडत बसतात. जिंकले की प्रतिस्पर्ध्याला चिडवतात. हे सगळे असे का होते? एकमेकांवरचा विश्वास का उडालाय लोकांचा? का,का आणि का? हे असले जीवघेणे प्रश्न सारखे सतावत असतात.
पण मी कशाला ह्या सगळ्याचा विचार करतोय? जो तो समर्थ आहे की त्यांचा त्यांचा विचार करायला. मग मी कशाला उगीच काथ्याकुट करतोय? सगळ्या जगाचे ओझे माझ्याच एकट्याच्या शिरावर कुणी दिलेय?
नाही ना! मग गप बसायला काय घेशील? तू कधी पासून असा विचार प्रवण झालास? तुला आठवतेय! त्या कदमकाकांनी काय सांगितले होते?
कोण कदमकाका? मला तर काहीच आठवत नाहीये.
अरे ते नाही का तुमच्याच वाडीत राहायचे एका छोट्याश्या झोपडीत? त्यांचा मुलगा 'उपा' तुझा मित्र नव्हता का? आणि त्याचा मोठा भाऊ 'दादा'! तो मिलिटरीवाला! विसरलास सगळे? लहानपणी तू त्यांच्या घरी गेला होतास तेव्हा नाही का तुझा हात पाहून ते म्हणाले होते की तू तुझ्या आयुष्याच्या उत्तरार्धात संन्यस्त वृत्तीचा होशील म्हणून?
हॅ! असल्या भाकड गोष्टींवर माझा विश्वास नाही. ते आपले गमतीने म्हणाले. तसे तर काय माझ्या पत्रिकेत 'राजयोग' होता; पण मी राजा सोड, साधा प्रधानही बनलो नाही कधी नाटकातला. सांगणारे काय काहीही सांगतात. अजून एक गंमत सांगतो. माझ्या जन्म पत्रिकेप्रमाणे मी माझ्या वयाच्या २२ ते २५ ह्या वर्षात बाप बनणार होतो.अरे पण माझे लग्नच मुळी ३५व्या वर्षी झाले तर मी कसा बनणार होतो बाप त्याआधी? हे कसे सांगता आले नाही त्या ज्योतिषांना? काही तरी आकडेमोड करतात आणि फेकतात तुमच्या थोबाडावर! माझा तर ह्या असल्या गोष्टीवर काडीचाही विश्वास नाही बरं का!
असं? मग रोज वर्तमानपत्रातले राशी भविष्य कशाला रे पाहतोस?
हॅ! त्यात काय! जरा गंमत म्हणून बघतो झाले. अरे त्यातली गंमत तुला सांगतो. ऐक! हल्लीच एकदा काय लिहिले होते तर 'आज बायकोपासून सुख मिळेल'! आहे की नाही गंमत! आता बायकोच नाही हयात तर तिच्यापासून सुख कसे मिळणार?पण हे बेटे मनाला येईल ते लिहितात.कधी कधी हे लोक काय लिहितात ते त्यांना तरी कळत असेल की नाही ह्याची मला शंका येते.
काय ते नीट बोल! उगीच फेकाफेक करु नकोस! रोज सगळ्या राशींचे भविष्य न चुकता वाचतोस ते कशाला रे आणि तुझी रास कुठली बरं?तशी पत्रिकेप्रमाणे म्हणजे चांद्र रास म्हटलीस तर कुंभ आहे आणि सुर्यरास(इंग्रजी जन्म तारखेप्रमाणे) पण कुंभच आहे. मला हे कळत नाही की एक सकाळी उगवतो(म्हणजे तो उगवला की सकाळ होते असे म्हणू या)आणि एक रात्री. मग तरीही माझ्या दोन्ही राशी कुंभ कशा?
हे असले प्रश्न मला विचारू नकोस(हवे तर एखाद्या ज्योतिषाला विचार)!उगीच माझं डोकं खाऊ नकोस. विषय कुठे सुरु झाला आणि तू कुठे पोचलास. मी तुला कदमकाकांनी सांगितलेले भविष्य सांगत होतो. मी आता विचारीन त्या प्रश्नाची सरळ उत्तरे निमूटपणे दे. जास्त पकपक करू नकोस! काय? हां,आता तुझे उत्तरायुष्य सुरु झालेय! बरोबर?
बरोबर आहे बाबा! बोल पुढे!
तर हल्ली तुझ्या मनात कसले कसले विचार येतात ते तू मगाशीच बोललास. ते विचार सामान्य माणसाला कधी सुचतात काय मला सांग? माझ्या मते असले विचार नेहमी तत्वज्ञानी आणि संन्यस्त माणसांनाच पडतात.
अरे पण मी पण चारचौघांसारखाच आहे ना! मलाही ते तुम्ही काय म्हणता, त्या षडरिपुंनी वेढलंय ना! मी कुठे त्या मोठ्या लोकांसारखा वागतो? हां! आता कधी कधी नाटक करतो मोठेपणाचे. कुणी फसतं ! कुणी हसतं! पण मी आपला साधा,सरळ आणि सामान्य माणूस आहे. आता रिकामा वेळ असतो म्हणून कदाचित उगीचच हाय-फाय विचार करत असेन. बाकी अजून कसलाही मोह सुटलेला नाहीये. उगीच तू सुतावरून स्वर्गाला जाऊ नकोस! ह्या जगात सगळ्यात सोपे काय आहे? तर ते म्हणजे तत्वज्ञान सांगणे,उपदेश करणे! आपण फक्त सांगायचे असते! तसे वागायचे कधीच नसते! आणि मी तरी वेगळे काय करतोय? काय समजलास बेंबट्या???
क्रमशः
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा