माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२० सप्टेंबर, २००७

आठवणी!शालेय जीवनातल्या!११

मी घरी पोचायच्या आधीच ही बातमी घरी पोचली होती. वाडीतली काही मुले माझ्याच शाळेत मागच्या-पुढच्या इयत्तेत होती. त्यांनी ती बातमी जरा जास्तच तिखट-मीठ लावून माझ्या आईला सांगितली होती. आई दारात सचिंत मुद्रेने उभी होती. मी दिसताच ती लगबगीने पुढे आली. माझ्या हातातले दप्तर घेऊन मला तिने आत नेले. कपडे बदलून हात-पाय धुवून मी खायला बसलो. सगळे होईपर्यंत तिने मला काहीच विचारले नाही पण तिचे निरीक्षण चालूच होते.

माझे खाणे आटोपल्यावर मी हात धूवून खेळायला पळणार इतक्यात तिने मला थांबवले आणि झाल्या प्रकाराबद्दल विचारले. मी जे काही घडले ते तिला सांगितले. एकीकडे मुलावरचा विश्वास(कारण तिने केलेले संस्कार) आणि दुसरीकडे शिक्षकांबद्दलचा आदर(त्या काळात 'छडी लागे छम छम,विद्या येई घम घम' ह्या उक्तीवर पालक-शिक्षक ह्या दोघांचाही विश्वास होता) अशा विचित्र कात्रीत ती सापडली होती.तिने काहीच मतप्रदर्शन केले नाही पण माझ्या अंगाला हळुवार हाताने तेल चोळुन दिले.

मी जरी वर वर शांत दिसत होतो तरी मनातुन खूप चिडलो होतो. मला येत असतील नसतील त्या सर्व शिव्या सरांना देऊन (मनातल्या मनातच) झाल्या होत्या. कैक वेळेला 'बेडकी,बेडकी' असे देखिल बोलून झाले होते.पण तरीही भर वर्गात झालेला अपमान(तोही मुलींसमोर!) मी विसरू शकत नव्हतो. माझे विचारचक्र चालूच होते. मी ताकतवान असतो तर "भेंडी! ह्या बेडकीला चेचून टाकले असते. यंव केले असते आणि त्यंव केले असते" असे मनातल्या मनात धुमसत होतो.पण बाहेर खेळायला गेलो,तिथला गार वारा अंगाला लागला आणि हळूहळू खेळात रमलो. खेळून पुन्हा येईपर्यंत सगळे विसरलो होतो. मात्र आता अंग चांगलेच ठणकायला लागले होते. आईकडे तशी तक्रार केल्यावर तिने पुन्हा अंगाला हळुवार हाताने तेल लावून गरम पाण्याच्या पिशवीने अंग शेकून काढले. त्यानंतर थोडे बरे वाटले. मग जेवण,थोडा गृहपाठ करून झोपी गेलो.

दुसर्‍या दिवशी जाग आली तेव्हा पुन्हा अंग ठणकत होते. अंगही चांगलेच तापले होते. त्या दिवशी आईने मला शाळेत पाठवलेच नाही. ती आपली दिवसभर माझी सेवा सुश्रुशा करण्यातच गुंतली होती. संध्याकाळपर्यंत ताप उतरला होता. अंगदुखी देखिल कमी झाली होती. तेव्हा कुठे तिने नीट श्वास घेतला. हा सगळा प्रकार वडिलांच्या कानावर घातलेलाच नव्हता.तिचे तीच एकट्याने सगळे निस्तरत होती. तसेही आमच्या घरात दिवसभर मुलांनी काय खोड्या केल्या,कुणाला मारले,कुणाकडून मार खाल्ल्ला असल्या तक्रारी वडिलांपर्यंत कधीच पोचत नसत. आईच काय तो सगळ्याचा सोक्ष-मोक्ष लावत असे. तीच आम्हाला शिक्षा करत असे आणि तीच आमची गार्‍हाणी सोडवत असे. आमच्या सबंध वाडीत संध्याकाळी सर्व घरातून मारझोड,रडारडीचे आवाज येत त्याला अपवाद फक्त आमचे घर होते. वाडीतल्या इतर बायका आल्या आल्या आपल्या मुलाचे दिवसभराचे प्रताप सांगून आपल्या नवर्‍याला हैराण करत. मग ती बाप-माणसं आपापल्या मुलांना धोपटीत तरी नाहीतर त्याचे बखोट पकडून ज्याने त्यांच्या मुलाला मारले असेल त्यांच्याकडे भांडायला तरी जात. असे सगळे गोंगाटमय वातावरण तेव्हा समस्त वाडीत असे. त्याउलट आमच्या घरी शुभंकरोती,परवचा वगैरे चालत. ह्या सगळ्याचे श्रेय आईकडे होते. कार्यालयातून दमून थकून आलेल्या आपल्या नवर्‍याला घरी आल्यावर तरी आराम मिळावा अशी शुद्ध भावना त्यामागे होती.घरातली कर्ती सवरती स्त्री खमकी असली की त्या घरातल्या पुरुषाला देखिल सुख मिळू शकते हा फार मोठा धडा माझ्या लहानपणीच आईकडून आम्हा सर्व भावंडांना मिळाला.

