माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

१७ सप्टेंबर, २००७

आठवणी!शालेय जीवनातल्या!१०

स्पर्धांमध्ये बक्षीसे मिळवत असल्यामुळे मी बर्‍याच शिक्षकांचा लाडका होतो. अभ्यासात मध्यम असूनही हुशारपणाचा शिक्का माझ्यावर बसला होता.वर्गात माझे वागणे अगदी आदर्श मुलासारखे नसले तरी एक प्रामाणिक,सरळमार्गी मुलगा असा नावलौकीक होता. तसा मी वर्गबंधूंमध्येही प्रिय होतो. अजून काय हवे असते आपल्याला! तसा मी मस्ती करत असे,खोड्याही काढत असे;पण ते सर्व वर्गात शिक्षक नसताना. शिक्षक वर्गात शिकवताना मात्र मी ते काय शिकवताहेत ह्या कडे लक्ष देत असे. गणित हा माझा तसा नावडता विषय आणि त्यातही अंकगणित हे तर अत्यंत नावडते होते. पण इंग्लिश हा विषय माझ्या विशेष आवडीचा विषय होता.

पाचवीपासूनच आम्हाला इंग्रजी हा विषय होता. तो विषय शिकवणारे घैसास गुरुजी दिसायला अतिशय खडूस असे होते. त्यातून त्यांच्या लाल काड्यांच्या चश्म्यामुळे ते अजूनच रागीट दिसत. पण दिसते तसे नसते हेच खरे! हे गुरुजी इतके सुंदर शिकवत की आम्हा मुलांच्या इंग्रजीचा पाया एकदम भक्कम झाला. एरवी रागीट चर्या असणारे गुरुजी शिकवायला लागले की एक विलक्षण तेज त्यांच्या चेहर्‍यावर विलसत असे. ह्या जगाच्या पलीकडल्या जगात ते पोचत. त्यांच्या त्या भावमुद्रा टीपण्यात आणि त्यांचे ते ओजस्वी शब्द कानात साठवण्यात आम्ही सगळे इतके तल्लीन होत असू की तासिका संपल्याची घंटा देखिल कधी कधी ऐकू येत नसे;पण पुढच्या तासाचे शिक्षक येऊन आम्हा सगळ्यांना त्या भावमुद्रेतून जागे करत आणि नाईलाजाने आम्ही वर्तमानात प्रवेशत पुढच्या विषयाकडे वळत असू.

आमच्या सुदैवाने आम्हाला इंग्लिश ह्या विषयाला ८वी पर्यंत एकापेक्षा एक चांगले गुरुजी मिळत गेले आणि त्याचाच परिणाम म्हणजे आमचे इंग्लिशचे व्याकरण अगदी पक्के झाले. ६वीला ओगले नावाचे गुरुजी आम्हाला इंग्लिश शिकवायला आले. ५फुटाच्या आतबाहेर उंची,काळा वर्ण,डोक्यावरले केस अतिशय विरळ झालेले,लाल काड्यांचा चश्मा(त्या वेळी लाल काड्यांची फॅशन होती की काय न कळे) धोतर, सदरा आणि कोट असा त्यांचा वेष होता. दिसायला तसे अतिशय सामान्य असे हे गृहस्थ आम्हाला ज्या दिवशी पहिल्यांदाच वर्गात आले तेव्हा आमचे त्यांच्याबद्दलचे मत फारसे अनुकूल असे नव्हते. पण त्यांनी शिकवायला सुरुवात केली आणि आम्ही कधी त्यांच्या अधीन झालो हे देखिल आम्हाला कळले नाही इतके ते सुंदर शिकवत होते. शब्दांचे उच्चार कसे करायचे, कुठे आघात करायचा,कुठे हलकेच उच्चार करायचा हे ते प्रात्यक्षिकासहित दाखवत त्यामुळे आम्हाला हे गुरुजी अधिकच आवडू लागले. कविता शिकवताना तर त्यांची तंद्रीच लागायची. कवितेत कवीने ज्या भावना व्यक्त केलेल्या असत त्या आमच्यापर्यंत पोचवण्यात ते अतिशय कुशल होते. वेळ प्रसंगी उड्या मारून,माकडचेष्टा करत ते आम्हाला हसवत, करूण प्रसंगात ते आम्हाला रडवतही. कवितेतल्या भावविश्वात आम्हाला ते सहजपणे रममाण करत असत. हे शिकवणे इतके जीवंत होते की त्या तुलनेत मराठी विषय शिकवताना त्यातल्या कविता आमच्या पर्यंत पोचवण्यात मराठी विषयाचे शिक्षक कमी पडत. त्यामुळे इंग्लिश हा आमच्या सर्वांच्याच आवडीचा विषय झाला ह्यात नवल ते कसले.