मी तिसर्‍या दिवशी शाळेत गेलो तेव्हा सर्व वर्ग-बंधुंनी माझी विचारपूस केली आणि सरांना भरपूर दूषणे दिली. पण आता माझा राग केव्हाच शांत झाला होता. त्या दिवशीही बेडेकर सरांचा तास होता. ते नेहेमीप्रमाणे वर्गात आले. त्यांनी शिकवलेही.मात्र त्यांचे शिकवण्यात लक्ष नव्हते. माझ्या दिशेला ते नजर देखिल टाकत नव्हते. कदाचित त्यांची चूक त्यांनाच कळली असावी असे वाटत होते(पण हा माझा भ्रम होता हे पुढे कित्येक वर्षांनी कळले).त्यानंतर विशेष असे काहीच घडले नाही.

हा प्रसंग घडून गेला.पुढे मी शालांत परीक्षा पास झालो.पुढचे शिक्षण घेऊन नोकरीला देखिल लागलो.असेच एकदा उपनगरी रेल्वेतून प्रवास करत असताना माझ्या बाजूला एक गृहस्थ येऊन उभे राहिले. मी त्यावेळी पुस्तक वाचनात दंग होतो. दादर की काहीसे स्थानक आले आणि मी पुस्तकातून डोके बाहेर काढले आणि वर पाहिले तर समोर बेडेकर सर उभे होते. मी पटकन उठून त्यांना जागा दिली. त्यानंतर त्यांना माझी ओळख दिली कारण आता मी बराच उंच झालो होतो. दाढी-मिशाही उगवल्या होत्या. त्यामुळे त्यांनी मला ओळखणे शक्यच नव्हते.बर्‍याच खाणखुणा पटवल्यानंतर त्यांनी मला ओळखले.

मग मी हळूच म्हणालो, "सर! आठवतं? तुम्ही मला एकदा बेदम मारले होते आणि तेही माझी काहीही चूक नसताना"!क्षणभर त्यांच्या चेहर्‍यावरचे भाव बदलले. मला वाटले. ते म्हणतील. " अरे हो! आठवलं! खरेच माझी चूक झाली! तुला मी निष्कारण मारले होते. मला खूप वाईट वाटले नंतर! असा कसा रे मी वागलो"?मग मी म्हणेन, " सर! जाऊ द्या हो! त्याचे काय एव्हढे! वगैरे वगैरे"!

पण कसलं काय नी कसलं काय! त्याही परिस्थितीत सर मला म्हणाले, "तू खूप व्रात्य होतास त्यावेळी आणि तो आवाजही तूच काढला होतास हे मला पक्के माहित होते.म्हणून मी तुला शिक्षा केली होती.मी कधीच चूक करत नाही. काय समजलास"?
मी पुढे काहीही बोललो नाही. उपयोग तरी काय होता म्हणा!इथे मला नेहमीच्या वापरातली एक म्हण थोडीशी बदलून सांगावीशी वाटते. ती म्हणजे "गाढवापुढे वाचली गीता आणि वाचणारा गाढव होता"!

आजही सर मला नियमितपणे दिसतात. वय झालं असलं तरी तब्येत राखून आहेत.स्वत:च्या नादातच रमत-गमत रस्त्यातून फिरत असतात. मीच त्यांच्यापुढे म्हातारा दिसतो. आता तर ते मला ओळखत देखिल नाहीत.तरी वाटते,पुढे व्हावे,नमस्कार करावा आणि आपली ओळख पटवावी.पण आता मात्र मी त्या भानगडीत पडत नाही.मला पाठमोरे होऊन गजगतीने दूर दूर जाणार्‍या सरांकडे मी नुसतेच पाहत बसतो.

मनातल्या नीरगाठी वरून ब्रह्मदेव जरी खाली उतरला तरी सोडवू शकेल असे आता वाटत नाही.

क्रमश:

३ टिप्पण्या:

Yogesh म्हणाले...

Pramodkaka, khoopach manamokala ani oghavata lihita tumhi. Pudhil bhaganchi utsukata lagali ahe.

abhijit म्हणाले...

मस्तच लिहीलय राव. मीही एकदा दोनदा प्रचंड मार खाल्लाय पण त्या आधी चूक करण्याची खबरदारी घेतली होती. लहान असताना रडण्याखेरीज आपण काहीच करू शकत नाही. पूर्वी शिक्षक चांगले असायचे त्यामुळे त्यांनी मारलं तरी चांगल्यासाठीच मारलं असाव असा समज होता त्यामुळे पालक मध्ये पडत नसत. पण आता शिक्षणाचा दर्जा खालावल्यामुळे पालकही जागरूक असतात आणि सरकारही न मारण्याविषयी कायदे करतंय.

TheKing म्हणाले...

"गाढवापुढे वाचली गीता आणि वाचणारा गाढव होता"!

जुन्या म्हणीला एक तेजस्वी भावंड दिल्याबद्दल थॅंक्स!

:-)