७वीत बेडेकर सर नावाचे शिक्षक इंग्रजीसाठी आले. तेही तसे उंचीने सामान्यच होते.पण लख्ख गोरे आणि घारे डोळे हे त्यांचे वैशिष्ठ्य! खणखणीत आवाज(ह्या आधीच्या दोन्ही गुरुजींचाही आवाज असाच खणखणीत होता). अतिशय मिस्किल स्वभाव. विषयाला धरून शिकवणे होतेच पण त्याव्यतिरिक्त बाहेरचे देखिल शिकवीत. शिस्तीला कडक होते तितकेच मऊ देखिल होते;पण एक विक्षिप्तपणाची झांक त्यांच्या स्वभावात होती. कधी हसतील,कधी खूश होतील,कधी चिडतील सांगणे कठीण होते. त्यांच्या ह्या स्वभावाचा मला आलेला हा अनुभव पाहा.....

ह्या सरांना मुले 'बेडकी' असे चिडवत. तसे कुठल्या ना कुठल्या स्वरूपात प्रत्येक शिक्षक-शिक्षिकेला नावे ठेवली जातच असत. तर त्या दिवशी सर अतिशय समरसून एक धडा शिकवत होते. वर्ग अगदी चित्रासारखा स्तब्ध होता. सरांच्या मुखातून निघणार्‍या प्रत्येक शब्दाचे जीवाचे कान करून श्रवण चालले होते. एक कठीण शब्द फळ्यावर लिहिण्यासाठी म्हणून सर वळले आणि कुठूनतरी दबक्या आवाजात "ए बेडकी"! अशी हाक आली. सरांपर्यंत ती हाक गेली आणि ते चमकून मागे वळले. त्यांचा गोरापान चेहरा लालबुंद झाला होता. "कुणी हाक मारली" असा करडा सवाल त्यांनी केला पण कुणीच काही बोलेना. सरांनी करडेपणाने वर्गावरून एक नजर फिरवली आणि ती नजर माझ्यावर येऊन स्थिर झाली. मी शहारलो पण मी तसे काही केले नसल्यामुळे खात्री होती की तो निव्वळ योगायोग होता.

मी पहिल्याच बाकावर बसत असे. हळूहळू सर माझ्यापर्यंत आले. मला आता मात्र भीती वाटू लागली आणि ती बहुधा माझ्या चेहऱ्यावर दिसली असावी. सरांनी मला उभे राहायला सांगितले आणि प्रश्न केला, "बोल! कोणी हाक मारली"?
"सर! मी नाही मारली! मला माहित नाही कुणी मारली ते"!
टिळकांबद्दलची भाषणे देऊन आणि त्यांच्या निर्भीडपणाबद्दल जनमानसात असलेल्या कौतुकाच्या भावनेचा त्यावेळी माझ्यात संचार झाला असावा! पण सरांवर त्याचा काडीचाही परिणाम झाला नाही. त्यांनी एक सणसणीत मुस्कटात ठेऊन दिली माझ्या आणि मी तिरिमिरी येऊन खाली पडलो. सरांनी माझे बखोट पकडून मला पुन्हा उभे केले आणि पुन्हा तोच प्रश्न केला, "आता तरी बोल! कोणी हाक मारली"! मी खरे तेच बोलत होतो पण सरांचा का कुणास ठाऊक माझ्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. त्यांनी मला अजून दोनचार थपडा लगावल्या. हेची फल काय मम तपाला! असे बोलण्याची माझ्यावर पाळी आली होती. माझी इतक्या वर्षांची उजळ प्रतिमा एका क्षणात नष्ट झाली होती. सरांचा मार इतका जोरकस होता की मला रडू फूटणार होते पण मुलींच्या देखत रडणे म्हणजे नामर्दपणा ठरेल म्हणून मी कसे तरी स्वतःला रोखले होते. सुरुवातीला मुली गालातल्या गालात हसत होत्या(का कुणास ठाऊक) पण जेव्हा सरांनी मला पुन्हा पट्टीने मारायला सुरुवात केली आणि मला रडू रोखणे अशक्य झाले तेव्हा मी अगदी मनसोक्त (सूर लावून) रडू लागलो आणि मग मुलींनाही रडू आवरेना. सर बेभानपणे मला मारत होते. मीच ती हाक मारली होती असा त्यांचा आरोप होता आणि वर मी खोटेही बोलतोय हा अजून दुसरा आरोप होता. आणि माझ्या रडण्या-भेकण्याकडे संपूर्ण दूर्लक्ष करून मिळेल तिथे त्यांचे फटके मारणे चालू होते. त्यांच्या डोळ्यात खून उतरला होता. मी निपचित पडेपर्यंत त्यांनी मला मारले आणि थोडावेळ ते जाऊन स्वस्थपणे खूर्चीवर बसले.

मी जशी पुन्हा हालचाल करू लागलो तसे ते पुन्हा पट्टी घेऊन आले पण आता त्यांनी मला न मारता अंगठे धरून उभे केले आणि पाठीवर पट्टी ठेवली. ती पट्टी खाली पडली तर पुन्हा मार मिळेल असे दरडावून खूर्चीवर जाऊन बसले. ह्या सगळ्या तमाशात तासिका संपल्याची घंटा झाली आणि पुढच्या विषयाचे शिक्षक वर्गाबाहेर येऊन उभे राहिले. त्यांनी मला त्या अवस्थेत पाहिले आणि चटकन पुढे होत माझ्या पाठीवरची पट्टी उचलून मला नीट उभे केले. हे पाहताच बेडेकर सर पुन्हा भडकले आणि त्यांनी मला बखोटीला धरून वर्गाबाहेर काढले आणि मारत मारत मुख्याध्यापकांच्या दालनाकडे कूच केले.

मला काहीच कळत नव्हते. मी आज असे काय केले,सकाळी सकाळी कुणाचे तोंड पाहिले म्हणून ही इतकी भीषण शिक्षा मला मिळतेय.तसा बघायला गेले तर मी बेडेकर सरांचाही लाडका होतो. मग आज हे काय घडतंय? माझी ती 'वरात' बघणार्‍या बर्‍याच शिक्षकांनी वाटेत मध्यस्थी करायचा प्रयत्न केला पण सरांनी कुणालाच धूप घातली नाही. सर नुसते शिक्षक नव्हते तर पर्यवेक्षकही होते. त्यामुळे इतर शिक्षकांच्या मध्यस्थीचा काहीही उपयोग झाला नाही. मला पुन्हा मुख्याध्यापकांच्या खोलीबाहेर अंगठे धरून उभे केले आणि पाठीवर पट्टी आणि माझ्यावर देखरेख ठेवायला एका शिपायाला ठेऊन दुसऱ्या वर्गावर निघून गेले.

ह्या गोष्टीची खबर मुख्याध्यापकांकडे गेली. तेही त्यांच्या कक्षातून बाहेर आले आणि स्तिमितच झाले. माझ्यासारख्या सरळमार्गी मुलाला ही शिक्षा कुणी केली आणि का ह्या प्रश्नाचे उत्तर 'बेडेकर सरांनी' इतकेच मिळाले. का ते कोण सांगू शकणार? मुख्याध्यापकांनी शिपाया मार्फत सरांना ताबडतोब बोलावून घेतले आणि कारण विचारले. बेडेकर सरांनी माझ्या विरुद्धच्या आरोपाचा पुनरुच्चार केला आणि म्हणाले ह्याला आज शाळा सुटेपर्यंत असाच उभा ठेवायचंय! मुख्याध्यापकांनी त्यांना समजावण्याचा एक अयशस्वी प्रयत्न केला पण सर आज कुणाचेच ऐकणार नव्हते आणि एका विद्यार्थ्यापायी मुख्याध्यापक त्यांच्याशी उगाचच संबंध बिघडवायला देखिल तयार नव्हते. त्यामुळे मला त्यादिवशी शाळा सुटेपर्यंत ती शिक्षा भोगणे क्रमप्राप्तच झाले.

शाळा सुटण्याची घंटा झाली. घरी परतणारी सगळी मुले माझ्याकडे बघत बघत, हसत-चिडवत,चुकचुकत निघूनही गेली. सगळा शिक्षकवर्गही एकएक करून चुकचुकत गेला. मी वाट पाहत होतो की कधी एकदाचे सर येताहेत आणि ह्यातून माझी सुटका करताहेत. पण कसले काय? मुख्याध्यापक जेव्हा घरी जायला त्यांच्या खोलीतून बाहेर पडले तेव्हा त्यांनी मला त्या स्थितीत पाहिले आणि धावत येऊन माझी सुटका त्यांनी केली आणि घरी जा असे सांगितले;पण मी सरांचा इतका धसका घेतला होता की त्यांनी घरी जा म्हटल्याशिवाय जाणार नाही असे म्हणालो. त्यावर सरांना बोलावण्यासाठी शिपाई गेला तेव्हा त्याला कळले की सर जाऊन अर्धा तास झालाय. मग माझी समजूत काढून मुख्याध्यापकांनी मला पाणी पाजले. हात-तोंड धूऊन यायला सांगितले. वर्गातून माझे दप्तर शिपायाकडून मागवून घेतले आणि मला बरोबर घेऊनच शाळेतून बाहेर पडले.

क्रमश:

२ टिप्पण्या:

vivek म्हणाले...

यापेक्षा "ए बेडकी" अशी हाक मारुन फटके मिळाले असते तर बरं झालं असतं असं तुम्हाला निश्चित वाटलं असणार. उगाच आपलं "खाया नही, पिया नही, सिर्फ ग्लास फोडा, और पचास रुपया दंड" अशी तुमची परिस्थिती झाली. असो, वाचून तुमची फार कीव आली. रडावंसंही वाटलं (इतर मुलींप्रमाणे) पण लोकलज्जेस्तव नाही करता आलं. तुमच्या दु:खात मी सहभागी आहे.

vivek म्हणाले...

इंग्रजी हा तुमचा आवडता विषय हे तुमचं अलिकडचं "वर्तन" पाहून खरं वाटत नाही ;-)
मराठीचा अट्टाहास मान्य हो, तो माझाही असतो, पण कधीतरी तुमच्या इंग्रजीच्या आवडीची झलकही दिसू दे की राव आम्हाला. "त्या काळच्या लोकांचं" (हा तुमचं वय झालंय असं म्हणण्याचा छुपा प्रयत्न नाही बरं का) इंग्रजी मला फार आवडतं. एक वेगळं वजन असायचं.